ॲरॉइडी : (सुरण कुल ॲरेसी). फुलझाडांपैकी एकदलिकित वनस्पतींतील एका कुलाचे हे नाव असून याचा समावेश भिन्न वनस्पतिविज्ञांनी भिन्न भिन्न गणांत केला आहे. बेसी, हचिन्सन, ब्रँडिस इत्यादींच्या मते ॲरेलीझ बेंथॅम व हूकर यांच्या मते न्यूडिफ्लोरी रेंडेल यांच्या मते स्पॅडिसिफ्लोरी व जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते स्पॅथिफ्लोरी, अशी त्या गणांची नावे आहेत. या गणांतील वनस्पती ⇨ओषधी, क्षुप (झुडुपे) किंवा वृक्ष असून फुले एकलिंगी किंवा क्वचित उभयलिंगी, बहुधा अपरिदल व महाछदाने वेढलेल्या स्थूलकणिशावर येतात [पुष्पबंध] किंजपुट ऊर्ध्वस्थ व बी सपुष्क (विकास पावत असलेल्या बीजातील गर्भाच्या पोषणास मदत करणारा भाग म्हणजे पुष्क) असते.

 

या कुलातील वनस्पती बहुधा ओषधीय, जमिनीवर अथवा क्वचित पाण्यात वाहणाऱ्या, कधी ⇨अपिवनस्पती  अथवा आरोहिणी (वर चढत जाणाऱ्या) असतात. मूलक्षोड, घनकंद, ग्रंथिक्षोड इ. प्रकारचे

खोड व आगंतुक मुळे असतात पाण्यासारखा किंवा दुधी चीक व कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे स्फटिक सामान्यतः असतात.

या कुलात सुमारे १०५ वंश व १,५०० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आहे. यांची पाने साधी किंवा संयुक्त, एक किंवा अनेक, बहुधा मूलज, कधी हवेत वाढणाऱ्या खोडावर एकाआड एक, अखंड किंवा विविध प्रकारे खंडित असून तळाशी आवरक असतात सिराविन्यास समांतर किंवा जाळीदार असतो [→पान]. फुले लहान, उभयलिंगी किंवा एकलिंगी, अपरिदल अथवा त्यांत १-२ परिदलमंडले असतात कधी फक्त एक किंजदल किंवा केसरदलच असते [→फूल]. लहान किंवा मोठ्या हिरव्या किंवा रंगीत छदाने वेढलेला स्थूलकणिश, हा पुष्पबंध ठळकपणे दिसतो. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक किंवा तीन कप्पे असून मृदुफळे सुटी किंवा संयुक्त प्रकारची असतात. परागण कीटकांद्वारे घडून येते. अळू, माणक, सुरण व वेखंड या वनस्पती उपयुक्त असून कॅलॅडियम, ॲरम, अंजनवेल, पोथॉस ऑरिया व गोंडाळ बागेत शोभेकरिता लावतात. ॲरेसी व ⇨पामी  या कुलांमध्ये आप्तभाव आहेत.

वैद्य, प्र. भ.