चोपचिनी (हिं. चोबचिनी लॅ. स्मायलॅक्स चायना कुल-लिलिएसी). प्रतानांच्या (तणाव्यांच्या) साहाय्याने वर चढणारी ही झुडुपवजा वेल चीन, जपान, कोचीन चायना व भारत ह्या प्रदेशांत साधारण उबदार हवामानात आढळते. मुळे भक्कम व ग्रंथिल असून भूमिस्थित खोड मूलक्षोड प्रकारचे असते. वायवी फांद्या गोल व काटेरी आणि उपशाखा बिनकाटेरी असतात. उपपर्णे प्रतानरूप पानाचा देठ पेरेदार व तळ त्रिकोनी पात्यातील मुख्य शिरा तीन ते सात आणि मांडणी जाळीदार व हस्ताकृतीपाने साधी व एकांतरित (एका आड एक) असतात. फुलोरा चामरकल्प (चवरीसारखा) व सच्छद [ →  पुष्पबंध] असून त्यावर लहान एकलिंगी फुले पावसाळ्याच्या शेवटी येऊ लागतात. मृदुफळात एकदोन बिया असून पुष्क (बीजातील गर्भाबाहेरील अन्नांश) कठीण असतो. इतर सामान्य लक्षणे लिलिएसी अथवा पलांडू कुलात वर्णिल्याप्रमाणे. मुळे वाजीकर (कामोत्तेजक), स्वेदक (घाम आणणारी) आणि शामक असून जुनाट संधिवात, उपदंश व चर्मरोग यांवर उपयुक्त असतात.

 

चोपचिनी : (१) पाने, प्रताने व फुलोरा यांसह फांदी, (२) फळे आलेली फांदी, (३) स्त्री-पुष्प (बाजूस कापून बी दाखविलेले), (४) पुं- पुष्प.

बडी चोपचिनी :(सं. शुकचीना लॅ. स्मायलॅक्स ग्लॅब्रा ). ही त्याच वंशातील बिनकाटेरी जाती आसाम, सिल्हेट व खासी टेकड्या येथे आढळते. हिची मुळे ग्रंथिल असतात. पानांत फक्त तीन शिरा, पर्णतल गोलसर, पाने खालून पांढरट व देठ तळाशी आवरक (खोड वेढणारा) असतो. फुलोरा चामरकल्प फुले लहान, पांढरी शुभ्र असून इतर लक्षणे वरच्याप्रमाणे. ताज्या मुळांचा काढा जखमा व गुप्तरोग यांवर उपयुक्त आहे.  

 

गुटी :(घोटवेल हिं. जंगली औशवाह गु. उशबा सं. कुमारिका लॅ. स्मायलॅक्स झेलॅनिका ). ही मोठी वेल त्याच वंशातील  असल्याने अनेक लक्षणे समान आहेत. हिचा प्रसार जावा, श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश व भारत (हिमालय, बिहार, मध्य प्रदेश, आसाम, महाराष्ट्र इ.) ह्या प्रदेशांत, बहुतेक सर्वत्र रानटी अवस्थेत व लागवडीतही आहे. समशीतोष्ण हवामान, भरपूर पाणी व मध्यम प्रतीची जमीन ही सर्व असल्यास ती चांगली वाढते. हिचे खोड काटेरी असते. चोपचिनीप्रमाणे ही प्रतानारोही (तणाव्यांच्या साहाय्याने वर चढणारी) असून तिला ग्रंथिल मुळे व हस्ताकृती सिराल (शिरांची) पाने असतात. चवरीसारखा फुलोरा ऑगस्टमध्ये येतो. फुले एकलिंगी, पांढरट हिरवी असून संरचना व इतर सामान्य लक्षणे लिलिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ लाल व मोठ्या वाटाण्याप्रमाणे असते.

 

सार्सापरिला या औषधात हिची मुळे वापरतात आणि ते गुप्तरोगावर उपयुक्त आहे तसेच संधिवात, पाय दुखणे, आमांश इत्यादींवर मुळे उपयुक्त आहेत. कोवळा पाला भाजीकरिता वापरतात. ही वेल बागेत शोभेकरिता लावतात.

 

हाँडुरसमध्ये सापडणारी एक जाती (स्मायलॅक्स ऑफिसिनॅलिस ) व मेक्सिकोतील आणि जमेकामधील याच स्मायलॅक्स  वंशातील काही जाती यांच्या मुळांपासूनही सार्सापरिला काढतात. मुळांतील कडवट पदार्थ स्वादाकरिता वापरतात.  

जगताप, अहिल्या पां.