सप्ताळू : ( हिं. अरू क. पिचेसू इं. पीच ट्नी नेक्टराइन लॅ. प्रूनस पर्सिका, कुल – रोझेसी ). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा लहान वृक्ष मूळचा चीनमधील असून भारत, इंग्लंड, अमेरिका, यूरोप, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे लागवडीत आहे. समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत तो फार चांगला वाढतो. रोमन लोकांना त्याचे सहा प्रकार माहीत होते. ⇨जरदाळू, बदाम, अलुबुखार हे सप्ताळूच्या प्रूनस ह्या शास्त्रीय प्रजातीतील असल्याने त्यांची सामान्य शारीरिक लक्षणे सारखी आहेत.

वनस्पतिवर्णन : ह्या वृक्षाची पाने साधी, २·५ सेंमी. पेक्षा लांब, एकाआड एक भाल्यासारखी व साधारण दातेरी असून त्यांच्या देठांवर प्रपिंडे ( गंथी ) असतात. फुले एकेकटी, लालसर, फार आखूड देठाची असून बहार आल्यावर हे झाड फार शोभिवंत दिसते. अश्मगर्भी (आठळीयुक्त ) फळे गोलसर खरबरीत तपकिरी, टोकदार, नरम, लवदार व चिकूएवढी (५-७ सेंमी. व्यास ) असतात. आठळी कठीण व खाचदार असते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे (रोझेसी ( गुलाब ) कुलात आणि (रोझेलीझ ( गुलाब ) गणात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सप्ताळू (चायनिज पीच ) : (१) फुले असलेली फांदी, (२) पानाफळासह फांदी.

उपयोग : फळांचे काही प्रकार मुखशुद्धीकरिता खातात काहींचा रस पेयाप्रमाणे घेतात. पीच बँडी (मदय) बनवून ठेवतात. काही फळे उकडून खातात किंवा मुरंबा घालतात. सुकवून त्यांची चटणी करतात. बियांपासून काढलेले स्थिर तेल स्वयंपाकात, दिव्यांत किंवा केसांना लावण्यास वापरतात. फुले मूत्रल (लघवी साफ करणारी ), कृमिनाशक व रेचक ( पोट साफ करणारी ) फळे दीपक (भूक वाढविणारी ), शामक ( शांत करणारी ) व रक्तपित्तव्याधिनाशक असतात. फुले, बिया, पाने व साल यांना कडू बदामाचा वास व चव असते. जलीय विच्छेदनाने त्यापासून हायड्रोसायनिक अम्ल मिळते. पानांत बाष्पनशील तेल असते. पानांतूनही ०·०४-०·१४% हायड्रोसायनिक अम्ल निघते. तसेच पानांत ८% टॅनिना-सारखा पदार्थ असतो. पाने सारक व कृमिनाशक असतात. पानांचा किंवा सालीचा फांट (गरम पाणी ओतून काढलेला रस ) विशेषत: माकड खोकल्यावर देतात. पाने, फुले व बियांतील मगज विषारी असतात. मुळांच्या सालीपासून रंग काढतात. लाकडाचा वापर बांधकामात करतात.

रासायनिक संघटन : फळांत साखर, थायामीन आणि अस्कॉर्बिक अम्ल असतात. कुन्नूर येथील पक्व फळातील ८८% खादय मगजात पुढील घटक प्रतिशत आढळलेले आहेत. पाणी ८३·०, प्रथिने १·२, मेद ०·३, तंतू १·२, कार्बोहायड्नेटे १०·५, खनिजे ०·८ यांशिवाय (मिगॅ/१०० गॅ.मध्ये ) कॅल्शियम १५·०, मॅग्नेशियम २१·०, ऑक्झॅलिक अम्ल १·०, लोह २·४, एकूण फॉस्फरस ४१·०, फायटीन फॉस्फरस १·०, सोडियम २·० पोटॅशियम ४५३·० ताम ०·०६, गंधक २६·० जीवनसत्व अ नाही, थायामीन ०·०२, रिबोफ्लाविन ०·०३ निकोटिनिक अम्ल ०·५ आणि अस्कॉर्बिक अम्ल·० साधारणपणे हे घटक कमी-अधिक प्रमाणात भिन्न प्रकारांत आढळतात.

प्रकार व लागवड : ह्या वनस्पतीचे स्थूलमानाने तीन मुख्य प्रकार ओळखले जातात : (१) पर्सिका, (२) नेक्टरिना(३) कॉम्प्रेस. मगजाचा प्रकार लक्षात घेऊन यांमध्ये दोन गट केले आहेत. मगज आठळीस चिकटलेला असल्यास ‘ क्लिंगस्ट्नोन ’ व तो आठळीपासून सुटा असल्यास ‘ फीस्टोन ’ अशी नावे त्यांना दिली आहेत. चीनमध्ये हजारो सप्ताळू लागवडीत आहे. प्रूनस डॅव्हिडियाना ही जाती त्याच्याशी संबंधित असून ती आजही तेथे जंगली अवस्थेत आढळते. सप्ताळू व ही दुसरी जाती यांच्या फळातील फरक फक्त त्यावरील सूक्ष्म केसाळ आवरणाचा असतो. डॅव्हिडियाना च्या फळांवर केस नसतात. सप्ताळूच्या बिया व कळ्या यांतील परिवर्तनाने (भेदामुळे ) डॅव्हिडियाना ची (नेस्टरिनाची ) निर्मिती झाली असावी, असे म्हणतात. दोन्हीच्या बियांपासून परस्परांसारखी संतती होते असा अनुभव आहे.

समशीतोष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत सप्ताळूची लागवड केली जाते. अमेरिकेत सर्वांत जास्त व सफरचंदाखालोखाल त्याचे महत्त्व आहे. याशिवाय यूरोपात इटली, फ्रान्स व स्पेन आशियात चीन व जपान दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका इ. देशांतही लागवड आहे. भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील व पंजाबातील डोंगराच्या पायथ्याचा प्रदेश,तसेच निलगिरीचा काही प्रदेश इ. ठिकाणीही लागवड आहे. काश्मीर, कुलू दरी, हिमाचल प्रदेश व कुमाऊँ टेकडया इ. ठिकाणी मिळून सु. ८०० हेक्टरांत लागवड आहे व तेथे इतर देशांतून आणलेले सुधारित प्रकार लावले आहेत. पंजाबात व उत्तर प्रदेशांत सु. ८०० हेक्टरांत कमी दर्जाच्या सप्ताळूचेही पीक घेतात. किन्नोरमध्ये सु. ३०,००० जंगली सप्ताळू वृक्ष असून एकूण हिमाचल प्रदेशात ५५० हेक्टरांत लागवड आहे. उत्तर प्रदेशात ‘ शरबती ’ हा एक चांगला प्रकार असून त्याचे पीक भरपूर येते. भारतातील लागवडीत महत्त्वाचे प्रकार ‘ अलेक्झांडर, पेरेगाइन, अर्ली रिव्हर्स, डय्क ऑफ यॉर्क, बॅबॉक, एल्बर्टा, हनी, जे. एच्. हॅले, सी. ओ. स्मिथ ’ इ. असून उत्तर भारतात ते लावले आहेत. डबाबंद करण्यात सोयीचा, मोठया आकर्षक फळांचा आणि घट्ट, रसाळ व गोड मगजाचा ‘ हॅल्बर्टा जायंट ’ हा संकरज प्रकार हिमाचल प्रदेशात लागवडीत आहे, तसेच नैनिताल जिल्ह्याच्या रामगड क्षेत्रातील मोठय प्रमाणात लागवडीत असलेल्या ‘ तोतापरी ’ प्रकार डबाबंद करण्यास चांगला असतो. निलगिरीतही ‘ किलिकंरकी ’ आणि ‘ शंघाई सीडलिंग ’ हे दोन प्रकार यशस्वीपणे लागवडीत आले आहेत. सप्ताळूच्या बियांतील तेल (पीच कर्नेल ऑईल ) ३२-४५% असते व त्याचे गुणधर्म जरदाळूच्या तेलाप्रमाणे असतात. ते पिवळे असून त्याचा स्वाद व वास बेंझाल्डिहाइड सायनहायड्रीनासारखा/// असतो. तेल काढून उरलेली पेंड कडू बदाम तेलासारखे तेल काढण्यास वापरतात. पेंडीत ७-९% नायट्रोजन असून त्याचा खतासारखा उपयोग होतो. त्यातील कडूपणा घालवून ती जनावरांच्या खाद्याकरिता वापरता येते. अठळीच्या कवचाची पूड करून तिचा वापर कोळसा करण्यास व यंत्रे स्वच्छ करण्यास होतो. कोळशाचा उपयोग पोलादावर औष्णिक संस्कार करण्यास करतात.

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

परांडेकर, शं. आ. चौधरी, रा. मो.