शिंदी : [सेंदी हिं. सेंधी, खाजी, खजूर, खजूरी गु. कजुरी, खरक, खाक्री क. कळ्ळू सं. विट खर्जूर, खर्जुरी, खर्जुरिका इं. टॉडी पाम, वाइल्ड डेट पाम, डेट शुगर पाम, लॅ. फीनिक्स सिल्व्हेस्ट्रिस कुल – पामी (पामेसी, ॲरेकेसी)]. फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] सु. १०–१६ मी. उंच व खजुराच्या वृक्षासारखा दिसणार एक सर्वपरिचित वृक्ष. हा भारतात सर्वत्र साधारपणे १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. त्याची लागवडही करतात. बहुधा तो ओलसर गाळाच्या जमिनीत, पण फार भारी व चिकण माती नसलेल्या जमिनीत आढळतो. ओढ्यानाल्यांच्या काठी याची चांगली वाढ होते. फीनिक्स प्रजातीत सु. १५ जाती असून त्यांपैकी आठ जाती भारतात आढळतात. तो भारतीय असल्याबद्दल एकमत आहे. लागवडीसाठी प्रथम पन्हेरीत रोपे तयार करतात. तीन वर्षे वयाची रोपे चांगल्या नांगरलेल्या व भुसभुशीत जमिनीत पावसाळ्यात लावतात. झाडे पाच वर्षांची झाल्यावर त्यांची खालची पिवळट पाने काढून टाकतात व हिरवट पाने एकत्र बांधून ठेवतात. आंतरमशागत नियमितपणे करतात. उन्हाळ्यात आरंभी झाडांना फुलोरे येतात व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळे पक्व होतात. या वृक्षांना मुनवे किंवा फुटवे येत नाहीत. पाने चिंबणे, काळे सूक्ष्म ठिपके, मखमली काणी, काळी भुरी, करपा इ. कवकजन्य रोग व कीटक यांचा याला उपद्रव होतो. त्यासाठी योग्य ती कवकनाशके व कीटनाशके फवारतात.

शिंदी : (१) वृक्ष, (२) फळाचा घोस, (३) बी रुजून बनलेले रोप

शिंदीच्या वृक्षाला फांद्या क्वचितच आढळतात. गळून पडलेल्या पानांच्या देठांमुळे पृष्ठभाग सतत झाकलेला असतो किंवा त्यांच्या वणांमुळे तो खरबरीत दिसतो. पाने संयुक्त व मोठी, १–५ मी. लांब असून त्यांचा झुपका खोडाच्या शेंड्यावर असतो. देठावर आखूड काटे असून मध्यशिरेवर अनेक अरुंद, भुरकट करडी व ताठर दले असतात. ती सु. १५–४५ सेंमी. लांब व चिवट असून त्यांच्या टोकांस तीक्ष्ण काटे असतात. फुले लहान, सुगंधी व एकलिंगी असतात. नर-पुष्पे पांढरट व स्त्री-पुष्पे हिरवट असतात. ती जाड, लोंबक्या दांड्यांवर अनेक फुलोऱ्यांवर जानेवारी ते मार्च दरम्यान येतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨ पामी अथवा ताल कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ आयत-लंबगोल, शेंदरट पिवळे, गोड, सु. २·५ ते ३ सेंमी. लांब व बी साधारण १·५ सेंमी. लांब, कठीण, गोलसर व दोन्ही टोकांस बोथट असते. त्यावर एका बाजूस खोलगट खाच असते.

शिंदीची फळे गोड, थंड व खाद्य असली, तरी ती सामन्यतः कमी प्रतीची असतात. ती आरोग्य पुनःस्थापक, कामोत्तेजक व मेदवृद्धी करणारी असून त्यांपासून मुरंबे, जेली व शिर्का तयार करतात. पानांचा उपयोग छपरे, चटया, पंखे, टोपल्या, पिशव्या, झाडू–केरसुण्या, मासे पकड्ण्याची जाळी इ. तयार करण्यासाठी होतो. देठ व मध्यशिरांपासून मिळणाऱ्या धाग्यांचे दोर बनवितात. लाकडाचा मध्यभाग मऊ आणि बाहेरील भाग कठीण व खरबरीत असतो. ते फिकट तपकिरी व टिकाऊ असते. खोडापासून डिंक मिळतो. सालीत टॅनीन असते. दातदुखीवर मुळे उपयुक्त असतात. पानांपासून मिळणारा धागा कागदनिर्मितीत वापरतात.

शिंदी पासून मिळणारी ⇨ नीरा व ⇨ गूळ ही उत्पादने व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत.

पहा : खजूर ताड परागण पाम पामेलीझ.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.