आंत्ररोध: आतड्यातील अर्धवट पचलेले अन्न पुढेपुढे जाण्याच्या क्रियेला अडथळा उत्पन्न झाल्यास त्या विकाराला आंत्ररोध असे म्हणतात. कित्येक प्रकारांत ग्रस्त आंत्र विभागाचा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे आंत्ररोधाच्या गंभीरपणात भरच पडते. आंत्ररोध आशुकारी (तीव्र) किंवा चिरकारी (दीर्घकाळ टिकणारा) असू शकतो. पहिला प्रकार फार गंभीर असतो. चिरकारी प्रकारातही शेवटी आशुकारी आंत्ररोध होतो.

कारणे: आंत्ररोधाचे अनेक प्रकार असले तरी त्याच्या कारणांचे तीन वर्ग आहेत : (१) आंत्राच्या पोकळीतील कारणे, (२) आंत्रभित्तीतील कारणे, (३) आंत्रबाह्य कारणे. 

(१) आंत्राच्या पोकळीतील कारणे : (अ) भ्रूणावस्थेत आंत्राच्या एखाद्या विभागातील पोकळी योग्य प्रकारे उत्पन्न झाली नसल्यास जन्मानंतर थोड्याच वेळात हा प्रकार दिसतो. छिद्रविरहित

पीळ पडल्यामुळे झालेला आंत्ररोध

गुदद्वाराशिवाय इतर प्रकार क्वचितच दिसतो. (आ) फार मोठा पित्ताश्मरी (पित्ताशयात तयार होणारा खडा) पित्ताशयातून अभिलग्न (चिकटलेल्या) आंत्राचा भेद करून आंत्रात शिरल्यास आंत्राच्या संकुचित भागात (शेषांत्रात म्हणजे लहान आतड्याच्या शेवटच्या भागात) तो अडकून आंत्ररोध होऊ शकतो. (इ) मलाचे घट्ट व टणक खडे बनल्यास आंत्ररोध होऊ शकतो. हा प्रकार चिरकारी आंत्ररोधात दिसतो. रोध बहुधा पूर्ण नसल्यामुळे आभासी अतिसार होऊन गुदमार्गाने आव व रक्त पडते. काही काळानंतर हा रोध तीव्र व पूर्ण होतो. (ई) लहान मुलांत जंतांमुळेही आंत्ररोध होऊ शकतो.

 गिळलेल्या एखाद्या टणक पदार्थामुळे अगदी क्वचित आंत्ररोध होऊ शकतो.

(२) आंत्रभित्तीतील कारणे : (अ) आंत्रभित्तीतील स्नायूंचा अंगवध (लुळे पडणे) झाल्यास आंत्राची क्रमसंकोच-क्रिया (क्रमाक्रमाने आकुंचन पावण्याची व सैल होण्याची क्रिया) बंद पडून आंत्ररोध होतो. पर्युदरशोथामुळे (पोटातील इंद्रियांवरील आवरणाला येणार्‍या दाहयुक्त सुजेमुळे) असा अंगवध होऊ शकतो. आंत्ररोध काही काळ राहिला, तरी स्नायुअंगवध (स्नायू लुळे पडून) होऊन रोध अधिक तीव्र होतो. (आ) आंत्रभित्तीत अर्बुदोत्पत्ती (पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे झालेल्या निरुपयोगी गाठीची उत्पत्ती) झाल्यास चिरकारी आंत्ररोध होऊ शकतो. कर्कार्बुदामुळे (कर्करोगात होणार्‍या गाठीमुळे) असा आंत्ररोध होतो. अर्बुद मोठे झाल्यानंतर आंत्र भित्तिस्नायु-अंगवध होऊन (आतड्याच्या भित्तीचे स्नायू लुळे पडून) तीव्र आंत्ररोध होतो.

(३) आंत्रबाह्य कारणे : (अ) भ्रूणावस्थेत पीतक-कलेचा (भ्रूणाच्या एका पातळ आवरणाचा) आंत्राशी संबंध मेकेल-अंधनालाने (आतडे व पीतक-कला यांना जोडणाऱ्या कायम स्वरूपाच्या व मेकेल या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या भागाने) येतो. हा अंधनाल पुढे नाहीसा होतो. असा तो नाहीसा न झाल्यास आंत्रापासून बेंबीच्या आतल्या भागापर्यंत त्याचा एक बंधच तयार होऊन त्या बंधाच्या पलीकडे आंत्राचे एखादे वेटोळे गेल्यास आंत्ररोध होतो. (आ) पूर्वी होऊन गेलेल्या पर्युदरशोथानंतर किंवा उदरपाटनानंतर (पोटावरील शस्त्रक्रियेनंतर) उदरातील अंतस्त्ये (इंद्रिये) व पर्युदराचा भित्तिस्तर यांना जोडणारे बंध उत्पन्न होतात. अंडवाहिनी, आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) वगैरे अंतस्त्यांभोवती असे बंध अधिक प्रमाणात उत्पन्न होतात. त्या बंधांमुळेही वरच्याप्रमाणे आंत्ररोध होऊ शकतो. (इ) उदरभित्तीमधील छिद्रातून आंत्र बाहेर उतरल्यास त्याला अंतर्गळ असे म्हणतात. अंतर्गळ परत उदरगुहेत जाऊ न शकल्यास आंत्ररोध होतो. आंत्रबंधातील (आतडे उदराच्या पश्च भित्तीला बांधणाऱ्या तंतुमय थरातील) वाहिन्या बंद पडून तेवढ्या आंत्रविभागाला कोथ (रक्तपुरवठा थांबल्याने होणारा ऊतकांचा म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा मृत्यू) होतो व त्याचे फार गंभीर परिणाम होतात. त्याला पाश ग्रस्त अंतर्गळ म्हणतात [→अंतर्गळ]. (ई) उदरगुहेतील अर्बुदांच्या दाबामुळेही आंत्ररोध होऊ शकतो. (उ) परिपीडित आंत्र म्हणजे आंत्राला पीळ पडल्यास वरच्याप्रमाणे आंत्रबंधवाहिन्या बंद पडून आंत्ररोध व कोथ होतो. हा प्रकार पुष्कळ वेळा श्रोणीतील (घडाच्या तळाशी असलेल्या खोलगट आकाराच्या हाडांच्या वलयामुळे निर्माण झालेल्या पोकळ जागेतील) बृहदांत्रात (मोठ्या आतड्यात) किंवा शेषांत्रात होऊ शकतो.(ऊ) आंत्रांत्रनिवेश म्हणजे आंत्राचा अलीकडचा भाग पुढच्या भागात प्रवेशित झाल्यास (घुसल्यास) आंत्ररोध होतो. हा प्रकार लहान मुलांत अधिक प्रमाणात दिसतो. यातही आंत्रबंधवाहिन्या बंद पडल्यामुळे कोथ होतो [→आंत्रांत्रनिवेश].

लक्षणे : (१) पोटात एकाएकी तीव्र व मुरडल्यासारख्या वेदना होऊ लागतात. या वेदना अधूनमधून अतितीव्र होतात. आंत्ररोध फार वेळ तसाच राहिल्यास तेथे कोथ होतो व त्यामुळे वेदना कमी पडतात, पण अशा प्रकारे वेदना कमी पडणे हे फार गंभीर लक्षण आहे. (२) ओकारी हे लक्षण सर्व प्रकारांच्या आंत्ररोधात दिसते. रोध आंत्राच्या सुरुवातीसच असल्यास ओकारी लवकर सुरू होते. प्रथम खाल्लेले अन्न पडते पण पुढे आंत्ररस पित्तमिश्रित पडू लागतो. ओकाऱ्या सारख्या होऊ लागल्यामुळे रक्तातील व ऊतकांतील लवणे व द्रव उत्सर्जित होऊन शरीराचे निर्जलीभवन (द्रव पदार्थांचे प्रमाण कमी होणे) होते, डोळे, गाल खोल जातात, जीभ कोरडी पडते. रोगी फार कासावीस होतो. अवसादाची (शॉकची) लक्षणे दिसतात. (३) आंत्ररोध पूर्ण असल्यास मलावरोध होतो. अपूर्ण असल्यास आभासी अतिसार होतो. बस्ती (एनिमा) दिल्यास बृहदांत्रातील मळ प्रथम पडतो, पण पुन्हा बस्ती दिल्यास काही फरक न पडलेले पाणी तसेच बाहेर पडते किंवा काढून घ्यावे लागते. (४) रोध बृहदांत्रात असेल तर पोटाच्या दोन्ही बाजूंस फुगवटी दिसते लघ्वांत्रात असल्यास बेंबीभोवती दिसते. सुरुवातीस आंत्रपरिसंकोच होत राहिल्यामुळे पोटात गुरगुरते. पण पुढे उरःश्रवणयंत्राने (स्टेथॉस्कोपने) सुद्धा काही आवाज येत नाही. (५) अवरोधस्थानाच्या वरच्या भागातील साठून राहिलेल्या द्रवात जंतूंमुळे रासायनिक अपघटन होऊन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू वा अणू बनून) विषोत्पत्ती होते व ती विषे रक्तात शोषिली गेल्यामुळे ] विषरक्ततेची (विषारी पदार्थ रक्तात मिसळल्यामुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेची) सर्व लक्षणे दिसतात. (६) पोटात गाठ लागणे विशेषतः आंत्रांत्रनिवेशात लांबट आकाराची गाठ लागते.

चिकित्सा: आंत्ररोधाची चिकित्सा पुढील तीन मुख्य तत्त्वांवर आधारलेली आहे : (१) रोधस्थानाच्या वरच्या भागात साठून राहिलेले द्रव काढून घेतात. याकरिता नाकातून जठर व ग्रहणीमध्ये लांब रबरी नळी घालतात. या नळीवाटे साठलेला द्रव पिचकारीने शोषून घेतात. त्यामुळे रोधस्थानी साठून राहिलेला द्रव व त्यात उत्पन्न होणारी विषे काढून टाकल्यामुळे, रोग्याला थोडा आराम मिळतो, तसेच ओकारी व पोटफुगी ही लक्षणेही कमी होतात. (२) सारख्या ओकाऱ्या होत राहिल्यामुळे रोग्याच्या शरीराचे निर्जलीभवन होते. ते भरून काढण्यासाठी नीलेत सुई घालून त्या मार्गाने लवणद्राव (सलाइन) सारखा देत राहिल्यास अवसाद, निर्जलीभवन ही लक्षणे कमी होतात. (३) सर्वांत महत्त्वाची चिकित्सा म्हणजे रोध कशाने झाला आहे त्याचे निदान करून तो नाहीसा करतात. त्याकरिता बहुधा शस्त्रक्रिया करून उदरपाटन करावे लागते. आंत्राचा कोथ होण्यापूर्वी जर शस्त्रक्रिया केली तर रोध नाहीसा करण्याने भागते. कोथ झाल्यावर मात्र कमीजास्त प्रमाणात कोथग्रस्त आंत्र काढून टाकावे लागते. अंतर्गळ, परिपीडित आंत्र, आंत्रांत्रनिवेश या प्रकारांत शस्त्रक्रिया शक्य तितक्या लवकर करतात. परिपीडित आंत्राला पडलेला पीळ सोडवून त्या भागाला मिळणारा रक्तपुरवठा पूर्ववत करता येतो. आंत्रांत्रनिवेशाच्या शस्त्रक्रियेत आत घुसलेले आंत्र ओढून काढणे धोक्याचे असते. त्याऐवजी खालपासून हळूहळू ढकलीत ढकलीत प्रविष्ट आंत्र सोडवून घेतात, कोथ झाला असल्यास तेवढा भाग काढून टाकतात.

आयुर्वेदीय चिकित्सा: पहा : शल्यतंत्र बद्धगुदोदर.

संदर्भ: Wakeley, C. Harmer, M. Taylor, S., Ed., Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.

ढमढेरे, वा. रा.