कुमुद:(हिं. बाराचुली लॅ. लिम्नॅथिमम इंडिकम कुल-जेन्शिएनेसी). या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत)

कुमुद : (१) पाने, (२) फुले

असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते. खोड पाण्यात तरंगते व लांब असते त्यापासून देठासारख्या फांद्या व त्यांच्या पेऱ्यापासून मुळे, फुलांचा घोस व एक तरंगणारे जाड पान येते. ते सु.३० सेंमी. व्यासाचे, वर्तुळाकृती किंवा हृदयाकृती असते. फुले पांढरी व त्याचा मध्य पिवळा असून ती एप्रिल–सप्टेंबरमध्ये येतात. शाकीय अभिवृद्धी (बीजांशिवाय वनस्पतीचे इतर अवयव लावून केलेली लागवड) कळ्या व आगंतुक मुळांपासून किंवा मूलक्षोडापासून होते. मूलक्षोड, मुळे, फांद्या व पानांचे देठ यांचा भाजीसाठी उपयोग करतात. वनस्पती कडू असून स्कर्व्हीनाशक (आहारात क जीवनसत्त्व कमी पडल्यामुळे निर्माण होणारी स्थिती नाहीशी करणारी) व ज्वरनाशक आहे. शोभेकरीता तळ्यात व लहान पुष्करणीत लावतात. या वनस्पतीचा समावेश हल्ली निफॉयडिस  या वंशात मेनिअँथेसी कुलात केला जातो.

पहा : जलवनस्पती जेन्शिएनेलीझ  

जमदाडे, ज. वि.