सारडा : (सार्दोळ हिं. उदल क.कळसोगा लॅ. स्टर्क्युलिया व्हिलोजा कुल-स्टर्क्युलिएसी). ह्या नावाचा ⇨ कांडोळच्या स्टर्क्युलिया  ह्या प्रजातीतील एक मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष गुजरात ते द. कोकण या प्रदेशांत आढळतो. शिवाय हिमालयाच्या पायथ्याची पट्टी, म्यानमार, अंदमान व कोको बेटे येथेही त्याचा प्रसार झाला आहे. स्टर्क्युलिया प्रजातीत एकूण सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. १२ जाती आढळतात. बहुतेक जाती आग्नेय आशियात विशेषेकरून आढळतात. सारडाची बरीचशी लक्षणे कांडोळप्रमाणे व ⇨ स्टर्क्युलिएसी  (अथवा मुचकुंद) कुलवर्णनाप्रमाणे आहेत. उत्तरेत त्याची उंची (२-३मी.) मोठ्या झुडपाप्रमाणे व 

सारडा : (१) पानांसह फांदी,(२) फुलोऱ्यासह फांदी,(३) फूल.घेर सु. १ मी. असतो. कोवळे भाग लवदार असतात पाने साधी व अंशतः हस्ताकृती विभागलेली असून फांद्यांच्या टोकांस ती गर्दी करून वाढतात. पानांचे खंड ५–७ व त्यांचा व्यास ३०–४५ सेंमी. असतो. फुलोरा [ परिमंजरी ⟶ पुष्पबंध] मार्च-एप्रिल-मध्ये येतो. फुले पिवळसर असून त्यांत लाल अगर नारिंगी ठिपका आढळतो. पेटिका फळे [ पेटिकेसारखे फळाचे भाग ⟶ फळ] आयताकृती, शुष्क, चिवट व तांबूस किंवा शेंदरट लवदार असून प्रत्येक घोसात ३–५ असतात. बिया अनेक, काळ्या व चकचकीत असतात. फळे जून-जुलैमध्ये येतात. बिया फळ वाळल्यावर लगेचच पडतात व रुजतात. बिया किंवा ठोंब लावून नवीन लागवड करता येते. ह्या झाडांना हलकी व रेताड जमीन लागते, तसेच भरपूर सूर्यप्रकाशात यांची वाढ चांगली होते. उद्यानांत व रस्त्यांच्या दुतर्फा शोभेसाठी आणि सावलीकरिता ही झाडे लावतात. सालीपासून मिळणारा पांढरा गोंद पशुवैद्यकात औषधी उपयोगाचा असतो. सालीतील धाग्यांपासून कच्चे दोर व पिशव्या बनवितात, तसेच ते कागदनिर्मितीसही उपयुक्त असतात. याचे लाकूड प्रथम पांढरे आणि नंतर तपकिरी होते ते नरम व हलके असून फारसे टिकाऊ व बळकट नसते. कीटक व कवक यांपासून त्याची हानी होते. चहाच्या पेट्या, मालभरणीची खोकी, आगकाड्या, आगपेट्या, जहाजबांधणी व जळण इत्यादींकरिता लाकूड वापरतात. धाग्यांपासून रुंद पट्टे बनवून ते लाकडाचे मोठे ओंडके ओढणाऱ्या हत्तींच्या छातीवर बांधतात. बिया शिजवून किंवा भाजून खातात. फळाची साल जाळून त्यापासून रंग बनवितात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

पराडकर, सिंधू अ. परांडेकर, शं. आ.