शैवाक : (म. दगडफूल, धोंडफूल; हिं. छरीला; गु. पत्थरफूल; सं. शैलेय; लॅ. लायकेन). स्वयंपाकाच्या मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या ह्या लहान वनस्पतींचा अंतर्भाव वनस्पतिविज्ञ सामान्यपणे ⇨कायक वनस्पतीं त करीत आले आहेत कारण सर्वसामान्य वनस्पतींत आढळणारी मूळ, खोड, पान, फूल, फळ, बीज यांसारखी अंगे शैवाकांत नसतात.  ⇨ शैवले व ⇨कवक (हरितद्रव्य नसलेल्या भूछत्र व बुरशीसारख्या वनस्पती) यांच्याशी त्यांचे साम्य असते. शैवल व कवक यांच्या मिश्रणाने बनलेली ही एक जोडवनस्पती आहे. शैवाल (सं. शैवल) व कवक या दोन संज्ञांतील आद्याक्षरांनी बनलेली ‘ शैवाक ’ ही संज्ञा सूचक आहे. दगडधोंड्यावर अनेकदा वाढणाऱ्या या वनस्पतीला संस्कृतात शैलेय  असे म्हणतात. त्याच्याशी दगडफूल व धोंडफूल ही मराठी नावे मिळतीजुळती आहेत. ⇨ वराहमिहिराच्या सहाव्या शतकातील बृहत्संहिते त ७७ व्या अध्यायातील सुगंधी द्रव्यांच्या यादीत शैलेय असा उल्लेख  आढळतो. चरक, सुश्रूत व वाग्भट ह्यांनी शैलेय असा उल्लेख केला आहे. काही शैवले, शेवाळी आणि काही फुलझाडेही [→ पोडॉस्टेमोनेसी] खडकांवर वाढलेली दिसतात. त्यामुळे दगडफुलांकरिता शैलेय ही संज्ञा वापरण्यापेक्षा शैवाक ही संज्ञा शास्त्रीय विवेचनात अधिक योग्य वाटते. ह्या वनस्पती मोठया वृक्षांच्या खोडावरही आढळतात. शैवाक ही वनस्पती दोन भिन्न गटांतील एकके एकत्र येऊन बनते. ह्या गटांतील प्रत्येक मिश्रवनस्पतीची एक स्वतंत्र जाती असते व तिच्या एककातील प्रत्येक घटक परस्परावलंबन [→ सहजीवन] दर्शवितो.

शैवाक सर्व जगभर व अनेकदा ‘ निरस्तपादपे देशेही ’ आढळतात. आल्प्स पर्वतीय प्रदेश व विशेषत: उत्तर ध्रूवीय प्रदेशात त्यांचे विविध प्रकारचे भरगच्च समुदाय आढळतात. जगातील खडकांचे पृष्ठभाग बहुधा  विपुल शैवाकांनी आच्छादलेले असतात. अतिथंड दक्षिण धुव प्रदेशात फार थोडी फुलझाडे, सु. ६० शेवाळींच्या जाती परंतु सु. ४०० शैवाक जाती आढळतात. अधिक सौम्य हवामानात फारशी ढवळाढवळ जेथे झालेली नाही अशा ठिकाणी (जुनी शेते व वने) आणि जमीन, कुजके लाकडी ओंडके आणि जिवंत वृक्षांची पाने, खोडे व फांद्या इत्यादींवर [→ अपिवनस्पति] शैवाक सामान्यपणे असतात.उष्णकटिबंधातील अनेक ठिकाणी त्यांचे वैपुल्य व विविधता दिसून येते. जगात शैवाकांच्या एकूण जाती सु. २५,००० व प्रजाती २००(काहींच्या मते ४००) असून भारतात सातशेहून अधिक जाती आढळतात. शहरी भागांत धूर आणि इतर दूषित वायूमुळे त्यांचा प्रसार कमी असतो.

सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यावरच शैवाकाच्या वर निर्देश केलेल्या अनित्य संरचनेची माहिती उपलब्ध झाली. इ. स. पू. चौथ्या शतकातील ⇨ थीओफ़्रस्टस ह्या ⇨ ॲरिस्टॉटल च्या (इ. स. पू. ३८४  ३२२) शिष्यांच्या लिखाणात लायकेन्स ह्या नावाचा प्रथम उल्लेख आढळतो परंतु त्यानंतर कित्येक शतके शेवाळी व शैवाक यांमध्ये समजुतीचा घोटाळा होत असे. शैवाकाच्या शरीरातील शैवल हे कवकापासून बनलेले असून त्याचे कार्य प्रजोत्पादनाशी संबंधित असावे, अशीच गैरसमजूत अभ्यासकांत रूढ होती. १८२५ मध्ये वॉलरॉथ यांनी त्या शैवल घटकाला ‘गॉनिडियम’ हे बीजुक (अबीजी वनस्पतीतील प्रजोत्पादक अलिंग सूक्ष्म घटक) या अर्थाचे नाव, त्याचे प्रजोत्पादनाचे कार्य लक्षात घेऊन, दिले व त्याची तुलनाही स्वतंत्रपणे जगणाऱ्या शैवलाशी केली. १८६७ च्या सुमारास ⇨ झीमोन श्व्हेंडेनर यांनी वरील माहितीस आधार देऊन कवक हे त्यावर जगते [→ जीवोपजीवन] हे सिद्घ केले. १८८९ मध्ये ⇨ गास्ताँ बॉन्ये यांनी शैवल व कवक एकत्रीकरणातून शैवाक बनवून दाखविले. त्यानंतरच्या संशोधनात मात्र असे आढळले की, उभय घटकांच्या स्वतंत्र कृत्रिम संवर्धनानंतर त्यांचे पुन्हा संयोजन केले, तर त्यामुळे बनणारे नवीन शैवाक मूळच्या शैवाकाहून काहीसे भिन्न असते. ह्या संशोधनांमुळे शैवाकाच्या जीवनचकाचे प्रायोगिक निर्देशन काहीसे कठीण झाले. अत्यंत कठीण परिस्थितीतही पूर्णपणे निरोगी अवस्थेत राहिलेल्या शैवाकातील  कवक व शैवल यांचे संबंध फक्त जीवोपजीवनाचे असावेत, ही विचारसरणी अनेकांना पटली नाही. १८७३ मध्ये योहानेस राइन्के यांनी ऐक्य किंवा मैत्री या अर्थाची संकाय (लॅ.कन्सॉर्शियम ) ही संज्ञा त्या दोन घटकांतील संबंध दर्शविण्याकरिता वापरली. त्याच वेळी ‘ सहजीवन ’ ह्या अर्थाची अधिक  समर्पक संज्ञा (लॅ. सिम्बायॉसिस) एच्. ए. द बारी यांनी सुचविली. शैवलाचे कार्य प्रकाशसंश्लेषणाव्दारे अन्ननिर्मिती करणे आणि  कवकाचे कार्य वातावरणातील पाण्याचे शोषण करणे हे आहे इतकेच नसून, त्याशिवाय जटिल कार्बनी पदार्थांची परस्परांत देवघेव करण्याचे कार्यही ते करतात, असे प्रयोगांतून सिद्घ झाले आहे. शैवाकातील विशिष्ट शैवलाचे (आश्रयाचे) सातत्य अद्याप अनिश्चित आहे. एखादया शैवाकातील शैवलाची प्रजाती कायम असली, तरी त्या प्रजातीतील इतर जाती किंवा प्रकार त्याऐवजी आढळणे शक्य असते. कधीकधी तर काही शैवाकांत एका कायकात दोन गटांतील शैवले आढळतात उदा., कोकोमिक्सा  हे हरितशैवल आणि नॉस्टॉक हे निळे-हिरवे शैवल पेल्टिगेराच्या दोन जातींत एकाच वेळी आढळतात. सोलोरिना क्रोसिया या शैवाकात दोन  भिन्न शैवलांचे दोन भिन्न थर असतात. शैवाकातील शैवले व त्याच्या प्रजातीतील बाहेर स्वतंत्रपणे वाढणारी शैवले अनेकदा भिन्न असून त्यांचे संबंध संवर्धन-प्रयोगाने निश्चित करावे लागतात. कधी त्यांचे रंग भिन्न असतात किंवा शरीरातील घटकांची मांडणी भिन्न असते.

संरचना : शैवाकांचे स्वरूप व अंतर्रचना पाहिल्यास त्यांचे चार प्रकार आढळतात : (१) कवची, (२) शल्कयुक्त किंवा खवलेदार, (३) पर्णाभ आणि (४) क्षुपीय अथवा झुडपी. आकृती क्र. १ ते ११ मध्ये शैवाकांच्या विविध जातींचे स्वरूप व अंतर्रचना दाखविल्या आहेत.

कवची : हे शैवाक आधाराला खपलीसारखे घट्ट चिकटून वाढते. ते खडक किंवा झाडाच्या सालीवर पृष्ठभागावरच असते किंवा त्या आधारात कमी-अधिक रूतलेले असते. त्याची विशेष प्रकारची प्रजोत्पादक इंद्रिये (मुक्त धानीफल, पलिघ धानीफल इ.) पृष्ठभागावर राहतात (उदा.,ग्राफिस स्क्रिप्टा). कवची कायकात फक्त कवकतंतूचा एकच थर असून त्यामध्ये शैवलाच्या कोशिका विखुरलेल्या असतात (उदा., लेप्टोजियम सायनेसेन्स). कधीकधी कवकतंतूंच्या वरच्या थराखाली शैवलकोशिकांचा थर असून त्याखाली कवकतंतूंचा विरळ थर असतो. वरच्या थरास मध्यत्वचा व  ‘ स्तरित ’ (दोन्ही घटक स्वतंत्र थरात पसरलेले आहेत असा) म्हणतात.(उदा., फिसिया,पामेलिया). कवची गटातील कायक गुळगुळीत किंवा कणीदार असतो. कधीकधी तो जाडसर असल्यास त्याची विभागणी लहान कोनीय किंवा लांबट खंडात झालेली दिसते. शैवाकांच्या अंतर्रचनेत सर्वांत वरच्या व खालच्या थरांतील कवकतंतू अधिक घट्टपणे परस्परांस चिकटून असल्याने त्यांचेकार्य ⇨ अपित्वचेप्रमाणे असते.

शल्कयुक्त : येथे कायक लहान, सपाट खवल्यासारखा आणि  अनेक थरांचा असून तो आधाराला बहुधा एका कडेने सैलपणे चिकटलेला असतो (उदा., डर्‌मॅटोकार्‌पॉन, लेसिडिया, क्लॅडोनिय फ्लॅबेलिफॉर्मिस  इत्यादी).

पर्णाभ : हा सर्व शैवाकांत ठळकपणे वाढणारा आणि उठून दिसणारा प्रकार असून तो मोठा चिवट, पाना- सारखा व कधीकधी अनेक  लहान  खंडाचा बनलेला असतो (उदा., पामेलिया, फिसिया इ.), तर कधी तो कायक मोठया तबकडीसारखा व मध्यावर आधारास चिकटलेला असतो (उदा., अंबेलिकॅरिया). हा स्तरित प्रकारचा असून सर्वांत वरच्या थरात सूक्ष्म तंतूयुक्त किंवा कोशिकायुक्त मध्यत्वचा असून तिच्या खाली शैवलाचा थर व त्यातच मधून तुरळकपणे कवकतंतू पसरलेले असतात. त्याखाली विरळ तंतूंचे जाळे व शेवटी अनेक कोशिका किंवा तंतूंची मध्यत्वचा असते. याच थरांतून अनेक कवकतंतूंचे एकत्रित पट्ट (मूलब्रूव) निघून मुळांप्रमाणे आधारभूत माध्यमात वाढून कायकास विरळपणे चिकटून ठेवतात. ह्या प्रकारच्या कायकाची वाढ त्यांच्या किनारीत होते.

क्षुपीय : ह्या प्रकारचा कायक सरळ उभा किंवा लोंबता व सु.१५ सेंमी. उंच असून बहुधा त्याच्या तळाशी सपाट कवची किंवा शल्कयुक्त प्रकारचा भाग असतो. कायकावरचा मुख्य भाग  साधा असून त्यावर  गदेसारख्या, टोकदार किंवा पेल्यासारख्या संरचना असतात किंवा सर्वच कायक अनेक जटिल आणि शाखायुक्त दांड्यासारखा असतो (उदा., रेनडियर मॉस किंवा क्लॅडोनिया रँजिफेरिना). ह्या कायकाची अंतर्रचना पर्णाभ  प्रकारात  आढळते तशीच (स्तरित), परंतु अरीय किंवा चितीय अक्षाप्रमाणे असते. सर्वांत बाहेर कवकीय मध्यत्वचा, तिच्या आतील बाजूस शैवलाचा थर आणि मध्यभागी निकाष्ठाचा गाभा असतो. काही जातींत (उदा., क्लॅडोनिया आणि डॅक्टिलिना) प्रमुख अक्ष पोकळ असतो.इतर काहींत (रॉक्सेलारॅमॅलिना) उभे जाड आवरणाचे पट्ट असतात. अस्नियाच्या जातींत मध्यभागी बळकट व ताठर पट्ट असून तो शाखायुक्त कायक उष्णकटिबंधातील जंगली वृक्षांच्या फांद्यास ⇨ अपिवनस्पती प्रमाणे चिकटून खाली लोंबतो. अस्निया लाँगिसिमा ची लांबी सु. ९ मी. पर्यंत असते. वृद्घ मनुष्याच्या भुरकट दाढीसारख्या दिसणाऱ्या अस्निया बार्‌बॅटा ला इंग्रजीत ‘ ओल्ड मॅन्स बीअर्ड ’ असे नाव दिले आहे.

संरचनेतील दुय्यम घटक : शैवाकांच्या संरचनेत अनेक दुय्यम प्रकारचे व कमी-जास्त महत्त्वाचे अवयव असल्याचे आढळते. ह्यात पाच मुख्य प्रकार आहेत : (१) निगर्तिका, (२) अपवर्ध, (३) प्रजनी, (४) उत्प्रवाल आणि (५) मूलब्रूव.

निगर्तिका : यांचे कार्य वायुविनिमयाचे असते व उच्च वनस्पतींतील त्वग्रंध्राशी त्यांची कार्याच्या दृष्टीने तुलना करता येते. काही जातींच्या  (उदा., स्टिक्टा) कायकाच्या खालच्या बाजूस सूक्ष्म छिद्रे असून त्याखाली खोल खाच असते. छिद्रांना कधी पेल्याच्या किनारीप्रमाणे कडा किंवा काठ असते नसल्यास त्या सर्व संरचनेला ‘ निगर्तिकाभ ’ म्हणतात. छिद्रातून आत गेलेली हवा खाचेतून कायकातील घटकांना उपलब्ध होते व श्वसनासव प्रकाशसंश्लेषणास मदत करते. आ.७ (आ)].

अपवर्ध : एखादया कायकावर आलेल्या निळ्या-हिरव्या शैवलाला स्थानिक कवकतंतू वेढून टाकतात व असे अनेक सूक्ष्म गाठीसारखे कण पृष्ठभागावर दिसून येतात. कधी असे कण खालच्या पृष्ठावर, तर कधी कायकात आढळतात. येथे कायकातील शैवल त्याहून भिन्न असते, शिवाय ते हरित शैवलांपैकी असते.

प्रजनी : काही शैवलांच्या कोशिकांभोवती कवकतंतूचे वेष्टन बनून अनेक सूक्ष्म कणांची निर्मिती होते (उदा., पामेलिया ). ज्या शैवाकांचे हे दोन्ही घटक कणनिर्मिती करतात, त्यांच्या शाकीय प्रजोत्पादनास ह्या प्रजनींचा  फार  उपयोग होतो.  काही  प्रारंभिक शैवाकांत ह्या प्रजनी पृष्ठभागावर असतात. अधिक प्रगत  जातींत  त्यांची निर्मिती विशेष परिसीमित क्षेत्रात  होते,  त्याला ‘ प्रजनी-गुच्छ ’ म्हणतात. त्यांचा  आकार  कधी डोक्यासारखा असून ते पृष्ठभागावर आढळतात. कधी ते ओठासारखे असून कायकाच्या खंडांच्या टोकांवर किंवा किनारीवर असतात.

उत्प्रवाल : कित्येक शैवाकांच्या वरच्या पृष्ठभागावर किंवा किनारीवर प्रवाळासारखी (पोवळ्यासारखी)  विशेष प्रकारची  कायकाची  वाढ आढळते (उदा., पेल्टिगेरा प्रीटेक्स्टा). यामध्ये मध्यवर्ती निकाष्ठ, त्याभोवती  शैवलाचा  थर  आणि  सर्वांत  बाहेर कवकतंतूंची मध्यत्वचा  असते.  या संरचनेचा उपयोग कायकाचे प्रकाशसंश्लेषणाचे (अन्ननिर्मितीचे) क्षेत्र वाढविण्याकरिता होतो. त्यांच्या ठिसूळपणामुळे हे उत्प्रवाल  शाकीय  प्रजोत्पादनाकरिता  उपयुक्त  असतात. [आ. ७ (अ)]

मूलब्रूव : वर उल्लेख केलेल्या ह्या उपांगाचा (अनेक कवकतंतूंच्या  पट्टांचा) वापर कायकाला (उदा., स्टिक्टा) आधार देण्यास होतो. पाणी व खनिजे शोषून घेण्यात त्यांचा वापर काहींनी संशयास्पद मानला आहे. कित्येक शैवाकांच्या  खंडांच्या किनारीवर लांब  केसासारखी वाढलेली  उपांगे आढळतात परंतु त्यांच्या कार्याबद्दल निश्चित माहिती नाही. खंडांना परस्परांशी चिकटून जवळजवळ ठेवण्यास  बहुधा  त्यांचा उपयोग होत असावा.

आ. ७. (अ) पेल्टिगेरा प्रीटेक्स्टा (उत्प्रवाल), (आ) स्टिक्टा (निगर्तिका).

शैवाकाच्या कायकातील शैवलहरित शैवले व निळी-हिरवी शैवले [→ शैवले ] या दोन गटांतील असतात. जेव्हा ते निळे-हिरवे शैवल असते,  तेव्हा  कायकातील शैवलातून  स्रवलेल्या श्लेष्मल पदार्थांत कवकतंतू गुंतून राहतात आणि शैवाकाचा आकार शैवलाने निश्चित केलेला असतो. एकंदरीने शैवाकांत शैवलाचा आकारजननिक प्रभाव असतो असे दिसून येते [→ आकारजनन ]. रिव्ह्युलॅरिया, स्टाइगोनीमा किंवा सायटोनीमा यांसारख्या शाखायुक्त तंतूंचे शैवल जेव्हा कायकात समाविष्ट असते, तेव्हा कायकाचा (शैवाकाचा) आकार तसाच राहतो व अनेक कवकतंतूंचा समूह त्या शैवलतंतूभोवती असलेल्या श्लेष्मलात गुरफटलेला आ. ८. क्लॅडोनिया फ्लॅबेलिफॉर्मिसराहतो. कधी शैवाकाची वाढ होत असताना त्या शैवलाचे  तुकडे होऊन कोशिका सुट्या झालेल्या  आढळतात (उदा., नॉस्टॉकलीओकॅप्सा) आणि त्यांमुळे  हा  कायक अस्तरित  बनतो. शैवाकातील कवकांबरोबर अनेक हरित शैवले  आढळतात (उदा., प्रोटोकॉकस, ट्रेंटेपोहलिया, सिस्टोकॉकस) रॅकोडियम ह्या शैवाकातील क्लॅडोफोरा हे शैवल तंतूयुक्त असून कायकाचा आकार शैवलाने निश्चित केलेला असतो. सपाट कायकात शैवलाचा स्वतंत्र थर वरच्या बाजूस असतो परंतु दांड्यासारख्या (चितीय) कायकात शैवलाचा स्वतंत्र थर पृष्ठभागाखाली असतो. ही उदाहरणे स्तरित शैवाकाची आहेत. काही थोड्याच शैवाकांत कवकतंतूचे शोषकासारखे उपांग शैवल कोशिकांत शिरलेले दिसते. बहुधा दोन्ही घटकांचा निकट संपर्कच आढळतो. कायकातील दुसऱ्या घटकाचा (कवकाचा) विचार केल्यास असे आढळते की, हे ⇨ कवक त्यांच्या मुख्यतः दोन वर्गांतील असतात. गदाकवकांपैकी फार थोडे कवक शैवाकात आढळतात (उदा., कोरा पॅव्होनियाडिक्टिओनीमा शैवाक). याउलट अनेक शैवाकांत धानीकवक मुख्यतः आढळतात. वर्गीकरणात ही गोष्ट महत्त्वाची ठरली आहे. ह्या कवकांत आढळणाऱ्या बीजुकफलाच्या प्रकारांवरून आणि त्यातील बीजुकांच्या  प्रकारांवरून शैवाकांच्या वर्गांची, गणांची व कुलांची नावे दिली जातात.

उत्क्रांतिवादाच्या [→ क्रमविकास]  दृष्टीने पाहिल्यास शैवाकांचे जीवाश्म अद्याप आढळलेले नाहीत. त्याची उत्क्रांती त्याच्या घटकांच्या उत्क्रांतीनंतरच झाली असणे शक्य आहे. शैवाक वनस्पती प्रारंभिक नसून  फार विकसित असल्याचे मानतात तसेच शैवले व कवक हे दोन्ही गट अनेकोद्‌भव (पूर्वजांच्या अनेक प्रारंभिक गटांपासून विकास पावलेले) आहेत, असे मानतात. यावरून प्रारंभिक शैवाकांच्या कायकांतील स्वतंत्र घटकांचे संबंध निकट नसून मामुली असावेत. काही शैवाक या सीमारेषेवर आहेत. शैवाकांचा गट हा क्रियावैज्ञानिक दृष्टीने वैशिष्ट्य पावलेला  अनेकोद्‌भव कवकांचा गट असून तो मूलत: स्वावलंबी परंतु आता शैवलांशी सहजीवी झाला आहे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आ. ९. ॲनॅप्टिशिया शैवाकाची अंतर्रचना. प्रजोत्पादन व वृद्घी : शाकीय, अलैंगिक व लैंगिक प्रजोत्पादनाच्या पद्धतींपैकी शाकीय पद्घत शैवाकांत विशेषकरून आढळते.सुकलेले शैवाक ठिसूळ असून त्याचे तुकडे वाऱ्याने दूरवर पसरतात व तेथे चिकटून त्यापासून नवीन वनस्पतींची निर्मिती करतात [→ यकृतका ]. याशिवाय वर उल्लेख केलेल्यांपैकी प्रजनी, उत्प्रवाल किंवा इतर लहान खंड वारा, पाणी व हिमराशींचा पृष्ठभाग यांच्याद्वारा प्रसारित होतात. परिणामी खडकांवर आणि अनेक वृक्षांच्या फांद्यांवर शैवाकांची वाढ होऊन त्यांचे ठिपके दिसतात. लैंगिक प्रकारासंबंधी निश्चित माहिती प्रयोगांच्या (संवर्धक) साहाय्याने मिळविण्यात अडचणी असल्याने विद्यमान कवकांपैकी शैवाकांत समाविष्ट न झालेल्यांशी तुलना करून ती मिळवावी लागते. ॲनॅप्टिशियाकॉलेमोडस या शैवाकांत  गुंडाळी सारखा  अंदुकधारी  कवकतंतू  (धानीयोनी) कायकात  असतो  व  त्याचे मोकळे टोक-योनिकासूत्र-पृष्ठभागांवर बहुधा येते (कधी येतही नाही) परंतु त्याला चिकटलेली काही अचर रेतुके (हालचाल न करू शकणाऱ्या नर-कोशिका) आढळतात. ही रेतुके कायकातील विशिष्ट खाचेसारख्या ‘ पलिघ ’ नावाच्या इंद्रियात बनतात. येथे अंदुकाशी फलन क्रिया होऊन रंदुकनिर्मिती (दोन्हींची संयुक्त कोशिका बनणे) शक्य होते. हीच अचर रेतुके बीजुकाप्रमाणे (गर्तिका-बीजुके) स्वतंत्रपणेही कवकतंतू निर्माण करू शकतात. त्यावरून योनिकासूत्राशी त्यांचा आलेला संबंध हा यदृच्छया घडून आ. १०. कॉलेमोडस शैवाकाची अंतर्रचनाआलेला प्रकार असावा. पेल्टिगेरा या शैवाकात कवकतंतूच्या अंकुशासारख्या टोकातील दोन प्रकलांचा (केंद्रकांचा किंवा कोशिकेतील नियंत्रक बिंदूंचा) संयोग होत असावा असे मानले आहे. परिणामी फलनोत्तर प्रक्रियेमुळे धानीफलांची निर्मिती होते [→ कवक ].  कधीकधी फलन न होताही धानीफल बनते त्याला ‘अनिषेकजनन ’ म्हणतात. कित्येक शैवाकांतील लैंगिक अवस्थेचा ऱ्हास झाल्याने ते अलैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन करीत असावे,  हे  उघड  आहे. तथापि बहुसंख्य शैवाकांतील  कवक मुक्त धानीफलांची भरपूर पैदास करतात आणि त्यातील धानीबीजुकांमुळेच शैवाकांचा प्रसार व वाढ होते. शैवाकांतील कवक धानीफलांचे अनेक आकार आढळतात. बिंबासारखी, बशीसारखी अथवा पेल्यासारखी मुक्त धानीफले कायकावर किंवा कायकाच्या किनारीवर आढळतात. ह्या धानीफलांत तळाशी असलेल्या जननक्षम कवकतंतूंच्या थरांतून अनेक वंध्यतंतू व त्यांमधून काही धानीबीजुकांनी भरलेल्या कोशिका असतात. धानीबीजुके बहुधा आठ, क्वचित एक किंवा दोन (पर्टुसॅरिया)  अथवा  शंभर  (अकॅरोस्पोरा) असतात.  इतर  काही  शैवाकांत चंबूसारखे किंवा सुरईसारखे ‘ पलिघ धानीफल ’ असून त्यात  अनेक धानींचा थर असतो. पलिघ धानीफल कायकात अंशतः किंवा पूर्णत: रूतलेले असते. त्यांचा बाहेरचा भाग बहुधा काळपट व कार्बनयुक्त असतो. काहींतील वंध्यतंतू श्लेष्मल (बुळबुळीत) होऊन धानी पक्व होईपर्यंत ते नाश पावतात. कधीकधी धानीचा संपूर्ण ऱ्हास होऊन फक्त बीजुके सुटी व दोऱ्यासारख्या समूहांत राहतात. काही कायक कवकांत धानीफल लांब व अरूंद असून आतील बाजूचे कार्बनीकरण झालेले असते व तळातील खोबणीत वंध्यतंतू व धानी असतात. येथे मुक्त धानीफले व पलिघ धानीफले दीर्घकाळ टिकून राहतात. कायक ओलसर झाला म्हणजे बरीच बीजुके धानीतून बाहेर फेकली जातात व वाऱ्याने पसरविली जातात. ज्या शैवाकांतील (उदा., गॅनोडर्मा, स्टेरियम) कवक गदाकवकांपैकी असतो, त्यांचा आकार आधारपृष्ठाशी काटकोनात बसविलेल्या फळीप्रमाणे असून गदाबीजुकधारी भाग खालच्या बाजूस असतो [→ कवक बॅसिडिओमायसिटीज ]  व त्यातील गदाबीजुके बाहेर पडल्यावर अनेक ठिकाणी रूजून नवीन शैवाक निर्माण करतात.

आ. ११. अंबेलिकॅरिया (रॉक ट्राइप)शैवाकांची बीजुके विविध असतात व त्यांचा उपयोग नैसर्गिक वर्गीकरणात होतो. ती तपकिरी किंवा रंगहीन, एककोशिक किंवा अनेककोशिक, कधीकधी चौकोनी किंवा बहिर्गोल असून अनेकांची माळेसारखी  मांडणी असते. त्यांचा व्यास १ ते २५० मायकॉनपर्यंत असतो. त्यांच्या  भिंती जाड किंवा पातळ, गुळगुळीत व आकार गोल, लंबगोल, तर्कुरूप (लाटण्यासारखा), टकळीसारखा किंवा सुईसारखा असतो. त्यात एक किंवा अनेक प्रकल असतात. मुक्त धानीफलाखेरीज अनेक शैवाकांत गर्तिका किंवा पलिघा (कायकात किंवा किनारीवर आढळणाऱ्या पेल्यासारख्या किंवा सुरईसारख्या पोकळ्या) असून त्यात ‘ गर्तिका-बीजुके ’ बनतात ती रूजून नवीन कवकतंतू वाढतात व योग्य शैवलाचा आश्रय मिळाल्यास नवीन शैवाक बनते.  वर उल्लेख केल्याप्रमाणे ही  बीजुके  अचर-रेतुके असू शकतात. शैवाकांतील शैवल ह्या घटकाचे प्रजोत्पादन साध्या विभाजनाने होते  तथापि  शुद्घ संवर्धनात चलबीजुके किंवा स्वयंबीजुके (जननकोशिकेसारखी स्वतःच बनविलेली अचल  बीजुके) बनतात. वर उल्लेख केलेली बीजुके रूजून एक नवीन लहान पूर्वकायक (कायकाची आधीची अवस्था) बनतो व तो विश्रामी अवस्थेत जातो. सुयोग्य शैवलाशी त्याचा संपर्क आल्यास किंवा त्याच शैवाकाच्या प्रजनीचा सहवास लाभल्यास नवीन शैवाक वाढीस लागते. ह्या वाढीत कायकाच्या किनारीचा वाटा  मोठा असतो. कधीकधी काही विशिष्ट कवकतंतू आतील शैवल कोशिका कायकाच्या किनारीपर्यंत आणतात. कधीकधी हे कवकतंतू कायकाबाहेर येतात व वाऱ्यामार्फत आलेल्या शैवल कोशिकांशी त्यांचा संपर्क येऊन नवीन कायकाचे भाग बनतात. कवची शैवाकांची वाढ फार मंद (दरवर्षी सु. १ मिमी.) असते. सापेक्षतः पर्णाभ व क्षुपीय प्रकार जलद गतीने वाढतात (दरवर्षाला १-२ सेंमी.). जसजशी वाढ अधिक होऊन कायक जुना  होतो, तसतसा मधला भाग सुकून त्याचा नाश होत जातो व नवीन भाग किनारीजवळ राहून वाढत राहतो. नवीन कायकाचे आगमन व त्याची वाढ मध्यभागी होते व समकेंद्री कायकाची वलये बनतात.

वर्गीकरण : पूर्वी शैवाकांचा अंतर्भाव शेवाळी व शैवले यांमध्ये केला जात असे. प्रसिद्घ वर्गीकरणविज्ञ ⇨ कार्ल लिनीअस यांनीही त्यांच्या शैवाक प्रजातीत काही इतर वनस्पतीही समाविष्ट केल्या होत्या. आधुनिक शास्त्रज्ञ शैवाकांमधील परस्परसंबंधात कवकाला अधिक महत्त्व देऊन त्यांचे भिन्न गट नैसर्गिक वर्गीकरणात अंतर्भूत करतात. नामकरणामध्ये कवकाच्या प्रकाराला प्राधान्य दिले जाते. एम्. ई. हॅले (१९५६) यांनी पुरस्कार केलेल्या पद्धतीत (१) ⇨ ॲस्कोमायसिटीज (धानीकवक), (२)  ⇨ बॅसिडिओमायसिटीज (गदाकवक) व (३) ⇨ फंजाय इंपरफेक्टाय (अपूर्ण कवक) हे मुख्य वर्ग मानले असून त्यांमध्ये पहिल्या दोन वर्गांचे दोन उपवर्ग व पाच गण केले आहेत. पुढे त्या गणात संख्येने अधिक कुले व प्रजाती आणि जाती मानून विस्तार केला आहे तिसऱ्या लहान वर्गात (अपूर्ण शैवाकात) फक्त दोनच प्रजाती आहेत.

अपूर्ण शैवाक : (लायकेन्स इंपरफेक्टाय). अपूर्ण कवकांशी समांतर असलेल्या या शैवाकांच्या गटातील जातींत लैंगिक प्रजोत्पादक अवयव तर नसतातच परंतु कवकांत आढळणारे विबीजुकधारी अवयवही नसतात.  या शैवाकांचे शरीर कवची प्रकारचे असून त्यात अस्तरित संरचना आढळते. शैवल घटक एककोशिक असून कवकतंतूंनी वेढलेले असतात. या शैवाकांचे प्रजोत्पादन फक्त शरीरखंडाने घडून येते. हे खंड वारा, पाणी व प्राणी यांच्याव्दारे पसरविले जातात आणि सावली व ओलावा मिळत असलेल्या दमट हवामानातील खडकांवर व वृक्षांच्या बुंध्यांवर वाढतात. क्रोसिनियालेप्रारिया ह्या प्रजातींतील जाती विशेषकरून सर्वत्र आढळतात. क्रोसिनिया हे रंगाने करडे आणि लेप्रारिया पिवळे असते.

स्मिथ व इतर काही शास्त्रज्ञ फक्त शैवाक (लायकेन्स) वर्गाचे (१) धानीशैवाक (ॲस्कोलायकेन्स) व (२) गदाशैवाक (बॅसिडिओ-लायकेन्स) हे दोन उपवर्ग मानतात. ते त्यांच्या प्रजोत्पादक संरचनेवर आधारलेले आहेत. तसेच धानीशैवाकांमध्ये पलिघ धानीफल असलेल्या शैवाकांची पायरिनोकार्पी व मुक्त धानीफल असलेल्यांची जिम्नोकार्पी अशा दोन श्रेण्या केल्या आहेत. कायकांचे बाह्यस्वरूप, संरचना, शैवलाचा प्रकार व धानीफलाची संरचना इ. लक्षणे विचारात घेऊन त्यांची विभागणी कुलात केली आहे. पायरिनोकार्पी या श्रेणीत सोळा कुले व जिम्नोकार्पी श्रेणीत  पस्तीस कुले समाविष्ट केली आहेत. गदाशैवाकात फक्त चार प्रजाती असून सर्व जाती उष्णकटिबंधीय आहेत.

शरीरक्रियाविज्ञान, परिस्थितिविज्ञान आणि भौगोलिक माहिती : शैवाकांना पाऊस, वातावरण, दव आणि धुके यांपासून पाणीपुरवठा होतो. मरू (रूक्ष) प्रदेशात दव विशेष महत्त्वाचे आहे.  शैवाकांचा कायक आपल्या वजनाइतके व वजनाच्या ३५ पटीपर्यंत पाणी शोषून घेऊ शकतो. जितक्या सहजपणे हे पाणी शोषले जाते, तितक्याच सहजतेने ते निघून कायक सुकते, कारण पाणी धरून ठेवण्याची कोणतीही यंत्रणा नसते. तथापि शुष्कता सोसून जगण्याची क्षमता मात्र शैवाकांत असते. ही क्षमता रूक्ष प्रदेशांतील जातींत अधिकच असते आणि त्याबरोबरच श्वसन आणि अन्नाची निर्मिती व सात्मीकरण मंद गतीने होते. भरपूर ओलावा असताना वायुविनिमय रूक्ष अवस्थेतल्यापेक्षा पाच पट अधिक असतो परंतु कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन यांचे गुणोत्तर शैवाकातील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून नसते. प्रकाशाची गरज शैवाकाच्या प्रकारावरून ठरते. शैवाक-२७३° से.चे थंड हवामान, तसेच २२३°-३३०° से. (पाण्याच्या उकळबिंदूच्या दुप्पट) तापमान सहन करू शकते. निर्वात पोकळीत ते सहा वर्षे जिवंत राहू शकते परंतु हवेतील विषारी पदार्थांचे अत्यल्प प्रमाणही त्यांना मारक ठरते. गंधकाची वायवी संयुगे व ओझोनेटेड हायड्रोकार्बने यांबाबत शैवाक संवेदनशील असते. प्रदूषित हवामानाचे शैवाक हे निदर्शक आहे. अशा हवामानात त्यातील शैवल प्रथम व नंतर कवक मरते परंतु ॲमिनो अम्लातील नायट्रोजन त्यांना उपयोगी पडत नाही. कवक व शैवल ह्या दोन समघटकांत कार्बनी संयुगांचा विनिमय होण्याची शक्यता मान्य झाली आहे. बहुशर्करी कार्बोहायड्रेटे लायकेनीन व आयसोलायकेनीन कवकतंतूंच्या भिंतीत आढळतात. ते सेल्युलोज (तूलीर) व स्टार्च (तवकीर) यांतील मध्यस्थ असतात. कायटीन, हेमिसेल्युलोज, पेंटोसॅन, डेक्स्ट्रोन व ग्लुकान यांची  निर्मिती शैवलांत होते. लिपिडे सामान्यपणे आढळतात. साखरेचे इतर प्रकार आणि मॅनिटॉल व व्होले मिटॉल यांसारखी अल्कोहॉले, सोळा ॲमिनो  अम्ले, वृद्घी पदार्थ आणि जीवनसत्त्वे शैवाकांत आढळली आहेत. शैवाकात असणाऱ्या शैवलांतील घटक मात्र इतर शैवलांच्या प्रमाणेच असतात. भारतीय शैवाकांत ४-२०% प्रथिन असते. अनेक पदार्थ शैवाकांच्या कवकतंतूंवर आढळतात. कॅल्शियम ऑक्झॅलेट व इतर कित्येक स्फटिकरूपांतील रासायनिक संयुगे त्यांत असतात. भडक रंग (पिवळा, लाल व नारिंगी इ.) दर्शविणाऱ्या पदार्थांमुळे शैवाकांत वेगवेगळे रंग व  रंगच्छटा प्राप्त होतात आणि यांपैकी काही पदार्थ स्वतंत्रपणे असणाऱ्या  कवकांतही आढळतात. ह्या रंगाच्या कडूपणामुळे बाष्पोच्छ्‌वासात होणाऱ्या पाण्याच्या हानीपासून शैवाकांना संरक्षण मिळते. शिवाय ते पदार्थ टाकाऊ स्वरूपाचे असल्याने त्यांचा निचरा यामार्गे होत असावा. शैवाक (अस्निक) अम्लाचा परिणाम सूक्ष्मजंतूंविरूद्घ होतो. यांमध्ये अम्लाखेरीज इतर रासायनिक पदार्थही असतात. पृथ्वीवरील विविध प्रकारच्या परिस्थितीत  किंवा प्रदेशांत शैवाकांची वस्ती आढळते तथापि प्रत्येक जातीच्या कायकातील दोन घटकांतील समतोल फार नाजूक स्वरूपाचा असतो.  त्यामुळे कोणत्याही प्रकारातील शैवाक बाह्य परिस्थितीला प्रतिसाद देऊ शकते म्हणजे शैवाक त्यांच्या परिसरातील परिस्थितीचे निर्देशक ठरतात. प्रकाश, तापमान, वारा, ओलावा व आश्रय किंवा माध्यम(जमीन, खडक, वृक्ष, पाणी इ.) यांमुळे त्यांच्या प्रसारावर मर्यादा पडते. यूरोप व उत्तर अमेरिकेतील समुद्रकिनाऱ्यांवर भरती-ओहोटीच्या रूंद पट्ट्यांत फक्त दोन विशिष्ट जाती किंवा काही तत्सम जातीच सागरी शैवलांबरोबर वाढतात.  उत्तर अमेरिकेत हायड्रोथिरिया व्हेनोजा ही एकच जाती कॅलिफोर्नियातील  व पूर्वेकडील डोंगरातील गोड्या पाण्याच्या सन्निध आढळते. काही जाती चुनखडीच्या खडकांवर किंवा जमिनीवर व काही अम्लीय खडकांवर  वाढतात. ‘ कॅलिफोर्नियन स्पॅनिश मॉस ’ (रॅमॅलिना रेटिक्युलॅटा) हे शैवाक उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील धुके असलेल्या दमट रेडवुड वनात वृक्षांच्या फांद्यांवरून माळेप्रमाणे लोंबत असते. काही शैवाक विशिष्ट वृक्षांच्या सालीवरच वाढतात.

आर्क्टो-पॅसिफिक प्रदेशातील समुदायातील अनेक जाती सायबीरियात व पश्चिम अमेरिकी आर्क्टिक प्रदेशांत आढळतात. उत्तर व दक्षिण ध्रूवीय प्रदेशांतील एक सामान्य जाती म्हणजे अस्निया सल्फ्यूरियस. समशीतोष्ण कटिबंधातील क्लॅडोनिया, लेकॅनोरा, पामेलिया, फिसियारिनोदिना इ. प्रजातींचा प्रसार मोठा आहे. भूमध्य सामुद्रिक रूक्ष प्रदेशांतील शैवाक  (उदा., फिसिया बिझिॲना ) उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातही आढळते. उष्णकटिबंधातील अनेक शैवाकांत ट्रेन्टेपोहलिया हे शैवल आढळते. त्यात समशीतोष्ण कटिबंधातील काही शैवाकांच्या प्रजातीही आढळतात. दक्षिण ध्रूवीय प्रदेशात ४०० वर शैवाक प्रजाती असून त्या बहुतेक कवची प्रकारातील आहेत. बुएलिया  प्रजातीतील जातीही भरपूर आहेत.

व्यावहारिक महत्त्व : आद्य वनस्पती म्हणून शैवाक महत्त्वाचे ठरते. शैवाक अम्लाची खडकावर रासायनिक क्रिया होऊन त्याचा भुगा होऊ शकतो. चुनखडी खडकात याच कियेने खाचा पडतात (उदा., व्हेरूकॅरियाकॅलोप्लॅका). इतर शैवाकांतील प्रक्रियेने आकुंचन व प्रसरणास चालना मिळून पृष्ठभागाची फूट होते व त्याचे लहान तुकडे निघतात याशिवाय रासायनिक प्रक्रियेने खनिजे सुटी होतात. अशा रीतीने खडकाचा पृष्ठभाग नरम व भुसभुशीत होऊन माती बनते आणि त्यावर प्रथम शेवाळी व नंतर उच्च दर्जाच्या वनस्पती वाढू लागतात. काही प्रकारच्या पादपसमुदायाची सुरूवात अशीच होते[→ पादपजात वनश्री परिस्थितिविज्ञान]. याउलट  वालुकायुक्त जमिनीवर वाढणाऱ्या शैवाकामुळे वाळूचे कण एकत्र केले  जाऊन ते बांधले जातात व वाऱ्यामुळे वाळूच्या होणाऱ्या हालचालीस आळा बसतो. तसेच चिकणमातीच्या जमिनीवर वाढणाऱ्या शैवाकांपासून अशाच प्रक्रियेने जमिनीची धूप थांबते. ध्रुवीय व उपध्रुवीय प्रदेशांत शैवाकांचा फार मोठा उपयोग रेनडियर प्राण्यांना चाऱ्याकरिता होतो. कॅरिबो, कस्तुरी मृग आणि मूस हेही प्राणी त्यावर पोसले जातात. क्लॅडोनिया च्या काही जातींचा अंतर्भाव रेनडियर मॉस या नावाच्या गटात करतात. आइसलँड मॉस (सेट्रॅरिया आयलँडिका) हे त्याच प्रकारचे शैवाक आहे. यांच्या मंद वाढीमुळे एखादे क्षेत्र संपून पुन्हा उपयोगात येण्यास ३५ ते ३८ वर्षे लागतात यामुळे या प्राण्यांचे कळप पाळणाऱ्या जमातींना भटके जीवनच कंठावे लागते [→ टंड्रा ]. ग्रीनलंड व आइसलँड येथील मेंढपाळ व गुराखी शैवाकांचा पूरक खाद्य म्हणून उपयोग करतात. इझ्राएली मुले लेकॅनोरा एस्क्युलेंटा हे उत्तर आफिका व आशिया मायनर येथील शैवाक ⇨ मान्ना शर्करा या नावाने खाण्यात वापरतात. मरूक्षेत्रात ह्या शैवाकाचे असंख्य तुकडे वाऱ्याने उडून जातात. गोगलगायी, पिकळ्या, माइट, अळ्या व वाळवी हे व इतर अनेक लहान प्राणी शैवाक खातात व त्याच्या प्रसारासही मदत करतात. जपानी लोक इवोटेक हे शैवाक भाजून किंवा शिजवून खातात.

काही शैवाकांच्या मानवी शरीरावयवांशी बाह्यत: दिसून येणाऱ्या आकारसाम्यामुळे शैवाकांचा औषधी उपयोग सुरू झाला असे दिसते. लोबॅरिया पल्मोनॅरिया (लंगवर्ट) ह्या शैवाकाच्या फुप्फुसाच्या पृष्ठभागाशी दिसणाऱ्या साम्यावरून त्याचा उपयोग क्षय, फुप्फुसदाह (न्यूमोनिया) आणि तत्सम व्याधींवर केला जाई. काविळीवर झॅन्थोरिया पॅरिएटिना चा वापर करण्यात येई. पेल्टिगेरा कॅनिना (डॉग लायकेन) या शैवाकाचा वापर कुत्र्याच्या दातांशी दिसलेल्या साम्यावरून अलर्क रोगावर केला जात असे. पुढे शैवाक-अम्लांच्या ‘ सूक्ष्मजंतुविरोधक ’ गुणांची माहिती झाली. रशियात ऊल्फ लायकेन (लेथॅरिया व्हुल्पिना) या शैवाकाचा उपयोग लांडग्यांवर विषप्रयोग करण्यासाठी होतो. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील पामेलिया क्लोलोकोआ चा विषारी परिणाम गुरांवर होतो, असे आढळून आले.

एव्हर्निया प्रूनास्त्री, रॅमॅलिना व काही संबंधित शैवाकांच्या जाती (ओकमॉस) दक्षिण यूरोपात अत्तराच्या निर्मितीत वापरतात. त्यामुळे अत्तरास स्थिरत्व येते व त्यातील घटकांचे बाष्पीभवन एकसमान होण्यास मदत होते. साबण तसेच सौंदर्यप्रसाधने यांत ही अत्तरे वापरतात. शैवाकां-तील रंगांपैकी एकाचा (आर्चिल, कडबिअर) उपयोग लिटमस (लालसर निळा रंग) बनविण्यास वापरतात. यूरोपात कडबिअर (ऑक्रोलेकिया टार्टारिया) हे कवची शैवाक खडकांवरून खरवडून काढून वापरतात. अनेक पाश्चात्त्य देशांत रॉक्सेला टिंक्टोरियारॉक्सेला च्या इतर जाती सोडियम व अमोनियम हायड्रॉक्साइडाबरोबर लोकर व रेशीम रंगविण्यासाठी वापरतात. तसेच रॉक्सेला टिंक्टोरिया पासून काढलेली कडबिअर ही लाल रंगाची पूड पूर्वी मद्याला व लाकडाला रंग देण्यासाठी वापरीत. हल्ली ती औषधे, कटुद्रव्ये व सॉस (खीर किंवा गरगटे यांसारखे पदार्थ) इत्यादींत रंग येण्यासाठी वापरतात. अंबेलिकॅरियापामेलिया या व इतर काही शैवाकांच्या जाती तपकिरी, पिंगट, पिवळा इ. रंग लोकरीला देण्यासाठी काही देशांत वापरतात. काही शैवाकांपासून ओलिओरेझीन व टॅनीन मिळवितात.

भारतीय शैवाक : भारतात आढळणाऱ्या शैवाकांची गणती व त्यासंबंधी तपशीलवार माहिती अपूर्णावस्थेत आहे. आजवर सु. ७०० जातींची नोंद झाली आहे.

आइसलँड मॉस : (सेट्रॅरिया आयलँडिका कुल-पामेलिएसी). हे क्षुपीय सरळ उभे किंवा कलते वाढणारे, लहान, पट्टीसारखे व काहीसे ताठर असून उत्तर ध्रूवीय व आल्पीय प्रदेशांत त्याचा भरपूर प्रसार आहे. आल्पीय हिमालयात ते क्वचित आढळते. त्याचा रंग फिकट किंवा गर्द तपकिरी असतो. हे शैवाक गंधहीन, गिळगिळीत व कडू असते. ते सारक व दाहशामक असून त्याचा काढा जुनाट खोकला, श्वासनलिकादाह व क्षय यांवर देतात. प्रयोगशाळेत त्याचा एक संवर्धक म्हणून उपयोग करतात. ग्लुकोज मिळविण्यास व मद्यनिर्मितीकरिता आणि कातडी कमाविण्यास व रंगविण्यास हे शैवाक उपयुक्त आहे.

रेनडियर मॉस : (क्लॅडोनिया रँजिफेरिना कुल-क्लॅडोनिएसी). हे क्षुपीय शैवाक सिक्कीममध्ये आढळते. याच्या कायकाचा तळभाग प्रथम करडय रंगाच्या कणांचा असून पुढे त्या जागी ठळकपणे, सरळ, करडय हिरव्या रंगाचा किंवा पांढरट, दांडयसारखा, काहीसा गुलुच्छासारखा [→ पुष्पबंध] अथवा झुबकेदार उन्नत कायक असतो. हे शैवाक जाडसर गालिचासारखे किंवा पसरट व झुपक्यांनी बनलेल्या गादीसारखे (गवताळ रानाप्रमाणे) वाढते. ग्लुकोज व अल्कोहॉलाकरिता हे उपयुक्त असून फिनलंडमध्ये त्याचा गरम विद्राव (रस) क्षयावर देतात त्यापासून लालसर रंग मिळतो. (आ. १०).

पामेलिया अबेसिनिका : (कुल-पामेलिएसी). हे कवची शैवाक बेल्लरी, अनंतपूर व कडाप्पा या जिल्ह्यांत (आंध्र प्रदेश) खडकाळ जमिनीवर वाढते. ते विपुल असून अन्न व मसाला यांकरिता लोक वापरतात. ऑर्सिनॉल व लिटमसकरिता ते फार उपयुक्त असते पामेलिया सिऱ्हाटा हे पर्णाभ शैवाक समशीतोष्ण हिमालयात व दक्षिण भारतातील डोंगराळ भागांत आढळते. त्याचा खाण्यास उपयोग होतो. त्यापासून फिकट गुलाबी रंग मिळतो व त्याचा वापर छपाईसाठी व कॅलिकोस सुगंध येण्यास करतात. त्यात स्तंभक (आकुंचन करणारा), शोथशामक व सौम्य विरेचक गुण असून त्याची पूड तपकिरीप्रमाणे वापरतात. पामेलिया टिंक्टोरियम हे पर्णाभ शैवाक भारतातील सपाट प्रदेशांत व हिमालयात खडक व वृक्षांची साल यांवर आढळते. दक्षिण भारतात ह्याचा उपयोग विविध खाद्यपदार्थांत करतात. तसेच यापासून मिळालेल्या ऑर्सिनॉलाचा उपयोग अनेक संश्लेषणांत व सूक्ष्मजीवांच्या अभ्यासात रंगद्रव्यासारखा करतात.

पेल्टिगेरा कॅनिना : (कुल-पेल्टिगेरॅसी). हे पर्णाभ शैवाक मोठे, पसरट, काहीसे जाड व खंडयुक्त असून ते समशीतोष्ण हिमालयात सापडते त्याचा अन्नासाठी उपयोग होतो त्यापासून लालसर रंग मिळतो. त्याचा फांट (कढत पाण्यात काही वेळ ठेवून मिळालेला अर्क) पौष्टिक व रेचक असून यकृताच्या विकारांवर देतात.

रॅमॅलिना सायनेन्सिस : (कुल-अस्निएसी). हे क्षुपीय शैवाक पातळ व खोलवर विभागलेले असून नैनिताल व आसपास आढळते. त्याचा अन्नासारखा उपयोग होतो.

रॉक्सेला माँटेगेनी  : (कुल-रॉक्सेलिएसी). भारताच्या पूर्व किनारी क्षेत्रात अनेक वृक्षांच्या सालींवर हे क्षुपीय शैवाक आढळते. पशूंचा चारा व माणसाचे अन्न म्हणून ते उपयुक्त आहे.

अस्निया लाँगिसिमा : (कुल-अस्निएसी). हे क्षुपीय शैवाक फार लांब, तंतूयुक्त व लोंबते असून आल्पीय हिमालयात वृक्षांवर आढळते. त्याच्या नरमपणामुळे त्याचा स्थानिक वापर उशा भरण्यास करतात. अन्नासारखाही त्याचा उपयोग होतो. चीनमध्ये ते कफोत्सारक व वणांवर उपाय म्हणून करतात.

शैवाकांच्या काही जाती हवा-प्रदूषण-निर्देशक असल्याचे दिसून आले आहे. उदा., डिरिनॅरिया एप्लॅनॅटा  आणि रॉक्सेला माँटेगेनी  या दोन जाती आंबा, शिरीष, करंज व जांभूळ या वृक्षांच्या सालींवर वाढतात. भारतातील सुंदरगड ते राउरकेला ह्या पश्चिम ओरिसातील सु. १०० किमी. अंतराच्या मार्गावरील झाडांवरच्या शैवाकांची वारंवारता, विपुलता व  घनता रंगनाथ मिश्रा यांनी अभ्यासली आणि डिरिनॅरिया एप्लॅनॅटा  व रॉक्सेला माँटेगेनी  या दोन जातींचे प्रदूषण निर्देशक वैशिष्ट्य दाखवून दिले.  या मार्गाच्या जवळपास हिंदुस्थान स्टील प्लँट, ओरिसा सिमेंट लि. व इतर काही कारखाने असून परिसरातील हवेत प्रदूषण निर्माण होण्यास ते कारणीभूत असल्याचे आढळले आहे.

पहा : कवक; कायक वनस्पति; प्रजोत्पादन; वनस्तींचे वर्गीकरण; शैवले.

संदर्भ : 1. Ahmadjian, V. Hale, Mason E. (Eds.), The Lichens, Washington, 1973.

2. Asahina, Yasuhiko Shibata, Shoji, Chemistry of Lichen Substances, Tokyo, 1971.

3. Bell, Peter Coombe, David, Strasburger’s Text Book of Botany, London, 1965.

4. C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

5. Hale, Mason E. The Biology of Lichens, Washington, 1983.

6. Misra, Ranganath, Lichens as Indicators of Air-Pollution, Science Reporter, New Delhi, 1979.

7. Smith, Annie L. Lichens, Cambridge, 1975.

8. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. I, Tokyo, 1955.

देशपांडे, शं. रं.; परांडेकर, शं. आ.

शैवाक : पिवळे शैवाक : जगातील सर्वांत जुनी सजीव वनस्पती. शैवाक : आर्क्टिक शैवाक : टंड्रा प्रदेशाचा बराचसा पृष्ठभाग व्यापणारे.