हिरवा चाफा : (१) फांदी (२) फूल (३) अंकुश (४) पाकळ्या काढून टाकलेले फूल : अ–संदल, आ–केसरदले, इ–किंजदले (५) पाकळी (६) घोसफळ (७) बीज (८) बीजाचा उभा छेद.

चाफा, हिरवा : (हिं. हरिचंपा, मदनमस्त गु. लीलोचंपो इं. ग्रीन चंपा लॅ. आर्टाबॉट्रिस ओडोरॅटिसिमस कुल-ॲनोनेसी). हे एक आरोही (वर चढणारे) व जाडजूड क्षुप (झुडूप) असून त्याचा प्रसार उष्ण कटिबंधात (आशिया व आफ्रिका) बागेतून शोभेकरिता झाला आहे. द. भारतात व श्रीलंकेमध्ये ते जंगली अवस्थेतही आढळते. याच्या वंशात एकूण ३० जाती असून त्यांपैकी सु. १० भारतात आढळतात. कोवळ्या शाखा लोमश (लवदार) पण पुढे गुळगुळीत. पाने साधी, एकाआड एक, आखूड देठांची, सतत हिरवी व चकचकीत, चिवट, आयत किंवा भाल्यासारखी, टोकदार व गुळगुळीत असतात. फुले एकाकी किंवा जोडीने येतात ती हिरवट पिवळी, फार सुगंधी, आखूड देठांची, ३-४ सेंमी. लांब असून ऑगस्ट ते सप्टेंबरात येतात. फुलोऱ्याच्या दांड्यावरच्या आकड्यासारख्या संवेदी इंद्रियांच्या (अंकुशांच्या) साहाय्याने हे क्षुप जवळचा आधार घेते. फुलाची संरचना सामान्यतः ⇨ॲनोनेसी  अथवा सीताफल कुलात वर्णिल्याप्रमाणे. संदले तीन व लहान पाकळ्या सहा, मांसल, धारास्पर्शी आतल्या तीन पाकळ्या बाहेरच्यांपेक्षा लहान केसरदले आणि किंजपुटे अनेक (६–१०) व प्रत्येक किंजपुटात दोन बीजके असतात [⟶ फूल]. घोसफळ अनेक कठीण पिवळ्या मृदुफळांचे असते. बीज आयताकृती, साधारण चपटे, १·२५ सेंमी. लांब असून त्याच्या एका बाजूस खोबण असते. नवीन लागवड बियांपासून किंवा दाब कलमांनी करतात. जमीन कसदार व खतावलेली असावी लागते अनेक प्रकार भारतात लागवडीत आहेत. मलायात पानांचा काढा पटकीवर देतात. फुलांपासून काढलेला सुगंधी अर्क अत्तरांत आणि तेलांत वापरतात. सुगंधी फुलांकरिताच बागेत लागवड करतात. फिलिपीन्समध्ये या झाडाचा औषधात वापर करतात. या जातीला हल्ली आर्टाबॉट्रिस अन्सिनॅटस  असे लॅटिन नाव आहे.

वैद्य, प्र. भ.