कुकर्बिटेसी : (सं. कर्कटी कुल). आवृतबीज (बंदिस्त बीज असलेल्या) वनस्पतींतील या एकाच कुलाचा (वर्ग-द्विदलिकीत) अंतर्भाव कुकर्बिटेलीझ या गणात केला असून यातील सर्व वनस्पतींचा प्रसार जगातील उष्ण भागात, विशेषतः उष्णकटिबंधात आहे. याचे सु. ८० वंश व ६०० जाती असून त्या सर्व ओषधीय [→ ओषधि] वेली आहेत. यांचे आधारावर

कुकर्बिटेसी कुलातील काही सामान्य जातींची फळे: (१) घोसाळे, (२) तुंबा, (३)करटोली, (४) शिवलिंगी, (५) फ्रुट, (६) पडवळ, (७) परवर, (८) तोंडले, (९) दोडका, (१०) खरबूज,(११) कडू दुधी भोपळा, (१२)दुधी भोपळा, (१३) कलिंगड, (१४) तांबडा भोपळा, (१५) भुरा कोहळा, (१६) घेर्किन, (१७) कारले, (१८) चवचव, (१९) काकडी.

चढण्याचे साधन बहुधा संवेदनाक्षम, जाड दोऱ्यासारखे व गुंडाळणारे प्रतान (तणावे) असून ते साधे किंवा शाखित असते व त्याच्या मूलस्वरूपाबद्दल (पान, खोड किंवा फांदी) मतभेद आहेत. पाने साधी, एकाआड एक, लांब देठाची, बहुधा तळाशी हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. सर्व भागांवर बहुधा थोडे फार राठ केस असतात. फुले एकलिंगी, एकाच किंवा विभक्त वेलीवर एक एकटी किंवा फुलोऱ्यात अनेक येतात ती पांढरी किंवा पिवळी, सामान्यपणे नियमित, पंचभागी, पूर्ण व दर्शनीय असतात. संदले वर अंशतः सुटी पण खाली किंजपुटाला चिकटून वाढतात. प्रदले संख्येने तितकीच, कधी सुटी, पण बहुधा अंशत: अथवा पूर्णत: जुळलेली संवर्त व पुष्पमुकुट चक्राकृती, घंटाकृती वा नरसाळ्यासारखे असतात. केसरदले दिसण्यात तीन (वस्तुत: पाच), अंशत: जुळलेली (संकेसरमंडल), संवर्तास चिकटलेली परागकोश बहुधा जुळलेले, नागमोडी किंवा सुटे, एकात एक कप्पा व बाकी दोन्हीत प्रत्येकी दोन असतात, ते बाहेरच्या बाजूस उकलतात परागण (परागसिंचन) कीटकांद्वारे होते. किंजपुट अध:स्थ किंजदले बहुधा तीन व जुळलेली किंजल्क त्रिखंडी, पण किंजल एकच (क्वचित जास्त) असतो. बीजुके अनेक, आडवी व तटलग्न (वस्तुत: अक्षलग्न) [ → फूल] पक्क मृदुफळ मांसल, बहुधा न तडकणारे,  क्वचित उभे किंवा शेंड्याकडे टोपणाप्रमाणे तडकणारे. बीजे अपुष्क (वाढणार्‍या बीजाच्या गर्भाला पोषकद्रव्ये पुरविणारा पेशीसमूह नसलेली) अनेक व चपटी असतात. या कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे. फळे बहुधा खाद्य असून काहींची फळे, फुले व पाने भाजीकरिता वापरतात. पडवळ, भोपळा, काकडी, कलिंगड, खरबूज  इ. मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत. कारले, कडू इंद्रायण, कडू दुध्या यांची फळे कडू असतात.

या कुलाचे वर्गीकरणातील स्थान विवाद्य आहे, तथापि याची अनेक लक्षणे ध्यानात घेतल्यास ते प्रगत आहे याबद्दल दुमत नाही. रूबिएलीझ आणि कँपॅन्यूलेलीझ या दोन गणांना जोडणारा कुकर्बिटेलीझ हा दुवा आहे असे मानतात. पॅसिफ्लोरेसी व बिग्नोनिएसी या कुलांशी कुकर्बिटेसी कुलाचे काही लक्षणांत साम्य आहे.

पहा : इंद्रायण, कडू कलिंगड काकडी कारले काशीफळ भुरा कोहळा घेर्किन घोसाळे चवचव  

          तोंडले दोडका पडवळ भोपळा, दुधी  भोपळा, लाल.

क्षीरसागर, ब. ग.