चंदनबटवा : (सुरका इं. गार्डन ओरॅक, मौंटन स्पिनॅक, सी-पर्स्लेन लॅ. ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस कुल-चिनोपोडिएसी). सु. अर्धा मी. उंचीची ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी  हिरवी पिवळट किंवा लालसर असते या झाडाला कापरासारखा वास येतो खोडावर बारीक खोबणी असतात पाने एकाआड एक व साधी खालची किंचित त्रिकोणी व शेंड्याकडची लांबट खालची बाजू जांभळट पिंगट आणि कडा साधारण दातेरी फुलोरा माठाप्रमाणे कणिशांची परिमंजरी फुले लहान द्विलिंगी व एकलिंगी प्रदलहीन, हिरवट किंवा लालसर असून ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये येतात. काहींत परिदले ३-५ व छदहीन, काहींत फक्त दोनच छदे. केसरदले ३-५ [⟶ फूल] सर्वसाधारण लक्षणे ⇨चिनोपोडिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे हिचे मूलस्थान आशिया आहे, पण यापेक्षा अधिक माहिती नाही. बियांतील पूड अ जीवनसत्त्वाभावी देतात. ही वनस्पती पालेभाजीकरिता उपयोगात आहे. संग्रहणी, मूळव्याध या विकारांवर व कृमिनाशक म्हणून उपयुक्त आहे. 

        

           पाटील, शा. दा.

भारतामध्ये ही काश्मीर, पं. बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात लावतात. या पिकाला मध्यम काळी जमीन मानवते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २०—२५ टन शेणखत घालून, कुळवून ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात आणि त्यांत हेक्टरी ४·५ किग्रॅ. बी फेकतात, मातीत मिसळतात व पाणी देतात. बी पेरल्यापासून ४—५ आठवड्यांत पीक विक्रीसाठी काढतात. हेक्टरी ४,००० ते ५,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते.

   

पाटील, ह. चिं.