सेरिसा फेटिडा : (कुल-रुबिएसी). अनेक फांद्यांचे शोभिवंत झुडूप. सेरिसा प्रजातीत ही एकमेव जाती आढळते. पाने व फुले कुस्करली असता दुर्गंधी येत असल्यामुळे तिचे जातीवाचक लॅटिन नाव फेटिडा पडले आहे. पूर्वी ती सेरिसा जॅपोनिका या नावाने ओळखली जात असे. तिचे मूलस्थान आग्नेय आशियातील भारत व चीन यांपासून ते जपान आहे.

सेरिसा फेटिडा हे सदाहरित झुडूप सु. ६० सेंमी.पर्यंत उंच वाढते. त्याचे खोड खडबडीत आणि राखाडी रंगाचे असते. फांद्यांची वाढ सभोवताली झाल्यामुळे गर्द पानांचा घुमट तयार होतो. त्याची पाने गडद हिरवी, अंडाकृती-कुंतसम, चिवट व चकचकीत असतात. फुले लहान, दुहेरी, बिनदेठाची, पांढरी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकास वर्षातून २-३ वेळा येतात. संदले, प्रदले व केसरदले ४-६, पुष्पमुकुट आतून केसाळ व नाळक्यासारखा, किंजपुट दोन कप्प्यांचा आणि प्रत्येक कप्प्यात एक बीजक असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

सेरिसा फेटिडा या झुडूपाची बागेमध्ये नवीन लागवड कलमांनी करतात. जपानमध्ये या झुडुपाचे ⇨ बॉनसाई करतात. वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे बॉनसाई करण्यासाठी ही प्रजाती उपयुक्त आहे. पाणी जास्त वा कमी झाल्यास तसेच तापमान अतिथंड वा अतिउष्ण झाल्यास त्याची पानगळ होते.

हर्डीकर, कमला श्री.