कामर्लिंग–ऑनेस, हाइके : (21 सप्टेंबर 1853-21 फेब्रुवारी 1926). डच भौतिकीविज्ञा. 1913 च्या ‌भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म ग्रोनिंगेन येथे झाला. ग्रोनिंगेन विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर डेल्फ पॉलिटेक्निकमध्ये साहाय्यक, लायडन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक आणि तेथील भौतिकीय प्रयोगशाळेचे संचालक या पदांवर त्यांनी काम केले.

नीच तापमानासंबंधीच्या संशोधनारिकता कामर्लिंग हे विशेष प्रसिद्ध आहेत. 1908 साली द्रवरूप हीलियम तयार करण्यात त्यांनी यश मिळविले. नीच तापमानात आढळणाऱ्या प्रकाशीय, चुंबकीय व चुंबकप्रकाशीय गुणधर्मांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना 1913 साली भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. अतिनीच तापमानात आढळणाऱ्या घन पदार्थांच्या अतिसंवाहकतेसंबंधी संशोधन करून काही विशिष्ट तापमानात धातूंमधून अखंडपणे विद्युत्‌ प्रवाह चालू ठेवण्याच्या शक्यतेचा शोध लावला (1914) (→ अतिसंवाहकता नीच तापमान भौतिकी).

ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक शास्त्रीय लेखांपैकी लायडन येथील प्रयोगशाळेत नीच तापमानासंबंधी केलेल्या प्रयोगांविषयीचा त्यांचा लेख विशेष प्रसिद्ध आहे (1910). ते लायडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.