शरीर, वनस्पतींचे : (वनस्पतींचे शरीररचनाशास्त्र). वनस्पतिविज्ञानाच्या या शाखेत बहुकोशिक (अनेक पेशींचे शरीर असणाऱ्या) वनस्पतींच्या बाह्य व अंतर्गत संरचनेचा अभ्यास केला जातो. सामान्यत शारीर वाहिनीवंत (अन्नरसाची ने-आण करणारे घटक असणाऱ्या) वनस्पतींच्या अध्ययनाशी मर्यादित असते. या वनस्पतींमध्ये हरिता, एक्विसीटम, नेचे, प्रकटबीज वनस्पती व आवृत्तबीज वनस्पती यांचा समावेश असतो.

थीओफ्रॅस्टस (इ.स.पू.सु.३७२–२८५) यांच्या ग्रंथांत शारीरीय लक्षणे असणाऱ्या वनस्पतींचा सर्वांत पुरातन उल्लेख आढळतो. त्यांनी वनस्पती ऊतकांचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांचे) मूळ, खोड, शाखा, पान, फूल व फळ असे प्रमुख भेद मानले होते. त्यांनी साल, लाकूड आणि भेंड अशा भिन्न ऊतकांचे वर्णन केले होते. या संकल्पना किंवा संज्ञा अजूनही वापरात आहेत. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागेपर्यंत त्यामध्ये फार अल्प प्रगती झाली. १६६५ मध्ये सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने रॉबर्ट हुक यांनी कोशिकेचा शोध लावला. त्यामुळे जीवांच्या संरचनेच्या अध्ययनाला जोराची चालना मिळाली. १६८२ मध्ये निहेमिया ग्रू यांनी वनस्पती ऊतकांचे वर्णन धाग्यांचे जटिल जाळे असे केले व त्यांची सुरेख चित्रेही काढली. १८३१ मध्ये हुगो फोन मोल यांनी खशेड, मूळ व पाने यांमधील वाहक ऊतकाचा शोध लावला. १८६३ मध्ये कार्ल सानिओ यांनी वाहक ⇨ऊतककराच्या उगमाचा शोध लावला व हे निदर्शनास आणले की, दरवर्षी ते प्रकाष्ट व परिकाष्ठ यांचा दंडगोल (नळकांडे) निर्माण करते. १८७७ मध्ये ⇨ हाइन्रिख अँताँ द बारी यांनी कंपॅरेटिव्ह अनॅटॉमी ऑफ द फॅनेरोगॅम्स अँड फर्न्स हा अभिजात ग्रंथ प्रकाशित केला आणि त्यामध्ये त्या काळी उपलब्ध असलेल्या वनस्पती शारीरावरील सर्व माहितीचा समावेश केला. विसाव्या शतकात त्यात वेगाने प्रगती झाली.

वनस्पतींच्या आकारांत खूपच विविधता आढळते, तरी पण त्या ज्या कोशिकांपासून निर्माण झालेल्या असतात, त्यांत अत्यंत साम्य असते. कोशिकेचे संघटन व विविध कोशिका प्रकारांची लक्षणे समजल्याशिवाय कोशिकेच्या अंतर्गत संरचनेचे आकलन होत नाही.

कोशिका : सजीव कोशिकेत जेलीसारखे जीवद्रव्य असते आणि ते सेल्युलोज व जीवद्रव्यापासून स्रवलेल्या पेक्टीन संयुगापासून बनलेल्या अंजीवी (निर्जीव) भित्तीने वेढलेले असते. कित्येक कोशिकांत मूळ व प्रारंभिक भित्तीच्या आतील बाजूस द्वितीयक पुढे असतात. जीवद्रव्य साधे रासायनिक संयुग नसून ते पाणी, प्रथिने, शर्करा, वसा, अम्ले व लवणे यांचे भौतिकीय मिश्रण असते. त्यांची योग्य प्रमाणात योग्य तऱ्हेने मांडणी झाल्यास योग्य परिस्थितीत त्यांचे जीवद्रव्य तयार होते. सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण केल्यास जीवद्रव्य केंद्रक व कोशिकाद्रव्य (प्राकलकणूंसह) अशा दोन भागांचे बनलेले असते, हे लक्षात येते. केंद्रक हा काहीसा गोलसर पिंड असून कोशिकेच्या मध्ये किंवा कडेला असतो. हा रासायनिक क्रियांचा केंद्रबिंदू होय व त्यात आनुवंशिक लक्षणे निश्चित करणारी द्रव्ये असतात. विशेषतः नव्या कोशिकेचा उरलेला भाग कोशिकाद्रव्याने भरलेला असतो. ते द्रव्य चिकट करड्या रंगाचे असून रासायनिक दृष्ट्या फार क्रियाशील असते. प्राकलकणू पांढरे असताना अन्नसंचयाचे केंद्र म्हणून कार्य करतात व हिरव्या रंगाचे झाल्यावर शर्करेची निर्मिती करतात. जून कोशिकांमध्ये रिक्तिका मोठ्या पाण्याच्या बिंदूसारखी असते व तीत विद्रुत पदार्थ असतात. ती मध्यभागी असते व ती केंद्रक, प्राकलकणू व प्राकल यांना दाबून कोशिकाभित्तीच्या कडेने पातळ पटल तयार करते. वनस्तींत आढळणारे विविध प्रकार सापेक्षत: साध्या संघटनेच्या कोशिकांपासून तयार झालेले असतात.

ऊतके : संरचनात्मकदृष्टा वनस्पतींच्या अंगाचे वेगवेगळे विभाग किंवा प्रदेश पडतात. त्यांची लक्षणे कोशिकेचे प्रकार किंवा मांडणी आणि त्यांत असलेल्या प्रकारांचा संयोग यांवर अवलंबून असतात. जुन्या शारीरविज्ञांनी अशा विभागांना ऊतके मानले. उत्पत्ती, संरचना, कार्य किंवा सर्वांचा संयोग यांची त्यांनी ऊतके अशी व्याख्या केली. ऊतके नेहमीच स्पष्टपणे असीमित असतात असे नाही वा त्यांची संरचना एकसारखी नसते व बहुधा त्यांना विविध कार्ये करावी लागतात. या विशिष्टतेतील कमतरतेमुळे त्यांचे वर्गीकरण करणे फार अवघड व कष्टप्रद झाले आहे. आधुनिक पद्धतीत ऊतक ही संज्ञा प्रदेश किंवा विभाग या अर्थाने वापरतात. स्थलाकृतिकत: वाहिनीवंत वनस्पतीच्या आडव्या छेदात बाहेरून सुरुवात करून आतील बाजूस (मध्याकडे) जाताना अपित्वचा स्तर, मध्यत्वचा विभाग, वाहक ऊतकाचा दंडगोल किंवा गाभा व बहुधा मध्यवर्ती भेंड असे भाग दिसतात. [⟶ ऊतके, वनस्पतींची].

मूळ : अक्षाचा पर्णहीन भाग म्हणजे मूळ होय. ते पाणी, जमिनीतून विरघळलेली अन्नद्रव्ये शोषते, झाडाला आधार देते आणि गाजर व रताळे यांसारखे अन्नसंचय करणारा अवयवही झालेले असते. स्थलाकृतिकत: मुळाचे अरीय (त्रिज्यीय) दृष्ट्या अपित्वचा, मध्यत्वचा व रंभ असे स्वतंत्र भाग असतात. अग्रस्थ (टोकाच्या) ⇨ विभाज्या वरील भागांत नव्या कोशिकांची भर घालीत असते. विभज्येच्या बाह्य पृष्ठभागापासून मूलत्राण तयार होते. ते विभज्येचे संरक्षण करते. कारण ती जमिनीत जोराने घुसत असते. मुळाचा संपूर्ण व्यास अग्रस्थ विभज्येने व्यापलेला असतो. लंबनानंतर (लांबी वाढल्यावर) नव्या कोशिका रांगेत मांडणी केलेल्या कोशिका प्रकारांत विकास पावतात. कोशिका विभाजन, लंबन व परिपक्वता येणे या प्रागतिक प्रक्रिया आहेत. त्यामुळे मुळाचे मूलत्राण, अग्रस्थ विभज्या, लंबन विभाग व परिपक्वता विभाग यांमध्ये ऊर्ध्वस्थ स्तरीभवन होते. अपित्वचा, मध्यत्वचा व रंभ यांमध्ये ऊतक प्रभेदनातील आनुक्रमिक अवस्था प्रत्येक विभागात स्पष्टपणे दिसू लागतात. लंबनविभागाच्या लगेचच वर अपित्वचा कोशिका लांब, दंडगोलाकार प्रवर्ध निर्माण करतात. त्यांना मूलकेश (मुळावरील केसासारख्या संरचना) म्हणतात. त्यांच्यामुळे अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेणाऱ्या विभागाचे क्षेत्र वाढते.

रंभ : प्रारंभिक प्रकाष्ठ व प्रारंभिक परिकाष्ट यांच्या पेंडांनी रंभ तयार झालेले असते. प्रकाष्ठ व परिकाष्ठ अग्रस्थ विभज्येपासून निर्माण झालेले असतात. प्रकाष्ठ पट्ट त्रिज्येच्या दिशेने पसरट झालेले असतात व मुळातील एकसारख्या परिघावर परिकाष्ठाच्या एकाआड एक असतात. सामान्यत: मुळांमध्ये भेंड नसतो, तथापि तो द्विदलिकित् (बियात दोन दले असलेल्या) वनस्पतींपेक्षा एकदलिकित (बियात एकच दलिका असलेल्या) वनस्पतींत जास्त असतो. पार्श्विक मुळे परिरंभापासून (विभज्येच्या कोशिका स्तरापासून), रंभाच्या पृष्ठभागापासून येतात आणि मध्यत्वचेतून जोमाने आपला मार्ग काढतात. व्यासामध्ये (जाडीत) उल्लेखनीय वाढ होण्याची क्षमता असल्यामुळे प्रारंभिक प्रकाष्टाच्या लगेच बाहेरील बाजूस व परिकाष्ठाच्या आतील बाजूस पन्हाळीयुक्त दंडगोलाच्या रूपात वाहक ऊतककर विकास पावतो. द्वितीयक प्रकाष्ठ ऊतककराच्या आतील पृष्ठापासून निर्माण होते व द्वितीयक परिकाष्ठ बाह्य पृष्ठापासून निर्माण होते. व्यासाच्या भरपूर वाढीमुळे अपित्वचा व मध्यत्वचा यांचे विदारण होते. हे घडते, तेव्हा मध्यत्वतेच्या आतील बाजूस, परिरंभामध्ये किंवा द्वितीयक परिकाष्ठात त्वक्षा तयार होते.

खोड : खोड हा वनस्पती अक्षाचा असा भाग आहे की, त्यावर पाने व प्रजोत्पादक अवयव धारण केलेले असतात. ते झाडाच्या हवेतील अवयवांना आधार देते, जमिनीवरील अवयवांना पाणी पोहोचविते आणि मुळांना व इतर असलेल्या केंद्रांकडे तयार अन्नाचे वहन करते. कॅक्टसांप्रमाणे काही खोडे हिरवी असतात व ती अन्ननिर्मितीचे मुख्य कार्य करतात. अन्नसंचय करण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. ऊस व बटाटा यांसारखे ते अभिवृद्धीचे साधन आहे.


अग्रस्थ विभज्या : खोडाचे अग्र घुमटाकार कोशिकापुंजाने टोपीसारखे आच्छादिलेले असते, त्याला अग्रस्थ विभज्या किंवा प्ररोहाचे टोक म्हणतात. लांबीत वाढ होऊन पानांमधील अंतराचे कांडे होते व पाने फुटलेली जागा पेरे होते. मुळातील स्थितीच्या विरुद्ध स्थिती अग्रस्थ विभज्येमध्ये असून ती (विभज्या) कोवळ्या पानांनी आच्छादिलेले असते. त्यांचे छताच्या पाटणीसारखे एकावर एक आच्छादन असते.

रंभ : इतर कोणत्याही वनस्पतीच्या अवयवापेक्षा शारीरविज्ञांनी रंभावर अधिक अध्ययन केले आहे. त्याचे दोन मुख्य प्रकार असतात. आद्यरंभामध्ये प्रकाष्ठाचा घनरूप स्तंभ परिकाष्ठाने वेढलेला असतो व नलिकारंभामध्ये प्रकाष्ठाच्या दंडगोलात भेंडाचा गाभा असतो हा त्यांमधील फरक आहे. क्रमविकासाच्या दृष्टीने आद्यरंभ नलिकारंभापेक्षा जास्त प्रारंभिक आहे. तो गदा हरितांच्या विशिष्ट नेचांच्या खोडांत व मुळांत असतो. तसेच तो सर्व प्रारंभिक जीवाश्मभूत वनस्पतींत व बीजी वनस्पतींच्या मुळांत आढळतो. काही रूपांतरणांसह नलिकारंभ इतर वाहिनीवंत वनस्पतींत आढळतात.

वाहक ऊतकाचे पेड किंवा पर्णलेश रंभामधून पानामध्ये जातात. आद्य प्रकाष्ठ किंवा परिकाष्ठाचा विकास होत नाही. हा भाग पर्ण विवर असून तो मृदूतकाने भरलेला असतो. वाहिनीवंत वनस्पतींमध्ये क्रमविकासात ही प्रवृत्ती असते व पर्णविवराची उंची वाढते आणि त्यामुळे रंभ अलग झालेल्या वाहक पेडांच्या दंडगोलासारखे दिसते. या प्रकारच्या रंभाला जालरंभ म्हणतात व तो ओषधीय बीजी वनस्पतींत नेहमी आढळतो. एकदलिकित वनस्पतींत यापेक्षा जास्त विशेषीकरण झालेले असते. त्यांमध्ये असंख्य वाहक पेड असल्यामुळे त्यांचा दंडगोल होत नाही. परंतु खोडामध्ये तो सर्वत्र विखुरलेला असतो.

एकदलिकितांचा व काही अतिविशेषित प्रकार सोडल्यास बीजी वनस्पतींमध्ये प्राथमिक प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांमध्ये वाहक ऊतककर विकास पावतो. समशीतोष्ण कटिबंधातील काष्ठमय वनस्पतींमध्ये वसंतकाष्ठ व ग्रीष्मकाष्ठ यांचे प्रत्येक हंगामातील एक स्तरयुक्त प्रकाष्ठ वलय तयार झालेले असते. [⟶ रंभ वृक्ष].

पान : पानाची अंतर्गत संरचना खोड व मुळ यांपेक्षा अगदी भिन्न असते. वरच्या बाजूने सुरुवात करून अपित्वचेचा एक स्तर असतो, स्कंभोतकीय मध्योतकाचे एक किंवा अधिक स्तर (कोशिकांचे लांब अक्ष पानाच्या पृष्ठभागाला लंब असतात), मध्योतकाचे स्पंजासारखे अनेक स्तरीय (त्रिमितीय जाळ्यामध्ये कोशिकांची रचना असून त्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात) व खालची अपित्वचा असते. तीमध्ये त्वग्रंध्राची छिद्रे असतात. स्कंभोतक व स्पंजयुक्त मध्योतक हे खरोखरीच अधिक रूपांतरित मध्यत्वचा आहेत, तर शिरा ह्या रंभाच्या विस्तार (वाढी) आहेत. पसरट व खूप आखूड शाखाप्रणाली असे पानांचे खरे वर्णन करता येईल. [⟶ पान].

केस : वनस्पतींच्या शरीराच्या भिन्न भागांवर भिन्न प्रकारांच्या केसासारख्या उपांगांची वाढ आढळते. त्यांपैकी ज्यांची वाढ फक्त अपित्वचेपासून होते, त्यांनाच केस म्हणतात. काही उपांगांत अपित्वचेच्या खालच्या त्वचेतीही वाढ अंतर्भूत असते, त्यांना त्वगुत्थित म्हणतात. यांमध्ये काट्यांचा समावेश होतो, परंतु दोन्हींत काटेकोर फरक नसतात. कधीकधी अपित्वचेच्या कोशिकांपासून त्वचेवर फोडाप्रमाणे उंचवटे आढळतात. केस एककोशिक किंवा बहुकोशिक असून जिवंत किंवा मृत असतात. एककोशिक केस बहुधा सरळ, लांबट किंवा शाखायुक्त असतात.  काही केस फारच लांब व पिळवटलेले असून लोकरीसारखे दिसतात. बहुकोशिक केसात कोशिकांची एकच रांग किंवा अनेक रांगा वा थर असतात. ते तात्पुरते किंवा कायम असतात. त्यांच्या अपित्वचेतील भागास पद व वरच्या भागास काय म्हणतात.

प्रपिंडे : विशिष्ट द्रव पदार्थाचे स्रवण करणाऱ्या संरचनाविशेषांना ही संज्ञा देतात. ती फक्त एकच कोशिका असते किंवा तो कोशिकासमूह असतो. हे कार्य करणारे काही विशिष्ट केसही असतात. कोशिकांतील प्राकल-निर्मित पदार्थ त्यातून बाहेर पडल्यावर लगेच शरीराबाहेर पडून जातो किंवा शरीरात विशिष्ट पोकळ्यांत व नलिकांत साचून राहतो. या पोकळ्या वा नलिका कोशिकांच्या नाशामुळे किंवा परस्परांपासून अलग झाल्यामुळे बनलेल्या असतात. अशा संरचनाविशेषांना कधीकधी उत्सर्जन कोशिका म्हणतात. स्राव कोशिकेतून बाहेर न जाता तसाच आत साचून राहिल्यास ती एककोशिक स्रावक कोशिका मानतात, स्राव प्रत्यक्षत: बाहेर टाकल्यास त्या संरचनाविशेषाला बाह्यप्रपिंड व शरीरातील पोकळीत असल्यास अंतःप्रपिंड म्हणतात. बाह्यप्रपिंड अपित्वचेवर पृष्ठवर्ती असून काही भाग व्यापतात किंवा इतस्ततः विखुरलेले असतात. अंतःप्रपिंडातील स्राव शरीरातील इतर ऊतकातील जागेत आढळतात. साधारणत: पाचक रस स्रवणारे पचन प्रपिंड, मधुरस स्रवणारे मधुरसप्रपिंड, राळ-नलिका, तैल-नलिका, चीक-नलिका व पाणी बाहेर टाकणारी छिद्रे इत्यादींचा यात समावेश होतो.

संदर्भ : 1. Eames, A. J. and MacDaniels,  L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.     

           2. Esau, K. Plan Anatomy, New York, 1960. 

           3. Haberlandt, G. Physiological Plant Anatomy, New Delhi, 1965.

चौबळ, पुष्पलता परांडेकर, शं. आ.