सॉफोक्लीझ : (४९६–४०६ इ. स. पू.). प्राचीन ग्रीक शोकात्मिकाकार. जन्म अथेन्सजवळील कोलोनस येथे एका सुखवस्तू कुटुंबात. त्याला उत्तम शिक्षण मिळाले होते. तो रुपवान होता. नृत्य, वादन (लायर हे सॉफोक्लीझतंतुवाद्य तो उत्तम प्रकारे वाजवीत असे ) अशा कलांत तो प्रवीण होता. कुस्तीतही त्याने प्रावीण्य संपादिले होते. सॅलमिसच्या लढाईत ( इ. स. पू. ४८०) ग्रीकांनी पर्शियनांवर मिळविलेल्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी जो गायक-वादक वृंद उभा केला होता, त्याचे नेतृत्व त्याने केले होते. ग्रीक नाटककारांत नाट्यलेखनाच्या स्पर्धा होत, इ. स. पू. ४६८ मध्ये झालेल्या स्पर्धेत थोर ग्रीक शोकात्मिकाकार ⇨एस्किलस ( इ. स. पू. ५२५–४५६) ह्याच्यावर सॉफोक्लीझने मात केली होती. अशा नाट्यलेखनस्पर्धांतून त्याने अनेक पारितोषिके प्राप्त केली होती. सॉफोक्लीझने १२५ च्या आसपास नाटके लिहिली, असे म्हटले जाते तथापि आज आपणास त्याची पुढील सात नाटकेच उपलब्ध आहेत : (१) अँटिगॉन ( इ. स. पू. ४४१), (२) ईडिपस टिरॅनस, (३) इलेक्ट्रा, (४) अजॅक्स, (५) द विमेन ऑफ ट्रेचिस (१९५७, इं. भा.) ह्या नाट्यकलाकृतींची निर्मितिवर्षे अनुपलब्ध आहेत. (६) फिलॉक्टीटीझ (इ. स. पू. ४०९) आणि (७) ईडिपस ॲट कलोनस ( इ.स.पू. ४०१).

सॉफोक्लीझच्या उपर्युक्त नाट्यकृतीं पैकी अँटिगॉन ही नाट्यकृती आधुनिकांना सर्वांत आवाहक वाटत आलेली आहे. आधुनिक जर्मन नाटककार ⇨ बेर्टोल्ट ब्रेक्ट (१८९८–१९५६) आणि फ्रेंच नाटककार ⇨ झां आनुईय (१९१०– ८७) ह्यांनी ह्या नाट्यकृतीच्या आधारे अनुक्रमे ‘द अँटिगॉन ऑफ सॉफोक्लीझ’ (१९४८, इं. शी.) आणि आँतिगॉन (१९४४) ही आपली नाटके लिहिली. ईश्वरी कायदा आणि मनुष्याने निर्मिलेला कायदा ह्यांच्यातील संघर्ष ह्या नाटकात सॉफोक्लीझने प्रभावीपणे रंगविला आहे. एका पातळीवर हाच संघर्ष राज्ययंत्रणा विरुद्घ व्यक्ती असाही प्रकट होतो. ह्या नाटकात दोन परस्परविरुद्घ दृष्टिकोणांतले ताण आणि तोल सॉफोक्लीझ ताकदीने सांभाळतो मात्र ईश्वरी कायद्याचे, व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अँटिगॉन कडे प्रेक्षकांची सहानुभूती सहजपणे जाते. ईडिपस टिरॅनस ही सॉफोक्लीझची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती मानली जाते. परिपूर्ण ग्रीक नाट्यकृती म्हणून ⇨ॲरिस्टॉटलन ने ह्या नाटकाला मान्यता दिलेली आहे. केवळ अज्ञानामुळे राजा ईडिपस आपल्या पित्याचा वध करतो आणि त्यानंतर स्वत:च्या आईशी विवाहबद्घ होतो. हे भयंकर सत्य पुढे जेव्हा त्यास समजते, तेव्हा तो स्वत:चे डोळे फोडून घेतो. ह्या नाटकातून सॉफोक्लीझ न्यायाचा प्रश्न उपस्थित करतो. विवेकशून्य दुष्टता ह्या जगात का आहे ? जो मनुष्य मूलत: सज्जन आहे, त्याच्या वाट्याला असह्य यातना का याव्यात ? याचे उत्तर न्यायाच्या एका विशिष्ट संकल्पनेत आढळते. विश्व हा एक तोल आहे एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था नैसर्गिक नियमांना अनुसरते. मनुष्य कितीही चांगला, सद्‌भावप्रेरित असो नैसर्गिक नियमांचे उल्लंघन त्याच्याकडून झाले, की त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणारच. ईडिपस रेक्स आणि ईडिपस द किंग ( इं. भा. १९२८) ही ह्या शोकात्मिकेची पर्यायी नावे. ईडिपस ॲट कलोनस ( इं. भा. १९५७) मध्ये ईडिपस टिरॅनस ची पुढची कथा आलेली आहे. इलेक्ट्रा मध्ये ट्रोजन युद्घावरुन परत आलेल्या आपल्या पित्याचा खून करणारी आपली माता आणि तिचा प्रियकर ह्यांचा खून इलेक्ट्राना आपल्या भावाच्या मदतीने कसा करते, हे दाखविले आहे. अजॅक्स मध्ये ट्रोजन युद्घातील एक वीर अजॅक्स ह्याची मानखंडना आणि मृत्यू दाखविला आहे. द विमेन ऑफ ट्रेचिस ह्या नाटकात दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या आपल्या पतीचे प्रेम पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नात एक स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूलाच कशी कारणीभूत होते, ह्याचे नाट्यात्म दर्शन घडते. फिलॉक्टीटीझ मध्ये त्याच नावाच्या एका वीराकडे असलेले जादूचे धनुष्य पळवण्यासाठी ओडिस्यूस आणि त्याचा साथी निओप्‌टोलेमस हे प्रयत्नशील असलेले दिसतात. ट्रॉयचे युद्घ जिंकण्यासाठी त्यांना ह्या विशिष्ट धनुष्याची आवश्यकता असते. फिलॉक्टीटीझ लेम्नॉस ह्या एकाकी बेटावर एकाकीपणे राहत असतो. एके काळी त्याला झालेल्या एका जखमेतून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास नको म्हणून ग्रीक सैन्य त्याला ह्या बेटावर एकाकी टाकून निघून गेलेले असते पण आता त्याचे धनुष्य हवे असते. त्यासाठी त्याचा विश्वास संपादन करुन ते मिळवण्याचे काम ट्रोजन युद्घातील ग्रीकांचा एक समर्थ नेता ओडिस्यूस हा निओप्‌टोलेमस ह्याच्याकडे सोपवतो. फिलॉक्टीटीझला ग्रीसला नेण्याचे वचन देऊन निओप्‌टोलेमस त्याचा विश्वास संपादन करतो आणि ते धनुष्य मिळवतो. मात्र निओप्‌टोलेमसच्या सदसद्‌विवेक बुद्घीला टोचणी लागल्यामुळे तो फिलॉक्टीटीझला सांगतो, की त्याला ग्रीसला नव्हे, तर ट्रॉयला न्यावयाचे आहे, तसेच तो त्याचे धनुष्यही त्याला परत करतो तथापि त्यानंतर काही घटना घडून फिलॉक्टीटीझ स्वेच्छेने त्या धनुष्यासहित ट्रॉयला येण्यास तयार होतो. ह्या नाटकातही ग्रीक लष्करासारखी बलाढ्य शक्ती आणि तिची तमा न बाळगता आपल्या नैतिक विचारानुसार वागणारा निओप्‌टोलेमस ह्यांचा संघर्ष असून तो अँटिगॉनमधील संघर्षाचे स्मरण करुन देतो.

एक नाटककार आणि रंगतंत्रज्ञ म्हणूनही, सॉफोक्लीझ हा श्रेष्ठ कलाकार होता. त्याला त्याच्या काळात मोठी ख्याती प्राप्त झालीच पण ॲरिस्टॉटलसारख्या तत्त्वचिंतकावरही त्याच्या नाटकांचा मोठा प्रभाव होता. ग्रीक रंगभूमीवर त्याने काही महत्त्वाचे बदलही घडवून आणले. एस्किलसपासून ग्रीक शोकात्मिकेत दोन अभिनेते असावयाचे सॉफोक्लीझने तिसरा अभिनेता आणला. वृंदाची संख्या बारा होती, ती वाढवून पंधरा केली मात्र नाटकातल्या कृतीमध्ये ( ॲक्शन ) वृंदाची गुंतवणूक त्याने कमी केली. रंगभूमीवर रंगीत देखावे उभे करण्याची प्रथा त्याने आरंभिली. त्याचप्रमाणे त्रिनाट्ये लिहिण्याची पद्घत न अवलंबिता, स्वयंपूर्ण असे एकेक नाटक लिहिणे पसंत केले. संवादलेखनावर त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. वेगवेगळ्या भावना वा भावसूर प्रकट करण्यासाठी विविध प्रकारच्या वृत्तांची त्याने योजना केली. मोजके पण नेमके शब्द वापरुन समोरासमोर आलेल्या दोन व्यक्तींमधील संघर्ष परिणामकारक करण्याचे त्याचे सामर्थ्य मोठे आहे.

अँटिगॉन, ईडिपस टिरॅनस आणि ईडिपस ॲट कलोनस ह्या नाटकांची मराठी भाषांतरे सुशील परभृत ह्यांनी केली आहेत. ⇨ सदानंद रेगे (१९२३–८२) ह्यांनी ईडिपस टिरॅनस या नाटकाचे रुपांतर जयकेतू ह्या नावाने केले आहे. ⇨ पु. ल. देशपांडे (१९१९–२०००) ह्यांनी ईडिपस रेक्स चे मराठी भाषांतर केले आहे.

अथेन्सच्या सार्वजनिक जीवनातही सॉफोक्लीझने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. उदा., संगीत व साहित्य ह्यांच्या विकासासाठी अथेन्समध्ये त्याने एक संस्था स्थापन केली होती. अथेन्सच्या बाजूने काही राजनैतिक कामांतही त्याने वेळोवेळी भाग घेतला होता.

पहा : ग्रीक साहित्य शोक-सुखात्मिका शोकात्मिका.

संदर्भ : 1. Adams, Sinclair M. Sophocles the Playwright, 1957.

2. Bowra, C. M. Sophoclean Tragedy, 1944.

3. Kirkwood, George M. Study of Sophoclean Drama, 1958.

4. Kitto, H. D. F. Sophocles, Dramatist and Philosopher, 1958.

कुलकर्णी, अ. र.