आ. १. बाल डायसेमिड : (१) अयुग्मक, (२) अक्षीय कोशिकेचे केंद्रक, (३) पक्ष्माभिकायुत कोशिका, (४) चामखिळीच्या आकाराची कोशिका, (५) ध्रुवीय टोपी, (६) अक्षीय कोशिका.मेसोझोआ : सूक्ष्म, कृमीसारख्या, परजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणाऱ्या) प्राण्यांचा हा एक लहान समूह आहे. हे प्राणी सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांवर परजीवी आहेत. हे प्राणी बहुकोशिक (ज्यांचे शरीर अनेक कोशिकांचे-पेशींचे-बनलेले आहे असे) असून यांच्या शरीराची रचना अत्यंत साधी आहे. यांच्या अभ्यासास शैक्षणिक महत्त्व आहे. जातीनुसार शरीर मोजक्या कोशिकांचे बनलेले असते. या कोशिका पक्ष्माभिकायुत (ज्यांच्या लयबद्ध फटकाऱ्यांनी प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न होतात अशा केसासारख्या वाढींनी युक्त) असतात व त्यांच्या एका स्त राचे शरीर बनलेले असते. या स्तरातच एक किंवा दोन जनन कोशिका (प्रजोत्पादक कोशिका) सामावलेल्या असतात. यांच्या जीवनचक्रात लैंगिक व अलैंगिक पिढ्या सामावलेल्या असतात [→ एकांतरण, पिढ्यांचे].

आ. २. लैंगिक दृष्ट्या प्रौढ ऑर्थोनेक्टिड : (अ) मादी (आ) नर (१) अग्र शंकू, (२) वृषण (पुं-जनन ग्रंथी), (३) अंड्यांचा पुंजका. यांच्या वर्गीकरणासंबंधी एकमत नाही. साधारणपणे यांचा एक स्वतंत्र संघ मानला जातो किंवा चापट कृमी (प्लॅटिहेल्मिथिस) संघाबरोबर परिशिष्ट म्हणून यांचा विचार केला जातो. यांची विभागणी दोन गणांत होते : (१) डायसेमिडा व (२) ऑर्थेनेक्टि डा.

डायसेमिडा गणातील कृमी सेफॅलोपोडांच्या वृक्कीय (मूत्रपिंडीय) इंद्रियात आढळतात. यांच्या शरीरात एक लांब अक्षीय कोशिका असते आणि तीत जनन कोशिका व भ्रूण असतात. या कोशिकेभोवती पक्ष्माभिकाय कोशिकांचा एक स्तर असतो. यातील अग्र टोकावरील कोशिकांना ‘डोके’ किंवा ‘ध्रुवीय टोपी’ म्हणतात. याचा उपयोग चूषकासारखा यजमान प्राण्यास चिकटण्यास होतो. प्रजननाच्या दोन अवस्था असतात. नेमॅटोजेन अवस्थेत अयुग्मक कोशिकेपासून (अलैंगिक जनन कोशिकेपासून) अळ्यांसारखे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसलेली सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) तयार होतात. हे जनकापेक्षा आकारमानाने लहान असतात. यामुळे यजमानाचा संसर्ग वाढतो. यानंतर ऱ्हाँ बोजेन अवस्था सुरू होते. काही जनन कोशिका उभयलिंगी जीव निर्माणकरतात. हे जीव अक्षीय कोशिकेत राहून तेथे शुक्राणू (पुं-जनन कोशिका) किंवा अंडी निर्माण करतात. फलित अंड्यापासून इन्फ्यु झोरीफॉर्म डिंभ तयार होतात आणि यांची पूर्ण वाढ झाल्यावर ते अक्षीय कोशिकेतून किंवा डायसेमिडाच्या शरीरातून बाहेर पडतात. पुढे यांचे काय होते ते ज्ञात नाही. काही जातींत सेफॅलोपॉडांमध्ये प्र थम शिरणाऱ्या नेमॅटोजेनांना स्टेम नूमॅटोजेन म्हणतात. यांपासून यथाकाळ नेमॅटोजेन अवस्था प्राप्त होते.

ऑर्थोनेक्टि ड मेसोझोआ हे अपृष्ठवंशी सागरी प्राण्यांत बहुकेंद्रकी अमीबीय (अनेक केंद्रके-कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारे गोलसर पुंज असलेली व अमीबासदृश) द्रव्ये म्हणून आढळतात. या बहुकेंद्रकी रचनांपासून पुढे लैंगिक रूपे  तयार होतात. या लैंगिक रूपात मादीचे आकारमान नरापेक्षा मोठे असते. फलित अंड्यांपासून मादी लिंग असलेले डिंभ तयार होतात व ते दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात शिरून तेथे नवीन बहुकेंद्रकी अमीबीय रचना तयार करतात.

संदर्भ : Hyman, L. H. The Invertebrata, Vol. I, New York, 1940. 

कुलकर्णी, र. ग. इनामदार, ना. भा.