प्राणिविच्छेदन : सजीवांच्या आणि विशेषतः प्राण्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने शारीरशास्त्रास फार महत्त्व आहे. शारीरशास्त्राचा अभ्यास प्राण्याचे विच्छेदन केल्याशिवाय करता येणार नाही. शारीर हा ⇨ आकारविज्ञानाचाच एक भाग आहे. शारीरशास्त्रात प्राण्याच्या शरीरातील निरनिराळ्या यंत्रणांचा चिकित्सक बुद्धीने अभ्यास केला जातो. या अभ्यासामुळे शरीरयंत्रणेच्या निरनिराळ्या क्रियांचेही ज्ञान होते. निरनिराळ्या प्राण्यांची शरीरयंत्रणा पाहिल्यावर तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करणे सोपे जाते व प्राण्यांचे परस्पर आनुवंशिक संबंधाचे काही ठोकताळे बसविता येतात. [⟶ शारीर शारीर, तुलनात्मक].

 

या प्रकारचा अभ्यास प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२-२८७) यांनी सुरू केला. या अभ्यासाचे क्षेत्र सुरुवातीस मनुष्याचे मृत शरीर तपासण्यापुरतेच मर्यादित होते. तुलनात्मक शारीराच्या अभ्यासाने आपणास असे दिसते की, पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या शरीररचनेत काही सामान्य सारखेपणा आहे. म्हणून मानवाच्या अगर इतर उच्च पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीररचनेचे आकलन करण्यास कोणत्याही पृष्ठवंशीय वर्गातील प्राण्याचे विच्छेदन करणे जरूरी पडते.

 

विच्छेदनात प्राण्याचे शरीर खोलवर कापावे लागते. हे कापणे म्हणजे नुसते तुकडे करणे नव्हे. कोणतेही एक तंत्र (शरीरातील संस्था उदा., पचन संस्था) घेऊन त्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास करावा लागतो. एका प्राण्याच्या शरीरातील जास्तीत जास्त तंत्रे कशी अभ्यासता येतील हे विच्छेदन करणाऱ्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. उदा., पचन तंत्राचा अभ्यास करताना विच्छेदन अशा रीतीने करावे लागेल की, पचन तंत्राचे सर्व भाग दिसतील पण इतर तंत्रे (उदा., रक्ताभिसरण तंत्र, जनन तंत्र वगैरे) अभ्यासाच्या दृष्टीने जागेवरच राहतील. कोणत्याही प्राण्याचे विच्छेदन करताना प्रथम कोणते तंत्र अभ्यासावे व नंतर कोणत्या तंत्राचा क्रम लावावा हे अगोदर ठरविणे आवश्यक आहे. कारण काही तंत्रे कापून बाजूस केल्याखेरीज त्याखाली दडलेली इतर तंत्रे अभ्यासता येत नाहीत.

 

वापरण्यातयेणारेप्राणी: अभ्यासाच्या दृष्टीने अशा विच्छेदनासाठी मासे, बेडूक, सरडे, पक्षी, उंदीर अगर ससे या प्राण्यांचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. काही विशिष्ट संशोधनात कुत्रे, मांजर, वानर वगैरे प्राणीही उपयोगात आणतात. या प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास केल्यावर तुलनात्मक दृष्टीने असे आढळून येते की, निरनिराळ्या तंत्रांच्या आराखड्यात सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत बरेच साम्य आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा पुढे विद्यार्थी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करावयास जातो तेव्हा तो मानवी शरीराचे विच्छेदन करतो आणि मानवाच्या निरनिराळ्या तंत्रांतील वैशिष्ट्ये त्याच्या लक्षात येतात.

 

विच्छेदनात लहान प्राण्यांचाही उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या दृष्टीने गांडूळ, झुरळ, खेकडे, गोगलगाई वगैरेंचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो पण या प्राण्यांत पृष्ठवंशी प्राण्यासारखे निरनिराळ्या तंत्रांच्या आराखड्यात साम्य नाही.

 

आ. १. विच्छेदनासाठी मेणात अंतःस्थापित केलेले झुरळ.काही वेळा विच्छेदनाच्या वेळी प्राण्याच्या शरीरातील काही ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे-पेशींचे-समूह) काढावी लागतात. ही ऊतके प्राणी मेल्यावर शक्य तितक्या लवकर काढणे आवश्यक असते. अशा वेळी क्लोरोफॉर्माच्या तंत्राचा वापर न करता डोक्यावर जोराचा तडाखा मारून प्राणी मारला जातो. बेडूक व उंदीर यांचे मृत्यू जरूर असेल, तर अशा रीतीने घडवून आणले जातात. कित्येकदा झुरळासारखे कीटक पंख कापून टाकून मेण असलेल्या लहान तबकामध्ये किंवा थोडासा खोलगट खळगा असलेल्या बशीत ठेवतात व त्यावर गरम केलेले पातळ मेण ओततात.

 

कृती: प्राणिविच्छेदन करण्यासाठी प्रथम प्राणी मारावा लागतो. या क्रियेस साधारणपणे क्लोरोफार्मासारख्या रासायनिक द्रव्याचा उपयोग करतात. एखाद्या झाकणाच्या डब्यात अगर बरणीत प्राण्यांस बंद करावयाचे व नंतर क्लोरोफॉर्मामध्ये भिजवलेला कापसाचा अगर कापडाचा बोळा त्या डब्यात टाकावयाचा म्हणजे थोडक्याच वेळात प्राण्यास गुंगी येते व क्लोरोफॉर्माची मात्रा जास्त असल्यामुळे तो प्राणी स्वतःस काहीही इजा न करून घेता मरतो. अशा मारलेल्या प्राण्याचे लगेच विच्छेदन केले जाते व पचन तंत्र, रक्ताभिसरण तंत्र, जनन तंत्र वगैरेंसारख्या तंत्रांचा अभ्यास केला जातो. तंत्रिका तंत्राचा (मज्जासंस्थेचा) अभ्यास याच प्राण्यावर ताबडतोब अगर फॉरमॅलिनासारख्या द्रव्यात टाकून नंतर काही कालाने केला तरी चालतो. फॉरमॅलिनामध्ये जतन केल्यास प्राण्याचे शरीर सडत नाही व थोडे कठीण बनते. हाडांचा अभ्यास करण्यासाठी हाडांवरील सर्व मांस काढून व हाडे स्वच्छ करून निरनिराळी अलग करावी लागतात आणि मग ती जुळवून अगर एकेकट्या हाडाचा अभ्यास करता येतो.

 

उपकरणेवसाहित्य: प्राण्याच्या विच्छेदनात निरनिराळी उपकरणे व साहित्य वापरावे लागते. मेणाचा जाड थर असलेली तबके, लाकडी फळी, दोरे, कापूस, पाणी व विच्छेदन करण्यासाठी लागणारी चाकू, कात्री, सुया, टाचण्या वगैरेंसारखी हत्यारे ही सर्वसाधारणपणे नेहमी लागतात. विच्छेदनाच्या वेळी प्रकाश योजनाही चांगली असावी लागते. जवळच विवर्धक भिंग, सूक्ष्मदर्शक वगैरेंसारखी उपकरणे असणे बरे असते. मोठ्या प्राण्यांचे हातपाय फळीवरील खिळ्यांना बांधणे सोईचे होते. यामुळे विच्छेदनाच्या वेळी कीटकाचे शरीर तुटण्याची भिती नसते (आ. १). पक्ष्याचे विच्छेदन त्याची पिसे काढून टाकून कोरड्या स्थितीतच केले जाते.

 

आ. २. गांडुळाचे विच्छेदन (यात गांडुळाच्या पचनतंत्राचा काही भाग दाखविला आहे आकडे खंडांचे क्रमांक दर्शवितात). शरीररचनेनुसार निरनिराळ्या प्राण्यांच्या विच्छेदनाच्या वेळी थोडेफार फरक करावे लागतात. अपृष्ठवंशी प्राण्यांत बरीच विभिन्नता आढळत असल्यामुळे हे फरक जरूर आहेत. वलयी [ज्याचे शरीर लांब असून वलयकारी व सारख्या खंडांनी बनलेले असते अशा  ⟶ ॲनेलिडा], कंटकचर्मी [ कंटकयुक्त त्वचा असलेले → एकायनोडर्माटा] वा मृदुकाय [⟶ मॉलस्का] प्राण्यास मारण्यापूर्वी अम्ली पदार्थ द्यावा लागतो. यामुळे या प्राण्यास शैथिल्य येते व मारण्याचे रसायन घातल्यावर त्याच्या शरीराचे आकुंचन होत नाही आणि विच्छेदन केल्यावर आतील तंत्रांचा योग्य अभ्यास करता येतो. अनेक प्राण्यांचे विच्छेदन त्यांच्या शरीरावरील विशिष्ट आवरण काढल्याशिवाय करता येत नाही. उदा., सागरी अर्चिनाच्या अंगावरील काटे, कीटकाच्या विविध खंडांवरील संरक्षक पट्टिका, कासवाच्या अंगावरील कठीण कवच.

 

सामान्यतः अपृष्ठवंशी प्राण्यांचे विच्छेदन पृष्ठीय बाजूने केले जाते (आ. २). कारण अशा प्राण्यांत अधर बाजूस तंत्रिका तंत्र असते. याउलट पृष्ठवंशी प्राण्यांत तंत्रिका तंत्र पृष्ठीय बाजूस असल्याने त्यांचे विच्छेदन अधर बाजूकडून केले जाते. (आ. ३ व ४). कोणते हत्यार केव्हा व कसे वापरावयाचे याचाही विचार करावा लागतो. उदा., बेडकाच्या विच्छेदनाच्या सुरुवातीस बुळबुळीत कातडी पकडण्यासाठी मोठ्या व रुंद टोकाच्या चिमट्याचा वापर करावा लागतो.

 

 


 

आ.३. बेडकाच्या विच्छेदनाची पद्धत

उदा., बेडकाच्या विच्छेदनाच्या सुरुवातीस बुळबुळीत कातडी पकडण्यासाठी मोठ्या व रुंद टोकाच्या चिमट्याचा वापर करावा लागतो. विच्छेदनात रक्तवाहिन्या, तंत्रिका इ. नीट दिसाव्यात म्हणून भोवतीचे संयोजी (जोडणारे) ऊतक लहान व टोकदार चिमट्याचा वापर करून काढावे लागते. शरीरातील विशिष्ट तंत्राचा भाग झाकून गेलेला असेल, तर सरळ कात्रीचे गोल टोकाचे पाते खाली करून छेद घ्यावा लागतो व वरचे आवरण बाजूस करून झाकलेला भाग अनावृत (उघडा) करावा लागतो. जर रक्तवाहिन्या चिकटलेल्या असतील, तर त्या कौशल्याने सोडवून घ्याव्या लागतात. विच्छेदनात इतर तंत्रांचा अभ्यास करीत असतानाच प्राण्याच्या ऊतकातील कोशिकांचा अभ्यास करणेही जरूर असते. अशा वेळी काचपट्टीवर ऊतक ठेवून व त्यास योग्य रीतीने अभिरंजित करून (कृत्रिम रीतीने रंग देऊन) सूक्ष्मदर्शकाखाली त्याची तपासणी करावी लागते. याचप्रमाणे विच्छेदन केल्यावर प्राण्याच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत काही परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे) जंतूही आढळतात व त्यांचाही परामर्ष घ्यावा लागतो.

 

 सजीवविच्छेदन : कित्येकदा प्राण्याच्या शरीरातील विशिष्ट भाग अगर ऊतके अन्य प्रयोगासाठी वापरावयाची असतात. अशा वेळी प्राण्यास पूर्णपणे न मारता जिवंत किंवा शुद्धिहरण करून किंवा संवेदनाहरण करून त्याचे विच्छेदन करावे लागते. यास सजीव विच्छेदन म्हणतात. गुणसूत्रांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या) अभ्यासासाठी जेव्हा प्राण्याचे वृषण (पुं-जनन ग्रंथी) अगर अंडकोश (स्त्री-जनन ग्रंथी) काढावे लागतात तेव्हा या वर उल्लेखिलेल्या तंत्राचा अवलंब करावा लागतो. ही काढलेली ऊतके त्वरित ०·७५% लवण विद्रावात अगर इतर विशिष्ट विद्रावात (उदा., सिडनी रिंगर या इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या विद्रावात) टाकावी लागतात. काही वेळा सबंध प्राणीच अशा लवण विद्रावात ठेवून त्याचे विच्छेदन करावे लागते. तसेच शरीरक्रियाविज्ञानातील काही प्रयोगांसाठी, विकृतिविज्ञानाच्या अभ्यासासाठी किंवा सूक्ष्मछेदनास इंद्रियांचे भाग घेण्यासाठीही (सूक्ष्मछेदक) केव्हा केव्हा सजीव विच्छेदन आवश्यक असते. उदा., बेडकाच्या हृदयासंबंधीच्या काही प्रयोगांच्या वेळी बेडकास भूल देऊन त्याचे विशिष्ट पद्धतीने अपवेधन किंवा मस्तिष्क-मेरुरज्जुवेधन (मेंदू व त्याच्या मागील भागातून निघणारा व पाठीच्या कण्यातून जाणारा दोरीसारखा भाग म्हणजे मेरुरज्जू यांचा नाश करणे) केले जाते. यात भूल न दिलेल्या बेडकाचे डोके डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांत धरले जाते. अंगठा कबंधावर (धडावर) ठेवून तर्जनीने डोके किंचित खाली दाबून उजव्या हातात शलाका (बारीक सळई) घेऊन प्रथम बृहद्रंध्र (कवटीतील ज्या छिद्रातून मेरुरज्जू बाहेर पडते ते छिद्र) कोठे आहे ते चाचपून पाहिले जाते. नंतर बृहद्रंध्रातून आत शलाका खुपसून मेंदू व मेरुरज्जू अलग केले जातात. नंतर त्या त्या दिशेस शलाका आत सरकवून मेंदू व मेरुरज्जूचा नाश केला जातो. इतके केले तरी प्राणी जिवंत असतो. फक्त त्याची संवेदना नष्ट होते. अशा स्थितीत केलेले विच्छेदन सजीव विच्छेदन होय.

 आ. ४. उंदराचे विच्छेदन : (अ) सुरुवातीचा छेद (आ) विच्छेदनातील एक भाग

मानवी वैद्यक व पशुवैद्यक या शास्त्रांतही शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. मृत देहात फॉरमॅलिनासारखी द्रव्ये पिचकारीने भरली जातात. यामुळे ऊतकांचे विघटन होत नाही. यानंतर शरीराचे निरनिराळे भाग करून ते विद्यार्थ्यांना विच्छेदनासाठी दिले जातात.

 

सध्या निरनिराळ्या प्रगत देशांत विच्छेदनासाठी जिवंत प्राणी वापरण्यावर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल्स यांसारख्या संस्था स्थापन झाल्या आहेत व त्या प्राण्यांच्या रक्षणासाठी जागरूक आहेत. यामुळे उंदीर, ससे, माकडे यांसारख्या मोठ्या प्राण्यांचा विच्छेदनासाठी उपयोग अगदी तारतम्यानेच केला जातो. [⟶ प्राण्यांविषयीची निर्दयता].

 

 

 

 

 

 

संदर्भ : 1. Knudsen, J. W. Biological Techniques, New York, 1966.

           2. Rowett, H. G. Q. Guide to Dissection, London, 1962.

           3. परांजपे, स. य. पांडे, अ. के. जीवविज्ञान कल्पनाविस्तार, पुणे, १९७३.

 

परांजपे, स. य. इनामदार, ना. भा.