भूछत्रे : (इं. मशरूम,टोडस्टूल हिं. कुकुरमत्ता, धिंग्री, गुच्छी, खुंभी).ही पावसाळ्यात सर्वत्र आढळून येणारी हरितद्रव्यहीन व शवोपजीवी (प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी व मृत वनस्पती यांपासून प्रत्यक्षपणे पोषण द्रव्ये घेणाऱ्या) वनस्पती असून कुत्र्याची छत्री, अळंभे, अळिंब इ. नावांनीही ती मराठी भाषेत ओळखली जाते.
बहुसंख्य भूछत्रे बॅसिडिओमयसिटीज या वर्गात आढळून येतात. ⇨ अँस्कोमायसिटीज (धानीकवक) या वर्गातील काही मांसल कवकांचाही भूछत्रात समावेश केला जातो. (उदा., ट्रफल, मोरेल).
प्रत्येक देशात अनेक प्रकारची भूछत्रे जंगली अवस्थेत वाढताना आढळून येतात. भारतातही अनेक खाद्य व अखाद्य भूछत्रे पावसाळ्यात निसर्गतः वाढताना दिसतात. काही भूछत्रांचे कवकजाल (कवकांच्या तंतुमय कोशिकांचे-पेशींचे-जाळे) वृक्षांच्या उपमुळांबरोबर सहजीवी अवस्थेत (परस्परांवर अवलंबित अशा एकत्रित अवस्थेत) वाढते.
इतिहासकालीन वापर : भूछत्रे व इतर लहान मोठी खाद्य कवके यांचा खाण्यासाठी वापर फार प्राचीन काळापासून होत असल्याचे उल्लेख व पुरावे मिळतात. ईजिप्तमधील प्राचीन फेअरो राजे आपल्या भोजनात भूछत्रांचा समावेश करीत. ग्रीक व रोमन लोक ते देवाचे अन्न मानीत. मेक्सिकोतील अँझटेक जमातीतील लोक भूछत्रांचा उपयोग भ्रम उत्पन्न करण्यासाठी व शकुन पाहण्यासाठी करीत. वेदात उल्लेख केलेला सोमरस विषारी भूछत्रांपासून तयार करीत, असे काही शास्त्रांज्ञांचे म्हणणे आहे. वेदकालात आणि महाभारत कालात भूछत्रे खाणे निषिद्ध मानले जाई.
सर्वसाधारण वर्णन : भूछत्रांच्या तंतुयुक्त भागाला कवकजाल आणि जमिनीवरील प्रजोत्पादक घटक (बीजुके) निर्मिणाऱ्या भागास बीजुकदंड म्हणतात. बीजुकदंड चेंडू, छत्री इत्यादींप्रमाणे दिसतात आणि त्यांचे सर्वसाधारणपणे दांडा व छत्र (टोपी) असे दोन भाग स्पष्ट असतात. जमिनीतील भाग अनेक वर्षे जगणारा असून दरवर्षी त्यापासून अनुकूल परिस्थितीत (ऋतूत) लहान छत्रीसारखा अथवा काहीसा तत्सम आकाराचा अथवा चेंडूसारखा भाग जमिनीतून वर येतो. अन्नाचा पुरवठा संपेपर्यत कवकजाल एकाच जागी अनेक वर्षे जिवंत राहते व त्यापासून अनुकूल परिस्थितीत वर्षातून फक्त एकदाच बीजुकदंड (सामान्य भाषेत भूछत्रे) आढळून येतात. परिस्थिती अनुकूल नसल्यास काही महिन्यांतच कवकजाल मरते. प्रयोगशाळेत पुष्कळ भूछत्रांच्या कवकजलांवर २० ते ३० दिवसांतच बीजूकदंड तयार करता येतात.
(१) अ. बायस्पोरस : (पांढऱ्या गुंडीचे अथवा लागवडीतील भूछत्र). काही शास्त्रज्ञ ही स्वतंत्र जाती न मानता अ. कँपेस्ट्रिस जातीचाच एक प्रकार (बायस्पोरस) मानतात, , तर काही शास्त्रज्ञ ती स्वतंत्र जाती मानतात. अ. कँपेस्ट्रिस जातीच्या गदाकोशिकांवर २ ते ४ गदाबीजुके असतात, तर अ. कँपेस्ट्रिस प्रकार बायस्पोरस (अथवा अ. बायस्पोरस) याच्या गदाकोशिकांवर फक्त दोनच गदाबीजुके असतात [आ. (आ)]. या भूछत्राची लागवड मध्य यूरोप, अमेरिका, तैवान, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या प्रदेशांत फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. फक्त अमेरिकेतच दरवर्षी सु. ४५,००० टन भूछत्रांचे उत्पादन होते. निसर्गात भूछत्रांची वाटवर्षातील ठराविक महिन्यात (पावसाळी हवामानात) होते. कृत्रिम त-हेने वातावरणाचे नियंत्रण करून या जातीच्या भूछत्रांची लागवड वर्षभर करता येते. ही भूछत्रे त्यांच्या स्वादासाठी आणि चवीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
भारतात या जातीच्या भूछत्रांच्या लागवडीला १९६१ मध्ये सोलन (हिमाचल प्रदेश) येथे सुरूवात झाली. सध्या या जातीची व्यापारी प्रमाणावर लागवड मुख्यत्वेकरून उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्यानजीकच्या प्रदेशात होते. जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश व आसाम या राज्यांतील समशीतोष्ण जलवायुमानाचे (दीर्घकालीन सरासरी हवामानाचे) प्रदेश या जातीच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. भारतातील भूछत्रांच्या वार्षिक उत्पादनापैकी सु. ८०% उत्पादन या जातीचे असते. (लागवडीचे तपशील पुढे दिले आहेत).
(२) लेंटिनस इडोडस (कॉर्टिनेलस बर्कलेयानस) जातीच्या ‘शीटेक’ [आ. (ई)] नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूछत्रांची लागवड जपानमध्ये लाकडाच्या ओंडक्यावर मोठ्या प्रमाणात करतात. ओंडक्यांना जागोजागी भोके पाडून त्यात भूछत्राचे बेणे (कवकजाल) घालून त्यावर सावली करतात.
(३) व्होल्व्हारिएला व्होल्व्हेसी आणि व्हो. डायप्लासिया जातींच्या भूछत्रांची लागवड आग्नेय आशियातील देशांत (चीन, ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया, फिलिपीन्स) भारताच्या पेंढ्यावर करतात. भात-पेंढ्यांचे अथवा उष्णकटिबंधातील भूछत्र या नावाने ही भूछत्रे ओळखली जातात [आ. (इ२)]. त्यांच्या दांड्यावर वलय नसते व तळाशी फुगीर भाग (परिस्यून) असतो. दांडा वरच्या बाजूला निमुळता असून त्यावर प्रथम घंटेसारखे व नंतर पसरट छत्र असते. पटले प्रथम पांढरी व मागाहून लालसर होतात. पश्चिम बंगाल व तमिळनाडूत पावसाळ्यात कुजणाऱ्या गवतावर ही भूछत्रे आढळून येतात. या भूछत्रांच्या लागवडीचे तंत्र भारतात विकसित करण्यात आले आहे (तपशील पुढे दिले आहेत).
इतर महत्त्वाची खाद्य भूछत्रे : (१) शँतरेल: (कँथरेलस सिबँरियस). हे लहान सु. ५.८ सेंमी. उंचीचे खाद्य भूछत्र उत्तर व पूर्व भारतात पर्वताच्या पायथ्याशी आढळते. छत्राचा भाग प्रथम घुमटासारखा, नंतर सपाट व शेवटी नाळक्यासारखा दिसतो. त्याची कडा नागमोडी असून दांड्यापासून छत्राकडे पटले पसरलेली असतात. कधीकधी ती दुभंगून वाढतात व परस्परांशी आडव्या पटलांनी जोडलेली असतात. फ्रान्समध्ये ते फार आवडीने खातात. [आ. (उ)].
(२) भूकंदुक : (इं. पफ बॉल: पंजाबी-बोएन फल). लायकोपर्डॉन वंशातील या भूछत्रांचा जमिनीवरील भाग म्हणजे दांडा नसलेली तपकिरी रंगाची गोल अथवा पेरूच्या आकाराची पिशवी असून पक्कावस्थेत थोडाही धक्का लागल्यास वरच्या बाजूकडील छिद्रांतून बीजुकांचा धुळीसारखा लोट बाहेर पडतो. भूछत्राचा सर्वसाधारण व्यास ८ सेंमी. पेक्षा जास्त नसतो. याचा ‘प्रचंड भूकंदुक’ (इं. जायंट पफ बॉल, लॅ. लायकोपर्डॉन जायगँशियम) या नावाने ओळखला जाणारा प्रकार आहे. सर्वात मोठे प्रचंड भूकंदूक (१५७ सेंमी. व्यासाचे व ४२.५सेंमी. उंचीचे) डर्बिशर येथे १९७१ मध्ये आढळून आले. ही भूछत्रे कच्च्या स्थितीत (आतील मगज पांढरा असताना) खातात. उत्तर भारतात ती गवताळ जागेत अथवा साल वृक्षाखाली आढळतात [आ. (ऊ)].
(३) केसाळ भूछत्र : (इं. शॅगी मेन, शॅगी इंक कप लॅ.कॉप्रिनस कोमॅटस). पूर्ण वाढलेले भूछत्र गवताने शाकारलेल्या झोपडीसारखे दिसते. शेवटच्या अवस्थेतील करड्या रंगाच्या छत्रातील पटले विरघळतात व त्यातून काळी बीजुके असलेले शाईसारखे थेंब खाली पडतात. हे भूछत्र फार स्वादिष्ट असते [आ. (ए)].
(४) धिंग्री : (इं. ऑयस्टर मशरूम)प्लुरोटस वंशातील ही भूछत्रे पंजाब, जम्मू व काश्मीरमध्ये जंगली अवस्थेत आढळतात व ती वाळवून बाजारात विकतात. सोलन येथे आणि म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टियूटमध्ये (प्लुरोटस सजोर-कॅजू या जातीच्या धिंग्रीची लागवड करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे (त्याचे तपशील पुढे दिले आहेत) [आ. (ऐ)].
(५) मधाचे भूछत्र : (इं. हनी मशरूम, हनी अगॅरिक लॅ. आमिंलेरिआ मेलिआ). सफरचंद व इतर काही झाडांच्या मुळावर हे भूछत्र संकवकाच्या स्वरूपात आढळून येते व त्यामुळे मूळकूज उद्भवते. भूछत्रे पुंजक्यात जमिनीवर आढळून येतात. हे भूछत्र स्वादासाठी फार प्रसिद्ध आहे [आ. (ओ)].
(६) कंदकवक : (इं. ट्रफल्स). अँस्कोमायसिटीज वर्गातील ट्यूबर वंशातील कवके जमिनीखाली सु. ३० सेंमी. खोलीवर कंदासारखी वाढतात व ती डुकरे व कुत्रे यांच्या साहाय्याने प्रथम शोधून नंतर ती खणून काढावी लागतात. पश्चिम यूरोपातून अमेरिकेत त्यांची आयात होते. काश्मीर व कांग्रामध्ये ही भूछत्रे आढळून येतात [आ. (औ)].[⟶ ट्रफल].
(७) गुच्छी : (इं. मोरेल). मधाच्या पोळ्याप्रमाणे दिसणारा हा अँस्कोमायसिटीज वर्गातील भूछत्रांचा प्रकार स्वादासाठी प्रसिद्ध आहे. मोर्शेला एस्क्युलेंटा या जातीची भूछत्रे विशेष प्रसिद्द असून ती काश्मीर, पंजाब व नैनिताल भागात २,५०० मी. पासून हिमरेषेपर्यतच्या (ज्या उंचीपेक्षा अधिक उंचीवरील प्रदेशात सतत बर्फ व हिम असते त्या उंचीपर्यतच्या) प्रदेशात नैसर्गिक रीत्या आढळून येतात. वाळलेल्या अवस्थेत ती वर्षभर बाजारात मिळतात व रस्सा करण्यासाठी वापरतात. फ्रान्स व स्वित्झर्लड या देशांना त्यांची निर्यात केली जाते [आ. (क)].
दीप्तिमान भूछत्रे : आर्मिलेरिआ, मायसेना, पॅनस आणि क्लिटोसिबे या वंशांतील काही जातींची भूछत्रे दीप्तिमान असतात [त्यांच्यात प्रकाश बाहेर टाकण्याची क्षमता असते ⟶ जीवदीप्ति]. संवर्धन प्रयोगांत काही सूक्ष्मजंतूंच्या दीप्तिमान जातींशी तुलना करता वरील भूछत्रे फारच अंधुक प्रकाश देतात असे आढळून आले आहे. कृत्रिम प्रकाशातील दीप्तिमान भूछत्रे आणि अंधारातील तीच भूछत्रे भिन्नरंगी दिसतात.
भारतातील लागवड : भूछत्रांची लागवड का करावी याला अनेक कारणे आहेत पिकांची पुष्कळशी लागवड निसर्गावर अवलंबून असते. भूछत्रांची लागवड सावलीत करण्यात येते व त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण थोड्याशा प्रयत्नाने व खर्चाने नियंत्रित करता येते. हवामान विशेष अनुकूल असलेल्या ठिकाणी वर्षातून ५ पर्यत पिके घेता येतात. मांसोत्पादनासाठी एकक क्षेत्रातील मिळणाऱ्या वैरणीतील प्रथिनांच्या एक हजारपट प्रथिने तेवढ्याच क्षेत्रात भूछत्रे वाढविल्याने मिळतात. भूछत्रांना परदेशात मागणी असल्यामुळे परकी चलन मिळविण्याचे ते एक साधन आहे.
(अ) पांढऱ्या गुंडीचे भूछत्र : सोलन येथील भूछत्र संशोधन प्रयोगशाळेत या भूछत्राच्या लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. येथे भूछत्राच्या लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. येथे भूछत्राच्या लागवडीसंबंधी शिक्षण देण्यात येते व आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात येते. तसेच या भूछत्राच्या लागवडीसाठी लागणारे शुद्ध बेणे वडीच्या स्वरूपात [ आ. (आ३)] अथवा निर्जंतुक केलेल्या संवर्धन माध्यमावर वाढविलेले कवकजाल या स्वरूपात पुरविण्यात येते.
या भूछत्रांच्या लागवडीमध्ये प्रथम कवकजालाची वाढ होते व त्यानंतर त्यातून भूछत्रे (बीजुकदंड) निघून येतात. कवकजालाची ज्या आधारस्तरावर वाढ करण्यात येते त्याला ‘खत’ (कंपोस्ट) म्हणतात. पांढऱ्या गुंडीच्या भूछत्रासाठी घोड्याच्या लिदीपासून तयार केलेले खत सर्वात चांगले परंतु ते सर्वत्र उपलब्ध नसते. यासाठी सुचविण्यात आलेल्या निरनिराळ्या तीन सूत्रांपैकी पुढील सूत्राप्रमाणे घटक मिसळून तयार केलेले खत वापरतात : गव्हाचे तुकडे केलेले काड ३०० किग्रॅ. ( अथवा भाताचा पेंढा ४०० किग्रॅ.) कॅल्शियम अमोनियम नायट्रेट अथवा अमोनिया सल्फेट ९ किग्रॅ. यूरिया ३.६ किग्रॅ. पोटॅशियम सल्फेट अथवा म्युरिएट ३ किग्रॅ.: सुपर फॉस्फेट ३ किग्रॅ. गव्हाचा कोंडा ३० किग्रॅ. जिप्सम ३० किग्रॅ. काकवी ५ किग्रॅ. खत तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. एका (दीर्घ) पद्धतीत वरील घटक विशिष्ट पद्धतीने मिसळून पाणी मारून त्याचा ढीग घालतात आणि फळ्यांच्या साहाय्याने तो दाबून ठेवतात. ढिगातील तापमान ६०° से. पर्यंत जाते. प्रथम सहाव्या दिवशी व नंतर दर तीन दिवसांनी ढीग मोकळा करून परतून त्यावर बेताचे पाणी मारून पुन्हा ढीग घालतात. तिसऱ्या परतणीच्या वेळी जिप्सम मिसळतात. ढिगातून अमोनियाचा वास न येईपर्यत ही वारंवार परतण्याची क्रिया करतात. ह्या क्रियेत किण्वनामुळे [सूक्ष्मजीवांच्या वा एंझाइमांच्या क्रियेने कार्बनी पदार्थाचे अपघटन होण्यामुळे ⟶ किण्वन] खत कुजते. कुजलेल्या खताचे pH मूल्य [ ⟶ पीएच मूल्य] सु ७.०० असते व हातात धरून दाबल्यास पाणी गळणार नाही इतकाच ओलावा त्यात असतो. खत कुजविण्याच्या दुसऱ्या (लघू) पद्धतीत तिसऱ्या परतणीनंतर (१० दिवसांनंतर) मिश्रण विशिष्ट तऱ्हेने बनविलेल्या कोठ्यांत ठेवतात व ८-१० दिवसांनी (अमोनियाचा वास येईनासा झाल्यावर) बाहेर काढतात. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर भूछत्रांची लागवड करण्यासाठी सोयीस्कर आहे.
(आ) भात-पेंढ्यांचे भूछत्र : भाताच्या पेंढ्यावरच या भूछत्रांची लागवड करतात. भूछत्रे उगवून येण्यासाठी पेंढ्यावर मातीचा थर घालण्याची आवश्यकता नसते. यासाठी लागणारे बेणे निर्जंतुक केलेल्या भाताच्या पेंढ्यावर अथवा धान्यावर प्रयोगशाळेत जंतुविरहित वातावरणात वाढवितात. हाताने झोडपून दाणे वेगळे केल्यावर राहिलेल्या भाताच्या पेंढ्याच्या ०.९ ते १.२ मी. लांबीच्या व सु. २० ते ३२ सेंमी. जाडीच्या पेंढ्या बांधून त्या १८ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवतात आणि मग बाहेर काढून पाणी निथळू देतात. पेंढ्या त्यांची जाड टोके एका दिशेला करून एकमेकींना खेटून बांबूच्या चौरस जाळीवर ठेवतात. पेंढ्यांच्या दुसरा थर पहिल्या थरावर जाड टोके विरूद्ध दिशेला करून ठेवतात [आ. (इ१)]. कडेला ८-१० सेंमी. जागा सोडून १२-१५ सेंमी. अंतरावर सर्व बाजूंनी तुरीच्या अथवा हरभऱ्या च्या डाळीचे पीठ छिडकतात आणि डाळीच्या पिठावर बेण्याचे तुकडे ठेवतात. तिसरा व चवथा थर अशा रीतीने रचतात की, त्यांची जाड टोके पहिल्या व दुसऱ्या थरातील जाड टोकांशी काटकोनात येतील. पाचवा व सहावा हे थर पहिल्या व दुसऱ्या थरांप्रमाणे असतात. चवथ्या व सहाव्या थरावर डाळीचे पीठ व बेणे घालून सहाव्या थरावर ७०० सेंमी. जाडीचा पेंढा घालतात. तयार चौरस ढिगाची लांबी व रुंदी पेंढ्याच्या लांबी एवढी व उंची सु. ४०-५० सेंमी. असते. हवेची पोकळी राहू नये म्हणून ढीग दाबून ठेवतात. आवश्यकतेप्रमाणे पाणी मारतात. पाण्याचे प्रमाण फार झाल्यास पेंढा कुजतो. योग्य प्रमाणात पाणी मारून पहिल्या ४८ तासांत ढिगातील तापमान ३०° ते ३५° से. या मर्यादेत ठेवल्यास इतर कवकांची वाढ होत नाही. इतर कवकांची वाढ होऊ न देण्यासाठी भाताचा पेंढा निर्जंतुक करणे फार खर्चाचे असल्याचे आढळून आले आहे. बेणे घातल्यावर १० – १२ दिवसांनी करड्या पांढऱ्या रंगाची सोंगटीच्या आकाराची भूछत्रे उगवून येण्यास सुरुवात होते. या वेळी खेळती हवा आणि ८०% पेक्षा जास्त हवेतील आर्द्रता यांची आवश्यकता असते. जमिनीवर दिवसातून २-३ वेळा पाणी मारल्यास पुरेशी आर्द्रता राहते. ताज्या स्थितीत खाण्यासाठी भूछत्रे त्यांचे अधोवेष्टन फाटण्याच्या सुमारास हलकेच पिळवटून काढतात (कापून काढीत नाहीत). हवेशीर जागेत न ठेवल्यास त्यांना पाणी सुटते. १०° ते १५° से. तापमानात ही भूछत्रे सु. ४८ तास टिकतात. १०% मिठाच्या पाण्यात बुडवून नंतर उन्हात पांढऱ्या कपड्यावर अथवा त्यांची माळ करून सावलीत वाळविल्यास ती १०° ते १५° से. तापमानात सु. एक आठवडा टिकतात. पुन्हा वापरण्यापूर्वी मिठाचा अंश धुवून काढणे आवश्यक असते. ही भूछत्रे बंद डब्यातून विकण्यालायक नाहीत कारण त्यांतील स्वाद व चव आणणारे पदार्थ पाण्यात विरघळतात.
(इ) धिंग्री : या भूछत्राच्या लागवडीसंबंधीचे प्रयोग म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्ट्यिट्यूटमध्ये करण्यात आले. वर्षातील ६-८ महिने तेथील नैसर्गिक हवामानात (तापमान २१° ते २८° से. आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता ५५–७५ %) या भूछत्राची लागवड सुलभ रीतीने करता येते आणि उन्हाळ्यात दिवसा हवेतील आर्द्रता ५५-७५ % पर्यंत ठेवण्यासाठी जादा परिश्रम केल्यास त्या ऋतूतही ती करता येते, असे आढळून आले आहे. लागवडीची कृती थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे : लागवड खोल्यांतून अंधुक प्रकाशात करतात. एक वर्षापेक्षा जास्त जुन्या नसलेल्या भाताच्या पेंढ्याचे १.२५ सेंमी. लांबीचे तुकडे करून ते निर्जंतुक करण्यासाठी त्यांना मिथिल ब्रोमाइडाच्या साहाय्याने धुरी देऊन नंतर १५-१८ तास पाण्यात भिजवून बाहेर काढतात किंवा पेंढ्यांचे तुकडे ६०° से. तापमान असलेल्या गरम पाण्यात १०-१५ मिनिटे बुडवून नंतर गार पाण्यात २-३ तास ठेवून बाहेर काढतात व जास्त असलेले पाणी निथळू देतात. ६ किग्रॅ. पेंढ्यात ६० ग्रॅ. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ व ६०० ग्रॅ. भाताच्या पेंढ्यांवर वाढविलेले भूछत्राचे बेणे चांगल्या त-हेने मिसळून ते मिश्रण ३५ x ५५ सेंमी. मापाच्या पॉलिथिनाच्या पिशव्यांत भरतात व पिशव्यांची तोंडे बंद करतात. दुसऱ्या पद्धतीत ६ सेंमी. व्यासाची व १.६ मी. लांबीची अँस्बेस्टसाची दंडगोलाकार नळी लोखंडाच्या जाळीदार वाटोळ्या सांगाड्यावर उभी बसवून त्यावर या नळीच्या भोवती १५०-२०० गेज (३ ते ४ मिमी.) जाडीची १.७ मी. लांब व ४० सेंमी. व्यासाची पॉलिथिनची नळी बसवितात. पॉलिथिनाच्या नळीत अँस्बेस्टसाच्या नळीच्या बाहेरच्या बाजूला भात-पेंढा व बेण्याचे मिश्रण भरतात आणि नळीचे तोंड बंद करतात. पहिल्या पद्धतीतील पिशव्या अथवा दुसऱ्या पद्धतीतील नळ्या खोलीत अंधुक प्रकाशात व नैसर्गिक ( २१° ते २८° से. ) तापमानात १५ ते २० दिवस ठेवतात. या अवधीत कवकजालाची पेंढ्यावर वाढ होऊन भात-पेंढ्यांचे तुकडे एकमेकांना कवकजालाने जोडले जातात. अशा वेळी पिशवी अथवा पॉलिथिनाची नळी उभी चिरून ती आतील पेंढ्याच्या गठ्ठ्यापासून वेगळी काढतात. पेंढ्याच्या गठ्ठ्यावर दिवसातून २-३ वेळा पाणी मारतात व वारंवार पाणी मारून खोलीतील आर्द्रता कमीत कमी ६५-७५ % पर्यंत ठेवतात. पॉलिथिन काढल्यावर ४-५ दिवसांत भूछत्रे काढण्याच्या अवस्थेत येतात. छत्राचा व्यास १०-१२ सेंमी. असताना ती तीक्ष्ण धारेच्या कात्रीने कापून काढतात व ती ताजी वापरतात अथवा उन्हात वाळवून बरेच दिवस ठेवता येतात.
पहा : कवक ट्रफल.
संदर्भ : 1. Bailey, L. H. Standard Cyclopaedla of Horticulture, Vol. II, New York, 1960.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.
3. Kleijn, H. Mushrooms and Other fungi, London, 1962.
4. Seth, P. K., Ed. Mushroom Cultivation in India, Solan, 1980.
5.Singer, R. Mushrooms and Truffles, London, 1961.
6. Smith, G. M. Cryptogamic Botany, part I., Tokyo, 1955.
परांडेकर, शं. आ. गोखले, वा. पु.
“