हॅबनेरिया : पावसाळी फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨ ऑर्किडेसी कुलातील एक बहुवर्षायू प्रजाती. यामध्ये सु. ४०० जातींचा समावेश होत असून त्यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत मोठा आहे. भारतात सु. ८ जाती सामान्यपणे आढळतात. फुलातील भागांच्या पट्टीसारख्या आकारावरून त्या अर्थाचे ग्रीक नाव प्रजातीला मिळाले आहे. ‘रेन ऑर्किस’ हे इंग्रजी नाव त्याच अर्थी आहे. काही जाती बागेत लावतात, परंतु बहुतेक जाती ओलसर जागी जमिनीवर निसर्गतः वाढतात. त्या सर्व लहान ओषधी असून त्यांना भूमिस्थित खोड (२०–८० सेंमी. लांब) असते व त्यावर अखंड किंवा कधीकधी विभागलेली ग्रंथिल मुळे असतात. पाने साधी, मूलज, सपाट, कधी मांसल, कधी स्कंधोद्भव व लहान, परंतु सर्व तळाशी आवरक असतात. फुले वायवी, मंजरी किंवा कणिश प्रकारच्या पुष्प-बंधावर, तर कधी एकेकटी संदले सुटी किंवा जुळलेली व असमान, सरळ किंवा पसरट प्रदले लहान, बहुधा द्विखंडी ओष्ठ (पाकळी) सपाट किंवा लोंबता असून त्याला तळाशी आखूड किंवा लांब शुंडिका असते तसेच तो ३–५ खंडांत विभागलेला किंवा अखंडित असतो. स्तंभ आखूड बोंड सरळ व आयत किंवा लंबगोल कधी बाजूच्या पाकळ्या खंडित (झिर-मिळ्यासारख्या) असल्याने फुले शोभिवंत दिसतात. फुले मुख्यतः हिरवी–पांढरी, पिवळी-हिरवी, पांढरी-हिरवी, परंतु काही अपवादात्मक चमकदार लाल रंगाची (उदा., हॅबनेरिया सुसानी म. वाघचुरा) देखील असतात.

 

हॅ. सुसानी व हॅ. कॉमेलिनीफॉलिया या भारतीय जाती आहेत. हॅ. सुसानी या जातीचे ग्रंथिल मूळ ७–१० सेंमी. लांब फुले मोठी, पांढरीव सुगंधी असतात. ग्रंथिल मूळ खाद्य असून जंगली लोक आणि रानडुकरेते खातात. हॅ. कॉमेलिनीफॉलिया या जातीची फुले पांढरी असतात व ग्रंथिल मूळ लंबगोल किंवा दंडाकृती असून त्यापासून सलेप मिळते. हॅ. ग्रँडिफ्लोरा या जातीच्या ग्रंथिल मुळांपासूनही सलेप मिळते. ही जाती जुलैमध्ये फुलते फुले पांढरी असतात. पाने एकेक व लहान असतात. हॅ. प्लॅटिफायला ही कोकणात व देशावर आढळते ऑगस्ट-सप्टेंबरमध्येफुलते फुले सुगंधी व पांढरी असून शुंडिका अधिक लांब असते.

 

हॅबनेरिया वनस्पती सखोल पात्रात (उदा., २० सेंमी. खोलीच्या पात्रात १० सेंमी. खोलीवर ग्रंथिक्षोड लावतात) ५०% नदीतील वाळू , ४०% पालापाचोळा आणि १०% व्हर्मिक्युलाइट (तापमान नियंत्रणासाठी वापरले जाणारे एक प्रकारचे अभ्रक) वापरून वाढविता येते. उष्ण तापमानात ५०–७०% सावली व उत्तम खेळणारी हवा असल्यास ती उत्तम रीत्या वाढते. ऋतुनुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. वनस्पतींच्या समूहात ती नैसर्गिकपणे क्वचितच आढळते.

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.