साग : (सागवान हिं. सागून गु. साग क. तेगिन, तेगू, त्याग सं.शाक, खरच्छद, अर्जुनोपम इं. टीक ट्री, इंडियन ओक, शिप ट्री लॅ.टेक्टोना ग्रँडिस कुल-व्हर्बिनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति,आवृतबीज उपविभाग], फार प्राचीन काळापासून (इ. स. पू. सु. २०००वर्षांपूर्वीपासून) उत्तम इमारती लाकडासाठी प्रसिद्घ असलेला पानझडीवृक्ष. ‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीयभाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारता त (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे )आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’यांचा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यकग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीकभाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनामत्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीजनावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ यानावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो. सागवानाच्याटेक्टोना या प्रजातीत एकूण तीन जाती असून त्या इंडोमलेशियन आहेत.टे. ग्रँडिस ही जाती भारतात सर्वत्र आढळते. टेक्टोनाप्रजातीतील इतरजातींचा प्रसार दक्षिण व आग्नेय आशियात आहे इतरत्र त्यांचे प्रवेशनझालेले आहे. भारत, म्यानमार आणि प. थायलंड हे टे. ग्रँडिस याजातीचे मूलस्थान असून जावा व इतर काही इंडोनेशियन बेटे येथेही तीआढळते. भारतीय द्वीपकल्प व म्यानमार ही सागाची दोन प्रमुख क्षेत्रेअसून त्यांचा आढळ पानझडी जंगलांत असतो तथापि त्यांची वाढसांघिक नसते. स्थानिक उपयोग व निर्यात या दृष्टींनी सागवानालाआर्थिक व भौगोलिक दृष्ट्या बरेच महत्त्व आहे.

वनस्पतिवर्णन : भौगोलिक परिस्थितीनुसार सागाचे आकार व आकारमान यांमध्ये विविधता आढळते. सर्वसाधारणपणे फांद्याविरहित उंच सरळ दंडगोलाकृती खोड (सोट) वत्यावर लंबवर्तुळाकृती किंवा अर्धवर्तुळाकृती माथा असे त्याचे ओळखण्यासारखे स्वरूप असते. या वृक्षाची जास्तीत जास्त उंची सु. ५० मी. व घेर ६-७ मी. पर्यंत असतो. जूनझालेल्या झाडांचे खोड काहीसे खोबणीदार होते व त्याच्या तळाशी आधारमुळे दिसतात. फांद्या लहान, काहीशा चौकोनी व त्यांच्या कडांशी उथळ पन्हाळी असतात. सालधागेदार, फिकट तपकिरी किंवा भुरकट असून तिची जाडी ४–१८ मिमी. असते तिचे उभे लांबट व पातळ पट्टीसारखे तुकडे सुटून गळून पडतात. पाने समोरासमोर, साधी,रुंदट लंबवर्तुळाकृती किंवा व्यस्त अंडाकृती (तळाकडे थोडी निमुळती व टोकाकडे गोलसर) आणि मोठी ३०– ६० × २०–३० सेंमी. असून शेंड्याकडे लहान होत जातात वफुलोऱ्यावर छदाप्रमाणे (उपांगाप्रमाणे) असतात ती चिवट, खरबरीत व खालच्या बाजूस पांढरट लवदार असतात त्यांवर सूक्ष्म, लालसर व प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) ठिपकेअसून नंतर ते काळे पडतात. सामान्यपणे जून ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सु. ४५–९० मिमी. लांब फुलोरे [ परिमंजऱ्या ⟶ पुष्पबंध] फांद्यांच्या टोकांस येतात व त्यांवरअसंख्य, लहान, सुगंधी, द्विलिंगी व पांढरी फुले असतात अनेक फुले वंध्य असतात. कधीकधी अधिक ओलसर हवामान असल्यास एप्रिलमध्ये देखील फुलांना बहर येतो.आठळीयुक्त फळे नोव्हेंबर ते जानेवारीत पिकून गळतात ती कठीण, गोलसर, वर टोकदार, काहीशी चतुःखंडी, १०–१५ मिमी. व्यासाची व चार कप्प्यांची असून त्यांभोवतीसंवर्त फुग्याप्रमाणे वाढलेला असतो फलावरण नरम असते व त्यावर तारकाकृती मऊ केसांचे आवरण असते. प्रत्येक कप्प्यात एक बी याप्रमाणे चार बिया क्वचित असतातपरंतु सामान्यतः १ ते ३, पांढऱ्या, स्वच्छ, अंडाकृती व ४–८ मिमी. लांब बिया आढळतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी अगर साग कुलात वर्णनकेल्याप्रमाणे असतात.

सागाची पाने कोरड्या हवामानात व नोव्हेंबर ते जानेवारी या काळात गळतात परंतु विशेष ओलसर हवेत मार्चपर्यंत हिरवी पाने टिकून नंतर गळण्यास सुरुवात होते. उन्हाळासंपेपर्यंत वृक्षावर पाने नसतात. त्यामुळे सावली व शोभा ह्या दृष्टीने त्याचे महत्त्व गौण आहे. कीटकांनी हिरवा भाग खाल्ल्यामुळे अनेक पानांच्या शिरांचे जाळे झालेले दिसते.नवीन पाने एप्रिल ते जून या काळात येतात. सुकी फळे जाड पिशवीत अगर पोत्यात घालून व जोराने घासून त्यांची फुगीर आवरणे अलग करतात व नंतर उफणून आतीलफळे स्वच्छ करतात. एका किग्रॅ. मध्ये सरासरीने २,००० ते ३,००० फळे भरतात.

इमारती लाकडाच्या व्यापाराच्या दृष्टीने ह्या वृक्षाचे शाखाहीन खोड महत्त्वाचे असल्याने त्याच्या आकारमानाला महत्त्व असते. उत्तर कारवारात वृक्षांचा घेर सु. ५– ७ मी. व २४–२७ मी. उंची असलेले सोट आढळतात. सुमारे ५-६मी. उंची व १·५–२ मी. घेर असलेले सोट आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथील वृक्षांपासूनमिळतात, तसेच अधिक कोरड्या जंगलांतील (उदा., खानदेश, पंचमहाल, सातपुडा, मध्य प्रदेशाचा उत्तरेचा भाग व उत्तर प्रदेशाचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी) सागाचेवृक्ष त्यामानाने खुजे, अधिक शाखायुक्त व खोबणीदार असल्याने त्यांच्या सोटांचे आकारमान कमी प्रतीचे असते.

प्रसारवक्षेत्रप्रमाण: केरळातील वायनाडमध्ये व अन्नमलईच्या टेकड्यांवर सागाची महत्त्वाची जंगले असून तेथील वृक्षांच्या सोटांचे आकारमान सर्वाधिक असते नीलांबूरदरीतील लागवड फारच यशस्वी झाली आहे. तमिळनाडूत निलगिरी, कोईमतूर, मदुराई, कन्याकुमारी व तिरुनेलवली येथील साग-क्षेत्रे त्यामानाने लहान आहेत. कर्नाटकराज्यातील साग क्षेत्राचा मोठा भाग सह्याद्रीत दक्षिणोत्तर पसरलेला पट्टा असून अतिशय महत्त्वाची साग-जंगले उत्तर कारवार आणि केरळ या राज्यांच्या वायव्य व दक्षिणेच्याप्रदेशांत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व पानझडी जंगलांत साग आढळतो तथापि चंद्रपूर जिल्ह्यात तो सर्वाधिक प्रमाणात आढळतो. गुजरातेत सुरत व डांग जिल्ह्यांतील जंगलांतसागाचे प्रमाण बरेच असून भडोच, वडोदरा (बडोदा), पंचमहाल व सांबरकांथा जिल्ह्यांतील साग कमी प्रतीचे आहेत. मध्य प्रदेशात पूर्व व दक्षिण भागातील साल वृक्षाची [⟶साल−२] जंगले वगळल्यास इतरत्र सर्व जंगलांत साग आढळतो. होशंगाबाद व बेंतूल येथील जंगले सागाच्या दृष्टीने चांगली आहेत. दक्षिण राजस्थानात सु. ८०% सागबन्सवारा विभागात असून चितोडगढ, उदयपूर, झालवार व बरण विभागांतील याचे प्रमाण थोडे आहे. ओरिसामध्ये राष्ट्रीय जंगलातील मर्यादित भागात साग असून मणिपूर,म्यानमार सीमेजवळच्या काबव दरीतील लहान प्रवाहांची पात्रे व काठांजवळच्या जलोढीय (गाळाच्या) जमिनीत साग वृक्ष आढळतात.

सागाची नैसर्गिक वाढ जलद असून वर्षाला ती सु. ५ सेंमी. घेराची असते तसेच उंचीत सरासरीने वार्षिक वाढ १·८मी. असते. पनामा व हाँडुरस येथे प्रायोगिक वाढ केलीअसता १६ वर्षांत १९·२० मी. उंची व ४५सेंमी. व्यास इतकी वाढ झाल्याचे आढळले. म्यानमार येथे १५ वर्षांत १८ मी. उंची व ४७ सेंमी. घेर अशी वाढ आढळते. सागाच्यानैसर्गिक मर्यादेबाहेर जंगलवाढीतील विस्तार बराच केला असून त्यात भारतातील आसाम, प. बंगाल, बिहार, अंदमान व निकोबार बेटे यांचा समावेश होतो तर उत्तर प्रदेशव इतर काही राज्यांत साल वृक्षाऐवजी सागाची लागवड केली जात आहे. कारण ती अधिक स्वस्त असून लवकर काढलेल्या झाडांचे स्वच्छ, सरळ व लहान वयाचे सोटविक्रीस अधिक लाभदायक ठरलेले आढळले आहेत.

पारिस्थितिकी: हवामानातील तसेच जमिनीतील स्थानिक आणि प्रादेशिक बदलांमुळे सागाच्या शारीरिक लक्षणांत व लाकडांच्या काही गुणधर्मांत फरक दिसून येतातत्यानुसार भिन्न वाण ओळखले जातात. हवामानाचा विचार केल्यास साग वृक्षाचा जास्तीत जास्त विस्तार ओलसर, ऊबदार व उष्णकटिबंधीय हवामानात होतो तथापिकोरड्या हवामानात आणि रुक्ष ठिकाणीही तो आढळतो. सामान्यपणे सु. १२५–२५० सेंमी. पर्जन्यमानात सागाची वाढ चांगली होते त्याशिवाय ३–५ महिन्यांचा उन्हाळा(कोरडा ऋतू) त्याला आवश्यक असतोच तथापि कमी पर्जन्याच्या (सु. ७५ सेंमी.) प्रदेशांतही तो आढळतो. कमीतकमी २° से. व जास्तीतजास्त ४८° से. या तापमानाचीआत्यंतिक (कोरडी) अवस्था वृक्षवाढीसाठी आवश्यक असते. परंतु जेथे उत्तम वाढ होते अशा स्थानाच्या तापमानाच्या मर्यादा १३°–१७° से. ते ३९°–४४°से. असतात.जमिनीच्या सर्वसाधारण संरचनेवर (खोली, निचरा, ओलावा व सुपीकता यांवर) सागाच्या आकारमानाची व लाकडाची गुणवत्ता अवलंबून असते डोंगरांच्या सुपीक वखालच्या उतरणीवर त्याची वाढ अधिक चांगली होते. उथळ जमिनी व कोरड्या डोंगरकडा यांवर तो ठेंगणा होतो. जांभा खडकावरच्या जमिनीत तो सहसा आढळत नाहीपरंतु कॅल्शियम ऑक्साइडयुक्त जमिनीवर त्याची वाढ चांगली होते मात्र पाणथळ जागी किंवा चिकण मातीच्या, काळ्या मातीच्या जमिनीत व खोलवर वाळू असलेल्याकोरड्या जमिनीत तो वाढत नाही. जमिनीतून नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम इ. विशेष प्रमाणात घेतले जाऊन त्यामानाने जमिनीला परत मिळणारा केरकचरा(झाडपाला) फार कमी असल्याने जमिनीतील कस कमी होत जातो.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व दक्षिण भारत येथील मिश्र-पानझडी जंगलांत साग आढळतो कधीकधी जेव्हा तो ओलसर सदापर्णी जंगलांत आढळतो, तेव्हा तेथे त्याचे पानझडीअवस्थेतून सदापर्णी अवस्थेत अनुक्रमण होत आहे असे समजतात. जलोढीय निक्षेपांवर त्याचे शुद्घ समूह आढळतात. सागाबरोबर जंगलामध्ये साधारणपणे पुढील वृक्षआढळतात:आवळी, कदंब, बांबू, काळा पळस, खैर, चारोळी, जांभा, तेंडू, धावडा, पळस, फान्सी, बाहवा, बिवल, कोशिंब, बेहडा, बोंडारा, मोई, मोरवा, मोह, रक्तचंदन,वासा, शिवण, शिसू, सालई, हळदू, हेदी इत्यादी. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात सागाबरोबर वर दिलेल्या वृक्षांशिवाय पुढील वृक्ष आढळतात:अंजन, कारी, किंजळ, कुंभ,धामणी, नाणा, पाभिरी, मिमोजाच्या (लाजाळूच्या प्रजातीतील) जाती, रँडियाच्या [⟶ गेळफळ] जाती, लाल सावर (शाल्मली), हिरडा इत्यादी. सागाच्या सर्व बाजूंनीभरपूर सूर्यप्रकाश असल्यास फांद्यांची भरपूर वाढ होते व सर्व बाजूंस फुलोरे येतात. अनेक वृक्षांच्या (त्याच किंवा अन्य जातींच्या) गर्दीत उंचीत वाढ झाली, तरी फांद्या फारकमी व त्यांची लांबीही कमी होते आणि फुले वरच्या फांद्यांवर अधिक येतात. सतत सावलीत असलेल्या फांद्यांवर फुलोरे येत नाहीत. सागाची मुळे जमिनीत खोलवर जातात.त्यामुळे वादळी वाऱ्यापासून तो सुरक्षित असतो. जनावरे सागाची पाने व फांद्या खात नाहीत तसेच छाटणे, कापणे, जळणे इत्यादींमुळे त्याला फारशी इजा पोहोचत नाही.छाटल्यानंतर उरलेल्या भागांपासून होणारी नवीन वाढ चांगली होते. कोवळी रोपे पाण्याअभावी मरून जातात तर कधीकधी ती चरणाऱ्या जनावरांमुळे नाश पावतात.

अभिवृद्घी: सागाची नैसर्गिक अभिवृद्घी बियांपासून होते. साधारणपणे वीस वर्षांच्या वृक्षांना फळे व जननक्षम बिया येतात परंतु छाटल्यानंतर नवीन आलेल्या फांद्यांना दहावर्षांत फळे येतात. त्यानंतर दरवर्षी फळे व बिया मिळत राहतात. बिया रुजण्यास भरपूर उष्णता (सूर्यप्रकाश) लागते व ती उष्णता वणव्यामुळेही मिळाली तरी चालते तशातापमानात रोपांची वाढही चांगली होते मात्र वाढीसाठी प्रकाश, जमिनीतील ओलावा व हवेचा पुरवठा लागतो. पावसाच्या आरंभी बी रुजून रोपे बनतात तर काही बियापाऊस सुरू असताना रुजून रोपे वाढतात. जमिनीच्या पृष्ठावरच्या बियांपासून अभिवृद्घी कमी होते जमिनीत असलेल्यांना अग्नी (वणवा), कीटक व पक्षी यांपासून संरक्षणमिळते आणि त्यांची वाढ होऊन नवीन संख्यावाढ अधिक होते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, अग्नी, सावली, चरणारे प्राणी इ. घटकांचे बरे-वाईट परिणाम सागाच्या अभिवृद्घीवरहोऊन त्याचा परिपाक त्यांची शारीरिक वाढ व संख्यावाढ यांवर बराच होतो. सुमारे १८४४ पासून सागाच्या लागवडीचे (कृत्रिम अभिवृद्घीचे) कार्य हाती घेतले गेले व अनेकठिकाणी त्यांची वाढ (नैसर्गिक वाढीच्या व त्याबाहेरच्या क्षेत्रात) कशी होते, याबद्दलचे संशोधन चालू आहे. त्यासंबंधी बरीच नवीन माहिती संकलित करून नवीन लागवडीकेल्या जात आहेत व विस्तार क्षेत्र वाढू लागले आहे. ⇨ पन्हेरीबागेतविशिष्ट पद्घतीने रोपे तयार करून किंवा प्रत्यक्ष बी पेरू न लागवडी करतात. एक वर्षाच्या जुन्या बियांचेताज्याबियांपेक्षा अधिक चांगले ⇨ अंकुरण होताना दिसून येते. अधिक गुणवत्ता असणाऱ्या वृक्षांची निवड करून त्यांचे बी रुजवून त्या वृक्षांची लागवड करणे व काही ठिकाणीनिवडक बी मिळविण्याकरिता विशेष तंत्र वापरणे, असे कार्य चालू आहे. कठीण सालीच्या सागाचे बी लवकर रुजविण्याकरिता उपाय उपलब्ध झाले आहेत. थंड पाण्यात बीभिजवून नंतर उन्हात सुकविणे असे वारंवार करून ते नरम होते, असे आढळले आहे. कलमे बांधून सुधारित प्रकारचे खुंट बनवून त्यांची लागवड करणे अधिक फायद्याचेअसते. लागवडीनंतर तण काढण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवणे आवश्यक असते. सागाच्या रोपांच्या रांगेत अनेकदा मका, भात, मिरची, हरभरा इत्यादींचीही एक-दोन वर्षेलागवड करणे लाभदायक असल्याचे आढळले आहे त्यामुळे तण कमी होते व आर्थिक लाभ होतो.

लाकूड: टिकाऊपणा व आकार-स्थिरता आणि इतर रासायनिक व भौतिक गुणधर्मांमुळे सागवानाला जगभर महत्त्व प्राप्त झाले असून जगातील उत्कृष्ट लाकडांपैकी ते एकअसल्याचे मानतात. त्याचे रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) पांढरट-पिवळे ते तपकिरी असून मध्यकाष्ठ सोनेरी-पिवळे, गर्द रंगाच्या रेषांनी भरलेले व हळूहळू पिंगट होत जाणारे असते.ते मध्यम कठीण, मध्यम जड व बळकट परंतु काहीसे राठ, अनियमित पोताचे व उग्र वासाचे असते. वाळवी, इतर कीटक व कवकांपासून सहसा त्याला इजा पोहोचत नाही.त्याला रसकाष्ठ अपवाद असते. समुद्रातील भोके पाडणाऱ्या प्राण्यांपासून मात्र ते अर्धसंरक्षित असते. सागवान पाण्यापावसात चिंबत नाही. कार्ल्याच्या लेण्यातील सु. २२०वर्षांपूर्वीच्या एका लाकडी तुकड्याचा भाग बाहेरून सुरक्षित, परंतु आतील भाग काहीसा खराब झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे १,०००–२,००० वर्षांपूर्वीचे व चांगल्यास्थितीत असलेले जुने लाकडाचे तुकडे उपलब्ध आहेत. इतर लाकडाच्या मजबुतीची तुलना दक्षिण भारतीय (केरळातील नीलांबूर व तमिळनाडूतील कोईमतूर येथील)सागवानाच्या मजबुतीशी करतात. कारण ते प्रमाण स्वीकारण्याइतके उच्च दर्जाचे ठरले आहे. सागवान चांगले अम्लरोधक असून ते लोखंड, तांबे व ॲल्युमिनियम यांची झीजकरीत नाही. कापण्यास, रंधण्यास व झिलई करण्यास ते सोयीचे असून काहीसे ठिसूळ असते मात्र त्याची वाकण्याची क्षमता फार कमी असते. लाकडाचे वजन मध्यम असते.दर ०·०२८ घ. मी. सागवानाचे वजन सु. २० किग्रॅ. असते. रोगणयुक्त विशिष्ट पदार्थांचा रंग त्यांवर चांगला बसतो. वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनाने लाकडापासूनसु. ०·१५% एक तेलकट पदार्थ व त्याबरोबरच टेक्टोक्विनोन हा शेंदरी घनपदार्थ मिळतो. सागाच्या तेलाला ‘टीक ऑइल’ म्हणतात तेल पिवळट पिंगट असून ते ९५ टक्केअल्कोहॉलामध्ये विरघळते. हे तेल म्यानमारमध्ये औषधांत आणि रंगांत जवस तेलाऐवजी वापरतात.

उपयोग: नावा, जहाजे व पूल यांची बांधणी, बंदरातील स्तंभिका, रेल्वेचे डबे आणि इतर वाहनाचे भाग घरवापरातील सजावटी सामान (फर्निचर), कपाटे, तक्तपोशी,सुतारकाम व लहानमोठे खांब, शेतीची अवजारे, खोकी, गिरणीतील काही साधने, पादपगृहे इत्यादींकरिता मुख्यतः सागवान वापरात आहे. निरुपयोगी भाग जळणाकरिताउपयुक्त असतो. दक्षिण भारतीय आणि म्यानमारमधील सागवानाचे लाकूड बांधकाम व फर्निचर यांकरिता अधिक करून वापरतात तथापि मध्य भारत, दख्खन व डांगजंगलांतील लाकूडही फर्निचरकरिता पोत आणि रंगाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर असल्यामुळे वापरतात. घरबांधणीत सागवान अनेक प्रकाराने (फळ्या ,तुळया, खांब,चौकटी इ.) उपयुक्त ठरले आहे. रासायनिक उद्योग, प्रयोगशाळांतील टेबलांचे पृष्ठभाग, क्षरण करणाऱ्या द्रव पदार्थांची किंवा वनस्पतिज तेल, फळांची सरबते इत्यादींची पिपेव अर्धपिपे यांकरिता सागवान फार उपयुक्त असते. यांशिवाय काही वाद्ये (व्हायोलीन, सतार व हार्मोनियम-बाजाची पेटी ) बनविण्यासही सागवान वापरतात. गणितातील वचित्रकलेतील काही साधनसामग्री, कातीवकाम, प्रतिकृती इत्यादींकरिताही सागवान उपयुक्त असते. विविध प्रकारचे तक्ते (प्लायवुड, हार्डबोर्ड इ.), कागदाचा लगदा,कोळसा इ.वस्तू निर्मिण्यासही सागवान उपयुक्त ठरले आहे.

सागवानाची भुकटी कातडीच्या दाहावर बाहेरून लावण्यास वापरतात पोटात घेतल्यास पोटातील आग व अग्निमांद्य (भूक न लागणे) कमी होते.पापण्या सुजल्यास याचीराख लावतात बस्तरमधील जमाती इसब व नायटे यांवर वर उल्लेख केलेला (ऊर्ध्वपातनातील) तेलकट पदार्थ लावतात. कोकणात याच्या लाकडापासून काढलेले डांबरगुरांच्या जखमांवर लावण्यास वापरतात त्यामुळे जखमेत अळ्या होत नाहीत. लाकूड जहाल, शीतक व सारक असून ते मूळव्याध, जळवात, पित्तप्रकोप व आमांश इत्यादींवरगुणकारी असते. ते कृमिनाशकही असते. सागवानाचा बहुतांश उपयोग स्थानिक असून, सागवानाची सर्वांत अधिक निर्यात म्यानमारातून होते. इतर देशांशी तुलना केल्यासथायलंड, जावा, भारत व श्रीलंका येथून कमी निर्यात होते. मध्यपूर्वेतील देश, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया व स्कँडिनेव्हियन देश हे भारतीय सागवानाचे ग्राहकआहेत. सागाच्या पानांत सु. ६% टॅनीन असते शिवाय त्यात पिवळे किंवा लाल रंगद्रव्य असून त्याचा उपयोग रेशीम पिवळे किंवा तत्सम छटांत रंगविण्यासाठी करतात.राळेबरोबर पानांचा चुरा घासून लाल रंग बनविण्याची पद्घत भारतात पूर्वीपासून आहे. तिचा उपयोग अस्सल सागाची कसोटी पाहण्यासाठी करतात. पूर्ण वाढ झालेल्या वसुक्या पानांतून ॲसिटोनाच्या साहाय्याने क्विनॉइड रंगद्रव्यांचे मिश्रण निघते, त्यातून गर्द तांबडे रंगद्रव्य (अँथ्रॅक्विनोन) अलग काढले आहे. व्यापारी दृष्टीने, मोठ्या प्रमाणावरपानांच्या चुऱ्यापासून पाण्याने किंवा सोडियम कार्बोनेट विद्रावाच्या साहाय्याने रंग बनविता येतो आणि त्याचा उपयोग लोकर व रेशीम रंगविण्यास होतो. मात्र सुती कापडाच्याबाबतीत रंगबंधक वापरावे लागते. रंगविताना विविध रंगांच्या छटा भिन्न रासायनिक द्रव्ये वापरून आणता येतात. पानांचा रस औषधोपयोगी (उदा., क्षयरोग) असतो.खेड्यांत पाने छपरांकरिता व स्वस्त छत्र्यांकरिता वापरतात. जावामध्ये फणसाच्या लाकडास झिलई करण्यास सागाच्या खरबरीत पानांचा उपयोग करतात. तसेचसोयाबिनाचे किण्वन घडवून आणण्याकरिता ते सागाच्या पानांत गुंडाळून ठेवतात. सागाच्या बियांचे तेल केशवर्धनास चांगले असून खरूज व खवडे यांवर ते लावतात. फुलेरुक्ष व कडू असून ती पित्तविकार, खोकला व मूत्रविकार यांवर देतात. बियांचा रस डोळ्यांच्या विकारांवर धुण्यास वापरतात. फुले व बिया मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या)आहेत. खोडावरील सालीत सु. ७·१४% टॅनीन असते ते स्तंभक (आकुंचन करणारे) व मधुर असून श्वासनलिकादाहात (घसा खवखवणे व ठसका लागणे इत्यादींत)उपयुक्त असते. सेलेबीझ बेटामध्ये मुळांची साल चटयांना पिवळट पिंगट रंग देण्यास वापरतात.

रोगवकीडी: मूळकूज झाल्याने साग वृक्ष वठतात. काही कवकांमुळे (पेनिओफोरा आणि पॉलिपोरस यांच्या जातींमुळे) तसेच पॉ.झोनॅलिस आणि फोम्स लिव्हिडसमुळेगुजरातमध्ये सागाच्या खोडातील मध्यकाष्ठात पोकळ्या झालेल्या आढळतात. नेक्ट्रियाच्या एका जातीपासून खोडांवर जखमा (फोड) होऊन त्यातून गोंद व टॅनीन पाझरूलागतात खोडावर आडव्या उभ्या चिरा पडल्याने झाडाला ‘सलरोग’ होतो. साल झडणे, तांबेरा, चूर्णभुरी, पर्णठिपके इत्यादींसारखे विविध प्रकारची हानी करणारे ⇨कवकरोगही आढळले आहेत. यांशिवाय फुलझाडांपैकी डेंड्रॉफ्‌थी नावाच्या प्रजातीतील काही जातींमुळे ⇨ बांडगुळे झाडांवर उगवतात व अन्नरस शोषून नुकसान करतात.त्यावरची बांडगुळे तोडणे, काही औषधे फवारणे व काही इंजेक्शने (अंतःक्षेपणे) देणे हे उपायही उपलब्ध झाले आहेत. सागाला सु. ५० कीडींचाही उपद्रव झालेला आढळतोत्यामुळे पाने, फुलोरे, बिया व मुळे यांचा नाश होतो. त्यांपैकी बहुतेकांवर निवारक व नियंत्रक उपाय मिळाले आहेत व त्यामुळे नुकसान कमी होत आहे. [⟶ कवकनाशकेकीटकनाशके]. (चित्रपत्र).

पहा : बांधकाम, लाकडाचे बांधकामाची सामग्री व्हर्बिनेसी साल–२.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, New Delhi, 1975.

४.काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

५. जोशी, वेणीमाधवशास्त्री, आयुर्वेदीय शब्दकोश, द्वितीय खंड, मुंबई, १९६८.

जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.

साग (टेक्टोना ग्रँडिस)