लूर्या, साल्व्हाथॉर एडवर्ड : (१३ ऑगस्ट १९१२-६फेब्रुवारी १९९१). इटालियन-अमेरिकन जीववैज्ञानिक. व्हायरसांची प्रतिकृतिजनन यंत्रणा व आनुवंशिकीय संरचना यांसंबंधीच्या शोधाबद्दल त्यांना èमॅक्स डेल्ब्र्युक व èॲल्फ्रेड डे हॅर्शी यांच्याबरोबर १९६९ च्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यांचे सूक्ष्मजंतुभक्षींना (फाज) म्हणजे सूक्ष्मजंतूवर संक्रामण करणाऱ्या व्हायरसांना होणाऱ्या सूक्ष्म जंतूंच्या विरोधाविषयीचे संशोधन रेणवीय जीवविज्ञानात महत्त्वाचे ठरले आहे.

 

लूर्या यांचा जन्म इटलीतील तूरिन येथे झाला. त्यांनी तूरिन विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेऊन १९३५ मध्ये एम्. डी. पदवी मिळविली. पॅरिस येथील इन्स्टिट्यूट ऑफ रेडियम या संस्थेत १९३८-४० मध्ये संशोधन अधिछात्र म्हणून काम केल्यावर ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी कोलंबिया विद्यापीठात शस्त्रक्रियात्मक सूक्ष्मजंतुविज्ञानातील संशोधन साहाय्यक (१९४०-४२) इंडियाना विद्यापीठात सूक्ष्मजंतुविज्ञानाचे निदेशक (१९४३-४५) साहाय्यक प्राध्यापक (१९४४-४७) व सहयोगी प्राध्यापक (१९४७-५०) इलिनॉय विद्यापीठात सूक्ष्मजीव-विज्ञानाचे प्राध्यापक (१९५०-५९) मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सूक्ष्मजीवविज्ञानाचे प्राध्यापक (१९५९-६४) व जीवविज्ञानाचे सेजविक प्राध्यापक (१९६४-७०) या पदांवर काम केले. १९७० मध्ये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जीवविज्ञान विभागात इन्स्टिट्यूट प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. ते १९६५ पासून साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीमध्ये अनिवासी अधिछात्र असून १९७२ पासून मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सेंटर फॉर कॅन्सर रिसर्चचे संचालकही होते. १९४२-४३ मध्ये ते व्हॅनडरबिल्ट व प्रिन्स्टन विद्यापीठांत गुगेनहाइम अधिछात्र होते. १९४७ मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. त्यांनी १९६३-६४ मध्ये पॅरिस येथील पाश्र्चर इन्स्टिट्यूटमध्ये काम केले.

अमेरिकेला स्थलांतर करण्यापूर्वी त्यांनी पाश्र्चर इन्स्टिट्यूटमध्ये सूक्ष्मजंतूभक्षी संशोधनाच्या तंत्रांचा अभ्यास केला. अमेरिकेत आल्यावर त्यांची डेल्ब्र्‍यूक यांच्याशी भेट झाली व त्यांच्याद्वारे लूर्या यांचा व्हायरस स्वप्रतिकृतिजननासंबंधीच्या समस्या सोडविण्याच्या कार्याला वाहून घेतलेल्या अमेरिकन फाज ग्रुप या संघटनेशी संबंध आला. १९४२ मध्ये त्यांनी  सूक्ष्मजंतुभक्षी कणाचा इलेक्ट्रॉन सूक्ष्मालेख (इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने घेतलेले छायाचित्र) मिळविला. त्यावरून सूक्ष्मजंतुभक्षींना गोलाकार डोके व बारीक शेपटी असते या त्यांच्या पूर्वी करण्यात आलेल्या वर्णनाला पुष्टी मिळाली. सूक्ष्मजंतुभक्षींच्या संसर्गकारक सूक्ष्मजंतूंवर होणाऱ्या परिणामांसंबंधी संशोधन करण्यासाठी त्यांनी कॉलीफॉर्म सूक्ष्मजंतूंतील सूक्ष्मजंतुभक्षींना विरोध करणारे परिवर्तित प्रकार अलग केले. हे प्रकार सूक्ष्मजंतूंतील बदल व त्यांची कारणे यांचे विश्र्लेषण करण्यास योग्य असल्याचे त्यांना दिसून आले. नंतर त्यांनी एक अस्थिरतेची कसोटी विकसित केली व तीमुळे सूक्ष्मजंतूंच्या उत्परिवर्तनावरील (आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होण्याच्या क्रियेवरील) माहितीत महत्त्वाची भर पडली. डेल्ब्र्‍यूक यांनी उत्परिवर्तनाच्या गतीच्या विश्र्लेषणासाठी एक गणितीय प्रतिकृती प्रस्थापित केली. लूर्या यांनी या पध्दतीचा व्हायरसांच्या उत्परिवर्तनाकरिता विस्तार केला. १९४३ मध्ये लूर्या व डेल्ब्र्‍यूक यांनी प्रसिद्ध केलेल्या निबंधात त्या वेळी प्रचलित असलेल्या दृष्टिकोनाच्या विरूद्ध असे दाखविले की, व्हायरसांच्या आनुवंशिकीय द्रव्यात कायमचे बदल घडून येऊ शकतात. लूर्या यांनी एकाच संवर्धनात सूक्ष्मजंतुभक्षींना रोधक असलेले व सूक्ष्मजंतुभक्षींना संवेदनशील असलेले असे दोन्ही प्रकारचे सूक्ष्मजंतू आढळण्याचे कारण उत्स्फूर्त सूक्ष्मजंतू उत्परिवर्तांची निवड हे आहे, असेही सिद्ध केले. १९४५ मध्ये हॅर्शी व लूर्या यांनी अशा सूक्ष्मजंतू उत्परिवर्तांचेच नव्हे, तर उत्स्फूर्त सूक्ष्मजंतुभक्षी उत्परिवर्तांचेही अस्तित्व दाखूवन दिले. याखेरीज लूर्या यांनी कॉलिफॉर्म सूक्ष्मजंतूंच्या काही वाणांनी निर्माण केलेल्या व इतरे वाणांना मारक असलेल्या कॉलिसिनांच्या (प्रथिन प्रतिजैव-आँटिबायॉटिक-पदार्थांच्या) क्रियेचा तसेच सूक्ष्मजंतू आनुवंशिकीतील त्यांच्या कार्याचा अभ्यास केला. त्यानंतर लूर्या व त्यांचे सहकारी यांनी सूक्ष्मजंतूंच्या गुणसूत्राला (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्यासुतासारख्या सूक्ष्म घटकाला) सूक्ष्मजंतुभक्षीच्या आनुवंशिक द्रव्याच्या होणाऱ्या जोडणीची यंत्रणा, सूक्ष्मजंतुभक्षीत सूक्ष्मजंतूच्या जीनांचा (आनुवांशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या गूणसूत्रावरील एककांचा) समावेश होणे व व्हायरसांचे आश्रयी-नियंत्रित गुणधर्म यासंबंधी संशोधन केले.

नोबेल पारितोषिकाखेरीज लूर्या यांना लेपेटिट पारितोषिक (१९३५), लेंघी पारितोषिक (१९६१) व लूइझा ग्रॉस हॉर्पिट्झ पारितोषिक (१९६९) हे सन्मान मिळाले, ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ मायक्रोबायॉलॉजी, अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायॉलॉजी (अध्यक्ष १९६७-६८), जेनेटिक्स सोसायटी वगैरे अनेक मान्यवर वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. जीवविज्ञानाची एक शाखा म्हणून व्हायरसविज्ञानाचे प्रथमच विवरण करणारा जनरल व्हायरॉलॉजी (१९५३) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. लाइफ : ॲन अनफिनिश्ड एक्स्पेरिमेंट (१९७४) या त्यांच्या ग्रंथाला नॅशनल बुक अवॉर्ड मिळाले. जर्नल ऑफ बॅक्टिरिऑलॉजी, व्हायरॉलॉजी एक्स्पेरिमेंटल सेल रिसर्च, जर्नल ऑफ मॉलिक्युलर बायॉलॉजी वगैरे कित्येक वैज्ञानिक नियतकालिकांचे ते संपादक वा संपादकीय मंडळाचे सदस्य होते. लेक्झिंग्टन (मॅसॅचूसेट्स) येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

भालेराव, य. त्र्यं. भदे, व. ग.