मोथा : (१) फुलोऱ्यासह संपूर्ण वनस्पती, (२) फुलोरा, (३) सच्छद फूल, (४) फळ, (५) ग्रंथिक्षोडाचा उभा छेद.

मोथा : (हिं. मुथा, मोथा क. तुंगे गुड्डे, कोरनारी गड्डे सं. मुस्तक, मुस्ता, सुगंधी ग्रंथिला इं. नट ग्रास, कॉमन सेज लॅ. सायपेरस रोटुंडस कुल-सायपेरेसी). शेतात सदैव ⇨ तणासारखी वाढणारी ही एकदलिकित (बियांत एकच दलिका असणारी) व बहुवर्षायू (अनेक चालणारी वर्षे जगणारी) ⇨ ओषधी सर्व उष्ण देशांत, श्रीलंकेत व भारतात सामान्यपणे सु. १,८०० मी. उंचीपर्यंत पाणथळ जागी आढळते. या वनस्पतीच्या सायपेरस प्रजातीत एकूण सु. ६०० जाती असून त्यांपैकी सु. १०० भारतात आहेत. कौटिलीय अर्थशास्त्र, बृहत्‌संहिता, ऋतुसंहार, शाकुंतल, रघुवंश इ. ग्रंथात मुस्ता (भद्रमुस्ता) या वनस्पतीचा उल्लेख आला असून ती डुकरांना आवडते, असे म्हटले आहे व त्यावरून हिला ‘वराही’ हे नाव दिलेले आढळते.

मोथाचे जमिनीवरील खोड सु. १५–६० सेंमी. उंच, हिरवे व टोकास त्रिधारी असते. जमिनीतील खोडापासून अनेक ग्रंथिक्षोडे (गाठीसारखी खोडे), तिरश्वर (जमिनीसरपट वाढून टोकास नवीन वनस्पती निर्मिणाऱ्या शाखा) व मुळे यांचा झुबका बनलेला आढळतो. मूलज (खोडाच्या तळापासून येणारी) पाने साधारणपणे खोडाइतकी लांब व गवतासारखी रेखाकृती असतात. फूलोरा साधा किंवा संयुक्त चवरीसारखा असून किरणे (पानासारखे उपांगे) २–८ व प्रत्येकावर ३–१० पसरट व लालसर पिंगट कणिशके (लहान कणसासारखे फुलोरे) असलेली आखूड कणिशे (→ पुष्पबंध) असतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरात प्रत्येक कणिशकात १०–५० फुले येतात, फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सायपरेशी किंवा मुस्तक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ (कपाली, कवचयुक्त, शुष्क, एकबीजी व न फुटणारे) रुंदट अंड्यासारखे, त्रिघारी व भुरकट काळे असते. नवीन वनस्पती निर्माण करण्याची क्षमता फार थोड्या बियांत असते.

 हे तण त्रासदायक असून शेतातून काढून टाकणे कठीण जाते. उन्हाळ्यात जमीन खोलवर नांगरून सु. ४५ दिवस ती वाळू दिल्यास तणाचे नियंत्रण होऊ शकते . बेवड करण्याचे पीक करून नंतर ते सत्वर जमिनीत गाडून टाकणे व पुढे सतत लागवड चालू ठेवणे हा उपाय परिणामकारक होतो. सोडियम क्लोरेट व कॅल्शियम थायोसायनेटचा विद्राव खोल नांगरटीनंतर फवारण्यापासून या तणांचा जवळजवळ संपूर्ण नाश होतो.

ग्रंथिक्षोड औषधी असते. ते मूत्रल (लघवी साफ करणारे), आर्तवजनक (विटाळ साफ करणारे), कीडनाशक, स्वेदकारी (घाम आणणारे), स्तंभक (आकुंचन करणारे), उत्तेजक असून पोटातील तक्रारींवर व मलाशयाच्या दाहावर (आगीवर) गुणकारी असते. कोकणात दुग्धस्त्राव वाढविण्यास स्त्रियांच्या छातीवर ग्रंथीझोडाचा ताजा तेप करून लावतात. त्यात बाष्पनशील (उडून जाणारे) सुगंधी तेल असते. श्रीलंकेत त्यांचा काढा ताप, अतिसार, अग्निमांद्य (भूक व लागणे) व उदरविकारांवर देतात. ग्रंथिक्षोडाचे चूर्ण उदबत्यात घालतात तसेच केसांना लावण्याच्या तेलास व कपड्यांस सुवास घेण्यास वापरतात.

 संदर्भ : 1. C. S. I. R, The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

            2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV, New Delhi, 1975.

           ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

 परांडेकर, शं. आ.