व्हिक्टोरिया-२ : चीनच्या अधिपत्याखालील हाँगकाँगची राजधानी व एक महत्त्वाचे नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ५,९०,७११ (१९८१). हाँगकाँग बेटाच्या वायव्य भागात काउलून सामुद्रधुनीवर हे शहर वसले आहे.  उत्तर हाँगकाँगचा हा गजबजलेला नागरी विभाग असून ते हाँगकाँग सिटी तसेच सेंट्रल डिस्ट्रिक्ट म्हणूनही ओळखले जाते.

ज्वालामुखीजन्य टेकड्यांच्या पायथ्यालगत असलेल्या सपाट प्रदेशात १८४३ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याच परिसरात व्हिक्टोरिया हे सर्वांत उंच (५५६ मी.) शिखर आहे. पुढेपुढे टेकड्यांच्या तीव्र उताराच्या प्रदेशातही शहराचा विस्तार होत गेला. तसेच काही ठिकाणी समुद्र हटवून विस्तृत निवासी जागा निर्माण करण्यात आली. १९५९ च्या दरम्यान १५ किमी. लांबीचा आणि १८३ ते ३६६ मी. रुंदीचा समुद्र हटवून तेथे शहराचा विस्तार करण्यात आला. ‘वानचाई क्वार्टर’ या नावाने हा भाग ओळखला जात असून, तो अतिदाट लोकवस्तीचा आहे. चीनच्या मुख्य भूमीवरील ताणतणाव, वाढती लोकसंख्या, भीषण आगी व रोगराई यांमुळे येथील गर्दी वाढत गेली. हाँगकाँग बेटावर मागणीच्या मानाने पुरवठा कमी पडत असे त्यामुळे येथे काही वेळा पाणीवाटपाचे नियमन (रेशनिंग) करणे आवश्यक झाले होते.

व्हिक्टोरिया हे हाँगकाँगचे व्यापारी, सांस्कृतिक व प्रशासकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व निगम यांची कार्यालये येथे आहेत. आधुनिक कार्यालये व शासकीय इमारती व्हिक्टोरियाच्या किनारी भागात आढळतात. येथे अनेक प्रकारचे व्यवसाय चालत असून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाराचे पूर्वेकडील केंद्र म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. वस्तूंच्य किमती इतर देशाच्या तुलनेने कमी असल्यामुळे जगभरातील व्यापारी येथे आकर्षिले जातात. दुसर्‍या महायुद्धापासून येथील जहाजबांधणी व दुरुस्ती व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यात आले. १९५० च्या दशकात चीनबरोबरील व्यापार कमी करण्यात आल्यानंतर येथील कापड व यंत्रनिर्मिती या स्थानिक उद्योगांस चालना मिळाली. शहराला लाभलेले आकर्षक सृष्टीसौंदर्य, सुंदर समुद्रकिनारा, विलासी हॉटेले इत्यादींमुळे जगभराच्या लोकांचे हे आवडते पर्यटनस्थळ ठरले आहे. या शहराकडून हाँगकाँगला मोठे उत्पन्न प्राप्त होते. बसगाड्या, विजेवर चालणाऱ्या ट्रामगाड्या व लहानलहान तरींद्वारे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालते. १८८८ पासून व्हिक्टोरिया शिखरापर्यंत तारेवर चालणारी रेल्वे सुविधा कार्यान्वित आहे. शहरात हाँगकाँग विद्यापीठ (स्था. १९१२) आहे.

पहा : हाँगकाँग.

चौधरी, वसंत