डकवीड : (इं. डक्स मीट कुल-लेम्नेसी). गोड्या व संथ (साचलेल्या) पाण्यात तरंगणाऱ्या व फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, एकदलिकीत) सर्वांत लहान, ऱ्हसित व अप्रभोदित (विशिष्ट कार्याकरिता बदल न झालेल्या) वनस्पतींना हे इंग्रजी नाव रूढ आहे. त्या जलपक्षी, विशेषतः बदके व काही मासे यांचे खाद्य असल्याने त्या अर्थाचे दुसरे इंग्रजी नाव आहे. वनस्पतीविज्ञानात या वनस्पती लेग्नेसी कुळात अंतर्भूत केल्या असून ⇨पामी, ॲरेसी [⟶ ॲरॉइडी] व सायक्लँथेसी या कुलांशी त्यांचा आप्तभाव लक्षात घेऊन ही चार कुले स्पॅथिफ्लोरी या गणात समाविष्ट केली जातात. लेम्नेसी कुलात लेम्ना, स्पायरोडेला, वुल्फियावुल्फिएला हे चारच वंश असून सु. ४० जाती आहेत. ध्रुवीय प्रदेशांखेरीज जगात सर्वत्र त्यांचा प्रसार आहे. काहींनी (ए. बी. रेंडेल, आडोल्फ एल्. डील्स, आर्. वेटस्टाइन, एंग्लर) वुल्फिया वुल्फिएला एकाच वंशात ठेवले आहेत, तर जॉन हचिन्सन यांनी (१९३४) स्पायरोडेला आणि वुल्फिएला यांना स्वतंत्र स्थान दिलेले नाही. या कुलाचा उगम ॲरेसीमध्ये असावा याबद्दल बहुतेकांचे एकमत आहे.

वर म्हटल्याप्रमाणे या लहान वनस्पती पाण्यात तरंगतात किंवा निमग्न (बुडालेल्या) असतात, त्यामुळे पाण्यावर हिरवट तवंग दिसतो. यांचे शरीर द्विपार्श्व, कायकाभ (अत्यंत साधे), लंबगोल, आयत, सपाट (टिकलीसारखे) किंवा गोलाकार, वर हिरवे व खाली कधीकधी जांभळट असते. वुल्फियावुल्फिएला  यांना मुळे नसतात वुल्फियाचे शरीर जाडसर व मांसल पण वुल्फिएलाचे पातळ व असमात्र (कोणत्याही पातळीने दोन सारखे भाग होणार नाहीत असे) असते. स्पायरोडेलाच्या पानासारख्या शरीराला खाली अधिक मुळे परंतु लेम्नाच्या तशाच शरीराला फक्त एकच मूळ किंवा अधिक मुळे असतात. मुळे आगंतुक असून त्यांवर टोकास मूलगोप (मुळाच्या टोकास असलेला पिशवीसारखा अवयव) असतो. मुळात वाहक

लेम्ना पॉलिऱ्हायझा : (१) मुळांसह वनस्पती (२) वनस्पतीचा उभा छेद : (अ) वरचा भाग, (आ) खवला, (इ) कक्षास्थ (बगलेतील) कळी, (ई) मुळे, (उ) मूलगोप (३) शरीराचा खालचा भाग : (ऊ) पुं-पुष्पे, (ए) स्त्री-पुष्प, (ऐ) महाछद, (ओ) खवले.

ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचे समूह) नसतात. साध्या शरीराच्या (लेम्नास्पायरोडेला ) स्वरूपाबद्दल मतभेद आहेत. हेगेलमायर यांच्या मते पानासारखा सपाट भाग रूपांतरीत खोड असून त्याच्या समीपस्थ टोकापासून निघणारे सूक्ष्म खवले ही पाने होत. एंग्लर यांच्या मते समीपस्थ भाग खोडाचा असून सपाट पानासारखा दूरस्थ भाग पानच होय. समीपस्थ भागांपासून निघणाऱ्या शिरेचे दोन भाग होतात, त्यांपैकी एक भाग दूरस्थ भागात (पानात) जातो. या शिरेत वाहिनी असते. शरीरापासून निघणाऱ्या कळ्यांमुळे शाकीय उत्पादन (एरवी पोषणाचे कार्य करणाऱ्या अवयवांपासून होणारे उत्पादन) घडून येते. समशीतोष्ण कटिबंधात हिवाळ्यात काही अशा कळ्या तळाशी जातात व ऋतुमान बदलल्यावर त्या रुजून नवीन वनस्पती बनतात. या कळ्या समीपस्थ क्षोडरूप [⟶ खोड] भागापासून खवल्यांच्या बगलेतून निघतात तसेच नवीन पानांसारखे दूरस्थ भागही तेथूनच उगम पावतात, वाढतात व नंतर स्वतंत्र होतात किंवा पूर्वीच्या शरीरास चिकटून वाढतात. तसेच या खवल्यांच्या बगलेतून निघणाऱ्या लहान दांड्यावर फुलोरा येतो (लेम्नास्पायरोडेला). प्रत्येक फुलोरा म्हणजे एका सूक्ष्म महछदाने संरक्षिलेले तीन अनावृत (परीदलहीन) फुले यांपैकी दोन पुंपुष्पे (म्हणजे दोन केसरदले) व एक स्त्री-पुष्प (एक किंजदल) असते. वुल्फियात महाछद नसतो फक्त एक केसरदल व एक किंजदल शरीरावर येतात. लेम्नाच्या परागकोशात दोन कप्पे असतात वुल्फियात एकच कप्पा असतो व केसारदलास तंतू नसतो [⟶ फूल]. किंजपुटात कप्पा एक असून तलस्थ बीजके एक ते सात व कृत्स्नफल (शुष्क, एकबीजी व न तडकणारे फळ) क्लोम प्रकारचे असते [⟶ फळ]. फुले येणे व फळ धरणे या घटना क्वचित आढळल्याने त्यांसंबंधी कुतूहल आढळते.

लेम्ना मायनर, ले. पौसिकॉस्टॅटा व ले. ऑलिगोऱ्हायझा या तीन जाती भारतात विशेषकरून आणि ले. ट्रीसुल्का (निमग्न जाती), ले. गिबा ले. पॉलिऱ्हायझा या महाराष्ट्रात आढळतात. वुल्फिया ॲऱ्हिझा हि जाती सर्व फुलझाडांत लहान समजली जाते. वुल्फिएलाच्या आठ जाती अमेरिकेत व आफ्रिकेत आढळतात. बंगालमध्ये शैवलांचा नाश करण्यासाठी ले. मायनर व. ले. पौसिकॉस्टॅटा यांना शेतात व मत्स्य-संवर्धनालयात सोडतात ह्या डकवीड वनस्पती असलेल्या ठिकाणी डासांची पिले वाढत नाहीत. मात्र कधीकधी भात खाचरात यांमुळे भाताची नासाडी होते. डकविडांचा नाश करण्यास अडुळशाच्या पानांचा व फांद्यांचा उपयोग हिरवळीच्या खतासारखा करतात किंवा पेंटॅक्लोरोफिनॉलाचा विद्राव शिंपडतात. डकवीडाचाही खतासारखा उपयोग करतात. डकवीड शीतकर (थंडावा देणारी). स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) व मूत्रल (लाघवी साफ करणारी) असून त्वचाविकार व नेत्ररोगांवरही ती उपयुक्त आहे. वर दिलेल्या  लेम्नाच्या दोन जाती (ले. मायनरले. पौसिकॉस्टॅटा) ज्या दूषित पाण्यात दुसऱ्या वनस्पती वाढत नाहीत अशा ठिकाणी टाकल्यास ते पाणी कार्बनी अशुद्ध पदार्थांपासून मुक्त करतात. तणनाशकांचा परिणाम अजमाविण्यास व पिकांचे अंशमात्र रासायनिक मूलद्रव्याची गरज शोधून काढण्यास डकविडाचा उपयोग होतो. संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

    2. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.