कामाँइश, लुईज  द : (? १५२४-१० जून १५८०). प्रबोधनकालातील श्रेष्ठ पोर्तुगीज कवी. त्याचा जन्म एका सरदार घराण्यात झाला. तो लिस्बन किंवा कोईंब्रा येथे जन्मला असावा. कोईंब्रा विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले असावे. व्हर्जिल आणि आरिऑस्तो ह्या कवींचा त्याने अभ्यास केलेला दिसतो. १५४७ च्या सुमारास El-Rei-Seleuco, Auto dos Enfatrioes आणि Filodemo ह्या तीन सुखात्मिका लिहून त्याने साहित्यिक म्हणून नाव मिळविले होते. त्याआधी राजदरबारातही त्याला काही स्थान प्राप्त झाले होते. तथापि काही कारणाने तेथून त्याची हकालपट्टी झाली (१५४६). १५४७ मध्ये पोर्तुगीज सैन्यात दाखल होऊन तो उत्तर आफ्रिकेत गेला. तेथे एका लढाईत त्याने एक डोळा गमावला. तेथून पोर्तुगालला परत आल्यानंतर तो स्वैराचारी जीवन जगू लागला. १५५२ मध्ये राजदरबारातील एका अधिकार्‍याचा अपमान केल्यावरुन त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तेथून एक वर्षाने त्याची सुटका करुन त्याला सैनिक म्हणून भारतात पाठविण्यात आले. तेथे गोव्यात तो काही काळ होता. मलबारचा किनारा, तांबडा समुद्र इ. ठिकाणच्या पोर्तुगीजांच्या मोहिमांत त्याने भाग घेतला. पुढे माकाऊ येथे एक सरकारी अधिकारी म्हणून काम करीत असता त्याच्यावर अफरातफरीचा आरोप ठेवून त्याला गोव्यात आणण्यात आले व त्यास पुन्हा तुरुंगवास घडला. त्यानंतरचा काळ त्याने अत्यंत दरिद्री अवस्थेत काढला. काही काळ तो मोझँबिक येथेही राहिला आणि १५७० मध्ये लिस्बनला परतला. १५७२ मध्ये त्याचे ⇨लुझीअड्‌स (इ.शी. द सन्स ऑफ लुझस किंवा द पोर्तुगीज) हे महाकाव्य प्रसिद्ध झाले. राजाकडून त्याला काही निवृत्तिवेतनही मिळू लागले. लिस्बन येथेच तो प्लेगने निवर्तला.

`ओताव्हा रिमा’ ह्या इटालियन वृत्तात लिहिलेल्या लुझीअड्‌स या दहा सर्गांच्या महाकाव्यामध्ये वास्को द गामाचे जलपर्यटन आणि त्याचे भारतातील आगमन ह्या विषयाच्या चौकटीत पोर्तुगालच्या एकूण इतिहासातील उज्ज्वल क्षण जिवंतपणे चित्रित केलेले आहेत. ख्रिस्ती धर्माच्या शत्रूंवर पोर्तुगालने मिळविलेले विजय त्यात अभिनिवेशाने दाखविले आहेत. कोणतीही विशिष्ट व्यक्ती यात नायक नाही तर पोर्तुगाल हे सबंध राष्ट्रच ह्या महाकाव्याचे नायक बनले आहे. व्हर्जिलची भव्यता ह्या महाकाव्यास लाभलेली आहे. १६५५ मध्ये सर रिचर्ड फॅनशॉ ह्या इंग्रज मुत्सद्याने त्याचे इंग्रजी भाषांतर केले. १९४६ मध्ये जे.डी.एम्‌. फोर्ड ह्याने या महाकाव्याची मूळ पोर्तुगीज संहिता इंग्रजी टीपांसह प्रसिद्ध केली.

कामाँइशची कीर्ती आज मुख्यतः त्याच्या महाकाव्यावरच अधिष्ठित असली, तरी उद्देशिका, सुनीत इ. प्रकारांत रचिलेल्या त्याच्या भावकविताही थोर कवी म्हणून त्याचे स्थान निश्चित करण्यास पुरेशा आहेत. त्याने लिहिलेली अनेक सुनीते तर पीत्रार्कच्या तोडीची आहेत. त्याच्या उत्कृष्ठ भावकवितांतून त्याच्या दुःखी जीवनाचे पडसाद उमटलेले आहेत. १५९५ मध्ये त्याच्या कविता प्रथम संकलित करण्यात आल्या.

कुलकर्णी, अ.र.