स्टिसिकोरसस्टिसिकोरस : ( सु. ६४०—सु. ५५५ इ. स. पू. ). ग्रीक वृंदगीतकार. दक्षिण इटलीतील माताउरोस येथे जन्म पण सिसिलीच्या उत्तर किनार्‍यावरील हिमर हेच त्याचे वास्तव्यस्थान झाले. ग्रीक कोशकार स्यूइडस ह्याच्या मते, स्टिसिकोरसचे मूळ नाव टिसिअस असे होते. पुढे प्रभावी वृंदगीतकार ( कोरस-मास्टर ) म्हणून त्याने गाजविलेल्या कर्तृत्वावरून त्याला स्टिसिकोरस हे नाव मिळाले. महाकाव्यातील विविध वीरांच्या गुणांचे वर्णन करणार्‍या ‘ हिरोइक हिम ’ किंवा ‘ वीरस्तोत्र ’ ह्या वृंदगीत- प्रकाराचा तो प्रवर्तक मानला जातो. लायर हे तंतुवाद्य वाजवीत वृंद ही स्तोत्रे गात असे. स्टिसिकोरसच्या वृंदगीतांतून ट्रॉयचे युद्ध, महान ग्रीक योद्धा ॲगमेम्नॉन ह्याचा त्याच्या व्यभिचारी पत्नीने केलेला खून, आपल्या पित्याच्या खुनाचा ओरेस्टीझ ह्याने घेतलेला सूड, हीरॅक्लीझ ह्या पराक्रमी पुरुषाची साहसे यांसारखे विषय येतात. ग्रीक भावकवितेत स्ट्रॉफी, अँटिस्ट्रॉफी आणि एपोड ह्या तीन भागांची आवर्तने त्याने आणली. ग्रीक भावकवी ⇨ पिंडर ह्याने आपल्या उद्देशिकांची ( ओड्स ) संरचना ह्या तीन आवर्तनांनी घडवली. स्टिसिकोरसची कविता २६ भागांत संकलित करण्यात आली होती; परंतु आज तिचा काही भाग — सु. ५० ओळी — उपलब्ध आहे. त्यामुळे कवी म्हणून त्याच्या मोठेपणाचा आपण केवळ अंदाज करू शकतो. ग्रीकांनी वेळोवेळी त्याच्याबद्दल जे म्हटले आहे, त्यावरूनही आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. भावकाव्यात्म कथानिवेदनाचे एक परिणामकारक वाहन म्हणून त्याने आपला वैशिष्ट्यपूर्ण वृंदगीतप्रकार विकसित केला त्याचा आवाका वाढवला. वृंदगीताला त्याने महाकाव्याची भव्यता प्राप्त करून दिली, असेही त्याच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते.

सिसिली येथील काताना येथे तो मरण पावला. त्याचा खून करण्यात आला असाही तर्क आहे.

पहा : ग्रीक साहित्य.

कुलकर्णी, अ. र.