ओलिएसी : (पारिजातक कुल). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील ⇨ जेन्सिएनेलीझ  ह्या गणात ह्या वनस्पति-कुलाचा समावेश होतो. ह्यातील वनस्पती विशेषतः समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांतील प्रदेशांत आढळतात व त्यात सु. २२ वंश व ५०० जाती आहेत. जाई-जुईच्या (जस्मिनम) वंशामध्ये सु. २०० जाती आहेत. या कुलातील वनस्पती क्षुपे (झुडपे), वृक्ष व वेली असून पाने साधी अथवा संयुक्त असतात. फुलोरे विविध प्रकारचे असून फुले सर्वसाधारणतः द्विलिंगी, नियमित, अपिकिंज व बहुधा सुवासिक असतात. संवर्तात चार संदले (क्वचित चार ते पंधरा किंवा नसतात) प्रदलमंडलात चार ते पाच बहुधा जुळलेल्या पाकळ्या (क्वचित चार ते बारा किंवा नसतात) हे मंडल समईसारखे दिसते. केसरदले दोन क्कचित चार किंजमंडल दोन जुळलेल्या दलांचे, ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचे प्रत्येक कप्प्यात दोन बीजुके [→फूल] फळे विविध. परागण (परागसिंचन) कीटकांकरवी घडते. जाई, जुई, चमेली, सायली, मोगरा, पारिजातक इ. बागेतील सुवासिक फुलांच्या वनस्पती तसेच करंबा, हेदी, मोखा,ॲश व ऑलिव्ह ह्यांसारख्या लाकूड, तेल वगैरे देणाऱ्या उपयुक्त वनस्पती याच कुलातील आहेत.

वर्तक, वा. द.