निॲसीन : प्राणी व मानव यांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या व ⇨ वल्कचर्म या त्वचारोगास प्रतिबंध करणाऱ्या विशिष्ट पदार्थास निॲसीन असे म्हणतात. हे ब गटातील एक जीवनसत्त्व असून त्याला निकोटिनिक अम्ल, पिरिडीन–३–कार्‌बॉक्सिलिक अम्ल असेही म्हणतात. त्याचे रेणवीय सूत्र C5H4NCOOH असे आहे.

इतिहास : पोषण व निकोटिनिक अम्ल यांचा संबंध कित्येक वर्षे अज्ञात होता. यीस्ट सांद्रितामध्ये (अधिक प्रमाणात एकत्रिक स्वरूपात असलेल्या यीस्टमध्ये) हे अम्ल भरपूर प्रमाणात असल्याचे १८६७ मध्ये माहीत झाले होते. त्या वर्षी ते निकोटिनाच्या ऑक्सिडीकरणापासून [→ऑक्सिडीभवन] मिळविण्यात आले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील नीग्रो रहिवाशांमध्ये वल्कचर्म (पेलाग्रा) हा रोग मोठ्या प्रमाणावर आढळे. हा आजार त्यांच्या गलिच्छ राहणीमुळेच होतो असा समज होता. १९१५ मध्ये जे. गोल्डबर्गर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथ बालकाश्रमातील रविवाशांच्या आहारात मांस, भाज्या, फळे व अंडी या पदार्थांचा समावेश केला. त्यामुळे या रोगाने पछाडलेले तेथील रोगी बरे झाल्याचे त्यांना आढळले. या अन्नपदार्थांमध्ये वल्कचर्म–प्रतिबंधक घटक असल्याचे आणि तो रोग त्रुटिजन्य असल्याचे त्यांनी प्रथम दाखविले. बेरीबेरी नावाच्या रोगाला प्रतिबंध करणाऱ्या घटकाचा शोध करीत असताना कॅझिमिर फुंग्क यांना १९१४ मध्ये निकोटिनिक अम्ल सापडले होते परंतु ते एक जीवनसत्त्व असल्याची कल्पना त्यांना सुचली नव्हती.

इ. स. १९१७ मध्ये कुत्र्यासारख्या प्राण्यामध्ये आढळणारा ‘काळी जीभ’ नावाचा रोग व त्याचे मानवातील वल्कचर्म या रोगाशी असलेले साम्य लक्षात आले. ज्या अन्नपदार्थांमुळे कुत्री रोगमुक्त होतात त्याच पदार्थांच्या सेवनामुळे वल्कचर्मही बरा होतो हे लक्षात आले. १९३५ मध्ये ओ. एच्. व्हारबुर्ख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोड्याच्या रुधिरकोशिकांपासून (रक्तपेशींपासून) ‘निकोटिनिक अम्ल अमाइड’ हा पदार्थ मिळविला होता. १९३७ मध्ये सी. ए. इलव्हेजेम यांनी कुत्र्यामधील काळी जीभ हा रोग यकृतार्क दिल्याने बरा होत असल्याचे व या अर्कातील क्रियाशील घटक निकोटिनिक अम्ल अमाइड असल्याचे दाखविले. वल्कचर्म रोगावर हा पदार्थ गुणकारी ठरला व तो एक अधिकृत औषध म्हणून मानला गेला. तंबाखूच्या अर्कातील निकोटिन या नावाशी नामसादृश्यामुळे संभाव्य घोटाळा टाळण्याकरिता कॉगविल यांनी NICOTINIC ACID व VITAMIN या इंग्रजी शब्दांतील अक्षरे निवडून या जीवनसत्त्वास निॲसीन (NIACIN) हे नाव दिले. निकोटिनिक अम्ल व निकोटिनिक अम्ल अमाइड यांऐवजी निॲसीन व निॲसिनामाइड ही नावे प्रचलित आहेत.

रासायनिक संचरना, प्राप्ती व गुणधर्म : निॲसिनामाइड हे निॲसिनाचे अमाइड आहे. या दोहोंची संचरना पुढीलप्रमाणे आहे.

निकोटिनापासून परमँगॅनेट किंवा वाफाळ नायट्रिक अम्ल यासारखी प्रभावी ऑक्सिडीकारके वापरून निॲसीन बनविता येते. तापविलेल्या निॲसीन विद्रावातून अमोनिया (NH3) जोराने पसरविल्यास अमाइड तयार होते.

निॲसीन निॲसिनामाइड

निॲसीन हा पांढऱ्या रंगाचे, सुईच्या आकाराचे स्फटिक असलेला पदार्थ आहे, पाण्यामध्ये तो १% विरघळतो. क्षार (अल्कली), अल्कोहॉल आणि ग्लिसरीन यांत सहज विरघळतो. त्याचा वितळबिंदू २२८°–२२९° से. आहे. चव आंबट असते. त्याला वास नाही. नेहमीच्या अन्न शिजविण्याच्या पद्धतीमुळे त्याचा नाश होत नाही. हवा, क्षार व प्रकाश यांचा त्यावर परिणाम होत नाही. ⇨ ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुकीकरण केल्यास निॲसिनाच्या क्रियाशीलतेवर परिणाम होत नाही. ते अम्ल असल्यामुळे त्यापासून लवणे व अमाइड सहज बनविता येतात.

 

शरीरक्रियात्मक कार्य : ⇨ थायामीन किंवा ⇨ रिबोफ्लाविन या जीवनसत्त्वाप्रमाणेच निॲसीन अमाइड स्वरूपात को–एंझाइमांचा (एंझाइमांबरोबर म्हणजे जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या पदार्थांबरोबर आढळणारा व त्यांच्या क्रियाशीलतेला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा) घटक असते. निकोटिनामाइड–ॲडेनीन डायन्यूक्लिओटाइड (NAD+) म्हणजे पूर्वीचे को–एंझाइम–१ (किंवा DPN+) आणि निकोटिनामाइड–ॲडेनीन डायन्यूक्लिओटाइड फॉस्फेट (NADP+) म्हणजे पूर्वीचे को–एंझाइम–२ (किंवा TPN+) यांमध्ये निकोटिनामाइड असते [→एंझाइमे]. आतापर्यंत अभ्यासिलेल्या प्रत्येक जिवंत कोशिकेतही ते असते. उत्तम प्रतीच्या प्रथिनांमध्ये ⇨ ट्रिप्टोफेन असते आणि त्यापासून रूपांतरणाने निकोटिनामाइड बनू शकते. म्हणून ट्रिप्टोफेन–समृद्ध पदार्थ निॲसिनाची त्रुटी होऊ देत नाहीत. मक्यातील प्रथिनामध्ये ट्रिप्टोफेन अजिबात नसल्यामुळे मका हे प्रमुख अन्नघटक असणाऱ्या प्रदेशांत निॲसीन–त्रुटिजन्य रोग आढळतो.

पिरिडीन न्यूक्लिओटाइडे अनेक ट्रान्सहायड्रोजेनेसिसची को–एंझाइमे असून ऑक्सिडीकरण–क्षपण [→ क्षपण] विक्रियांमध्ये उत्प्रेरकाचे (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाचे) कार्य करतात. उदा., लॅक्टेटाचे पायरूव्हेटामध्ये रूपांतर.

पुरवठा व दैनंदिन गरज : सर्व प्रकारची धान्ये व प्राणिज अन्नपदार्थांत निॲसिन असते.प्राणिकोशिकांमध्ये ते फक्त निॲसिनामाइड याच स्वरूपात असते. तांदुळ सडणे तसेच पांढरे शुद्ध पीठ बनविण्याकरिता केलेल्या प्रक्रियांमुळे मूळ पदार्थातील निॲसिनाचे प्रमाण घटते.

शारीरिक श्रम व अन्नातील ट्रिप्टोफेनाचे प्रमाण यांवर निॲसिनाची दैनंदिन गरज अवलंबून असते. अमेरिकेतील अन्न व पोषण मंडळाने ६० मिग्रॅ. ट्रिप्टोफेन म्हणजे १ मिग्रॅ. निॲसीन असे ठरविले आहे. प्रत्येक १,००० कॅलरींकरिता ४ ते ६ मिग्रॅ. निॲसिनाची गरज असते. प्रौढास दररोज १२ ते १८ मिग्रॅ. ते पुरेसे असते. पिते मूल असणाऱ्या स्त्रियांना २ मिग्रॅ. निॲसीन अधिक लागते.

अवशोषण, साठा व उत्सर्जन : जठर, लहान आणि मोठे आतडे यांमधून निॲसिनाचे जलद व सहज अवशोषण होते. आतड्यातील सूक्ष्मजंतू, प्रामुख्याने आंत्रदंडाणू (बॅसिलस कोलाय) संश्लेषणाने निॲसीन तयार करतात. निॲसिनाचे उत्सर्जन (शरीराबाहेर टाकण्याची क्रिया) मुख्यत्वेकरून एन–मिथिल निकोटिनामाइड या किंवा ग्लायसिनाशी संयुग्मित स्वरूपात होते. निॲसिनाच्या त्रुटीच्या निदान परीक्षेत एन–मिथिल निकोटिनामाइडाचे मापन करतात.


आमापन : निॲसीन आमापनाकरिता सूक्ष्मजैव व रासायनिक आमापन पद्धती वापरतात [→आमापन,  जैव].

निॲसीन विरोधके व सदृशे : निॲसिनाशी संबंधित असलेली अनेक संयुगे त्याची विरोधक असून ती प्राणी व सूक्ष्मजंतू या दोन्हीमध्ये आढळतात. उदा., पिरिडीन–३–सल्फॉनिक अम्ल व ३–ॲसिटील पिरिडीन. उंदीर व कुत्रा या प्राण्यांवरील प्रयोगान्ती हे सिद्ध झाले आहे. एथिल निकोटिनेट, निकोटिनिक अम्ल, N–मिथिलामाइड, बीटा–पिकोलीन (३–मिथिल पिरिडीन) या पदार्थांची क्रियाशीलता निॲसिनासारखीच असून त्यांची ही क्रियाशीलता त्यांच्या निॲसिनामध्ये रूपांतर होण्यावर अवलंबून असते.

त्रुटिजन्य रोग व औषधी उपयोग : कुत्रा, डुक्कर व माकड तसेच मानवात निॲसिन–त्रुटिजन्य रोग आढळतो. यूरोपात दीर्घकालिक मद्यासक्ती, स्टेॲटोऱ्हिया (वसासमृद्ध मलोत्सर्जन) आणि मानसिक रोग असलेल्या रोग्यांत त्रुटिजन्य विकृती आढळतात. क्षय रोगावरील आयसोनिकोटिनिक अम्ल हे औषध चालू असताना योग्य आहार नसल्यामुळे आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधामुळे त्रुटी उद्‌भवू शकते. वल्कचर्म या रोगामध्ये फक्त निॲसिनाचीच त्रुटी नसून ब जीवनसत्त्व गटातील आणखी काही जीवनसत्त्वांची तसेच ॲस्कॉर्बिक अम्ल यांचीही त्रुटी असावी. २५० ते ५०० मिग्रॅ. निॲसिनाबरोबरच दररोज ही इतर जीवनसत्त्वांचीही त्रुटी भरून काढावी लागते. ते तोंडाने किंवा अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देता येते.

 

संदर्भ : 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.

            2. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S. The Vitamins, Vol. IV, New York and London, 1967.

            3. West, E. S. Todd,W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.

हेगिष्टे, म. द. भालेराव, य. त्र्यं.