ट्रंपेट वृक्ष : (म. तुतारी वृक्ष लॅ. सेक्रोपिया पेल्टॅटा कुलमोरेसी). सुमारे १५ मी. उंच व जलद वाढणारा हा वृक्ष अमेरिकेत उष्ण भागात व वेस्ट इंडीजमध्ये आहे. खोड बारीक, कमकुवत व शेंड्याला पसरट माथा असतो. फांद्या खाली वाकलेल्या असून ह्यांत दुधी चीक असतो. पाने एकाआड एक, छत्राकृती, ५–१० खंडित आणि त्यांचा व्यास ३० सेंमी. असतो खंड लांबट, अंडाकृती व बोथट असतात. देठाच्या तळाशी मांसल वृद्धी असते. पाकळ्या नसलेली बारीक फुले गोलसर किंवा लांबट झुबक्यात येतात त्यांमध्ये चवरीसारखे फुलोरे असतात. फळे एकबीजी, लहान, कपालीसारखी (कवचयुक्त) असतात [→ मोरेसी]. याच्या पोकळ खोडापासून औपे इंडियन लोक वाद्ये बनवितात. खोडात व फांद्यांत मुंग्या कायम राहतात आणि पाने खाण्यास आलेल्या इतर मुंग्यांना हाकून देऊन झाडाचे संरक्षण करतात याबद्दल त्यांना झाडाकडून पानांवरच्या मांसल वृद्धींचा अन्न पुरवठा होतो हे पारस्परिक ⇨सहजीवनाचे उदाहरण आहे. याच्या हलक्या लाकडाचा उपयोग तरंडाकरिता (तरंगण्याकरिता) करतात. अंतर्सालीपासून जाडेभरडे धागे मिळतात व पानांचा घासण्यास उपयोग करतात. ब्राझीलमध्ये कागदाच्या लगद्याकरिता याचे सच्छिद्र लाकूड वापरतात. मेक्सिकोत चामखीळ घालविण्यास या वनस्पतीचा रस लावतात. खोडाचा पन्हळासारखा उपयोग करतात.

जमदाडे, ज. वि.