काणी रोग : बहुतांशी तृणधान्यांच्या कणसांवर दाण्याऐवजी कवकांची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींची) बीजाणुफळे (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग धारण करणारे अवयव) अथवा स्वतंत्र रीत्या काळी भुकटी आढळल्यास`काणी रोग’ पउला असे म्हणतात.

आ. १. बाजरीवरील दाणे काणी

तृणधान्यांशिवाय उसावर, मक्याच्या पानांवर, खोडावर किंवा फुलोऱ्यांवर, मोहरीच्या मुळांवर किंवा इतर गौण वनस्पतींच्या खोडांवरही गाठीयुक्त काणी रोगाची बीजाणुफळे आढळतात. ती फोडल्यास त्यांत काळी भुकटी आढळते. ज्यारीवर चार प्रकारांचे गव्हावर व मक्यावर दोन प्रकारांचे बाजरी, सातू, जव, राळा, नाचणी, कोद्रा, ऊस, मोहरी, कांदा व इतर पिकांवर एकाच प्रकारचा असे काणी रोग आढळतात. यां शिवाय गहू, भात इत्यादीं वर चिकटया काणी (बंट) असे काणीसारखेच अन्य रोगही आढळतात. बाह्य लक्षणांवरुन काणी रोगाचे पुढील प्रकार ओळखले जातात.

दाणे काणी : कणसात दाण्याऐवजी गोल किंवा चुरमुऱ्यासारखी टपोरी कवकाची बीजाणुफळे आढळतात. उदा., ज्वारी, बाजरी इत्यादी.

काजळी : बीजाणुफळे तयार झाल्यावर लगेच फुटल्यामुळे कणसावर काजळीसारखी भुकटी पसरते.उदा., गहू, ज्वारी, सातू इत्यादी.

झिपऱ्या काणी : कणसातील रोगट भाग रेषायुक्त, काळसर झिपऱ्यासारखा दिसतो. उदा., ज्वारी, मका.

लांबकाणी : बीजाणुफळे दाणे काणीसारखी दिसतात परंतु ती 2.5 सेंमी. पर्यंत लांब वाढतात. उदा., ज्वारी.

ध्वजकाणी : ध्वनपानावरील (कणीस ज्या पानातून बाहेर पडते त्या ध्वजासारख्या  उभ्या रहाणाऱ्या पानावरील, पोटऱ्यावरील) फुगलेल्या काळया रेषांत काळी भुकटी आढळते.

 आ. २. ज्वारीवरील काजळी

उदा., गहू. गव्हाची झाडे खुजी रहातात. पानांची पाती पिळवटली जातात व पानांच्या देठांवर करडसर काळे पट्टे उमटतात. रोगट पेशीसमूह वाळून जातात व चिरफळले जातात. रोगट झाडांना क्वचितच ओंबी येते.

चाबूककाणी:फुलोऱ्याऐवजी चाबकासारखा काणीयुक्त कोश फुटतो. उदा., ऊस.

गाठीकाणी:फुलोऱ्यावर, कणसावर, मुळावर, खोडावर काणीयुक्त गाठी येतात. उदा., मका, मोहरी. काणी रोग उस्टिलाजिनेलीझ गणातील कवकांमुळे होतो. काणीकारक कवकांचा समावेश प्रामुख्याने उस्टिलाजिनेसी कुलाच्या स्फॅसिलेथिका, उस्टिलागो, सोरोस्पेरियम, टॉलीस्पोरियम या वंशात होतो. चिकटया काणीकारक कवकांचा समावेश टिलेसिएसी कुलाच्या निलेशिया व निओव्होसिया या वंशात होतो.

दोन्ही कुलांतील काणी रोगकारक कवकांची काळी भुकटी ही विश्रामबीजाणूंची (अवर्षण किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकाव धरणाऱ्या जाड भिंत्तींच्या बीजाणूंची, क्लॅमिडोस्पोअर्स) असते व त्यांच्या रुजण्यावरुन त्यांतील भेद ओळखता येतो.

संक्रामणवउपाय:या कवकांचे संक्रामण (लागण) बियांव्दारे, हवेव्दारे, मृदेव्दारे, बियांवर व फुलोऱ्यावर पडलेल्या बीजाणूंमुळे व उसावरील डोळयामधून होते. म्हणून त्याच्या बंदोबस्तासाठी निरनिराळी उपाययोजना करावी लागते. याकरिता मळणीच्या वेळी बियाण्याच्या पृष्ठीगावर पडलेल्या बीजाणूंचा नाश करण्यासाठी पेरणीच्या वेळी एक किग्रॅ. बियाण्यास चार ग्रॅ. गंधक या प्रमाणात चोळतात किंवा वीस किग्रॅ. बियाण्यास पन्नास ग्रॅ. एक टक्का पारायुक्त कवकनाशकाची भुकटी या प्रमाणात चोळतात. उदा., ज्वारीची दाणे काणी, काजळी सातूची गुप्त काणी राळ्याची काणी. फुलोऱ्यातून बीजगर्भात संक्रामण करणाऱ्या गव्हाच्या व सातूच्या काजळीच्या नियंत्रणासाठी वियाण्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करतात किंवा ते कडक उन्हात वाळवितात. हवेव्दारे संक्रामण करणाऱ्या ज्वारीची लांब काणी, बाजरीची काणी, मक्याची गाठी काणी या रोगांच्या नियंत्रणासाठी रोगट ताटे नष्ट करतात. मृदेव्दारा संकक्रामण करणाऱ्या मका व ज्वारीच्या झिपऱ्या काणीच्या नियंत्रणासाठी रोगट कणसे नष्ट करतात व पिकांची फेरपालट करतात. उसाच्या चाबूक काणीला आळा घालण्यासाठी रोगमुक्त बेणे निवडतात आणि ते पाण्यात विरघळणाऱ्या पारायुक्त कबकनाशकाच्या विद्रावात बुडवून लावतात.

पहा:कवक नाशके.

कुलकर्णी, य.स.