आ. १. हृदयातील विद्युत वाहक ऊतकांची रचना : (१) उजवे अलिंद (कर्णिका), (२) डावे अलिंद, (३) उजवे निलय (जवनिका), (४) डावे निलय, (५) हिस तंतुगुच्छ, (६) या गुच्छांची डावी शाखा, (७) या गुच्छाची उजवी शाखा, (८) अलिंदनिलयपर्व, (९) कोटरअलिंदपर्व.

विद्युत् हृल्लेखन: हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलन नियंत्रित करणाऱ्या विद्युत् संदेशामुळे (आवेगामुळे म्हणजे उद्दीपनाच्या तरंगामुळे) जे विद्युत् वर्चस्व निर्माण होते, त्याचे मापन आणि आलेखन करण्याच्या तंत्राला विद्युत् हृल्लेखन म्हणतात. या तंत्राने प्राप्त होणारा आलेख (हृल्लेख, ECG किंवा जर्मन EKG इलेक्ट्रोकार्डिओग्राफ) संपूर्ण शरीराच्या त्वचेच्या पृष्ठावरील काही निवडक स्थळांना विद्युत् अग्रे टेकवून अनाक्रमक पद्धतीने (शरीराच्या कोणत्याही भागावर शस्त्रक्रिया न करता किंवा त्वचा आणि श्वेष्मल-बुळबुळीत-पटलाला इजा न करता वापरता आणावयाच्या तंत्राने) घेतला जात असल्याने आणि त्यास फारच कमी वेळ लागत असल्याने निदान व फलानुमान या दृष्टीने तो उपयुक्त ठरतो. सर्व हृद्कोशिकांच्या (हृदयाच्या पेशींच्या) विद्युत् वर्चस्वाच्या एकूण परिणामातून हा आलेख निर्माण होत असतो. हृदयाच्या कोणत्याही भागातील विकृतिजन्य बदल, रक्तपुरवठ्यातील अडथळ्यामुळे होणारे कार्यात्मक बदल आणि आवेगाची निर्मिती व वहन यांतील दोष या आलेखात प्रतीत होत असतात. रोगाच्या अवस्थेनुसार आलेखात वरचेवर फरक होत असल्याने हृदयाच्या रोगांचे वरचेवर किंवा सतत बोधन प्राप्त करणे (लक्षपूर्वक निरीक्षण करणे) शक्य होते.

या तंत्राच्या विकासामध्ये ⇨रूडोल्फ आलबेर्ट फोन कलिकर व योहासेन ग्यूलर (१८५६), ऑगस्टस  बॉलर (१८८७), ⇨व्हिलेम आयंटहोव्हेन (१९०३), सर टॉमस लुईस (१९२५), विल्सन (१९३०) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

हृदयाची आकुंचन यंत्रणा उत्तेजित करण्यासाठी आणि प्रत्येक कक्षाच्या सर्व स्नायुकोशिकांचे सुसूत्रतेने आकुंचन घडवून आणण्यासाठी विद्युत् वाहक ऊतकांची (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांची) या इंद्रियातील रचना निर्णायक ठरते. उजव्या अलिंदाच्या (कर्णिकेच्या हृदयाच्या वरच्या कप्प्याच्या) मागील भित्तीकेमध्ये असलेल्या कोशिकांचा एक विशिष्ट समूह नियमितपणे आवेगांची निर्मिती करत असतो, त्याला गतिकारक म्हणतात. त्याच्या शारीरीय स्थानावरून कोटरअलिंदपर्व असाही त्याचा उल्लेख केला जातो. त्यात निर्माण झालेला विद्युत् संदेश अलिंदांच्या भित्तींमधून सर्व दिशांना पसरून दोन्ही अलिंदांचे आकुंचन घडवतो. हाच संदेश अलिंद आणि नीलय (जवनिका हृदयाचा खालील कप्पा) यांच्या संयोगस्थानी असलेल्या अलिंदनिलयपर्व या विशेष ऊतकाला प्राप्त होतो. त्याचा पुढील प्रवास अलिंदनिलयपर्वापासून निघणाऱ्या आणि दोन निलयांच्या मध्ये असलेल्या जाड पडद्यात असलेल्या तंत्रिकाभ ऊतकाच्या (तंत्रिका कोशिकांसारखे संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या व स्नायुऊतकापासून विशेष रूपाने विकसित झालेल्या ऊतकाच्या) जुडग्यातून होतो. हिस तंतुगुच्छ (व्हिल्हेल्महिस या जर्मन वैद्यांच्या नावावरून पडलेले नाव) या नावाने ओळखला जाणारा हा तंत्रिकापुंज नंतर दोनशाखांमध्ये विभागतो. डाव्या शाखेच्या दोन उपशाखा अग्र आणि पश्च पूलिका (छोटे गुच्छ) डाव्या निलयात पोहोचतात. उजवी शाखा उजव्या निलयास आवेग पोहोचवते. या सर्व शाखांपासून पुढे सूक्ष्म अशा पुर्किन्ये तंतूंचे [हृदयाच्या एका भागातून दुसऱ्यात चेतनाकारक आवेग (विक्षोभ निर्माण करणारे तरंग) वाहून नेणाऱ्या विशिष्ट तंतूंचे ⟶पुर्किन्ये, योहान्नेस एव्हांग्गेलिस्टा] जाळे निर्माण होऊन त्यातून सर्व स्नायुकोशिकांना आवेग त्वरेने पोहोचतात. या रचनेमुळे दोन्ही निलय एकाच वेळी आकुंचन पावतात व त्यांमधील रक्त जोराने रोहिण्यांमध्ये फेकले जाते. 

आ. २. कोशिकापटलातून आयनांच्या प्रवाहामुळे निर्माण होणारे ऋण विद्युत् वर्चस् आणि त्याच्यामधील बदलांमुळे निर्माण होणारे कार्यकारी विद्युत् वर्चस् : (१) कार्यकारी विद्युत् वर्चस्, (२) यांत्रिक आकुंचन. विद्युत् आवेगाची निर्मिती आणि वहन: स्नायू आणि चेताकोशांकांचे [तंत्रिका आवेग प्रेषित व ग्रहण करण्याचा गुणधर्म असलेल्या तंत्रिका ऊतकातील कोशिकांचे ⟶तंत्रिक तंत्र] विद्युत् वाहक कार्य त्यांच्या अंतरंगातील आयनांच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांच्या) विशिष्ट वितरणामुळे घडून येते. कोशिकापटलामधील ॲडिनोसीनट्रायफॉस्फेटेज(ATPase)एंझाइमच्याप्रभावाखालीसोडियमआयनांचे बहिःसरण आणि पोटॅशियम आयनांचे अंतःसरण (कोशिकापटलातून आरपार होणारी आयनांची हालचाल) ३:२ या प्रमाणात होत असते. त्यामुळे कोशिकेच्या आत पोटॅशियमाची संहती (प्रमाण) अधिक असते व हे आयन पटलातून बाहेर झिरपत राहतात. या विसरणक्रियेमुळे पटलाच्या बाहेरील विद्युत् भार जास्त व आतील कमी अशी स्थिर परिस्थिती निर्माण होऊन सु. ८० मिलिव्होल्ट (mV) बाह्य घनता व अंतर्गत ऋणता असे विद्युत् वर्चस् राखले जाते. या ध्रुवीकृत अवस्थेत संदेशनिर्मिती किंवा वहनाच्या वेळी फरक पडतो आणि आतील ऋणता कमी होऊ लागते. ती ८० वरून ७० मिलिव्होल्टवर येताच, पटलाची सोडियमसाठी पार्यता (पार जाण्याची क्षमता) एकदम वाढते व बाहेरील सोडियम आत वाहू लागतो.


आ. ३. कोशिकापृष्ठावर ठेवलेल्या विद्युत् अग्रांतून आरेखित होणारे विध्रुवीकरणाच्या तरंगाचे परिणाम : (१) ध्रुवीकृत अवस्था, (२) विध्रुवीकरण सुरु, (३) विध्रुविकरण पूर्ण, (४) पुनध्रुवीकरण सुरु. [(४) नंतरच्या (१) अवस्थेत पुनर्ध्रुवीकरण पूर्ण होते आणि (१), (२), (३), व (४) असे चक्र पुढे चालू राहते]. या बदलाने ऋणता झपाट्याने कमी होऊन तिचे रूपांतर २० मिलिव्होल्ट घनतेत होते. यास द्विध्रुवीकरण म्हणतात. याच क्रियेमुळे बाहेरील कॅल्शियम आयन कोशिकेत प्रवेश करतात व त्यांच्या साहाय्याने स्नायूतील आकुंचनशील प्रथिने आकुंचन पावतात. यानंतर घनता थोडी कमी होऊन विद्युत वर्चस् काही काळ शून्याच्या आसपास स्थिरातून मग पुनर्धुवीकरण सुरू होते. पोटॅशियमच्या बहिःसरणानेयापुनःस्थापनास मदत होते (आ. २). कोटरअलिंद आणि आलिंदनिलय पर्वांमधील ऊतकसमूहात ८० मिलिव्होल्ट ऋणतेची स्थिती स्थिर राहत नाही. हळूहळू ती ७० मिलीव्होल्टकडे बदलत राहते. यास झिरपप्रवाह म्हणतात. त्यामुळे सभोवतीच्या ऊतकांकडे कार्यकारी विद्युत् वर्चस् (जेव्हा कोशिका एखाद्या उद्दीपकाने सक्रियित-अधिक क्रियाशील-केली जाते तेव्हा विद्युत् वर्चसात होणारा क्षणिक बदल) पसरू लागते व आवेग पसरू लागतो. आपोआपच आवेग निर्माण करण्याच्या या गुणधर्माला स्वयंचलता म्हणतात. ही आवेग निर्मितिक्रिया कोटरअलिंदपर्वात मिनिटाला ६०-७०, अलिंदनिलयपर्वात ५० व निलयात ३०-४० या वेगाने होऊ शकते परंतु कोटरअलिंदपर्वावर तंत्रिका (मज्जासंस्थेचा) प्रभाव असल्याने अनुकंपी व प्राणेशा या तंत्रिकांच्या [⟶तंत्रिका तंत्र] नियंत्रणानुसार व त्यांच्या संतुलनामुळे आवेगाची गती जास्ती किंवा कमी होते. त्यानुसार पूर्ण हृदयाच्या स्पंदनाचा वेग ठरतो. कोणतेही उच्चतर नियंत्रण अंशतः वा पूर्णपणे नष्ट झाले, तर त्याखालचे केंद्र त्याची जागा घेते व निलयाचा आकुंचनाचा वेग मंदावतो. हृदयाच्या प्रत्येक भागात स्वयंचलता सुप्तावस्थेत असते, हे यावरून लक्षात येईल. 

ऊतकातून संदेशाचे वहन होत असताना मार्गातील कोशिकापटलांचे एकामागून एक विध्रुवीकरण होत जाते. पटल पृष्ठावरील धन भाराचे रूपांतर ऋण भारात होते. कोशिकेच्या आतील भागात ऋणतेऐवजी घनता आढळू लागते. एकापासून एक (कोशिकांचे किंवा त्यांच्या अंशाचे) असे विध्रुवीकरण होत जाते. या मार्गातील कोणत्याही दोन बिंदूंवर विद्युत् अग्रे ठेवली, तर त्यांच्यामधील विद्युत् वर्चसाच्या बदलत्या फरकानुसार प्रथम एका दिशेने आणि नंतर दुसऱ्या दिशेने प्रवाह वाहून त्यानुसारप्रवाहमापकाकडून आ. ३. मध्ये दाखविल्याप्रमाणे आलेख मिळेल.

विद्युत् हल्लेखासाठी विद्युत अग्रे : अशा प्रकारे अनेक कोशिकांच्या विध्रुवीकरण व पुनर्ध्रुवीकरणाच्या क्रियेमुळे निर्माण होणाऱ्या विद्युत् वर्चसांचा संकलित आलेख आवेगवाहक ऊतकांच्या रचनात्मक आणि कार्यात्मक अखंडतेबद्दल बरीच माहिती देऊ शकतो. हे विद्युत् वर्चस् प्रत्यक्ष हृदयाच्या पृष्ठावर विद्युत् अग्रे ठेवून मापने अशक्य असल्याने त्याचे शरीरातील विविध ठिकाणच्या त्वचापृष्ठावर प्रक्षेपित होणारे परिणामच मापावे लागतात. उरोस्थीच्या मागे, २ ऱ्या ते ५ व्या वरगड्यांच्या पातळीवर मध्यरेषेपासून किंचित डावीकडे आणि अग्र डाव्या जत्रु-अस्थीच्या (मानेच्या दोन्ही बाजूंस पहिल्या बरगड्यांच्या अगदी वर असलेल्या वक्षीय मेखलेच्या हाडाच्या) मध्यरेषेपर्यंत पोहोचलेले असून आंतर-निलयपटलातून जाणारा हृदयांचा लंब अक्ष सु. ३० ते ४० अंशांत डावीकडे वळलेला असे हृदयांचे वैशिष्ट्यपूर्ण शारीरीय स्थान आहे. या वैशिष्ट्यांमुळे पुढील विविध स्थानी विद्युत् अग्रे ठेवून वर्चसाचे मापन केले जाते.

आ. ४. शाखीय विद्युत् अग्रे जोडण्याची पद्धत व त्यातून निर्माण झालेली सहा ताराबंध : (अ) आयंटहोव्हेन I, II व III ताराबंध (आ) VR, VL व VF गोल्डवर्गर ताराबंध : (१) उजवे मनगट, (२) डावे मनगट, (३) डावी पोटरी.

शाखीय विद्युत् अग्रे : (आ. ४). (१) उजवे मनगट, (२) डावे मनगट व (३) डावी पोटरी (घोट्याच्या थोडे वर) ही तीन चपटी अग्रे पट्ट्याने त्या त्या ठिकाणी घट्ट दाबून लावली जातात. विद्युत् प्रवाहमापकाला यांतील १-२, ३-१ व २-३ अशा जोड्या योग्य ती कळ दाबून जोडता येतात. त्यामुळे त्या दोन स्थानांच्या विद्युत् वर्चसांमधील फरक मोजला जातो. यालाच अनुक्रमे ताराबंध (बंधस्थान, जोडणी वा मापनस्थान) पहिला, दुसरा व तिसरा म्हणतात व त्यांचा निर्देश I, II व III या रोमन अंकांनी केला जातो. नंतर या तीन अग्रांपैकी एक विरूद्ध राहिलेल्या दोहोंची बेरीज अशी जोडणी करून त्यातून VR (१= २+३), VL (२= १+३), व VF (३= १+२) असे आणखी तीन ताराबंध मापनासाठी मिळतात. [VR, VL आणि VF यांचे क्षीण प्रवाह उपकरणात वर्धित केले जातात म्हणून त्यांना अवर्धित सदिश असेही म्हणतात⟶सदिश]. अशा रीतीने होणाऱ्या सहा द्विध्रुवी तारासंबंधांची गणितातील सदिश पद्धतीने आपण मांडणी केली, तर ललाटीय प्रतलात सहा रेषा हृदयाभिमुख किंवा हृदयात एकमेकींना छेदणाऱ्या अशा मिळतात.


आ. ५. शाखीय ताराबंधांचे सहा सदिश : (बाणाने विद्युतीय अक्ष दर्शविला आहे).

(आ. ५). म्हणजेच सहा निरनिराळ्या कोनांतून विद्युत् वर्चसाचे मापन होते. या रेषा वाढविल्या म्हणजे त्या पूर्ण प्रतलातील ३६० अंशांतून हृदयाचा अभ्यास होऊ शकतो, हे लक्षात येईल. याशिवाय उजव्या पायाला एक अग्रजोडून त्याचा उपयोग ⇨भूयोजनासाठी केला जातो.

छातीवरील विद्युत् अग्रे : ही सहा एक-ध्रुवीय अग्रे असतात व प्रत्येक अग्र म्हणजे एक ताराबंध होतो. एकच अग्र चूषणाने तात्पुरते त्या स्थळी घट्ट बसवून नंतर क्रमाक्रमाने इतर पाच ठिकाणी तसेच वापरून ते सहा ताराबंध साधता येतात किंवा सहा स्वतंत्र अग्रे वापरून आणि उपकरणातील खटके दाबून तीक्रमाक्रमाने कार्यवाहीत आणता येतात. या सहा अग्रांची स्थाने व नावे अशी आहेत (आ. ६): V1 उरोस्थीच्या उजव्या बाजूस चौथ्या आंतरपर्शुकीय अवकाशात, v6 डाव्या काखेच्या मध्यरेषेत पाचव्या आंतरपर्शुकीय अवकाशात आणि V2, V3, V4, V5 ही अग्रे पहिल्या V1 अग्रापासून क्रमाक्रमाने सु. २०-२५ अंशांनी डावीकडे सरकतात. आडव्या प्रतलावर अग्रांच्या दिशा दाखविणाऱ्या रेषा काढल्या (छातीचा आडवा छेद घेतला आहे अशी कल्पना करून), तर असे लक्षात येईल की, हृदयाच्या पुढच्या व डाव्या भागांचा अभ्यास छातीवरील या सहा ताराबंधांतून होतो (आ. ७). 

एकूण बारा ताराबंधांतून विद्युत् वर्चसाची त्रिमितीय रूपरेषा मिळते. या अभ्यासात व्यत्यय आणणारी इतर विद्युत् उपकरणे, क्ष-किरण यंत्रे, रूग्णाची हालचाल, बोलणे, खोलीतील तापमानाचा अतिरेक, विद्युत् अग्रांचा सैल संपर्क इ. घटकांचा उपद्रव योग्य त्या पद्धतीने कमी केला जातो. काही वेळा ग्रसिका (घसा) व खुद्द हृदयात सुषिरीच्या मदतीने विद्युत् अग्रे ठेवतात.

  

आ. ६. छातीवरील सहा ताराबंधआलेखन : विद्युत् हृल्लेखन उपकरणात विद्युत् प्रवाहमपाकाला जोडलेल्या लेखित्राकडून एका गरम काट्याने सरकत्या कागदावर आलेखन केले जाते. सु. ५-६ सेंमी. रुंद, उष्णतासंवेदी पृष्ठभाग असलेला हा आलेख कागद सेकंदाला २५ मिमी. या वेगाने पुढे सरकतो. तेवढ्या कालावधीत लेखनाग्र पाच मोठ्या आडव्या चौकोनांवरून म्हणजेच २५ लहान चौकोनांवरून फिरते. म्हणजेच प्रत्येक लहान चौकोन ०·०४ सेकंद कालावधी दाखवितो. उभ्या चौकोनांवरून आलेखातील विद्युत वर्चस् मोजता येते. बहुतेक वेळा १० मिमी.=१ मिलिव्होल्ट इतक्या संवेदनशीलतेचा वापर केला. जातो. जरूर तेव्हा हे प्रमाण कमीजास्त (५ मिमी. किंवा २० मिमी.) करण्याची सोय उपकरणात असते. कृत्रिम रीत्या १ मिलीव्होल्ट वर्चस् वापरून आलेखांचे प्रमाणीकरण आधीच करून घेता येते. 

आ. ७. आडव्या प्रतलातून छातीवरील सहा ताराबंधांची हृदयाकडे पाहण्याची बदलती दिशा : (१) उजवे अलिंद, (२) डावे अलिंद, (३) उजवे निलय, (४) डावे निलय. विध्रुवीकरणाचा तरंग (लाट) जेव्हा नोंद करणाऱ्याविद्युत् अग्राच्या दिशेने सरकतो तेव्हा आलेखात ऊर्ध्वमुखी विचलन आढळते (काटा वर जातो) व तो जेव्हा अग्रापासून दूर जातो तेव्हा अधोमुखी विचलन होते (काटा खाली जातो). त्यामुळे हृदयाच्या आकुंचनाच्या एकाच आवर्तनाचा आलेख निरनिराळ्या तारबंधांमध्ये निरनिराळे आकार दाखवितो परंतु विचलनाची तीव्रता साऱ्याच ताराबंधांत सारखी नसते, म्हणून सर्वच आलेखांचे निरीक्षण करून त्यावरून अगदी किरकोळ दोषांचेही निदान करणे शक्य होते. 


 नमुनेदार आलेख:तराबंध दोनमध्ये मिळणाऱ्याआलेखावरून प्रारूपीय (नमुनेदार) हृल्लेख व त्याचे आवेगवहनाशी संबंध सांगता येतील. मिनिटाला ७२ ठोके पडताना प्रत्येक आवर्तन ०.८ सेकंदाचे म्हणजे लहान वीस चौकोन व्यापणारे असते.

आ. ८. नमुनेदार विद्युत् हृल्लेखाची रचना व त्याचे घटक तरंग

पी (P) तरंग अलिंदामधून विद्युत् वहन दाखवितो. पीक्यू (PQ) अवधी वा पीआर (PR) अवधी हा अलिंदनिलयगुच्छातून निलयापर्यंत पोहोचण्याचा अवधी हा सु. ०·१२ सेकंद असतो. क्यूआरएस (QRS) संकुल (एकमेकांना जोडले गेल्यामुळे तयार झालेली क्यूआरएस तरंगांची विशिष्ट रचना) निलयाच्या विध्रुवीकरणामुळे होतो आणि त्यांच्याच पुनर्ध्रुवीकरणापासून टी (T) तरंग निर्माण होतो (आ. ८). T तरंगानंतर प्रसंगविशेषी u हे छोटे मंद विचलन आढळते. मात्र त्याचा निश्चित अर्थ समजलेला नाही. 

विध्रुवीकरणाच्या गुंतागुंतीच्या दिशांची सरासरी दिशा जर काढली, तर तिला हृदयाचा अक्ष (विद्युतीय अक्ष) असे म्हणता येईल. VR ताराबंधापासून दूर जाणारी व ताराबंध दोनच्या दिशेने प्रवास करणारी ही रेषा आहे (आ. ५ पहा). ताराबंध १, २ व ३ मध्ये ती प्रामुख्याने वर जाणारे तरंग निर्माण करते परंतु VR ताराबंधात त्याच्या उलट चित्र दिसते. अलिंदनिलयगुच्छाच्या शाखांमध्ये जर काही विकृतीमुळे वहनात अडथळा आला, तर हा अक्ष डावीकडे झुकून ताराबंध २, ३ चे QRS संकुल उलटवितो किंवा उजवीकडे झुकून ताराबंध १ मध्ये तसाच परिणाम घडवितो. संपूर्ण हृदयाच्या शारीरीय स्थानांतरानेही (उदा., फुप्फुसाचे रोग, गर्भिणी स्त्रिया) अक्षामध्ये किरकोळ बदल होऊ शकतात. दोन ताराबंधांमधील QRS च्या तोलनिक मापनाने हा अक्ष काढता येतो. 

विद्युत् हृल्लेखाची उपयुक्तता:आलेखाची निर्मिती विद्युत् वर्चसावर आधारित असल्याने त्याचा उपयोग मुख्यतः आवेगवहनातील दोष आणि अपसामान्य गतिकारकांच्या उपस्थितीमुळे निर्माण होणारे लयदोष शोधण्यासाठी होतो. इतर रोगांमध्ये वहनातील दोष निर्माण होत असतील, तेव्हाच हृल्लेखाची मदत इतर निदान पद्धतींना साहाय्यक म्हणून होऊ शकते. आलेखात घडून येणारे काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे असतात. 

वहनदोष:वहनदोषांपैकी महत्त्वाचे अवरोध अलिंदनिलयपर्वापासून पुढे संभवतात. प्रत्येक P तरंगानंतर QRS च्या निर्मितीपर्यंत ०·२ सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर सौम्य (प्रथम श्रेणीच्या) अलिंद-निलय-अवरोध आहे, असे समजले जाते. त्याहून जास्त अवरोध असेल, तर PR अंतर दर स्पंदनागणिक वाढत जाते आणि तीन-चार आवर्तनानंतर शेवटी एका P तरंगानंतर QRS चा संपूर्ण अभाव असतो. ही क्रिया वरचेवर घडून येते. काही वेळा मधून मधून P नंतर निलयजन्य तरंग आढळत नाहीत किंवा एकाआड एक P नंतर ते दिसतात. अवरोधाची तीव्रता याहून जास्त असल्यास (म्हणजेच तृतीय क्षेणीच्या किंवा संपूर्ण अवरोधात) अलिंदापासून कोणताच आवेग निलयास पोहोचत नाही व P तरंगापासून पूर्ण स्वतंत्र असे निलयाचे मंद गतीने स्वयंनियंत्रित स्पंदन होऊ लागते.

हिस तंत्रिकागुच्छात अवरोध असेल, तर QRS संकुलाचा आकार बदलतो व ते रुंदावते. अवरोध एका शाखेत असेल, तर आवेगाला प्रथम निरोगी शाखेतून जाऊन नंतर त्या निलयाकडून अवरोधग्रस्त बाजूस यावे लागते. त्यातूनच QRS चे रुंदावणे व एखादा अतिरिक्त R तरंग असे बदल होतात. विद्युतीय अक्ष अवरोधाच्या बाजूस झुकतो.

लयनिर्मितीमधील दोष:हे जर कोटरअलिंदपर्वात असतील, तर पूर्ण हृदयाचा वेग मंदावतो, वाढतो किंवा तालबद्धता नष्ट होऊन अनियमित ठोके पडतात परंतु प्रत्येक आवर्तनामध्ये P पासून T पर्यंत सर्व तरंग अबाधित राहतात. दर अंतःश्वनाबरोबर या लयीमध्ये फरक झालेला दसतो. कोटरअलिंदाशिवाय इतरत्र निर्माण होणाऱ्यालयीस अपस्थानीय लय म्हणतात. अशी लय जर निलयाशिवाय इतरत्र वर कुठेही सुरू होत असेल, तर ती अधिनिलयी गणली जाते. उदा., अलिंदजन्य किंवा अलिंदनिलय संयोगस्थानी निर्माण होणाऱ्यालयी. या लयींमध्ये P तरंग विकृत होतो पण QRS मात्र अबाधित असतात. यांपैकी (अ) अलिंदजन्य हृदक्षिप्रतेत वेगाने पण अनियमितपणे स्पंदने चालू असतात अंशतः अलिंदनिलय अवरोधही आढळतो. (आ) अलिंद आस्फारणात (अनियमितपणे होणाऱ्याहृदय-स्पंदनात) फडफडल्याप्रमाणे अलिंद आकुंचने होतात. त्यांचा वेग (मिनिटाला सु. ३००) अनियमित असतो. P तरंग अगदी लहान व करवतीच्या दात्यांसारखे दिसतात. अंशतः अवरोध असल्याने निलयाची गती सुदैवाने थोडी कमी असते व त्यामुळे कार्यक्षमता टिकून राहते. (इ) अलिंदाच्या विसंवादी आकुंचनात P तरंग पूर्ण नष्ट होऊन आधाररेषेवर केवळ लहान लहान हालचाली दिसतात. मिनिटास सु. ४०० ते ६०० आवेग अलिंदाकडून अलिंदनिलयपर्वावर आदळत असतात व ते क्षीण असल्याने काही थोडेच अलिंदनिलयपर्वाचे उद्दीपन करू शकतात. निलयाची हालचाल द्रुत व क्षीण असते. नाडीचे ठोके वहृदयाची आकुंचने यांत मेळ नसतो. अवरोध निर्माण झाल्यास निलयाची स्वतंत्र मंद लय सुरू होते. (ई) संयोगस्थानी निर्माण होणाऱ्या लयीमध्ये P तरंग पूर्ण नष्ट होऊन निलयाचा वेग मिनिटाला ५०-७० होतो. कधीकधी अलिंदाकडे उलट्या दिशेने आवेग गेल्यामुळे निलय तरंगानंतर उलटा दिसतो.

निलयजन्य लयीमध्ये P तरंग स्पष्ट दिसू शकत नाहीत, QRS रूंदावून मिनिटाला ८० ते ३०० आकुंचने दर्शवितात. थोडासा अनियमितपणा आढळतो. तो वाढत गेल्यास किंवा अनेक केंद्रे लयनिर्मिती करू लागल्यास निलयाचे विसंवादी आकुंचन सुरू होते आणि हृदयाची क्षमता (हृदयाच्या एखाद्या कप्प्यात आलेले रक्त आकुंचनाने पूर्णपणे बाहेर टाकण्याची क्षमता) धोक्यात येते व रोहिण्यांचे स्पंदन बंद होऊ शकते.


 वाहिनीक्लथनाने हृद्रोहिणीमध्ये रोध निर्माण होणे : रक्तवाहिनीतील गुठळीने असा रोध निर्माण झाल्यास तीव्र अल्परक्तता होऊन हृदयाच्या काही भागात अभिकोथ [रक्तपुरवठा थांबल्याने तेथील ऊतकांचा मृत्यू⟶अभिकोथ] निर्माण होतो. सामान्यतः ‘हृदयविकाराचा झटका’या नावाने ओळखल्या जाणाऱ्या] या स्थितीत हृदयस्नायूंची कार्यक्षमता त्वरित कमी होत असली, तरी विद्युत हृल्लेखातील बदल दिसून येण्यास काही तास जावे लागतात. रक्तपुरवठ्यातील कमतरतेमुळे ST खंडाचे अवनमन (खाली वाकले जाण्याची क्रिया) ताबडतोब होतो परंतु ३-४ तासांनी तो पूर्ववत होऊन अभिकोथ दाखविणारा खोल असा Q तरंग छातीवरील सर्वांत जवळच्या ताराबंधात दिसू लागतो. इतर ताराबंधातील ST खंड उन्नत होऊन T तरंग उलटा होतो. इजा झालेल्या ऊतकात दीर्घकाल टिकणारे विध्रुवीकरण होऊन त्यापासून काही प्रवाह निर्माण होत राहतात व आलेखात ते घडवितात. त्यानंतर क्रमाक्रमाने घेण्यात येणाऱ्याहल्लेखांवरून उपचारामुळे त्यानंतर हृदयातील बिघाड कसा बरा होतो आहे, ते समजते.  

आलेखातील विशिष्ट बदल : या बदलांच्या मदतीने अलिंद किंवा निलयाची अतिवृद्धी (जादा वाढ), परिहृदयशोथ [हृदयाभोवतीच्या पिशवीसारख्या आच्छादनाची दाहयुक्त सूज ⟶ परिहृदयशोथ], फुप्फुसरोहिणीमधील आंतरकीलन (रक्तवाहिनीचा अचानकपणे होणारा अवरोध), हृद्शूल [हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा झाल्याने अचानक उद्वणारा छाती दुखण्याचा सौम्य झटका ⟶ हृदयविकार] यांचेही निदान होऊ शकते.  

औषधाची मात्रा वाढणे: हृदयरोगासाठी वापरली जाणारी डिजिटॅलीस व तत्सम औषधांची मात्रा प्रमाणाबाहेर होत असल्यास त्याचाही निर्देश आलेखातून मिळू शकतो. पोटॅशियम अल्परक्तता (रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होणे), अवटू ग्रंथीची अतिक्रियाशिलता किंवा औषधजन्य हृद्विषाक्तता (हृदयावर विषारी परिणाम झाल्याची स्थिती) यांचेही प्रतिबिंब विद्युत हृल्लेखात उमटू शकते.

इतर: हृदय व महावाहिन्यांचे [हृदयाला जोडलेल्या नीला व रोहिणी (उदा., महारोहिणी, फुप्फुस रोहिणी, महानीला) या वाहिन्यांच्या विशेषतः हृदयाजवळील सुरूवातीच्या भागांचे] उपजत दोष, हृदय आणि छातीतील अन्य इंद्रियांवरील शस्त्रक्रिया, तसेच कृत्रिम गतिकारकाचे रोपण यांसाठीही विद्युत् हृल्लेखन महत्त्वाची माहिती देऊन मदत करू शकते. कधीकधी रूग्ण जोमाने व्यायाम करीत असताना हृल्लेख काढतात. याला ‘ताण स्थितीतील हृल्लेख’ म्हणतात आणि त्यावरून शरीराचे कार्य जोमदारपणे चालू असताना हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे की नाही, ते कळते.

अशा प्रकारे हृदयविकाराचे निदान व त्यावरील उपचार करताना रूग्णाच्या परिस्थितीचे मूल्यमापन करणारे हृल्लेख हे नित्य वापरातील साधन बनले आहे. उदा., अतिदक्षता विभागातील रूग्णाचे हृल्लेखनाद्वारे अखंडपणे चालणारे निरीक्षण व विशेषकरून घातक ठरू शकणाऱ्याहृदयाच्या अप्राकृत लयबद्धतेचे निदान. मोठमोठ्या रूग्णालयांतून १९६७-७० दरम्यानच्या काळात संगणकीकृत हृल्लेखक वापरण्यास सुरूवात झाली. यामुळे हृल्लेखांच्या खंडांचे विश्लेषण करणे व निदान सूचित करणे शक्य झाले आहे. दोलनदर्शकाला विद्युत् हृल्लेखक जोडून दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यासारख्या पडद्यावर हृदयातील विद्युत् प्रवाहाचे प्रतिमादर्शन (हृल्लेखाचे दर्शन) घडविता येते.

पहा : आयंटहोव्हेन, व्हिलेम रोगनिदान वैद्यकीय उपकरणे हृदयविकार. 

संदर्भ: 1. Haluber, M. J. ECG: An Introductory Course, New Delhi, 1989.

          2. Hampton, J. R. Corduovascular Disease, London, 1985.

          3. Thompson, D. R. Cardiac Nursing, London, 1982.

         4. Wilson, V. Cardiac Nursing, London, 1983.

श्रोत्री, दि. शं.