वनस्पतिरोगविज्ञान : वनस्पतींना होणाऱ्या  विविध रोगांचा अभ्यास या विज्ञानशाखेत करण्यात येतो. यामध्ये वनस्पतींच्या रोगांचा प्रकार, रोगांची कारणे, त्यांच्या वाढीला जबाबदार असणाऱ्या घटकांची माहिती आणि रोगाचे निर्मूलन या बाबींवर प्रामुख्याने भर दिला जातो. वनस्पतिरोगवैज्ञानिक वनस्पतीच्या रोगाला कारणीभूत होणाऱ्या ⇨कवक, सूक्ष्मजंतू, परोपजीवी (अन्य सजीवांवर आपली उपजीविका करणाऱ्या) वनस्पती, व्हायरस (विषाणू), सूत्रकृमी (नेमॅटोड), प्रतिकूल हवामान, जमिनीतील मूलद्रव्यांचा अभाव इत्यादींचा अभ्यास करून त्याच्या निर्मूलनाबद्दल माहिती मिळवितात. वनस्पतीच्या रोगाचे कारण, लक्षणे, पर्यावरणाचा रोगाच्या वाढीवर होणारा परिणाम, रोगाचा फैलाव, रोगकारकाच्या जीवनचक्राचा अभ्यास, रोगप्रतिबंधक व रोग निर्मूलक उपायांचा शोध या सर्व गोष्टींचा अंतर्भाव वनस्पतिरोगविज्ञानात होतो. 

मराठी विश्वकोशात वनस्पतिरोगविज्ञानाशी संबंधित अशा पुढील नोंदी आहेत : अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग, ॲस्कोमायसिटीज, करपा, काणी रोग, केवडा रोग, तांबेरा, फंजाय इंपरफेक्टाय, फायकोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज, भुरी, मर, वनस्पतींचे त्रुटिजन्य रोग, सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोग, सूक्ष्मजंतुजन्य वनस्पतीचे रोग. यांखेरीज कवक, कवकनाशके, कीटकनाशके, कीटक नियंत्रण, जीवोपजीवन, पीडकनाशके, बुरशी, रोगवाहक व व्हायरस या नोंदीही या संदर्भात पहाव्यात तसेच सर्व महत्त्वाच्या पिकांवरील (उदा., ऊस, गहू, भात, तूर, हरभरा, कापूस वगैरे) व फळझाडांवरील नोंदींमध्ये त्यांच्यावर पडणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची व त्यांवरील उपायांची माहिती दिलेली आहे.

मानवाचे जीवन जवळजवळ पूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. अन्न, वस्त्र, इमारती लाकूड, औषधे, इंधन इ. अनेक गोष्टीसांठी मानवाला वनस्पतींवर अवलंबून रहावे लागते. वनस्पती जर निरोगी असतील, तर त्यांपासून अन्न, वस्त्र इत्यादींचे मुबलक उत्पादन मिळते पण रोगामुळे वनस्पतीच्या उत्पादनात घट येते. ही उत्पादनातील घट काही रोगांमुळे खूपच होते. वनस्पतिरोगविज्ञानात रोगाबाबतच्या अनेक बाबींचा अभ्यास अंतर्भूत असला, तरी या विज्ञानाचा मुख्य उद्देश रोगावर नियंत्रण घालून वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पादनात रोगामुळे होणारी घट कमी करणे हा आहे. कृषी उत्पादनातील घट कमी करणे म्हणजे ते वाचलेले उत्पादन जगातील असंख्य गरजू लोकांच्या साठी वापरणे शक्य होत असल्यामुळे आधुनिक कृषिविज्ञानात या शाखेला महत्त्वाचे स्थान आहे. 

 

वनस्पतिरोगविज्ञानाचा पुढील विज्ञानशाखांशी निकटचा संबंध आहे : वनस्पतिविज्ञान, कवकविज्ञान, आनुवंशिकी, वनस्पतींचे शरीरक्रियाविज्ञान, रसायनशास्त्र, मृदा रसायनशास्त्र, सूक्ष्मजंतुविज्ञान, व्हायरसविज्ञान, सूत्रकृमिविज्ञान, कीटकविज्ञान, भौतिकी, वातावरणविज्ञान, कोशिकाविज्ञान (कोशिकांची म्हणजे पेशींची संरचना, वर्तन, वृद्धी, प्रजनन, कोशिकेतील घटकांचे कार्य व रसायनशास्त्र यांचा अभ्यास), वनस्पतिआकारविज्ञान (वनस्पतींची संरचना व आकार यांचा अभ्यास) व इतर अनेक विज्ञानशाखांचा सुद्धा संबंध आहे. 

 

वनस्पतिरोगाची व्याख्या : ही व्याख्या सोप्या शब्दात करणे कठीण आहे. रोगाची लक्षणे रोग नव्हे किंवा रोगकारक म्हणजे सुद्धा रोग नाही. प्रत्येक वनस्पतींच्या नैसर्गिक कार्याची व आकारमानाची कक्षा सर्वसाधारणपणे ठराविक असते. त्या कक्षेच्या आत नैसर्गिक कार्ये होत असताना ती वनस्पती निरोगी आहे, असे समजले जाते. रोगी अवस्थेत नैसर्गिक कार्यांपैकी एक अथवा अधिक कार्यांची कक्षा विस्तारित होते किंवा आकुंचित होते म्हणजेच अशा अवस्थेत रोगी वनस्पती आपली नैसर्गिक कार्ये योग्य रीतीने करू शकत नाही. म्हणून अशा अवस्थेला रोगी अवस्था रोग मानण्यात येते. आधुनिक संकल्पनेनुसार रोग म्हणजे पोषक किंवा आश्रयी वनस्पती, रोगकारक जीवीपजीवी व पर्यावरण यांच्यामधील परस्परक्रिया होय. वनस्पतीमध्ये रोग उद्‌भवण्यासाठी पोषक वनस्पती, रोगकारक व रोगाच्या वाढीला अनुकूल पर्यावरण या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. पोषक वनस्पती विशिष्ट रोगाला फार ग्रहणशील असेल व रोगकारकात रोगोद्‌भव करण्याची क्षमता तीव्र असेल, तर अनुकूल पर्यावरणात रोगाची तीव्रता जास्त असते. ग्रहणशील पोषक वनस्पती व तीव्र रोगकारक असूनही पर्यावरणाचे घटक अनुकूल नसतील, तर रोगाची तीव्रता कमी राहते. त्याचप्रमाणे ग्रहणशील पोषक वनस्पती व अनुकूल पर्यावरण पण रोगकारकाची रोगोद्‌भव करण्याची क्षमता सौम्य असली, तरी रोगाची तीव्रता कमी आढळते. तसेच रोगकारकाची रोगोद्‌भीव करण्याची क्षमता तीव्र व पर्यावरणही अनुकूल पण जर वनस्पतीमध्ये प्रतिकारक्षमता असेल, तर रोगाची तीव्रता कमी असते. त्यामुळे वनस्पतीमध्ये रोग उद्‌भवण्यासाठी (१) जिच्यामध्ये रोग होऊ शकेल अशी पोषक वनस्पती, (२) तीव्र रोगकारक आणि (३) रोगांच्या वाढीला अनुकूल पर्यावरण या तीन गोष्टींची आवश्यकता असते. 

 

वनस्पतिरोगाचे महत्त्व व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम : वनस्पतिरोगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे, कारण त्यामुळे वनस्पतीचे व तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचे नुकसान होते. वनस्पतिरोगाचा मानवाच्या जीवनावर होणाऱ्या विपरीत परिणामाचे ठळक उदाहरण म्हणजे १८४० च्या सुमारास आयर्लंडमध्ये बटाट्याच्या पिकावर पडलेला रोग. या रोगामुळे बटाट्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले व त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते, कारण बटाटा हेच त्यांचे मुख्य अन्न होते. १८७० साली श्रीलंकेमध्ये कॉपीच्या झाडांवर रोग पडून खूप नुकसान झाले व तेथे पुन्हा कॉफीची लागवड करणे शक्य दिसत नव्हते. भारतामध्ये १९४२ साली बंगालमध्ये भाताच्या पिकावर रोग पडून हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. १९४६-४७ मध्ये मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील काही भागांत गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन गव्हाच्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते. 

वनस्पतिरोगाने नुकसान किती व कोणत्या प्रकारचे होते हे त्या वनस्पतींवर, तिच्यापासून मिळणाऱ्या मुख्य उत्पादनावर, पर्यावरणावर व रोगनिर्मूलन करण्यासाठी केलेल्या उपायांवर अवलंबून असते. काही काही वेळा नुकसान १००%पर्यंतसुद्धा होऊ शकते. वनस्पतिरोगाने उत्पादनात घट तर येतेच पण जे काही थोडे फार उत्पादन हाती पडते त्याची प्रत पण खराब झालेली आढळते. विशेषतः फळफळावळ व भाजीपाला यांच्या पिकांमध्ये प्रत फार महत्त्वाची असते. अशा वेळी रोगामुळे प्रत खराब झाल्यामुळे नुकसान फार सोसावे लागते. काही वनस्पतिरोगांमुळे विषारी पदार्थ तयार होतात. उदा., बाजरीवरील ⇨अरगट रोग. अशा वेळी रोगट बाजरी खाणे योग्य नसते. अरगटमिश्रित बाजरी खाल्ल्याने पुष्कळ लोकांना विषबाधा झाल्याचे व काही जण मृत्यू पावल्याचे आढळून आले आहे. 

वाढत्या लोकसंख्येला अन्नाचा पुरवठा करणे ही जगातील अनेक देशांत बिकट समस्या आहे. रोगामुळे कृषी उत्पादनातील होणारे नुकसान वाचवण्यात मानवाला यश आले नाही, तर ही समस्या अधिकच बिकट होणार नाही. त्यामुळे वनस्पतिरोगवैज्ञानिकांवर मोठी जबाबदारी पडलेली आहे.


 वनस्पतिरोगांचे वर्गीकरण : वनस्पतिरोगांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते : (१) पोषक वनस्पतिपरत्वे : तृणधान्यांचे रोग, फळझाडांचे रोग, भाजीपाला पिकांचे रोग वगैरे.

(२) लक्षणपरत्वे : मर, तांबेरा, करपा, काणी, भुरी इत्यादी.

 

(३) पोषक वनस्पतींच्या ज्या भागाला रोग झाला असेल त्यावरून : मुळांचे रोग, पानांवरील रोग, फळांवरील रोग इत्यादी.

(४) कारणपरत्वे : कवकजन्य, सूक्ष्मजंतुजन्य, व्हायरसजन्य इत्यादी. काही वेळा पुढील तीन प्रकारांची वनस्पतिरोगांचे वर्गीकरण करतात : (१) सजीव कारणामुळे होणारे रोग, (२) निर्जीव कारणामुळे होणारे रोग, (३) व्हायरसामुळे व मायकोप्लाझ्मामुळे (सूक्ष्मजंतूंशी पुष्कळ साधर्म्य असलेल्या परोपजीवी सूक्ष्मजीवाच्या प्रकारामुळे) होणारे रोग.

  

(१) सजीव कारणामुळे होणारे रोग : (अ) कवकामुळे होणारे रोग : उदा., तांबेरा, काणी, मर (आ) सूक्ष्मजंतूमुळे होणारे रोग : उदा., भातावरील करपा, बटाट्यावरील बांगडी रोग (इ) परोपजीवी सपुष्प वनस्पतीमुळे होणारे रोग : उदा., ज्वारीवरील टारफुला,आंब्यावरील बांडगुळे, वनस्पतीवर वाढणारी अमरवेल (ई) सूत्रकृमीमुळे होणारे रोग : उदा., गव्हावरील ओंबीला होणारा (इअर कॉकल) रोग, भाजीपाल्याच्या मुळावरील गाठी [⟶ सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोग].

  

(२) निर्जीव (अजीवोपजीवी) कारणामुळे होणारे रोग : (अ) जमिनीतील घटक : (१) जमिनीतील पाण्याचा अभाव वा आधिक्य, (२) जमिनीची प्रमाणाबाहेर अम्ल ता वा क्षारता (अल्किलाइन), (३) जमिनीमधील मूलद्रव्याचा अभाव वा आधिक्य, (४) जमिनीमधील अपायकारक लवणे, (५) जमिनीतील ऑक्सिजनाचा पुरवठा.

  

(आ) वातावरणातील घटक : (१) प्रकाशाचा अभाव, (२) प्रतिकूल तापमान, (३) आर्द्रता–आधिक्य वा अभाव, (४) कडाक्याची थंडी, (५) वीज पडणे (तडिताघात), (६) हिमवर्षाव, (७) सोसाट्याचा वारा वा पाऊस.

(इ) पिकाच्या मशागतीमध्ये झाडांना होणारी इजा व पिकाच्या संरक्षणासाठी केलेल्या फवारणीचे रासायनिक दुष्परिणाम.

(ई) कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू, धूर इत्यादी.

(उ) साठवून ठेवलेल्या अगर वाहतुकीमध्ये फळे-भाजीपाल्यामध्ये चयापचय क्रियेमुळे (सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडीमुळे) उत्पन्न होणारे हानिकारक पदार्थ. [⟶ अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग].

  

(३) व्हायरसामुळे आणि मायकोप्लाझ्मामुळे होणारे रोग : (अ) व्हायरसापासून होणारे रोग : उदा., भेंडीचा केवडा रोग, बटाट्यावरील अनेक व्हायरसजन्य रोग, टोमॅटोवरील मोझेइक रोग.

(आ) मायकोप्लाझ्मामुळे होणारे रोग : उदा., उसावरील गवताळ वाढ, तिळाचा पर्णगुच्छ किंवा पर्णायित पुष्प रोग.

  

इतिहास : वनस्पतींचे रोग इतिहासपूर्व काळापासून ज्ञात होते. भुरी व करपा या रोगांचा बायबलमध्ये उल्लेख आहे. प्राचीन हिब्रू लोकांची अशी कल्पना होती की, वनस्पतिरोग म्हणजे ईश्वराने मानवाला त्याच्या दुष्कृत्याबद्दल दिलेली शिक्षा होय. ॲरिस्टॉटल व त्यांचे शिष्य थीओफ्रॅस्टस यांनी पिकावर पडणाऱ्या पुष्कळ रोगांचे वर्णन केले आहे. त्यावरून तांबेरा रोगामुळे तृणधान्याचे त्या काळी नुकसान होत असावे, असे दिसते. थीओफ्रॅस्टस यांनी निरनिराळ्या वनस्पतिरोगांच्या परिणामांचे वर्णन केले होते व वातावरणात होणारे बदल हे रोगाचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले होते. प्राचीन ग्रीक लोकांच्या मताप्रमाणे प्रतिकूल हवामान, जमिनीतील दोष आणि ईश्वराची अवकृपा यांमुळे पिकांवर रोग पडतात. आपल्या शेतातील पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून ते अपोलो व इतर देवतांची प्रार्थना करीत. रोमन काळात गहू व बार्ली (सातू) या पिकांवरील तांबेरा रोगाचा उल्लेख सापडतो. रोग पडू नये म्हणून रोमन लोक रोबीगास या देवाची दरवर्षी प्रार्थना करत. रोगाची कारणे व त्यांचे  निवारण यांचे त्या काळी ज्ञान नव्हते. अंधश्रद्धा, प्रचलित धार्मिक समजुतीचा पगडा व शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव यांमुळे अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत वनस्पतिशास्त्रज्ञांना वनस्पतिरोगाची कारणे व पर्यावरणाचा रोगाच्या वाढीशी असलेला संबंध यांविषयी स्पष्ट कल्पना नव्हती. अठराव्या शतकाच्या अखेरीसच या विज्ञानशाखेची खरी प्रगती सुरू झाली.

  

सूक्ष्मदर्शकाचा शोध सतराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास लागला. १६७५ साली आंतॉन व्हान लेव्हेनहूक यांनी सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने सूक्ष्मजंतू व इतर सूक्ष्मजीवांबद्दल शोध लावला. पी. ए. मायकेली (१६७९–१७३७) या इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम बऱ्याच कवकांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून कवकाची निर्मिती बीजाणूपासून (प्रजोत्पादक आणि एककोशिक सूक्ष्म कणापासून) होते याबद्दल त्यांच्या मनात शंका राहिली नाही. एम्‌. टिलेट (१७५५), सी. एच्‌. पेरसून (१८०१) व ई. एम्‌. फ्रीस (१८२१) यांनी कवकविज्ञानातील आपले निष्कर्ष मांडले. कवकामुळे वनस्पतिरोग होतात या निरीक्षणावर आधारलेला सिद्धांत बी. प्रीव्होस्ट या शास्त्रज्ञांनी १८०७ साली मांडला परंतु सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतिरोग उद्‌भवतात हे तत्त्व तत्कालीन वनस्पतिशास्त्रज्ञ मानण्यास तयार नव्हते. सूक्ष्मजीवाची उत्पत्ती आपोआप होते या कल्पनेचा त्यांच्या मनावर दृढ परिणाम होता. १८४० सालाच्या सुमारास आयर्लंडमध्ये बटाट्याच्या पिकावर करपा रोगाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. हा रोग कवकजन्य असल्याबद्दलचे काही वनस्पतिशास्त्रज्ञांचे मत होते, तर बऱ्याच वनस्पतिशास्त्रज्ञांना ते मान्य नव्हते. एम्‌. जे. बर्कली या इंग्लिश शास्त्रज्ञांना हा रोग कवकजन्य असल्याची खात्री होती पण ते प्रयोगसिद्ध पुरावा देऊ शकले नाहीत. अखेरीला हाइन्रिख अँताँ द बारी (१८३१–८८) या जर्मन शास्त्रज्ञांनी वनस्पतिरोग कवकापासून होतात, हे सिद्ध केले. त्यांनी गहू, मका, घेवडा या पिकांवरील रोगांवर संशोधन करून प्रीव्होस्ट यांनी ४० वर्षापूर्वी मांडलेला कवकांमुळे वनस्पतिरोग होतात हा सिद्धांत खरा असल्याचे पटवून दिले. त्यामुळे द बारी यांना वनस्पतिरोगविज्ञानाचे जनक समजतात. त्यांचे समकालीन शास्त्रज्ञ जे. जी. कून (१८२५–१९१०) यांनी जर्मनीत याच विषयावर संशोधन केले. १८५८ साली त्यांचा ‘पिकांवरील रोग, त्याची कारणे व निवारण’ या विषयावरील ग्रंथ प्रसिद्ध झाला. १८७८ साली यूरोपमध्ये द्राक्षपिकावर करपा रोग आढळून आला आणि त्याच्या नियंत्रणासाठी पी. एम. ए. मिलार्दे यांनी १८८५ साली  ‘बोर्डो मिश्रण’ उपयुक्त असल्याचे सिद्ध केले. याच सुमारास गंधक व गंधक चुना मिश्रण यांचा वनस्पतिरोगनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. पारायुक्त कवकनाशकांचा शोधही याच सुमारास लागला. अमेरिकेत फेडरल प्लँट क्वारंटाइन ॲक्ट (वनस्पतिसंसर्गरोध अधिनियम) १९१२ मध्ये अंमलात आला. पुढे या विज्ञानशाखेत अनेक शास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधन करून भर घातली व तिची झापाट्याने वाढ होत गेली.

  

टी. जे. बुरिल या शास्त्रज्ञांनी १८७८ साली सूक्ष्मजंतूंमुळेसुद्धा वनस्पतिरोग होतात हे प्रथमच सिद्ध केले. त्यानंतर ई. एफ्. स्मिय यांनी या विषयावर महत्त्वाचे संशोधन करून वनस्पतींच्या सूक्ष्मजंतुजन्य रोगांवर बॅक्टिरिया इन रिलेशन टू प्लँट डिसिझेस (३ खंड, १९०५–१४) हा ग्रंथ लिहिला.

  

इ. स. १७४३ मध्ये टी. नीडम या शास्त्रज्ञांनी सूत्रकृमीमुळे वनस्पतिरोग होतात, हे प्रथमतः दाखवून दिले. पुढे १८५५ मध्ये बर्कली व १८५७ मध्ये कून यांनी सूत्रकृमीमुळे होणाऱ्या इतर पिकांच्या रोगांची माहिती दिली.


 व्हायरसांमुळे वनस्पतिरोग होतात हे सिद्ध करण्याचे काम ए. ई. मायर, डी. आयव्हॅनोव्हस्की आणि एम्‌. डब्ल्यू. बायेरिंक या तीन शास्त्रज्ञांनी केले. १९३५ मध्ये डब्ल्यू. एम्. स्टॅन्ली या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या केवडा रोगाचा व्हायरस हा न्यूक्लिओप्रथिन असल्याचे सिद्ध केले.

  

विसाव्या शतकामध्ये वनस्पतिरोगविज्ञानामध्ये खूप प्रगती झाली. हजारो वनस्पतिरोगांसंबंधी संशोधन होऊन रोगांना कारणीभूत असणाऱ्या रोगकारकांबद्दल सखोल माहिती मिळवून त्यांच्या नियंत्रणासंबंधी उपाय शोधले गेले. १९४४ मध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर व्हायरस, सूक्ष्मजंतू व कवक यांचे आकारमान व कोशिकांची घडण यांवर संशोधन सुरू झाले. कवकनाशके व सूक्ष्मजंतुनाशके

  

यांवरही संशोधन सुरू झाले असून नवी नवी कवकनाशके व सूक्ष्मजंतुनाशके उपयोगात येत आहेत. संशोधनामुळे अनेक पिकांमध्ये रोगप्रतिकारक वाण उपलब्ध झाले आहेत. अशा प्रकारे वनस्पतिरोगविज्ञानातील प्रगतीमुळे रोग नियंत्रणाचे व निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

  

भारतात ई. जे. बटलर या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या पिकांवरील कवकजन्य रोगांवर बहुमोल संशोधन करून १९१८ मध्ये फंजाय अँड डिसिझेस इन प्लँट्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. जे. एफ्. दस्तुर या बटलर यांच्या समकालीन शास्त्रज्ञांनी ‘फायटोप्थोरा’ या कवकांवर संशोधन केले. बटलर यांच्यानंतर बी. बी. मुंडकूर यांनी १९४७ साली इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी स्थापन केली (या संस्थेतर्फे इंडियन फायटोपॅथॉलॉजी हे त्रैमासिक प्रसिद्ध होते). के. सी. मेहता यांनी गव्हाच्या तांबेऱ्यावर संशोधन केले, तर टी. एस्. सदाशिवन यांनी मद्रास विद्यापीठात कवकविज्ञान व वनस्पतिरोगविज्ञान ह्या दोन विज्ञानशाखा चालू केल्या.

  

महाराष्ट्रात बी. एन्. उप्पल, पी. एन्. पटेल, एम्. के. देसाई, मा. ना. कामत व वि. प. भिडे यांनी मुख्यत्वे सूक्ष्मजंतुजन्य तसेच कवकजन्य वनस्पतिरोगांवर संशोधन केले. कामत यांनी वनस्पतिरोगविज्ञानावर मराठीत पिकांचे रोग व त्यावरील उपाय (१९६५) हा ग्रंथ लिहिलेला आहे.

  

नवी दिल्ली येथील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वनस्पतिरोगविज्ञानाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागात वनस्पतिरोगविज्ञानामधील पदव्युत्तर शिक्षण दिले जाते तसेच तेथे संशोधनासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात वनस्पतिरोगविज्ञानाचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण तसेच संशोधनाचे काम राहुरी, परभणी, अकोला व दापोली येथील चारही कृषी विद्यापीठांत चालते. [⟶ कृषि संशोधन].

  

अध्ययनाच्या पद्धती : वनस्पतिरोगाच्या अध्ययनापूर्वी रोगाचे कारण निश्चित करावे लागते. जर रोगकारकामुळे रोग झाला आहे असे आढळले, तर रोगकारक पोषक वनस्पतीपासून विलग करून त्याचे आकृतिक गुणधर्म, निरनिराळ्या संवर्धन माध्यमांवर त्याची होणारी वाढ, विकृतिकारकता वगैरे बाबींचा अभ्यास करावा लागतो. रोगाचे कारण निश्चित करण्यासाठी रॉबर्ट कॉख या शास्त्रज्ञांनी काही गृहीत तत्वे प्रस्थापित केली आहेत. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रत्येक संक्रामणात विशिष्ट रोगकारक आढळून आला पाहिजे, (२) रोगकारकाचे रोगट वनस्पतीपासून विलगीकरण करून त्यांचे शुद्ध संवर्धन करणे, (३) शुद्ध संवर्धित रोगकारकाचा निरोगी पोषक वनस्पतींशी संपर्क केल्यावर पोषक वनस्पतीत रोगोद्‌भव झाला पाहिजे आणि रोगाची लक्षणे ज्या रोगट वनस्पतीपासून रोगकारकाचे विलगीकरण केले होते त्या वनस्पतीच्या लक्षणांशी जुळली पाहिजेत, (४) रोगोद्‌भव केलेल्या वनस्पतीतून रोगकारकाचे पुन्हा विलगीकरण केल्यावर त्याचे मूळ शुद्ध संवर्धित रोगकारकाशी गुणधर्मांच्या बाबतीत साम्य असले पाहिजे.

  

सूक्ष्मजंतू व वैकल्पिक स्वरूपाची कवके यांच्या वाढीसाठी ‘पोटॅटो डेक्‌स्ट्रोज आगर’ किंवा ‘ओट मील आगर’ [⟶ आगर ] यासारख्या संवर्धन माध्यमाचा उपयोग केला जातो परंतु व्हायरस व सदापरोपजीवी कवके (उदा., तांबेरा, द्राक्षावरील केवडा) संवर्धन माध्यमावर वाढू शकत नाहीत. त्यांच्या वाढीसाठी जिवंत वनस्पतींची आवश्यकता असते. यासाठी अशा प्रकारच्या रोगकारकांच्या संवर्धनासाठी त्या त्या पोषक वनस्पतीचा उपयोग केला जातो.

  

वनस्पतिरोगांची लक्षणे व चिन्हे : ज्या वेळी वनस्पतीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्या वेळी तिच्यामध्ये आकृतिक व शरीरक्रियात्मक फरक दिसून येतात. या फरकामुळे रोगी वनस्पती निरोगी वनस्पतीहून निराळ्या दिसतात. रोगोद्‌भवामुळे वनस्पतीमध्ये बाह्यतः दिसून येणाऱ्या शरीरक्रियात्मक अभिव्यक्तीला लक्षणे म्हणतात. रोगाचे निदान करण्यासाठी लक्षणांचा पुष्कळ उपयोग होतो परंतु काही बाबतींत निरनिराळ्या रोगांची लक्षणे सारखीच असू शकतात. अशा वेळी अचूक निदानासाठी निश्चित कारण शोधून काढणे आवश्यक असते. काही रोगांमध्ये बाह्यतः कोणतेच लक्षण दिसत नाही (उदा., बटाट्याचा एक्स व्हायरस रोग) तथापि अशा रोगामुळे सुद्धा उत्पादनात घट आल्याचे दिसून येते.

  

काही रोगांमध्ये वनस्पतीच्या बाह्य अगर अंतर्भागात रोगकारकाची वाढ झालेली दिसते. त्यामुळे रोग झाल्याचे सिद्ध करता येते. रोगाच्या अशा प्रकारच्या पुराव्याला चिन्ह अशी संज्ञा आहे. उदा., गव्हावरील तांबेरा, द्राक्षावरील केवडा व भुरी यांच्या बाबतीत इतर पुराव्याची जरूरी भासत नाही. याउलट दैहिक रोगात असा पुरावा रोगट भाग सूक्ष्मदर्शकाखाली तपासून अथवा रोगकारकाचे विलगीकरण करून मिळतो उदा., कपाशीवरील मर रोग. काही शास्त्रज्ञांच्या मते लक्षणे व चिन्हे यांत फरक नाही. वनस्पतिरोगाच्या लक्षणांचे तीन प्रकार आहेत : (१) ऊतकमृत्यू, (२) अधिवृद्धी व (३) अववृद्धी.

  

(१) ऊतकमृत्यू : (ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह). हा एक निरनिराळ्या लक्षणांचा समूह आहे. यात ⇨अपित्वचा, ⇨स्थूलकोनोतक, ⇨ऊतककर, ⇨वाहक वृंद व पानाचे ऊतक या विविध ऊतकांमध्ये रोगकारकाची वाढ होते. परिणामी संपूर्ण वनस्पतीचा अथवा वनस्पतींच्या काही भागांचा वा काही ऊतकांचा नाश होतो. यात खालील लक्षणांचा समावेश आहे.

  

(अ) पानावरील ठिपके : पानाचे विवक्षित भाग रोगामुळे पिवळे अथवा काळे पडतात. (उदा., भूईमुगाचा टिक्का रोग). ज्या वेळी पानावरील ठिपक्याचा भाग गळून पडतो त्या वेळी पानाला गोल छिद्रे पडतात.

  

(आ) करपा : (ब्लाईट अथवा ब्लास्ट). वनस्पतीची पाने, फांदी, शेंडा अगर संपूर्ण वनस्पती जलद गतीने वाळते आणि वाळलेला भाग जळाल्यासारखा (करपल्यासारखा) दिसतो (उदा., भातावरील करपा). यात कवकामुळे होणारा करपा (ब्लास्ट) व सूक्ष्मजंतूमुळे होणारा कडा करपा (ब्लाईट) असा फरक आहे. [⟶ करपा ].

  

(इ) व्रण अथवा खैरा : (कँकर). वनस्पतीच्या खोडावरील साल रोगामुळे वाळते व त्या ठिकाणी मोठे डाग पडतात. काही वेळा वाळलेली साल तडकते अथवा गळून पडते. रोगाची व्याप्ती वाढल्यास संपूर्ण फांदी अथवा संपूर्ण झाड वाळते. उदा., लिंबू, आंबा व इतर फळझाडांच्या खोडावरील खैरा.


  

(ई) काळा व्रण : (अँथ्रॅक्नोज). या लक्षणात रोगामुळे स्थूलकोनोतक व ऊतककर यांचा नाश होतो. रोगट भाग खोलगट असून त्याच्या कडा काहीशा उंच असतात. उदा., द्राक्षे, घेवडा, मिरची यांवरील काळा व्रण अथवा अँथ्रक्नोकज रोग.

  

(उ) कूज : हे लक्षण असलेल्या रोगात ⇨मृदूतक, स्थूलकोनोतक व ⇨भेंड (निकाष्ठ) यांचा मृत्यू होतो. कुजण्याची क्रिया कवकामुळे किंवा सूक्ष्मजंतूमुळे होते. वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांवर (मूळ, खोड, कळ्या, फुले, फळे) कूज आढळून येते. अवयवाप्रमाणे मूळकूज, खोडकूज, फळकूज अशी नावे आहेत, कुजलेल्या भागाच्या रंगावरूनही काळी कूज, लाल कूज, अशी नावे आहेत. कुजलेला भाग घट्ट व कोरडा असल्यास कोरडी कूज व मऊ असल्यास मऊ कूज आणि कुजणाऱ्या भागातून स्त्राव होत असल्यास ओली कूज असे म्हणतात. ही लक्षणे बटाटे व फळे यांच्या साठवणीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात व त्यामागे सजीव अगर निर्जीव कारणे असू शकतात.

  

(ऊ) मर : या लक्षणात रोगट वनस्पती पाण्याअभावी वाळल्यासारखी दिसते. प्रथम पाने व शेंड्याकडील भाग कोमेजून मान टाकल्यासारखा दिसतो. नंतर शेंड्याकडील भाग अगर संपूर्ण वनस्पती वाळते. वनस्पतीच्या मूळांना इजा झाल्याने अथवा जलवाहिन्यांत कवक किंवा सूक्ष्मजंतूंची वाढ झाल्यामुळे अथवा रोगकारकातून स्त्रवणार्याभ विषारी द्रव्यामुळे मर रोग होतो. उदा., कापूस, तूर, हरभरा, वाटाणा या पिकांचा मर रोग. [⟶ मर ].

  

(ए) रोपांची कूज अथवा रोपे मोडून पडणे : (डँपिंग ऑफ). रोपांचा जमिनीलगतचा खोडाचा भाग कुजल्यामुळे रोपे मान टाकल्याने मोडून पडतात. उदा., टोमॅटो, मिरची, भाजीपाल्याच्या रोपांची कूज.

  

(ऐ) स्त्राव : रोगकारकामुळे वनस्पतीतून निरनिराळे स्त्राव बाहेर पडतात. ते वनस्पतींना हानिकारक असतात. उदा., लिंबू वर्गीय (सिट्रस) फळझाडांचा डिंक्या रोग. नारळाच्या व सुपारीच्या झाडातून रोगकारकामुळे साल तडकून स्त्राव होतो.

  

(२) अधिवृद्धी : या प्रकारातील लक्षणांत वनस्पतींच्या विशिष्ट भागातील कोशिकांच्या संख्येत प्रमाणाबाहेर वाढ होते अथवा त्या भागातील कोशिका आकारमानाने मोठ्या होतात. यामुळे रोगट भागाची अस्वाभाविक वाढ होते. अधिवृद्धीमुळे मुळावर, खोडावर व पानावर गाठी उद्‌भवतात. कवक, सूक्ष्मजंतू, व्हायरस, सूत्रकृमी, कीटक, वनस्पति–वृद्धी नियंत्रक रासायनिक द्रव्ये आणि २, ४–डी सारखी तणनाशके यांमुळे अधिवृद्धी निर्माण होते. कोबीच्या मुळावरील गाठी, पपईचा पानवळी रोग आणि बटाटे, मिरची, वांगी यांसारख्या पिकांच्या मुळांवरील सूत्रकृमिजन्य गाठी ही या लक्षणाची उदाहरणे आहेत. बाजरीच्या केवडा रोगातील पर्णमय कणीस हाही अभिवृद्धीचाच प्रकार होय.

  

(३) अववृद्धी : वनस्पतीची प्रमाणात वाढ न झाल्यामुळे तिच्यातील हरितद्रव्य कमी होते अथवा वनस्पतीच्या विशिष्ट भागाची अथवा संपूर्ण वनस्पतीची वाढ खुरटते. संपूर्ण वनस्पती अथवा पाने कमीजास्त प्रमाणात पिवळी होणे, पानावरील केवडा अथवा मोझेइक रोग, पानांचे आकारमान लहान होऊन त्यांचे झुबके होणे (लघुपर्ण) ही लक्षणे या प्रकारात येतात. व्हायरसजन्य रोगात ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात (उदा., भेंडी, तंबाखू, पपई या पिकांवर आढळून येणारा केवडा रोग आणि वांगे, कापूस, टोमॅटो यांचा लघुपर्ण रोग). [⟶ केवडा रोग ].

  

वनस्पतिरोगाची कारणे : वनस्पतिरोगांचे वर्गीकरण या सदरात नमूद केल्यानुसार वनस्पतिरोग सजीव वा निर्जीव कारणांनी व व्हायरसांमुळे उद्‌भवतात.  

  

(१) सजीव कारणे : (अ) कवक, (आ) सूक्ष्मजंतू, (इ) जीवोपजीवी सपुष्प वनस्पती व (ई) सूत्रकृमी.

  

(अ) कवक : हा वनस्पतीचा अल्पविकसित व हरितद्रव्यविरहित प्रकार आहे. कवकाला मुळे, खोड अथवा पाने नसतात. त्यांची संरचना तंतुमय असते आणि या तंतूंना कवकतंतू म्हणतात व तंतुमय रचनेला कवकजाल म्हणतात. कवकाची पुनरूत्पत्ती बीजाणूमुळे होते. शिळ्या भाकरीवरील बुरशी हा कवकाचा प्रकार सर्वांच्या परिचयाचा आहे. पोषणावर आधारित असे कवकाचे दोन प्रकार आहेत. (१) मृतोपजीवी व (२) परोपजीवी. मृतोपजीवी कवक मृत कोशिकीय कार्बनी पदार्थावर पोषण करतात. (उदा., भाकरीवरील बुरशी). परोपजीवी कवके सजीव वनस्पतींवर आपले पोषण करतात. त्यांपैकी काही संपूर्णपणे परोपजीवी असतात. त्यांना सदाजीवोपजीवी म्हणतात (उदा., गव्हावरील तांबेरा). काही कवके मुख्यत्वे परोपजीवी असतात परंतु जीवनचक्राच्या काही भागांत ती मृतोपजीवी अवस्थेत राहू शकतात. मात्र त्यांचे जीवनचक्र पोषक वनस्पतीवाचून पुरे होत नाही. अशा कवकांना वैकल्पिक मृतोपजीवी म्हणतात. (उदा., मक्याचा काणी रोग). याउलट काही कवके सामान्यतः मृतोपजीवी असतात परंतु विशिष्ट परिस्थितीत परोपजीवी होतात. अशा कवकांना वैकल्पिक परोपजीवी म्हणतात (उदा., कापसाचा मर रोग).

  

आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या सर्व वनस्पतींवर कवकांमुळे रोग होतात. इतकेच नव्हे, तर वनस्पतिरोगांपैकी बहुसंख्य रोग कवकांमुळे होतात. काही महत्त्वाचे कवकजन्य रोग पुढीलप्रमाणे आहेत : (१) गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका, अंजीर, वटाणा आणि भुईमूग या पिकांवरील तांबेरा (२) गहू, बाजरी, ज्वारी, मका आणि ऊस या पिकांवरील काणी (३) गहू, वाटाणा, द्राक्षे, काकडी या पिकांवरील भुरी रोग (४) द्राक्षावरील केवडा व करपा (५) कापूस, तूर, हरभरा, ऊस, वाटाणा व पानवेल यांवरील मर रोग (६) भाताचा करपा, भुईमुगाचा टिक्का (७) कापसाचा मूळकूज, दह्या व कवडी रोग (८) मोसंबीचा डिंक्या, पपईचा खोडकूज (९) आल्याची व रोपट्यांची कूज, सुपारीची गळ, हळदीचा टिक्का (१०) ज्वारी–बाजरीचा अरगट (११) बटाट्यावरचा करपा वगैरे. [⟶ ॲस्कोमायसिटीज करपा कवक काणी रोग केवडा रोग तांबेरा फंजाय इंपरफेक्टाय, बॅसिडिओमायसिटीज भुरी मर].

  

(आ) सूक्ष्मजंतू : सूक्ष्मजंतूमुळेसुद्धा वनस्पतिरोग होतात हे बुरिल या शास्त्रज्ञांनी १८७८ मध्ये सिद्ध केले. सूक्ष्मजंतूचे अस्तित्व जवळ जवळ सर्वच ठिकाणी उदा., माती, पाणी, हवा इत्यादींमध्ये असते. सामान्यतः सूक्ष्मजंतू लांबट गोल, किंवा गोल (वर्तुळाकार) आकाराचे असतात. त्यांची पुनरूत्पती कोशिका–विभाजनामुळे होते.

  

सूक्ष्मजंतूचा वनस्पतीमध्ये प्रवेश पुढील प्रकारांनी होतो : (१) नैसर्गिक छिद्रे, त्वग्रंधे (अपित्वचेतील सूक्ष्म रंध्रे) (२) जखमा, (३) मूलरोम (पाणी व जमिनीतील खनिजे शोषून घेणाऱ्या मूळावरील बारीक नलिकाकार वाढी) व किंजल्क (ज्यावर पराग पडून रुजतात तो फुलाचा भाग). सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या रोगांत पानावरील ठिपके, अधिवृद्धी व मर हे मुख्यत्वेकरून आढळतात. पानावरील ठिपक्यांत रोगकारक सूक्ष्मजंतू त्वग्रंध्रे, जलप्रपिंड (ज्यातून पाणी बाहेर टाकले जाते असे पानाच्या शिरेच्या टोकाला असलेले रंध्र) व जखमा यांद्वारे प्रवेश करतात आणि कोशिकेतील अन्नशोषण करून वाढतात. परिणामी कोशिका मरतात व त्याजागी पानावर पिवळे ठिपके पडतात. काही रोगांत जंतूंचा पानात शिरकाव झाल्यावर ते वाहक वृंदात प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ झाल्याने झाड मरते (उदा., बटाट्याचा बांगडी रोग). इतर काही रोगांत पानांत शिरलेल्या जंतूंची वाढ शीघ्रग्रतीने होते आणि संपूर्ण पाने व फांद्या जळून गेल्यासारख्या दिसतात. कूज या रोगाच्या प्रकारात कोशिकांना जोडणाऱ्या मध्यपटलावर रोगकारक जंतू हल्ला करतात. त्यामुळे कोशिका अलग होतात व मरतात. इतर जंतूंच्या क्रियेमुळे तो भाग कुजून घाण सुटते (उदा., बटाटे, कोबी व फुलकोबी यांची कूज). काही रोगांत रोगट जागी कोशिकांची वाढ झाल्यामुळे गाठी उद्‌भवतात व काही वनस्पतींत अनेक मुळे फुटतात.


 सूक्ष्मजंतूमुळे होणारे काही महत्त्वाचे वनस्पतिरोग पुढीलप्रमाणे आहेत : भातावरील सूक्ष्मजंतुजन्य करपा, लिंबावरील खैरा, कापसाचा कोनावर टिक्का रोग, कोबीची कूज, बटाट्याचा बांगडी रोग, सफरचंदावरील सूक्ष्मजंतुजन्य करपा रोग. [⟶ सूक्ष्मजंतुजन्य वनस्पतींचे रोग].

  

(इ) परोपजीवी सपुष्प वनस्पती : या वर्गातील काही वनस्पती पोषक वनस्पतीच्या खोडावर वाढतात, तर काही मुळांवर वाढतात. काही वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते व पोषणासाठी त्या पोषक वनस्पतीवर पूर्णपणे अवलंबून असतात, तर काही हरितद्रव्ययुक्त वनस्पती पोषक वनस्पतीवर अंशतः अवलंबून असतात. अशा प्रकारच्या वनस्पती पोषक वनस्पतीतून शोषकद्वारे मूलद्रव्ये शोषून घेतात आणि स्वतःच्या पानातील हरितद्रव्याच्या साह्याने अन्नातील कार्बोहायड्रेट घटक तयार करतात.

  

परोपजीवी सपुष्प वनस्पतींची उदाहरणे : (१) निरनिराळ्या वनस्पतींवर वाढणारी पिवळी अमरवेल, (२) आंबा व इतर वनस्पतींवर वाढणारी बांडगुळे (लोरँथस), (३) तंबाखू, वांगी, टोमॅटो वगैरे पिकांवरील बंबाखू (ऑरोबॅंकी), (४) ज्वारी, ऊस, मका या पिकांवरील टारफुला (स्ट्रायगा). यांपैकी अमरवेल व बंबाखू यांमध्ये हरितद्रव्य नसते, त्यामुळे त्या पोषणासाठी पोषक वनस्पतीवर संपूर्णपणे अवलंबून असतात. बांडगूळ व टारफुला या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे या पोषक वनस्पतीवर अंशतः अंवलंबून असतात. [⟶ अमरवेल बांडगूळ].

  

(ई) सूत्रकृमी : वनस्पतिरोगकारक सूत्रकृमी हे गोलकृमी असून ते सूक्ष्म (सु. १ मिमी. अथवा त्याहूनही लहान) असतात. त्यांच्या बहुसंख्य जाती जमिनीत वास्तव्य करतात व वनस्पतीच्या मुळांत शिरून तेथे वाढतात. त्यामुळे मुळांवर गाठी उत्पन्न होतात. या गाठींमध्ये असंख्य सूत्रकृमी असतात. मुळावरील सूत्रकृमींमुळे पिकाची वाढ खुंटते व उत्पन्नात घट येते. वांगी, टोमॅटो, कापूस वगैरे वनस्पतींमध्ये मुळांवरील सूत्रकृमिजन्य रोग दिसून येतो. [⟶ नेमॅटोडा सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोग].

  

(२) निर्जीव कारणे : या कारणांनी होणारे महत्त्वाचे वनस्पतिरोग नसल्याने त्यांचा येथे तपशील दिलेला नाही [⟶ अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग].

  

(३) व्हायरस व मायकोप्लाझ्मामुळे होणारे रोग : (अ) व्हायरसामुळे होणारे रोग : वनस्पतिरोगकारकांमध्ये व्हायरसाला फार महत्त्वाचे स्थान आहे. व्हायरसाचे बरेच गुणधर्म सजीवाप्रमाणे आहेत परंतु काही गुणधर्म निर्जीवाप्रमाणे आहेत. यासाठी सजीव व निर्जीव या दोन्ही वर्गांमध्ये त्याचा समावेश करता येत नाही. रोगकारकाचा तो एक वेगळाच प्रकार मानला जातो. संशोधनानंतर व्हायरस हे न्यूक्लिओप्रथिन असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हायरसाचे कण पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो कारण ते सूक्ष्मजंतूपेक्षा सुद्धा सूक्ष्म असतात. त्यांच्या वाढीसाठी जिवंत वनस्पतीची आवश्यकता असते. व्हायरसाचा वनस्पतीत प्रवेश जखमांवाटे अथवा संसर्गामुळेही होतो. कीटकांमार्फत व कलमे करण्याच्या क्रियेत रोगट वनस्पतीतून निरोगी वनस्पतीत व्हायरसाचा प्रवेश होऊ शकतो. प्रवेश झाल्यावर वनस्पतींच्या कोशिकांत त्यांची वाढ होते व रोगाची बाह्य लक्षणे दिसून येतात. तापमान अनुकूल नसल्यास वनस्पतींत व्हायरसाची वाढ झालेली असूनही बाह्य लक्षणे नाहीत. व्हायरसजन्य रोगात वनस्पतीचा मृत्यू होत नसला, तरी वाढ खुंटून उत्पादनात घट येते.

  

काही व्हायरसजन्य वनस्पतिरोग पुढीलप्रमाणे आहेत : (१) भेंडी, पपई, केळी या पिकांवरील केवडा अथवा मोझेइक (२) बटाट्यावरील अनेक प्रकारचे व्हायरसजन्य रोग (३) टोमॅटोवरचा केवडा (४) भुईमुगावरचा शेंडा कुजणे (५) मुगावरचा केवडा वगैरे. [⟶ व्हायरस].

  

(आ) मायकोप्लाझामुळे होणारे वनस्पतिरोग : मायकोप्लाझामुळे प्राण्यांना रोग होतात याची माहिती पूर्वी प्राणिरोगशास्त्रज्ञांना होती पण १९६७ सालापासून काही वनस्पतिरोग मायकोप्लाझ्मामुळे होतात, असे आढळून आले आहे. त्यापूर्वी हे रोग व्हायरसामुळे होत असावेत, अशी शंका होती. जपानी शास्त्रज्ञांनी यावर प्रथम प्रकाश टाकला. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने व या रोगाची लक्षणे टेट्रासायक्लीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थाने नाहीशी होतात या माहितीच्या आधारे मायकोप्लाझ्मामुळे होणाऱ्या रोगाची माहिती मिळाली. जवळजवळ ८० वनस्पतिरोग मायकोप्लाझ्मामुळे होत असावेत, असा आतापर्यंतचा अंदाज आहे. मायकोप्लाझ्मामुळे होणारे काही वनस्पतिरोग पुढीलप्रमाणे आहेत : (१) उसावरील गवताळ वाढ : हा रोग सर्वप्रथम महाराष्ट्रात १९४९ साली आढळला. हा व्हायरसामुळे होत असावा, असे प्रथम वाटले होते. यामध्ये उसाला गवताच्या ठोंबाप्रमाणे मुळापासून फूट येते आणि त्या फुटीला अरूंद पिवळसर पाने येतात. रोगाच्या निर्मूलनासाठी उसाच्या कांड्यावर उष्ण जल प्रक्रिया ५० सें. तापमानाच्या पाण्यात करून लागवडीसाठी वापरतात. (२) वांग्यावरील बारीक पानाचा रोग आणि (३) तिळावरील पर्णगुच्छ किंवा पर्णयित पुष्परोग.

  

रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश : वनस्पतीत रोग उद्‌भवण्यासाठी रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश होऊन त्याची वाढ व्हावी लागते. कवक, सूक्ष्मजंतू, व्हायरस वगैरे रोगकारक परोपजीवी असल्यामुळे वनस्पतीत तयार झालेल्या अन्नावर ते वाढतात. त्यामुळे वनस्पतीचा अन्नपुरवठा कमी होतो आणि परिणामी वनस्पतीची नैसर्गिक वाढ होत नाही. तसेच रोगकारक वनस्पतीतील द्रव्यावर व कोशिकांवर रासायनिक विक्रिया घडवून आणतात आणि त्यामुळे रोगाची निरनिराळी लक्षणे उद्‌भवतात. वनस्पतीत रोगकारकाचा प्रवेश झाल्यापासून लक्षणे दिसून येण्यास काही काळ जावा लागतो. या काळाला परिपाककाल असे म्हणतात. या अवधीत रोगकारकाच्या वाढीसाठी हवामान अनुकूल असल्यास रोग जलद गतीने वाढतो व त्याची तीव्रताही अधिक असते. कवकाचा वनस्पतीमध्ये प्रवेश होण्यासाठी प्रथम बीजाणूंचे अंकुरण (रुजण्याची क्रिया) होणे आवश्यक असते. बीजाणूंच्या अंकुरणानंतर जनन-नलिका तयार होतात व या जनन-नलिका वनस्पतीमध्ये निरनिराळ्या मार्गानी प्रवेश करतात. बीजाणूंचे अंकुरण होण्यासाठी काही बाबी आवश्यक असतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे बीजाणू अंकुरणक्षम असावे लागतात. काही प्रकारचे बीजाणू तयार झाल्यावर ताबडतोब अंकुरणक्षम होतात, तर काही बीजाणू तयार झाल्यावर अंकुरणक्षम होण्यासाठी काही काळ जावा लागतो. या काळाला सुप्तावस्था काल असे म्हणतात. तसेच बीजाणूंच्या अंकुरणासाठी अनुकूल तापमान, हवेतील आर्द्रता व ऑक्सिजन यांची आवश्यकता असते.

  

सूत्रकृमीमध्ये अंड्यांतून बाहेर पडलेले लहान सूत्रकृमी वनस्पतीत प्रवेश करतात. 

  

वनस्पतिरोगाला कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू आणि व्हायरस यांमध्ये बीजाणू तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांचा वनस्पतीत प्रवेश जनन-नलिकेशिवाय होतो. 


 कवक : रोगकारक कवकाचा वनस्पतीत ज्या निरनिराळ्या मार्गांनी प्रवेश होतो ते खालीलप्रमाणे आहेत : 

  

(१) नेसर्गिक छिद्रे : (अ) त्वग्रंध्रे, (आ) वल्करंध्रे, (इ) जलप्रपिंड. गव्हाच्या तांबेरा रोगामध्ये रोगकारक कवकाचा प्रवेश त्वग्रंध्रामधून होतो.

  

(२) जखमा : वनस्पतींना अनेक कारणांमुळे जखमा होतात. सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव, तडिताघात, तीव्र ऊन यांमुळे वनस्पतीच्या काही भागांना इजा होते अथवा ते भाग मृत होतात, तसेच मशागत करताना, फेर लावणी करताना मुळांना इजा होते. झाडांची छाटणी, फळतोडणी या क्रियांमध्येही झाडांना जखमा होतात. कीटकही वनस्पतींना लहान मोठ्या जखमा करतात. या सर्व प्रकारच्या जखमा रोगकारक कवकांना वनस्पतीत शिरकाव करण्याचे मार्ग म्हणून उपयोगी पडतात.

  

फळे व भाज्या तोडताना व एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवताना, तसेच बटाटे, कांदे वगैरे साठविण्याच्या वेळेस हाताळण्यामुळे त्यांवर लहान मोठ्या जखमा होतात. अशा प्रकारच्या जखमांतून पिकांच्या साठवणीचे रोगकारक सुलभ रीतीने प्रवेश करतात. फळांच्या देठातूनही रोगकारक कवकाचा प्रवेश होऊ शकतो. आंबा व केळी यांची कूजकारक कवके अशा रीतीने प्रवेश करतात.

  

(३) अपित्वचा : अपित्वचेला उपत्वचेचा संरक्षक थर असतो. काही रोगकारक बीजाणूंच्या जनन-नलिका उपत्वचेसह अपित्वचेला सुईच्या अग्राने भोक करावे त्याप्रमाणे छिद्र करून आत प्रवेश करतात. पुष्कळशा भुरी रोगांची कवके अशा रीतीने पोषक वनस्पतीत प्रवेश करतात. 

  

(४) उपत्वचाविरहित भाग : किंजल्क, मूलरोग, नुकतीच उगवून आलेली रोपे, मकरंद ग्रंथी, खोडावरील कोवळे डोळे अशा प्रकारच्या भागांवर उपत्वचा नसल्यामुळे रोगकारक बीजाणूंच्या जनननलिकांचा त्यांत सहज प्रवेश होऊ शकतो. गव्हाच्या काणी रोगाचा प्रवेश किंजल्काग्रातून किंजपुटात होतो. बीज तयार झाल्यावर रोगकारकाचे कवकजाल त्यात सुप्तावस्थेत राहते. अशा प्रकारचे रोगट बी पेरल्यानंतर त्यापासून वाढणाऱ्या झाडाला निरोगी कणसाऐवजी काळसर भुकटीयुक्त कणीस आढळून येते. रोपांच्या नाजूक अवस्थेत रोपे मोडून पडण्याच्या रोगाची कवके अधराक्षातून (बीजातील गर्भाक्षाच्या खालच्या भागातून) प्रवेश करतात. ज्वारीवरील काणी रोगाचाही अशा तऱ्हेने प्रवेश होतो. कपाशीचा मर रोग व निरनिराळ्या पिकांचे मूळकूज रोग यांची कवके मूलरोमांतून प्रवेश करतात. उसावरील काणी रोगांचे संक्रामण खोडावरील कोवळ्या डोळ्यातून होऊ शकते.

रोगकारक कवकांचा वनस्पतीत प्रवेश झाल्यावर पोषणासाठी काही कवकतंतू कोशिकेत शिरकाव करतात, तर काही तंतू वनस्पतींच्या कोशिकामधील जागेत वाढतात आणि मुळाप्रमाणे कार्य करणाऱ्या शोषकाद्वारे कोशिकेतून अन्नशोषण करतात. बहुसंख्य परोपजीवी कवके वनस्पतीच्या अंतर्भागात वाढतात परंतु भुरी रोगाच्या कवकाप्रमाणे काही कवके वनस्पतीच्या पृष्ठभागावर वाढतात आणि अपित्वचेच्या कोशिकांतून शोषकांद्वारे अन्नशोषण करतात.

  

सूक्ष्मजंतू : जखमा, नैसर्गिक छिद्रे (त्वग्रंध्रे, जलप्रपिंड, वल्करंध्रे), मूलरोम, मकरंद ग्रंथी व किंजल्स यांपैकी जखमा व नैसर्गिक छिद्रे हे मार्ग महत्त्वाचे आहेत. फळे व भाज्या कुजण्याच्या रोगाचे सूक्ष्मजंतू बहुतांशी जखमांतून प्रवेश करतात. कापसाच्या पानावरील कोनाकार टिक्का रोगाचे सूक्ष्मजंतू त्वग्रंध्रातून प्रवेश करतात परंतू कोबी कुजण्याच्या घाण्या रोगाचे सूक्ष्मजंतू फक्त जलप्रपिंडातून प्रवेश करतात. बटाट्यावरील खवड्या रोगाचे सूक्ष्मजंतू वल्करंध्रातून प्रवेश करतात.

  

व्हायरस : व्हायरस रोगाचा कीटकामार्फत होणारा प्रवेश हा रोगकारकाचा वनस्पतीत शिरकाव होण्याचा असाधारण मार्ग आहे. रोगट वनस्पतींतून कीटक अन्नरस शोषून घेतात त्या वेळी अन्नरसाबरोबर व्हायरसही त्यांच्या शरीरात जातो. हे कीटक जेव्हा निरोगी वनस्पतीतून अन्नशोषण करतात त्या वेळी त्यांच्या लाळेबरोबर त्यांच्या शरीरातील व्हायरस निरोगी वनस्पतीत प्रवेश करतो. काही प्रकारच्या व्हायरसांची कीटकाच्या शरीरात वाढ होते. कीटकांना त्या व्हायरसामुळे काही अपाय होत नाही. बहुसंख्य व्हायरस कणांचा कीटकाद्वारे वनस्पतींत प्रवेश होत असला, तरी असेही काही व्हायरस रोग आहेत की, रोगी वनस्पतीतील अन्नरसाचा निरोगी वनस्पतीच्या सूक्ष्म जखमांशी संपर्क झाल्यास त्या जखमांतून व्हायरस कण निरोगी वनस्पतीत शिरतात (उदा., तंबाखूचा मोझेइक व्हायरस रोग).

  

पर्यावरणाचा वनस्पतिरोगाच्या वाढीवर होणारा परिणाम : सूक्ष्मजीवामुळे वनस्पतिरोग होतात हा सिद्धांत सर्वसामान्य होण्यापूर्वीच्या काळात प्रतिकूल पर्यावरणामुळेच वनस्पतिरोग उद्‌भवतात, असे मानले जात असे. केवळ पर्यावरणाच्या घटकांमुळेसुद्धा काही वनस्पतिरोग होतात, हे आता सर्वमान्य झाले आहे परंतु रोगकारकामुळे वनस्पतिरोग होतात त्या वेळी रोगोद्‌भवामध्ये रोगकारकाबरोबरच पर्यावरणाचा फार महत्त्वाचा वाटा असतो. पोषक वनस्पती व रोगकारक हे एकमेकांच्या सान्निध्यात असले, तरी पर्यावरणात्मक परिस्थिती अनुकूल असल्याखेरीज रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. रोगकारक बीजाणूंचा प्रसार, त्यांचे अंकुरण, रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश व त्यांची वाढ, बीजाणूंची उत्पत्ती व पिकाच्या एका हंगामापासून दुसऱ्या हंगामापर्यंत रोगकारकाची कोणत्या तरी अवस्थेत जिंवत राहण्याची क्षमता या सर्व बाबींवर पर्यावरणाचा परिणाम होतो.

  

बीजाणूंच्या अंकुरणासाठी व वनस्पतीत जनन-नलिकांचा प्रवेश होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत याचा उल्लेख मागे आला आहे. रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश झाल्यावर त्याची वाढ पुढील गोष्टींवर अवलंबून असते : (१) पोषक वनस्पतीची जननिक प्रवृत्ती, (२) रोगकारकाची जननिक तीव्रता, (३) पर्यावरणाचा पोषक वनस्पतीवर व रोगकारकावर होणारा परिणाम आणि (४) पर्यावरणाचे वनस्पती व रोगकारक यांवर होणाऱ्या परिणामांचे परस्परसंबंध. रोगाचे प्रमाण वरील सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असते. पोषक वनस्पतीची रोगप्रवृत्ती व रोगकारकाची तीव्रता यांमध्ये बदल लागलीच होत नाहीत पण पर्यावरणाच्या घटकामध्ये मात्र तत्काळ बदल होत असतात. अशा पर्यावरणाच्या घटकाच्या बदलामुळे काही वेळा वनस्पतीला त्याचा फायदा होतो किंवा रोगकारकालासुद्धा त्या बदलामुळे फायदा होतो व त्यावर रोगाची तीव्रता अवलंबून राहते.

  

पर्यावरणाच्या काही घटकांचा वनस्पतीवर अशा प्रकारचा परिणाम होतो की, त्यामुळे वनस्पतीची रोगप्रवृत्ती वाढते. पर्यावरणाच्या ज्या घटकामुळे वनस्पतीची विशिष्ट रोगाबाबतची प्रवृत्ती वाढते त्या घटकांना प्रवृत्तिकर घटक म्हणतात व वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाला पूर्वप्रवृत्ती म्हणतात. पर्यावरणाच्या ज्या घटकांचा वनस्पकिरोगावर मुख्यत्वेकरून परिणाम होतो ते पुढीलप्रमाणे आहेत : (अ) हवेतील घटक व (आ) जमिनीतील घटक.


  

(अ) हवेतील घटक : (१) तापमान : हवेच्या तापमानाचा रोगोद्‌भवाशी घनिष्ठ संबंध आहे. काही रोगकारक थंड हवामानात चांगले वाढतात. गव्हाचा पिवळा तांबेरा हा उत्तर भारतातील थंड हवेतच वाढत असल्यामुळे दक्षिणेकडील राज्यांत आढळत नाही. बटाट्यावरील करपा उत्तर व दक्षिण भारतातील डोंगराळ आणि थंड हवेतच वाढतो. सपाट प्रदेशात हिवाळ्यात तो फारसा आढळत नाही. या उलट काही रोग जगाच्या उबदार पट्ट्यातच आढळतात. उदा., बटाट्यावरील बांगडी रोग, काही फ्युजेरियम या कवकामुळे होणारे काही मर रोग इत्यादी. तांबेरा रोगाचे प्रमाण मुख्यत्वे तापमान आणि आर्द्रता यांवर अवलंबून असते. गव्हाच्या कांडी किंवा काळ्या तांबेऱ्याला २० से. हे इष्टतम तापमान आहे. असे तापमान भारतात १५ जानेवारीपासून मार्चपर्यंत असते. अशा वेळी जर दमट व ढगाळ हवामान आढळून आले, तर तांबेऱ्याची वाढ झपाट्याने होते आणि रोगाची तीव्रता वाढून नुकसान फार होते. पुष्कळशा व्हायरसजन्य रोगांत तापमान २०० ते २५ से. असल्यास रोगाची तीव्रता अधिक आढळते. हवेतील तापमानाचा काही व्हायरस रोगांच्या लक्षणांच्या अभिव्यक्तीवर परिणाम होतो. तापमान वाढल्यास वनस्पतीत व्हायरस असूनही रोगाची लक्षणे बाह्यतः दिसून येत नाहीत.

  

(२) आर्द्रता : रोगकारकाच्या बीजाणूंच्या अंकुरणासाठी व जनन-नलिकांचा पोषक वनस्पतीत प्रवेश होण्यासाठी आर्द्रतेची आवश्यकता असते. द्राक्षावरील केवडा रोग हा उबदार व ओलसर हवेत वाढतो. त्यामुळे या रोगाची वाढ पावसाळ्यात होते. त्याचप्रमाणे बटाट्यावरील करपा रोगालासुद्धा हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास ते अनुकूल असते. बऱ्याच वनस्पतिरोगांना हवेत जास्त आर्द्रता अनुकूल असते. उदा., बटाट्यावरील करपा, सुपारीवरील गळ रोग, तृणधान्यावरील करपा रोग इत्यादी. दवाचे प्रमाण जास्त असल्यास ते तांबेरा व करपा रोगाच्या बीजीणूंच्या अंकुरणासाठी व त्यांच्या जनन-नलिकांचा पोषक वनस्पतीत प्रवेश होण्यासाठी उपयुक्त ठरते.

  

(३) प्रकाश : तापमान किंवा आर्द्रतेचा जेवढा परिणाम रोगोद्‌भवावर होतो तेवढा परिणाम प्रकाशाचा होत नाही तथापि प्रकाशाची तीव्रता व दिवसाची कालमर्यादा या गोष्टींचा रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश, त्याचा परिपाक काल इत्यादींवर होतो.

  

(आ) जमिनीतील घटक : (१) मातीचे pH मूल्य : [⟶ पीएच मूल्य मृदा]. मातीच्या अम्लधर्मीय किंवा क्षारधर्मीय गुणाचा रोगाच्या वाढीवर निरनिराळा परिणाम होतो. बटाट्याच्या खवड्या रोगाची वाढ क्षारधर्मी जमिनीत चांगली होते, तर कोबीचा गाठी रोग अम्लाधर्मी जमिनीत जास्त होतो.

  

(२) मातीचे तापमान : जमिनीत वाढणाऱ्या पिकांच्या रोगावरील तापमानाच्या परिणामावर पुष्कळ संशोधन झाले आहे. निरनिराळ्या रोगांच्या वाढीसाठी किमान, कमाल व इष्टतम तापमान वेगळे असते. कोबीच्या गाठी रोगासाठी जमिनीतील इष्टतम तापमान २२ से., कापसाच्या मर रोगासाठी ते २७ से., तर ज्वारीवरील खडखड्या रोगासाठी ते ३६ से. आहे.

  

(३) मातीतील ओलावा : पपईच्या खोडकूज, पानवेलीचा मर इ. रोगांच्या कवकांचे बीजाणू अंकुरण्यासाठी व रोगाची वाढ होण्यासाठी जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असावा लागतो.

  

पर्यावरणाचा अभ्यास करून विशिष्ट पिकावर रोग पडण्याच्या शक्यतेचा अंदाज वर्तविणे हा विषय अलीकडील काळात महत्त्वाचा झाला आहे. पाश्चात्त्य देशांत यावर बरेच संशोधन झाले आहे. बटाटाच्या करपा रोगाच्या बाबतीत रोग पडण्याची शक्यता असल्यास शेतकऱ्यांना अगोदरच रेडिओवरून तसा इशारा देण्यात येतो. भारतात गव्हाच्या तांबेरा रोगाबाबतचा अंदाज अगोदर देता येईल की काय याबाबत संशोधन चालू आहे. 

  

वनस्पतिरोगाचा प्रसार : वनस्पतिरोगांचे दोन प्रकार आहेत : (अ) सांसर्गिक व (आ) असांसर्गिक. सांसर्गिक रोग कवक, सूक्ष्मजंतू, सूत्रकृमी, व्हायरस यांमुळे होतात, तर असांसर्गिक रोग हे निर्जीव कारणांमुळे होतात (उदा., मूलद्रव्याचा अभाव, प्रखर ऊन, कडाक्याची थंडी).

  

सर्वसाधारणपणे सांसर्गिक रोगकारकाचा प्रसार निष्क्रिय स्वरूपाचा असतो. सूत्रकृमी व काही सूक्ष्मजंतू चलनक्षम असतात परंतु ही चलनक्षमता मर्यादित स्वरूपाची असते आणि तिचा उपयोग काही थोडक्या अंतरापर्यंतच्या प्रसारासाठी होतो. बहुसंख्य रोगकारकांमध्ये चलनक्षमता नसते. त्यामुळे त्यांच्या प्रसारासाठी सजीव अथवा निर्जीव वाहकाची आवश्यकता असते. वारा, पाणी, कीटक, इतर प्राणी व मनुष्य हे रोगकारकांचे मुख्य प्रसारक आहेत.

  

वारा : नैसर्गिक रोगकारकांमध्ये वाऱ्यामुळे सर्वांत अधिक प्रसार होतो. कवक, सूक्ष्मजंतू. सूत्रकृमी व व्हायरस या रोगकारकांपैकी कवकाच्या प्रसारास वारा मुख्यतः कारणीभूत असतो. काही कवकांचे बीजाणू पोषक वनस्पतीच्या पृष्ठभागावर फार मोठ्या संख्येने तयार होतात आणि ते हलके असल्यामुळे वाऱ्याच्या ऊर्ध्वगामी प्रवाहाबरोबर आकाशात उंच व दूरवर नेले जातात. अधोगामी प्रवाहाबरोबर ते पुन्हा खाली येतात. वाऱ्यामुळे कवकाचे बीजाणू किती उंचीवर व किती अंतरापर्यंत जाऊ शकतात यांबाबतीत परदेशांत पुष्कळ संशोधन झाले आहे. गव्हाच्या तांबेरा रोगांचे बीजाणू आकाशात सु. ४,५०० मी. पर्यंतच्या उंचीवर आणि मूळ स्थानापासून सु. १,००० किमी. दूर पोहोचू शकतात. वाऱ्यामुळे कवकाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असला तरी मूलस्थानापासून लांब अंतरावर जाऊन पडणाऱ्या बीजाणूमुळे रोगाद्‌भव दम होण्यासाठी रोगकाराचे बीजाणू पोषक वनस्पतींवर पडले पाहिजेत. त्या वेळी ते अंकुरक्षणम असले पाहिजेत आणि त्यांचे अंकुरण व जनन-नलिकांचा प्रवेश पोषक वनस्पतीमध्ये होण्यासाठी हवामान अनुकूल असले पाहिजे. द्राक्षावरील केवडा, भुरी अशा काही रोगांचे बीजाणू हवेत जास्त काळ राहिल्यास त्यांची अंकुरणक्षमता नाहीशी होते पण गव्हाच्या तांबेरा रोगाचे व भाताच्या करपा रोगाचे बीजाणू हवेतील दूरवरच्या प्रवासातही अंकुरणक्षम राहू शकतात.

  

वाऱ्यामुळे काही रोगकारक सूक्ष्मजंतू थोड्या अंतरावर पसरू शकतात. व्हायरसजन्य रोगाचा प्रसार जरी मुख्यत्वेकरून कीटकांद्वारे होत असला, तरी कीटकांच्या उडण्यास वाऱ्यामुळे होते. त्यामुळे व्हायरसजन्य रोगांच्या प्रसारास वाऱ्याची अप्रत्यक्षपणे मदत होते.

  

पाणी : वाऱ्याशी तुलना करता पाण्यामुळे रोगप्रसार कमी प्रमाणात होतो. नदी, नाले, कालवे यांच्याद्वारे जमिनीवरील रोगकारकांचा प्रसार होतो. पानवेलीचा व कापसाचा मर, कोबीचा गाठी रोग यांसारख्या कवकजन्य आणि बटाट्यावरील बांगडी रोगासारख्या सूक्ष्मजंतुजन्य रोगांचा प्रसार वाहत्या पाण्यामुळे एका शेतातून जवळच्या अगर लांबच्या दुसऱ्या शेतात होतो. पाऊस व वारा यांच्या एकत्रित परिणामामुळे रोगाचा स्थानिक प्रसार सुलभ होतो. पावसामुळे बीजाणू मोकळे होतात व वाऱ्यामुळे बाजूच्या झाडावर शेंड्याकडून बुंध्यापर्यंत पसरतात. कापसाचा पानावरील ठिपक्यांचा रोग, कोबीचा काळी कूज यांसारखे सूक्ष्मजंतुजन्य रोग पाण्यामुळे पसरतात तसेच सुपारीचा गळ रोग, बाजरी व द्राक्षावरील केवडा, भाताचा करपा इ. कवकजन्य रोगही पावसामुळे पसरतात.

अमरवेल, टारफुला व तंबाखू या सपुष्प परोपजीवी वनस्पतींच्या बीजांचा प्रसार वाहत्या पाण्याबरोबर होतो.


 कीटक : व्हायरसजन्य रोगाच्या प्रसारामध्ये कीटकांना फार महत्त्वाचे स्थान आहे. मावा व तुडतुडे हे कीटक मुख्यत्वे व्हायरस रोगांचा प्रसार करतात. रोगट वनस्पतीवर कीटक अन्नशोषण करताना अन्नरसाबरोबर वनस्पतीतील व्हायरसाचा त्यांच्या शरीरात प्रवेश होतो. ज्या वेळी कीटक निरोगी वनस्पतीतून अन्नशोषण करतात त्या वेळी व्हायरसाचा निरोगी वनस्पतीत प्रवेश होतो. रोगट वनस्पतीवर अन्नशोषण केल्यावर काही कीटकांच्या शरीरात व्हायरस काही तासांपर्यंत टिकतो, तर काही कीटकांच्या शरीरात तो त्यांच्या आयुष्यभर टिकून राहतो. पपई, भेंडी, भुईमूग या पिकांवरील तसेच बटाटा पिकावरील निरनिराळ्या व्हायरसजन्य रोगांचा प्रसार कीटकांद्वारे होतो.

  

बाजरीवरील अरगट रोगासारख्या काही कवकजन्य रोगांचा प्रसारसुद्धा कीटकांद्वारेच होतो. 

  

इतर प्राणी : काही सूत्रकृमी व माइट यांच्याद्वारे व्हायरसजन्य रोगांचा प्रसार होतो, तसेच काही पक्षी बांडगुळाचा प्रसार करतात.

  

मनुष्य : वनस्पतींच्या रोगप्रसारामध्ये मनुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. एका भूखंडातून दुसऱ्या भूखंडात, एका देशातून दुसऱ्या देशात, एका गावाहून दुसऱ्या गावाला अथवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मनुष्य रोगाचा प्रसार करतो. इतकेच नव्हे तर समुद्र, उंच पर्वत, वाळवंट यांसारख्या नैसर्गिक अडथळ्यांमुळे वारा, पाणी, कीटक या मार्गानी रोगप्रसाराचे जे काम कित्येक शतकांत झाले नाही ते मनुष्याने काही आठवड्यांत केले. पूर्वी पृथ्वीवर मानवाने एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करताना निरनिराळ्या वनस्पतींचे बी-बियाणे व कंद नेले आणि त्याचबरोबर त्यांचे रोगही नेले. अलीकडील काळात बी-बियाणे, कंद, कलमे, फळे यांचा देशोदेशी व्यापार सुरू झाला आणि त्याचबरोबर रोगांचा प्रसारही झाला. अनुभवान्ती असेही दिसून आले आहे की, एखाद्या रोगकारकाचा एका प्रदेशातून (तो रोग नसलेल्या) दुसऱ्या प्रदेशात प्रवेश  झाल्यास मूळ प्रदेशापेक्षा नवीन प्रदेशात तो रोगकारक फार मोठ्या प्रमाणावर नुकसानकारक ठरतो आणि त्याची कारणे पुढीलपैकी एक अगर दोन्ही असू शकतात : (१) नवीन प्रदेशातील हवामान रोगाच्या वाढीला जास्त अनुकूल असते आणि (२) नवीन प्रदेशातील पोषक वनस्पतीची जात रोगाला जास्त ग्रहणशील असते. अभूक एक रोग आधीच आपल्या प्रदेशात आहे एवढ्याच कारणास्तव तो रोग असलेली रोपे अगर बी-बियाणे दुसऱ्या प्रदेशातून आपल्या प्रदेशात आणण्यात काही नुकसान नाही अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. कारण दुसऱ्या प्रदेशातील रोगकारक आपल्या प्रदेशातील रोगकारकापेक्षा तीव्र असल्यास आणि अशा रोगकारकाचा शिरकाव आपल्या प्रदेशात झाल्यास त्यामुळे बरेच नुकसान होण्याची शक्यता असते.

  

भारताबाहेरील देशांतून ज्या रोगांचा भारतात मनुष्यामार्फत, बी-बियाणे, कंद अगर कलमे यांतून प्रसार झाला असे मानण्यात येते ते रोग पुढीलप्रमाणे आहेत : (१) बटाट्याचा करपा हा रोग यूरोपातून १८७० च्या सुमारास, (२) केळ्याचा पर्णगुच्छ रोग श्रीलंकेमधून, (३) भाताचा करपा आग्नेय आशियातून १९१८ च्या सुमारास, (४) बाजरीचा अरगट रोग १९५७ च्या सुमारास आफ्रिकेतून भारतात आला आहे.

  

यांखेरीज शेती व फलसंवर्धन यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व हत्यारे (चाकू, विळा, कोयता, नांगर वगैरे) यांच्यामार्फत रोगप्रसार होतो.

वनस्पतिरोग नियंत्रण : वनस्पतिरोगावर उपाययोजना करताना त्या रोगाचे स्वरूप, रोगकारकाविषयीची माहिती (जीवनचक्र, जैव प्रजाती, पर्यावरणाचा परिणाम), पोषक वनस्पतीची रोगप्रतिकारक्षमता वगैरे गोष्टींचा सांगोपांग विचार करून  योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असते.

  

निर्जीव कारणांमुळे होणाऱ्या रोगांवर करावयाची उपाययोजना सजीव कारणांमुळे होणाऱ्या रोगांवर करावयाच्या उपाययोजनेपेक्षा वेगळी असते. पर्यावरणाच्या घटकांचे नियंत्रण करून अथवा पोषक द्रव्यांचा अभाव दूर करून निर्जीव कारणांमुळे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते. 

  

सजीव कारणांमुळे होणाऱ्या वनस्पतिरोगांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनेचे उद्देश मुख्यतः दोन प्रकारचे असतात : (१) रोगप्रतिबंधक व (२) प्रतिरक्षण. 

  

रोगप्रतिबंधक उपायांचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणे असते : रोगकारकाचा पोषक वनस्पतीशी संपर्क होऊ न देणे, संपर्क झाल्यास त्याचा वनस्पतीत प्रवेश होऊ न देणे आणि प्रवेश झाल्यास रोगकारकाच्या वाढीला अनुकूल असलेल्या पर्यावरणाच्या घटकांचे नियंत्रण करून अगर अन्य मार्गांनी रोगकारकाची वाढ होऊ न देणे. प्रतिबंधक उपाययोजना कमी खर्चाची असते आणि ती वेळीच अंमलात आणल्यास रोगाचे प्रमाण कमी राहते.

  

प्रतिरक्षण म्हणजे रोगकारकाच्या प्रवेशाला आणि रोगाच्या वाढीला पोषक वनस्पतीमध्ये प्रतिकार वाढविणे. रोगप्रतिकारक जातींची निवड करून अथवा संकरण पद्धतीने अशा जाती निर्माण करून हा उद्देश साध्य होतो.  

  

रोगप्रतिबंधक उपाययोजना : रोगप्रतिबंधक उपाय पुष्कळ प्रकारचे आहेत. सोईसाठी त्यांची विभागणी तीन प्रकारांत केली आहे. (अ) अपवर्जन, (आ) निर्मूलन व (३) संरक्षण.

  

(अ) अपवर्जन : रोगकारकाचा पोषक वनस्पतीच्या प्रदेशात प्रवेश होऊ न देणे हा अपवर्जनाचा मुख्य हेतू आहे. वाऱ्यामुळे अगर कीटकांमुळे ज्याचा प्रसार होतो अशा रोगकारकांचा प्रसार पर्वत अथवा समुद्र यांसारखे नैसर्गिक अडथळे नसलेल्या देशात अनिर्बंधपणे होतो परंतु ज्या दोन देशांमध्ये अगर भूखंडांमध्ये नैसर्गिक अडथळे असतात त्यातील एका देशांतून दुसऱ्या देशात नवीन रोगाचा प्रवेश न होऊ देणे शक्य असते. अशा बाबतीत पोषक वनस्पती अथवा त्यांच्या बी-बियाण्याबरोबर रोगकारकाचा एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश होतो. भारतात केळ्याचा पर्णगुच्छ रोग हा श्रीलंकेतून आलेला आहे. अशा प्रकारे नवीन रोगाचा प्रवेश न होऊ देण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या देशांनी वनस्पति-संसर्गरोध कायदे केले आहेत. या कायद्यान्वये वनस्पती, रोपे, बी-बियाणे, कंद, कलमे इ. माल निर्यात करताना तो माल रोगमुक्त आहे, असे प्रमाणपत्र निर्यात करणाऱ्या देशाने मालाबरोबर द्यावे लागते. याशिवाय आयात करणाऱ्या देशांत तपासणीसाठी केंद्रे असतात. तेथे सर्व मालाची तपासणी केली जाते व तो माल रोगमुक्त आहे याबद्दल खात्री केली जाते. अर्थात या उपाययोजनेला काही मर्यादा आहेत. रोगाचे स्वरूप व कायद्याची अंमलबजावणी कितपत कसोशीने होते यावर या योजनेचे यश अवलंबून असते. कवकजन्य व सूक्ष्मजंतुजन्य रोग ओळखणे विशेष कठीण नसते परंतु व्हायरसजन्य रोगाच्या तपासणीसाठी खास व्यवस्था करावी लागते. भारतात डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट अँड पेस्ट ॲक्ट (विनाशकारी कीटक व पीडक अधिनियम) हा अधिनियम १९१४ साली अंमलात आला व आतापर्यंत त्यात ८-९ वेळा सुधारणा करून त्याची अंमलबजावणी चालू आहे. भारतात एकूण १६ केंद्रांमध्ये बाहेरून येणाऱ्या वनस्पतीविषयक मालाची तपासणी करण्यात येते.

  

एखाद्या प्रदेशात नवीन रोगाचा प्रवेश झाला, तर त्याचा प्रादेशिक विस्तार होऊ न देण्यासाठी स्थानिक संसर्गरोध अधिनियमांचा वापर करून रोगट वनस्पतींचा नाश केला जातो.


 (आ) निर्मूलन : ज्या वनस्पतिरोगाने एखाद्या प्रदेशात मूळ धरले आहे अशा रोगाने समूळ उच्चाटन करणे अगर निरनिराळ्या उपायांनी त्यांची उगमस्थाने नष्ट करून रोगाचा विस्तार शक्य तितका कमी करणे हा निर्मूलनाचा हेतू आहे. निर्मूलनाखाली अनेक उपाययोजनांचा अंतर्भाव होतो. विशिष्ट रोगाच्या बाबतीत निर्मूलनाची उपाययोजना ठरविताना रोगकारकाचे जीवनचक्र, रोगकारकाचा प्रसार, जिवंत पोषक वनस्पतीच्या अभावी अगर प्रतिकूल हवामानांत रोगकारक कोठे आणि कोणत्या अवस्थेत आढळतो, रोगकारक ज्या निरनिराळ्या पोषक वनस्पतींवर आढळतो त्या वनस्पती, रोगाच्या वाढीला लागणारे अनुकूल हवामान यांसंबंधी माहिती असणे आवश्यक असते. व्हायरसजन्य रोगांच्या बाबतींत वाहक कीटकांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.

  

निर्मूलनाखाली खालील उपाययोजना अवलंबिण्यात येतात :  

  

(१) रोगट वनस्पतीचा अगर रोगट भागाचा नाश : रोगोद्‌भव झाल्याचे दिसून येताच तो शेतात पसरण्यापूर्वी रोगट वनस्पती उपटून त्यांचा नाश केल्याने रोगाचे नियंत्रण करता येते. गव्हाची काणी, ज्वारीची काणी, ऊस रंगणे, बाजरीचा अरगट रोग, तुरीचा मर रोग आणि बरचेसे व्हायरसजन्य रोग उदा., भेंडीवरील, पानांच्या शिरा पिवळ्या होणारा रोग, वेलदोडाच्याचा कट्टे किंवा मार्बल रोग यांचे या उपाययोजनेने निर्मूलन करता येते. रोगट वनस्पतीचे रोगट भाग छाटून ते जाळून नष्ट केल्याने रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. खैरा रोग झालेल्या कागदी लिंबाच्या झाडांच्या रोगट फांद्याउन्हाळ्यात कापून जाळून नष्ट केल्यास रोगकारक सूक्ष्मजंतूंचे प्रमाण कमी होते. डिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी संत्र्याच्या झाडाची रोगट साल काढून क्रिओसोट तेल लावतात.  

  

(२) पिकांची फेरपालट : जमिनीमध्ये ज्याची वाढ होते अशा रोगकारकांची पोषक वनस्पतीच्या अभावी उपासमार करून त्यांचे निर्मूलन करणे हा फेरपालटीचा उद्देश आहे. पोषक वनस्पतीच्या अभावी रोगकारक किती काळपर्यंत जिवंत राहतात याचा अभ्यास करून ही उपाययोजना निश्चित करणे आवश्यक आहे. पिकांच्या फेरपालटीमुळे पुष्कळसे जमिनीत वाढणारे रोगकारक नियंत्रणाखाली आणता आले आहेत. तुरीचा मर रोग, हरभऱ्याचा मर रोग, वाटाण्याचा मर रोग, भाजीपाल्याचे मूळकूज रोग, ऊस रंगणे व उसाचा मर रोग इ. रोगांमध्ये पिकांच्या फेरपालटीमुळे रोगाला आळा बसला आहे. [⟶ पिकांची फेरपालट]. 

  

(३) शेतातील स्वच्छता:रोगट वनस्पतीचे शेतातील अवशेष, बांधावरील गवत, पालापाचोळा गोळा करून खोल खड्‌ड्यात पुरणेकिंवा जाळणे यामुळे रोगाला आळा बसतो. भुईमुगाचा टिक्का, बाजरीचा अरगट, कापसाचा कोनाकार टिक्का इ. रोगांचे रोगकारक पिकांच्या दोन हंगामांच्या दरम्यानच्या काळात शेतातील रोगट वनस्पतींच्या अवशेषांमध्ये असतात. या अवशेषांचा नाश केल्याने पिकाच्या हंगामात रोगोद्‌भव झाल्यास त्याचे प्रमाण सुरूवातीला कमी राहते. काही रोगकारक पोषक वनस्पतींखेरीज शेताच्या बांधावर वाढणाऱ्यावनस्पतींवर अथवा गवतावर वाढतात. अशावेळी बांधावरील वनस्पती व गवत काढून बांध स्वच्छ ठेवावे लागतात.  

  

(४) पिक संवर्धन पद्धतीत बदल : रोगकारकाच्या वाढीसाठी पर्यावरण अनुकूल राहणार नाही अशा तऱ्हेने लागवडीच्या पद्धतीत बदल करून रोगनियंत्रण करता येते. उदा., आल्याची लागवड वाफ्यांत केल्यास पाणी साचून ते कवकजन्य रोगामुळे कुजते परंतु त्याची लागवड गादी वाफ्यावर केल्यास रोगकारकाच्या वाढीला पुरेशी ओल न मिळाल्याने रोगाचे प्रमाण कमी राहते. चर खणून पाण्याचा निचरा केल्यास पानवेलीच्या मर रोगाचे प्रमाण कमी होते. वरील रोग जलीय कवकांमुळे होतात व या कवकांच्या वाढीसाठी जमिनीत जास्त ओलीची आवश्यकता असते.  

  

उसाचा खोडवा ठेवल्यास चाबूक काणी व ऊस रंगणे हे रोग वाढतात. यासाठी या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास खोडवा घेण्याचे टाळावे.  

  

(५) मातीचे pH मूल्य कमी जास्त करणे : कोबीच्या मुळावरील गाठी रोग हा अम्लयुक्त जमिनीत होतो. अशा जमिनीत चुना मिसळून लागवड केल्यास रोगाचे प्रमाण कमी होते. बटाट्याच्या खवड्या रोगासाठी जमिनीत गंधक मिसळून रोगांचे प्रमाण कमी करता येते.  

  

(६) रोगमुक्त बियाण्याचा वापर : बाजरीचा अरगट रोग, बटाट्याचा बांगडी रोग, आल्याची कूज यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोगमुक्त बियाणे वापरल्यामुळे टाळता येतो. यासाठी ज्या भागांत अशा रोगाचा प्रार्दुभाव होत नाही अशा भागातील बियाणे शेतात पाहणी करून ते रोगमुक्त असल्याची खात्री करून घेऊन ते वापरले असता रोगाचे नियंत्रण होते.  

  

(७) पिक खंड : एखादे पीक एकामागून एक अशा सर्व हंगामात घेत गेल्यास त्या पिकावरील रोगामध्ये खंड पडत नाही. रोगाची साखळी तोडण्यासाठी ज्या हंगामात ते पीक थोड्या प्रमाणावर घेतले जाते त्या हंगामात न घेतल्याने रोगाचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात भेंडीचे पीक न घेतल्यास पुढील हंगामातील भेंडी पिकावर व्हायरसजन्य रोगाचे प्रमाण पुष्कळ कमी होते. भेंडीचे पीक शेतात नसते अशावेळी व्हायरस ज्या इतर वनस्पतींवर आढळून येईल त्या वनस्पतींचाही नाश करणे आवश्यक असते. खरीपांच्या हंगामात गव्हाचे पीक कोठेही न घेण्याची शिफारस केली जाते कारण गव्हाचे खरीप पीक महत्त्वाचे नसते व त्या पिकावर तांबेरा पडल्यास रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकावर लहान असतानाच तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.  

  

(इ) संरक्षण : वनस्पतीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या बीजाणूंचे अंकुरण न होऊ देणे आणि झाल्यास जनन-नलिकेचा वनस्पतीत प्रवेश होऊ न देणे हा संरक्षणाचा मुख्य हेतु आहे. यासाठी वनस्पतीचा संपूर्ण पृष्ठभाग अथवा रोगट भाग अथवा बी-बियाणे यांवर रासायनिक साधनांचा वापर करण्यात येतो, कवक व सूक्ष्मजंतू यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना ‘कवकनाशक’ ही सर्वसाधारण संज्ञा आहे. सूत्रकृमींचा नाश करण्यासाठी सूत्रकृमिनाशके व ज्वारीवरील टारफुलासारख्या सपुष्प परोपजीवी वनस्पतीचा नाश करण्यासाठी तणनाशके वापरणयात येतात. व्हायरसजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाच्या साह्याने व्हायरसवाहक कीटकाचा नाश केला जातो.

रोगाला प्रतिकूल अशा हवामानात बियाणे तयार करणे, शेतातील पाण्याचा निचरा, आवश्यकतेनुसार मातीचे pH मूल्य बदलणे, जमिनीतील पोषक द्रव्याचा अभाव दूर करणे, पिकाची कापणी व मळणी करताना शेतमालाला इजा न होईल याची खबरदारी घेणे, फळे भाजीपाला वाहतुकीमध्ये रोगामुळे खराब होऊ न देण्यासाठी उपाययोजना करणे हे सर्व उपाय संरक्षण या सदराखाली येतात. यातील काही उपायांचे विवेचन ‘निर्मुलन’ या सदराखाली आले आहे.  


 संरक्षण पुढील प्रकारांनी केले जाते : (१) जमिनीचे निर्जंतुकीकरण, (२) बीजोपचार व (३) वनस्पतीच्या जमिनीवरील भागाचे संरक्षण.  

  

(१) जमिनीचे निर्जंतुकीकरण : पाण्याची वाफ, उष्णता, गरम पाणी, फॉर्माल्डिहाइड, बोर्डो मिश्रण व काही सूत्रकृमिनाशकांचा उपयोग जमिनतील रोगकारकांचा नाश करण्यासाठी करण्यात येतो परंतु तो खर्चाचा असल्यामुळे मर्यादित प्रमाणात (उदा. काचगृहे, रोपांसाठी केलेले वाफे यांत) केला जातो. पानवेलीच्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाभोवती बोर्डो मिश्रण घालणे हा एक उपाय आहे. पेंटोक्लोरो नायट्रोबेंझीन (पीसीएनबी ब्रासीकॉल) या कवकनाशकाचा उपयोग जमिनीतील काही रोगकारक कवकांच्या नाशासाठी करतात. सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी डीडी मिश्रण (डायक्लोरोप्रोपीन व डायक्लोरोप्रोपेन यांचे मिश्रण) किंवा एखादे सूत्रकृमिनाशक जमिनीत वापरतात.  

  

(२) बीजोपचार : वीजोपचारांचे तीन उद्देश असतात : (अ) बीजांतर्गत सूक्ष्मजीवांचा नाश करणे, (आ) बीजांच्या पृष्ठभागावरील रोगकारक कवकांचा व सूक्ष्मजंतूंचा नाश करणे, (इ) बीजांचे अंकुरणझाल्यावर उगवून येणाऱ्या रोपांचे जमिनीतील सूक्ष्मजीवांपासून रक्षण करणे. बीजांतर्गत सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी रासायनिक बीजलेपनाचा (काही अपवाद वगळल्यास) फारसा उपयोग होत नाही.  

  

बीजांच्या पृष्ठभागावरील रोगकारकांचा नाश करण्यासाठी आणि उगवणाऱ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी निरनिराळ्या कवकनाशकांचा बीजलेपनासाठी वापर करवण्यात येतो. १% पारा असलेली पाऱ्याची संयुगे (सिरेसान, ॲग्रोसन) या कामी उपयुक्त ठरली होती पण पारा विषारी असल्यामुळे पारायुक्त कवकनाशक लावलेले बी पेरणीसाठी न वापरल्यास ते नंतर खाण्यासाठी उपयोगात आणता येत नाही. हल्ली पारायुक्त कवकनाशकाचा उपयोग बंद करण्यात आला आहे. टेट्रामिथिल थायरम डायसल्फाइड (टीएमटीडी थायरम) हे गंधकाचे कार्बनी संयुग हल्ली बीजलेपनासाठी वापरले जाते.  

  

(३) वनस्पतीच्या जमिनीवरील भागाचे संरक्षण : कवकाचे बीजाणू अगर सूक्ष्मजंतू वनस्पतीवर पडण्यापूर्वी कवकनाशकाचा उपयोग करून रोगकारकाचा वनस्पतीत प्रवेश होऊ न देणे हा याचा उद्देश आहे. कवकनाशकामध्ये गंधकाचा वापर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून करण्यात येत आहे. भुरी रोगावर याचा विशेष फायदा दिसून येतो. धुरळीसाठी वापरण्यात येणारे गंधक सूक्ष्म कणांचे असणे आवश्यक आहे. अतिसूक्ष्मकणांचे गंधक पाण्यात मिसळून फवारता येते. १८८५मध्ये चुना व मोरचूद यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या बोर्डो मिश्रणाचा शोध लागला. सुरुवातीला द्राक्षावरील केवडा व बटाट्याचा करपा या रोगांवर हे कवकनाशक युरोपात फार प्रभावी ठरले. अद्यापही याचा पुष्कळ रोगांवर वापर करण्यात येतो परंतु ते तयार केल्यावर लगेच वापरावे लागते. यासाठी कॉपर ऑक्साइड अथवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% ताम्र असलेली कवकनाशके बाजारात आली. ही भुकटीच्या स्वरूपात असून पाण्यात मिसळून फवारणीसाठी मिश्रण झाडाच्या फांद्या छाटल्यावर छाटलेल्या जागी रोगकारकाची वाढ होऊ नये यासाठी लावतात. तसेच संत्री व मोसंबीच्या झाडाचे डिंक्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी हे मिश्रण लावतात.  

  

इ. स. १९३४च्या सुमारास डायथाकोर्बामेटे या गंधकाच्या कार्बनी संयुगांचा शोध लागला. दुसऱ्या महायुद्धात तांब्याची टंचाई झाल्यामुळे गंधकाच्या कार्बनी संयुगांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. थायरम, फेरबाम, झायरम, नावम, झायनेब, मॅनेब ही या वर्गातील काही कवकनाशके आहेत.

प्रतिजैव पदार्थाचा वनस्पतिरोग नियंत्रणासाठी वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. काही सूक्ष्मजंतुजन्य रोगांवर त्यांचा चांगला परिणाम दिसून आला. स्ट्रेप्टोमायसीन, ऑरिओफंजीन, ॲग्रिमायसीन इ. प्रतिजैव पदार्थ उपलब्ध आहेत.

सध्या उपलब्ध असलेल्या बऱ्याच कवकनाशकांचा उपयोग मुख्यतः वनस्पतीच्या बाह्य संरक्षणासाठी होतो. आंतरिक संरक्षणासाठी (म्हणजेच पर्यायाने रोगकारकाच्या निर्मूलनासाठी) त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मुळावाटे अगर अपित्वचेतून कवकनाशकाचे वनस्पतीत शोषण होऊन त्यापासून वनस्पतीला अपाय न होता तिचे सूक्ष्मजीवापासून आंतरिक संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबबत आणखी संशोधन होऊन सुरक्षित कवकनाशके उपलब्ध झाली पाहीजेत. आंतरिक संरक्षणासाठी पुढील कवकनाशके उपलब्ध असून काहींचा परिणाम बराच आशादायक आहे : बेनोमिल, बावीस्टीन, व्हिटॅवॅक्स, प्लॅन्टवॅक्स, कॅलिक्झीन वगैरे. [⟶ कवकनाशके प्रतिजैव पदार्थ].

प्रतिरक्षण उपाययोजना : ज्याप्रमाणे मानवात व प्राण्यांत रोगप्रतिकारक्षमता असते त्याचप्रमाणे वनस्पतीतही अशी रोगप्रतिकारक्षमता कमीजास्त प्रमाणात आढळून येते. ज्यावेळी निसर्गात रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळी रोगाला बळी पडणाऱ्या वनस्पती आपोआपच नाहीशा होतात. ज्या जिवंत राहतात अशा काही वनस्पतींमध्ये कमीजास्त प्रमाणात आढळून येते. ज्यावेळी रोगाला बळी पडणाऱ्या वनस्पती आपोआपच नाहीशा होतात. ज्या जिवंत राहतात अशा काही वनस्पतींमध्ये कमीजास्त प्रमाणात रोगप्रतिकारक्षमता असू शकते परंतु ही क्रिया संथ गतीने चालू असते. शिवाय रोगाच्या वाढीसाठी सर्वस्वी अनुकूल हवामान सर्वच ठिकाणी नसते. त्यामुळे बाह्यतः रोगप्रतिकारक वाटणाऱ्या वनस्पती बऱ्याच वेळा रोगाच्या तावडीतून निसटलेल्या असतात. ⇨वनस्पतिप्रजननशास्त्र व वनस्पतिरोगविज्ञान यांच्या गेल्या १००-१२५वर्षातील प्रगतीमुळे निसर्गातील संथ गतीने होणाऱ्या कामाला चालना देऊन पिकांचे रोगप्रतिकारक वाण थोड्या मुदतीत उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. अर्थात हे कार्य सकृत्‌दर्शनी वाटते तेव्ह ढे सोपे नाही.  

  

वनस्पतीतील रोगप्रतिकारक्षमतेच्या निश्चित स्वरूपासंबंधी पुष्कळसे संशोधन झाले आहे. शास्त्रज्ञांनी १९०५मध्ये सिद्ध केले.त्यानंतर झालेल्या संशोधनावरून सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, वनस्पतीतील रोगप्रतिकारक्षमता निरनिराळ्या कारणांमुळे असू शकते. त्वचा व उपत्वचा यांची जाडी, त्वग्रंध्रांची संख्या, त्यांचा आकार व रचना देठावरील केस व मेणासारख्या पदार्थाचा थर, वनस्पतीमध्ये रोगकारकाला पोषक अशा अन्नाचा अभाव आणि रोगकारकाला मारक अशी वनस्पतीच्या कोशिकांतील द्रव्ये इ. कारणांमुळे रोगप्रतिकार क्षमता येते. रोगप्रतिकारक्षमता सर्व वनस्पतीत सारखी असत नाही. काहींमध्ये उच्च प्रतीची, तर काहीं मध्ये मध्यम असते.वस्तुतः रोग प्रतिकार व रोगप्रवृत्ती या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. विशिष्ट पिकाच्या रोगाला पूर्णपणे प्रतिकारक्षमता असलेली जात क्वचितच आढळते. पिकांचे रोगप्रतिकारक प्रकार पुढील प्रकारांनी उपलब्ध करता येतात. (अ) रोगप्रतिकारक प्रकार बाहेरून आणून लावणे, (आ) स्थानिक प्रकारांमध्ये रोगप्रतिकारक वनस्पतीची निवड करून नवीन वाण प्रस्थापित करणे, (इ) संकरण पद्धती व (ई) कलम पद्धती  


 (अ) रोगप्रतिकारक प्रकार लावणे : पिकाचा स्थानिक प्रकार एखाद्या रोगाला ग्रहणशील असेल, तर त्या रोगाला प्रतिकारक प्रकार  बाहेरील प्रदेशातून आणून लावणे हा सर्वांत सोपा व कमी खर्चाचा उपाय आहे परंतु अशा प्रकारांमध्ये स्थानिक प्रकारातील इतर इष्ट गुणधर्म असतील आणि स्थानिक हवामानात त्यांची चांगली वाढ होत असेल, तरच नवीन प्रका सर्वमान्य होतील. शिवाय हे प्रकार दुसऱ्या रोगाला ग्रहणशील असतील, तर रोगापासून होणारे नुकसान वाचवताना दुसरे रोग त्या भागांत पसरण्याचा संभव असतो. या पद्धतीने काही बाबतीत यश आले आहे, तर काही बाबतीत चांगला परिणाम दिसून आला नाही. १९२५सालाच्या सुमारास पश्चिम भारतात टिक्का रोगामुळे स्थानिक भुईमुगाच्या जातींचे फार नुकसान होत असे. बिग जपान, स्पॅनिश पीनट हे लवकर तयार होणारे प्रकार परदेशांतून आणून त्यांची लागवड करण्यात आली. काही वर्षे हे प्रकार रोगमुक्त होते. मर रोगामुळे सोनकेळ हा केळ्याचा प्रकार पुणे जिल्ह्याच्या काही भागात लावणे अशक्य झाले होते, त्यावेळी बसराई हा केळ्याचा प्रकार लावल्याने नुकसान थांबले.  

  

(आ) निवड पद्धत : ज्यावेळी पिकावर रोग मोठ्या प्रमाणावर उद्‌भवतो त्यावेळी काही झाडे रोगमुक्त अगर कमी प्रमाणात रोगट आढळतात. अशा प्रत्येक झाडाचे बी अलग ठेवून पुढील हंगामात ते शेतात अगर काचगृहात कुंड्यांमध्ये पेरले जाते. कृत्रिम तऱ्हेने रोगोद्‌भव करून त्यातील रोगप्रतिकारक झाडांमधून पुन्हा निवड केली जाते. अशारीतीने एका झाडाची सर्व प्रजा रोगप्रतिकारक व इतर बाबतीत शुद्ध आहे असे दिसून येईपर्यंत ही निवड चालू राहते. अशाप्रकारच्या निवड पद्धतीला ‘शुद्धवाण पद्धत’ म्हणतात. शुद्धवाण प्रस्थापित झाल्यावर त्याचे बी मोठ्या प्रमाणावर तयार करून लागवडीसाठी दिले जाते. या पद्धतीने कापूस, वाटाणा, तूर वगैरे पिकांचे ‘मर’ रोगप्रतिकारक प्रकार उपलब्ध केले गेले आहेत. यासाठी काचगृहात मातीच्या तापमानांचे नियंत्रण करून रोगकारकांच्या वाढीसाठी इष्टतम असे तापमान ठेवले जाते.  

  

(इ) संकरण पद्धती : बऱ्याच वेळा रोगप्रतिकारक असलेले पिकाचे प्रकार उपलब्ध असतात परंतु स्थानिक हवामानात त्यांची योग्य तऱ्हेने वाढ होत नाही अथवा इतर आवश्यक गुणात ते स्थानिक प्रकारांपेक्षा कमी दर्जाचे असतात. अशावेळी स्थानिक प्रकाराचा रोगप्रतिकारक प्रकारांशी संकर केला जातो. संकरित बीजापासून उत्पन्न झालेली झाडे सारख्या गुणधर्माची नसतात. निरनिराळ्या झाडांमध्ये दोन्ही प्रकारांच्या निरनिराळ्या गुणधर्माचे संयोग झालेले असतात. यासाठी कृत्रिम तऱ्हेने रोगोद्‌भव करून संकरित बीजापासून उत्पन्न झालेल्या झाडामधून रोगप्रतिकारक आणि स्थानिक प्रकारातील चांगले गुणधर्म असलेल्या झाडाची निवड केली जाते. या झाडाचे बी अलग ठेवून पुढील हंगामात रोगप्रतिकारक्षमतेसाठी परीक्षा घेतली जाते व रोगप्रतिकारक झाडापासून पुन्हा निवड केली जाते. शुद्ध वाण प्रस्थापित झाल्यावर उत्पादन वगैरे बाबींसाठी निरनिराळ्या प्रयोगक्षेत्रांवर बी लावूनपरीक्षा केली जाते आणि समाधानकारक ठरल्यास मोठ्या प्रमाणांवर बी तयार करून शेतकऱ्यांना ते दिले जाते. गव्हाचे तांबेरा रोगप्रतिकारक प्रकार अशा पद्धतीने इतर देशांत व भारतात उपलब्ध केले गेले आहेत. तसेच कापसाचे मर रोगप्रतिकारक प्रकार महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांत संकरण पद्धतीने तयार केले गेले आणि त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव पुष्कळच कमी झाला.  

  

(ई) कलम पद्धती : फळझाडाच्या रोगाच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जातो. रोगप्रतिकारक प्रकाराचा खुंट म्हणून उपयोग करून त्यावर आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे कलम केल्याने त्यापासून त्यापासून वाढणाऱ्या झाडामध्ये रोगप्रतिकारक प्रकारातील प्रतिकारक्षमता येते. मोसंबीच्या सल रोगासाठी आणि इतर फळझाडांच्या व्हायरसजन्य रोगांसाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो.

वरील काही पद्धतींमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यांतील महत्त्वाच्या काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत : (१) रोगप्रतिकारक्षमता व पिकातील अनिष्ठ गुणधर्म यांची सहलग्नता असल्यास रोगप्रतिकारक प्रकारामध्ये अनिष्ठ गुणधर्म आनुवंशिकतेने उतरतात. अशा बाबतीत रोगप्रतिकारक पण त्याचबरोबर अनिष्ट गुणधर्म नसलेला प्रकार प्रस्थापित करणे शक्य नसते. (२) निसर्गात रोगकारक कवक, सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या जातींमध्ये अनेक उपजाती असू शकतात आणि निरनिराळ्या पद्धतीने नव्या उपजाती निर्माण होतात. रोगकारकाची नवी उपजाती निसर्गात निर्माण झाल्यास आणि त्यावेळी पिकाचा लागवडीखाली असलेला जुन्या उपजातीला प्रतिकारक असलेला प्रकार नव्या उपजातीला प्रतिकारक नसल्यास त्यावर रोग पडून नुकसान होते. रोगकारकाच्या जुन्या व नव्या उपजातींना प्रतिकार करणारा आणि लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त असा पिकाचा प्रकार संकरण पद्धतीने पुन्हा तयार करावा लागतो आणि हे काम अवघड व दीर्घ मुदतीचे असते. (३) प्रत्येक पिकावर बहुधा एकाहून अधिक रोग पडतात. एका रोगाला प्रतिकारक असलेला पिकाचा प्रकार इतर रोगांना प्रतिकारक असतोच असे नाही.

  

संदर्भ : 1. Arios, G. N. Plant Pathology, New York, 1978.

           2. Bilgrami, J. G. Dube, K. S. A Textbook of Modern Plant Pathology, New Delhi, 1982.

           3. Chester, K. S. Nature and Prevention of Plant Diseases, New York, 1950.

           4. Evans, E. Plant Discases and Their Chemical Control, Oxford. 1968.

           5. Kamat, M. N. Introductory Plant Pathology, Poona, 1967.

           7. Mehrotra, R. S. Plant Pathology, New Delhi, 1990.

           6. Mathur, R. S. Plant Diseases, New Delhi, 1990.

           8. Mundkur, B. B. Fungi and Plant Disease, London, 1961.

           9. Roberts, D. A. Bcothroyd, C. W. Fundamentals of Plant Pathology, 1985.

           10. Shurtleff, M. C. How to Control Plant Diseases in Home and Garden, Ames, 1966.

           11. Singh, R. S. Plant Diseases, Calcutta, 1968.

           12 Smith, K. M. Plant Viruses, New York, 1968.

           13. Stackman, E. C. Harrar, J. G. Principles of Plant Pathology, New York, 1957.

           14. Tarr, S. A. J. The Principles of Plant Pathology, New York, 1972.

           15. Walker, J. C. Plant Pathology, New York, 1969.

           16. Westcott, C. Plant Discase Handbook, New York, 1971.  

           १७. कामत, मा. ना. पिकांचे रोग व त्यावरील उपाय, पुणे, १९६५ 

भिडे, वि.प. गोखली, वा. पु. रुईकर, स. के.