काजू : काजू वृक्षाचे मूलस्थान वेस्ट इंडीज, ब्राझील इ. विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत. काजूला ब्राझीलमध्ये ‘अकाजौ’ असे म्हणतात. त्याचा फ्रेंच भाषेत ‘कॅश्यू’ असा अपभ्रंश झाला.

पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात सु. ४०० वर्षांपूर्वी (सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस) आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू असे म्हणतात. मराठीत तेच नाव रूढ झाले आहे.

काजू वृक्ष (हिं. गु. काजू; क. गेरूबी, गोडांबे, कांपू; सं. काजुतक; इं. कॅश्यूनट ट्री; लॅ. ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटेल ; कुल- ॲनाकार्डिएसी) लहान असून त्याची उंची सु. १२ मी. असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. त्याची साल जाड, खरबरीत व करडी असते. पाने व्यस्त, अंडाकृती व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान, पिवळट असून त्यांवर लालसर रेषा असतात. फांद्यांच्या टोकास ती परिमंजरीवर जानेवारी – मार्चमध्ये येतात. फळ (कपाली, काजूगर) कडक सालीचे, मूत्रपिंडाकृती असून ते हिरवट व पिवळया नारिंगी रंगाच्या, फुगीर व रसाळ पुष्पस्थलीवर (आभासी फळावर) वसलेले असते. ही दोन्ही खाद्य आहेत. फुलांची रचना आणि इतर शरीरिक लक्षणे  ⇨ॲनाकार्डिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. आभासी फहाला बोंडू असे म्हणतात. बोंडूचा रस आंबटगोड व तुरट असतो. त्यात साखरेचे प्रमाणे १२.२८%  आणि क जीवनसत्व 1.7 – 2.3 मिग्रॅ./मिलि. तसेच टूनिने, अम्ल, रंगद्रव्ये इ. असतात. रस टिकविण्यासाठी तो तापवून त्यात संरक्षक पदाथ घालतात. या रसापासून जॅम, गोळया, सरबत, सायरप, मद्य व शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. रस आंबवून ऊर्ध्वपातन केल्यास (उकळून व वाफ थंड करुन) मद्य मिळते. प्रथम ऊर्ध्वपातित द्रवास `अरक’ म्हणतात व अरक पुन्हा ऊर्ध्वपातित करुन मिळणाऱ्या द्रवास `कजेल’ म्हणतात. गोव्यामध्ये हे मद्य `फेणी’ या नावाने प्रसिध्द आहे. झाडाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) आहे. मूळ रेचक असते. बियांतील मगज (गर) पौष्टिक, शमक व वेदनाहारक असतो. सालीपासून नऊ टक्के टूनीन मिळते. तसेच एक प्रकारचा तांबूस किंवा पिवळसर डिंग मिळतो. हा डिंक जंतुनाशक असून त्याचा उपयोग पुस्तक बांधणीमध्ये तसेच कुष्ठरोग, जखमा, घट्टे इत्यादींवर करतात. सालीपासून मिळणारा दुधी रस हवेवर उघडा राहिल्यास काळा पडतो. या रसाचा कपडयांवर खुणा करावयाची न पुसणारी शाई म्हणून उपयोग करतात. फळ अतिसाररोधी असते. काजूगराच्या टरफलापासून काळसर `टरफल तेल’ मिळते. काजूगरापासूनही तेल मिळते. काजूगरातील घटक पुढील प्रमाणे आहेत : पाणी ५.९ %, प्रथिने २१.२ %, वसा (चरबी) ४६.९ %, कार्बोहायड्रेटे २२.३ % खनिजे २.४ % , कॅल्शियम ०.०५ %, फॉस्फरस ०.४९ %, काजूगराचे पोषणमूल्य ५९० कॅलरी प्रती १०० ग्रॅमला असते. लाकूड तांबूस तपकिरी रंगाचे असून बरेच कठीण असते. श्रीलंकेत व ब्रह्मदेशात त्याला मालाची खोकी, कोळसा तसेच होडया तयार करण्यासाठी उपयोग करतात. दक्षिण भारतात समुद्रकिनाऱ्यावरील जमिनीचा उध्दार करण्यासाठी काजूच्या वृक्षाचा उपयोग करतात.

आ. १. काजू – फूल व फळ : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलातील केसरमंडल, (४) फुलातील किंजमंडल, (५) रसाळ देठ व खरे फळ.

काजूची लागवड मेक्सिको, पेरु, वेस्ट इंडीज, ब्राझील, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दक्षिण भाग, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, ब्रह्मदेशाचा दक्षिण भाग, मॅलॅगॅसी (मादागास्कर), केन्या, टांझानिया, युगांडा व पोर्तुगाल येथे केली जाते. भारतात विशेषतः केरळ राज्य, महाराष्ट्रातील कोकण व त्यालगतचा कोल्हापूर जिल्हयाचा भाग, गोवा, तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व द.अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेशातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापटनम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील द. व उ. कॅनरा जिल्हे या प्रदेशांत त्याची प्रामुख्याने लागवड केली जाते. भारतात 1968-69 मध्ये काजूच्या लागवडीखाली 2.6 लक्ष हेक्टर जमीन होती असा अंदाज आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काजू लागवडीखाली आणखी 2,40,000 हेक्टर जमीन आणावयाचे उद्दिष्ट होते.

जमदाडे, ज. वि.

हवामान व जमीन : काजूचे झाड उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत वाढू शकते, परंतु त्याला थोडीशीही थंडी सहन होत नाही. यामुळे ते उत्तरेकडील प्रदेशात वाढत नाही. रेताड आणि दरसाल सु.७५-३८० सेंमी. पाऊस पडणाऱ्या भागातही चांगले वाढते. सामान्यतः काजूची लागवड समुद्रकिनाऱ्यानजीकच्या प्रदेशात केली जाते. परंतु समुद्रकिनाऱ्यापासून १६० किमी. इतक्या आत किमान तपमान ७-१०० अंश से. असलेल्या प्रदेशातही त्याची लागवड करता येते. सोसाटयाच्या वाऱ्यातही हे झाड तग धरते. द.भारतात सु.९१५ मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात त्याची लागवड केली जाते. मळीच्या खोल जमिनीत त्याची वाढ फार चांगली होते. उतारावरील हलकी जमीनही त्यास चालते. मात्र क्षार जमीन त्यास मानवत नाही.

प्रकार : काजूच्या प्रकारांना नावे दिलेली नाहीत. नवीन लागवड बियांपासून करीत असल्यामुळे काजूबियांचे एकूण उत्पादन, त्यांचा आकार, रंग तसेच बोंडांचा रंग, आकार इ. प्रत्येक झाडागणिक बदलत असतात. तरीदेखील इतक्या विविध झाडांचे बोडांच्या रंगावरुन ठोकळमानाने (1) तांबडा, (2) पिवळा आणि (3) नारिंगी छटा असे तीन वर्ग केले जातात.

लागवड : काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करुन केली जाते. इतर फळझाडांप्रमाणे डोळे भरणे, भेट कलम इ. पध्दतींनी कलमे करुन चांगल्या वाणाच्या झाडांची निर्मिती करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

रोपे तयार करण्यासाठी लागणारे बी निरोगी, एकसारख्या मोठया आगाराचे व वजनदार आणि भरपूर बी देणाऱ्या झाडांपासून मिळणाऱ्या बियांतून निवडून घेतात. तयार केलेल्या वाप्यात ह्या बिया लावतात. सामान्यतः 20 दिवसांत रोपे 10-13 सेंमी. उंच वाढतात, मग ती रोपे इतरत्र लावली जातात. पण भारतात सामान्यतः या पध्दतीने लागवड करीत नाहीत, कारण रोपे कायम जागी लावल्यानंतर त्यांच्यापैकी बरीच मरतात. यासाठी कायम जागी 45 ग 45 ग 45 सेंमी. आगाराच्या खड्डयात मे-जूनमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यावर निवडक बिया लावतात. कोकणाच्या काही भागांत माडाच्या पानांपासून बनविलेल्या टोपल्यांत रोपे तयार करुन कायम जागी टोपल्यासह लावतात. दोन रोपांमधील अंतर हे जमिनीच्या मगदुराप्रमाणे 4-9 मी. ठेवतात. प्रत्येक खड्डयात किंवा टोपल्यात दोन-तीन बिया सु.5-7 सेंमी. खोल, देठाकडचा भाग वर करुन किंचित तिरप्या लावतात. पॉलिथिलीनच्या पिशव्यांतही रोपे तयार करतात. खड्डयातील रोपे एक महिन्यानंतर विरळ करतात. एका हेक्टरात सु.250 झाडे बसवतात.

काजूचे झाड फार काटक असते. एकदा झाडाने तग धरली की, त्याची विशेष मशगत करावी लागत नाही. तीन-चार महिन्यांच्या रोपात तेलाचे प्रमाणे भरपूर असल्याने त्यास जनावरांचा त्रास होत नाही. विशिष्ट प्रकाराच्या जमिनीतील रोपांचे गुरेढोरे, शेळया, मेंढया, पाखरे, उंदीर कोल्हे इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी खड्डयाभोवती काटेरी कुंपण घालणे जरुर असते. उतारावरील रोपांना पावसाच्या पाणलोटापासून अपाय होऊ नये म्हणून खड्डयाच्या वरच्या बाजूला मातीचा बांध घालून संरक्षण देतात.

चार महिन्यानंतर व झाडे सु.60 से.मी. उंचीची झाल्यावर संरक्षणाची विशेष गरज नसते. याच वेळी कमजोर व किरकोळ रोपे काढून टाकतात. साधारणपणे लहान व कोवळया झाडांना खत किंवा पाणी देत नाहीत. पण दोन वर्षे वयाच्या झाडांना एकदोनदा पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. या वयाच्या झाडांना खत घालीत नाहीत. पाणी देण्याची सोय असलेल्या व चांगल्या प्रकाराच्या जमिनीतील काजूच्या लागवडीत, भाजीपाला किंवा कडधान्ये यांची दुय्यम पिके होतात. त्यांना दिलेल्या खतपाण्याचा काजूवर चांगला परिणाम होतो. पूर्ण वाढलेल्या झाडांना सहसा खत देत नाहीत, पण खत दिल्यास उत्पन्नात वाढ होते.

झाडाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी फुले, फळे यावयास सुरुवात होते. झाडे 7-8 वर्षांची झाल्यावर भरपूर फळे येतात. योग्य काळजी घेतल्यास ती 30-37 वर्षापर्यत भरपूर फळे देतात. योग्य काळजी घेतल्यास ती 30-37 वर्षापर्यंत भरपूर फळे देतात. खोल व चांगला निचरा असलेल्या जमिनीत ही झाडे 70 वर्षापर्यंत उत्पन्न देतात नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान त्यांना फुले येतात. परागण (परागसिंचन) झाल्यापासून दोन महिन्यांत फळे पिकतात. फुले येण्याच्या काळात ढगाळ हवा किंवा पाऊस पडल्यास फळ चांगले लागत नाही. मात्र फळ लागल्यानंतर पाऊस पडल्यास चांगले असते. सामान्यतः वर्षातून एकदा बहार येतो.

फळे पिकू लागली म्हणजे ती जशी पिकतील तशी काढून घेतल जातात. पूर्ण पक्क फळे गळून पडतात. यांपासून मिळणाऱ्या बिया, उतरुन घेतलेल्या फहांपासून मिळणाऱ्या बियांपेक्षा चांगल्या असतात. फहांपासून बिया वेगळया करतात. प्रत्येक झाडापासून मिळणारी फळे व बिया यांचे उत्पन्न निरनिराळे असते. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी 68 किग्रॅ. फळे व 9 किग्रॅ. बिया मिळतात. काही झाडांपासून 45-70 किग्रॅ. बिया मिळतात.

सबनीस, रा. प.

रोग : काजूला बरेच रोग होतात. महत्त्वाचे रोग पुढीलप्रमाणे आहेत.

रोपठयांचीकूज : हा रोग पिथियम स्पायनोसमफायटॉप्थोरा जातीच्या कवकांमुळे (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमुळे) होतो. यामुळे रोपे उगवल्यानंतर कुजतात. रोग निवारणासाठी बिया लावण्याच्या वेळी खड्डयात बोर्डो मिश्रण टाकतात.

भुरी : ओइडियम जातीच्या कवकामुळे हा रोग होतो. डिसेंबर-जानेवारी महिन्यात ढगाळ हवा पडल्यास, मोहोरावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. याचवेळी तुडतुडयांचाही उपद्रव होतो. मोहोर गळून फलोत्पादन कमी होते. दोहोंवर उपाय करण्यासाठी मोहोर दिसू लागतात १०%  बीएचसी व गंधक सम प्रमाणात घेऊन ती भुकटी मोहोरावर मारतात.

फळकूज : रायझोपस व ॲस्परजिलस जातीच्या कवकांमुळे हा रोग होतो. रोगनाशनासाठी बोर्डो मिश्रण फवारतात.

स्ललागणे : पिलिक्युलेरिया साल्मोनीकलर या कवकामुळे झाडाच्या फांद्या वरुन खाली सुकू लागतात. रोग इतर सर्व भागांत पसरुन झाड मरते. रोग निवारणाचे खात्रीचे उपाय नाहीत. तथापि रोगट झाडे उपटून जाळतात.

कीड : बी पोखरणारी अळी, बी व फळ जेथे एकमेकांना चिकटलेली असतात, त्यामधून आक्रमण करते. करवतलेल्या लाकडाच्या भुशासारखा भुसा बियांवर दिसू लागतात त्याचे अस्तित्व समजते. उपद्रव सुरु होताच प्रथमावस्थेत रोगट फळे व बिया गोळा करुन जाळतात. मूळ किडा व खोड किडा यांमुळे झाडे मरतात. त्यांच्या नाशासाठी क्रिओसोटमध्ये भिजवलेले कापसाचे बोळे मोकात ठेवतात व मेलेले किडे काढून टाकतात. बीएचसी फवारल्यास चांगले पाने खाणाऱ्या अळया व गर्दभुऱ्या फुलकिडयांचाही उपद्रव होतो. त्यांच्या नाशासाठी फॉलिडॉल किंवा बीएचसी फवारतात.

कुलकर्णी, य. स.

काजू उद्योग : भरताला परदेशी चलन मिळवून देणारा हा एक उद्योग आहे. काजूगर व तेल ह्या दोन वस्तूंची निर्यात केली जाते. काजूगराच्या आंतरराष्ट्रीय विक्रीपैकी जवळजवळ ९०%  मालाची विक्री भारतातर्फे केली जाते, पण भारतात तयार होणारे काजूचे उत्पादन येथील कारखान्यांना जेमतेम सहा महिने पुरेल एवढेच असते. कारखाने चालविण्यासाठी ब्राझील, आफ्रिका आदी प्रदेशांतून काजूची आयात करावी लागते.

आ. २. काजूबिया भाजण्याची तेल भट्टी : (१) चालक मूठ, (२) वाहकासाठी व्ही पट्ट्याची चालक योजना, (३) सर्पिल चालकाचे मोठे दंतचक्र, (४) लहान दंतचक्र, (५) कच्च्या काजूबिया भरण्याचे कंप पावणारे भरण मुख, (६) धुराडे, (७) काजूगर बाहेर पडण्याचा मार्ग, (८) तेल बाहेर पडण्याचा मार्ग, (९) भट्टी, (१०) भट्टीत जळण टाकण्याचे द्वार.

१९५३ पर्यंत आफ्रिकेतून काजूची आयात होत असे. या वेळेपर्यंत भारत काजू उद्योगात अग्रेसर होता. ह्या  कालानंतर आफ्रिकेत विशेषतः अंगोला भागात काजूगर तयार करण्याचे कारखाने सुरु झाले, ह्यामुळे आफ्रिकेतून काजू येणे बंद झाले. काजूगराच्या विक्रीत अंगोला इ. आफिकी देश प्रतिस्पर्धी म्हणून निर्माण झाले. याचा परिणाम भारतातून निर्यात होणाऱ्या काजूगरावर व तेलावर झाला.

भारतात काजूगर व टरफल तेल काढणे हा धंदा मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर चालतो. काजूगर फोडण्याचे व टरफल तेल काढण्याचे 150 कारखाने देशात आहेत. त्यापैकी 100 कारखाने क्किलॉन (केरळ) शहराच्या आजूबाजूस आहेत.

काजूचे फळ व बिया दोन्ही महत्वाची आहेत. फळापासून सरबत, सायरप व मद्य तयार करतात तर बियांपासून काजूगर, गरतेल व टरफल तेल मिळते. काजूबिया भाजून त्यातील गर वेगळा करणे हे काम कौशल्याचे आहे. काजूबिया भाजल्याने आतील गराच्या गंधात व चवीन वाढ होते. काजूबिया जरुरीपेक्षा कमी किंवा जास्त भाजल्या गेल्यास त्याचा काजूगराच्या प्रतीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काजूबिया भाजत असताना निर्माण होणारा धूर आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या तेलाच्या थेंबापासून अपाय होत असल्याने या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते.

पूर्वी काजूबिया भाजण्याचे काम लोखंडाच्या उथळ तव्यामध्ये केले जात असे. तवा विस्तवावर ठेवून काजूबिया सारख्या भाजल्या जाव्यात म्हणून त्या एकसारख्या हलवत असत. या पध्दतीतील दोष म्हणजे टरफलांपासून निघणाऱ्या तेलाचा संपूर्ण नाश होत असे. टरफलांपासून मिळणाऱ्या तेलाची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर काजूबिया भाजण्याची क्रिया मातीच्या सच्छिद्र तव्यातून केली जाऊ लागली. तव्याच्या छिद्रांतून गळणारे तेल त्याखाली ठेवलेल्या भांडयात गोळा केले जात असे या पध्दतीतही 50 टक्केच तेल मिळू शकत असे. यानंतर बिया भाजण्याकरिता छिद्रे असलेल्या फिरत्या नळकांडयांचा उपयोग करण्यात येऊ लागला. या पध्दतीत तेलाची प्राप्ती जास्त होते तरीसुद्धा बरेचसे तेल वाया जात असे.

यापेक्षाही सुधारलेली पद्धत म्हणजे `तेल-भट्टी’ पद्धत ही होय (आ.२). या पद्धतीत काजूबिया लवकर व सारख्या प्रमाणात भाजल्या जाऊन तेल जासत मिळते. यात काजूच्या टरफल तेलामध्येच बिया भाजल्या जातात. भट्टीतील तेलाचे तपमान १८७ अंश ते १९३ अंश से. एवढे असते. यातून काजूबिया जाऊ लागल्या की उष्णता व आदरता यामुळे टरफलातील तेल बाहेर येते व भट्टीमधील तेलात जमा होते याच वेळी काजूबियाही सम प्रमाणात भाजून निघतात. टरफलात साधारण १० ते १५ टक्केच तेल उरते. टरफलांपासून तेल काढण्यासाठी वाफेचा (२६० अंश ते ३७० अंश से. व २.२५ ते ९ किग्रॅ. दाब) उपयोग करण्यात यावा असेही सुचविण्यात आले आहे.

काजूबिया भाजल्यानंतर त्या फोडल्या जाऊन गर व टरफल वेगळी केली जातात. बिया फोडताना आतील गर फुटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. नंतर गरावरील दुसरे आवरण हाताने चोळून काढतात. अखंड व डाग नसलेल्या गरांना जास्त किंमत येते आणि असे गर परदेशी पाठविले जातात. हे गर घासलेट डब्याच्या आकाराएवढया (१८ लि.) डब्यात `व्हिटापॅक’ या पध्दतीने भरतात. या पध्दतीत डब्यामधील हवा काढून घेतली जाते व त्याऐवजी डब्यात कार्बन डाय ऑक्साइड वायू भरुन ते हवाबंद केले जातात. प्रत्येक डब्यात साधारण ११ किग्रॅ. काजूगर भरले जातात. काजूबिया फोडणारे एक नवीन यंत्र तयार करण्यात आलेले आहे. ते स्वस्त व चालावयास सोपे असून वर्षाला सु.५०० टन काजूबिया या यंत्राच्या साहाय्याने फोडता येतील.

काजूगर-तेल : शेंगदाण्यापासून जसे तेल काढले जाते त्याच पध्दतीने काजूगरापासून तेल काढण्या येते, पण गराची किंमत त्यापासून मिळणाऱ्या तेलापेक्षा जास्त असल्याने गर-तेल सहसा काढले जात नाही. हे तेल बदामाच्या तेलाप्रमाणेच असून पेंडीमध्ये अल्ब्युमिनॉइडाचे प्रमाणे ३३% इतके जास्त असते.

टरफल तेल : टरफलांत २५ ते ३०% तेल असते. यातील मुख्य रासायनिक घटक म्हणजे कार्डोन व ॲनाकार्डिक अम्ल होय. हयामुळे हया तेलाचा शरीरास स्पर्श झाल्यास कातडीवर फोड येतात.

मचवे, होड्या, मासे पकडण्याची जाळी, लाकूड इ. खराब होऊ नयेत म्हणून या तेलाचे आवरण देतात. तसेच निरोधक व्हार्निश, टंकलेखन यंत्राचे रुळ, मोटारीचे गतिरोधक अस्तर, रंगद्रव्ये, खुणा करावयाची शाई, रंग, व्हार्निश, जलाभेद्य वस्तू इत्यादींच्या निर्मितीत या तेलाचा उपयोग होतो. या तेलाचे उपयोग व मागणी सतत वाढत आहे.

आयात-निर्यात : विशिष्ट व मान्य केल्या गेलेल्या मानकांप्रमाणे काजूगरांची निर्यात केली जाते. यासाठी काजूगरांच्या एकूण 24 प्रती मान्य करण्यात आल्या आहेत. भारतात माल बोटीवर किंवा विमानात चढविण्यापूर्वी काजूगरांची तपासणी करण्यात येते व ते मानकाप्रमाणे असल्यासच परदेशी पाठविले जातात.

गर व टरफल तेल यांची निर्यात 1971-72 मध्ये 62.13 कोटी रुपयांची होती. पण कच्च्या मालाच्या अपुऱ्या पुरवठयामुळे त्यावर्षी पूर्व आफ्रिकेतून सु.25.34 कोटी रुप्यांचे कच्चे काजू आणण्यात आले. भारतातून काजूगरांची निर्यात जर्मनी, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, स्पेन, इराण इ. देशांत केली जाते, तर टरफल तेल इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, स्पेन, इराण इ. देशांत केली जाते, तर टरफल तेल इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदर्लंड्स, ग्रीस, द. कोरिया येथे पाठविले जाते.

काजूगर व टरफल तेल यांची भारतातून होणारी निर्यात 

वर्ष काजूगर टरफल तेल
वजन (मे. टन) किंमत (रु. लक्ष) वजन (मे. टन) किंमत (रु. लक्ष)
१९६६ – ६७ ५०,७६० ४,२८० ११,७६० २०१
१९६९ – ७० ६०,६२५ ५,७४० ८,६४३ १०२
१९७१ – ७२ ६०,६२० ६,१५० ५,६०८ ६३

काजूगर व टरफल तेल यांची भारतातून होणारी निर्यात काजूगर व टरफल तेल यांच्या निर्यातीस मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एर्नाकुलम येथे 1955 मध्ये कॅश्यू एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेची स्स्थापना केली आहे. या संस्थेतर्फे कॅश्यू बुलेटिन (मासिक) व इंडियन कॅश्यू जर्नल (त्रैमासिक) प्रकाशित करण्यात येतात. 1970 साली केंद्र सरकारने स्टेट ट्रेडिंग कार्पोरेशनचा एक उपविभाग म्हणून कॅश्यू कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची कच्चे काजू आयात करण्यासाठी स्थापना केली. या संस्थेमार्फत काजूंवर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांना आयात केलेल्या कच्च्या काजूंचा पुरवठा केला जातो.

इंडियन सेंट्रल स्पायसेस अँड कॅश्यूनट कमिटी : स्पायसेस एनक्वायरी कमिशनने 1953 मध्ये केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार काजू व मसाले या पिकांच्या धंद्यांच्या विकासाचे कार्य इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेकडे सोपविण्यात आले. या संस्थेने सप्टेंबर 1963 मध्ये इंडियन सेंट्रल स्पायसेस अँड कॅश्यूनट कमिटीची स्थापना केली व तिच्याकडे या पिकांच्या व व्यापाराच्या विकासाची कामे सोपवली. या संस्थेतर्फे स्थापिलेल्या सेंट्रल स्पायसेस अँड कॅश्यूनट रिसर्च इंन्स्टिटयूट या संस्थेत वरील पिकांसंबंधीचे वनस्पतिविज्ञान, संकरण, कृषिविज्ञान, रसायनशास्त्र, तंत्रविद्या, रोग इत्यादींवर संशोधन केले जाते. कर्नाटकात उल्लाल, तमिळनाडून वृंदाचलम, आंध्र प्रदेशामध्ये बापाटला व महाराष्ट्रात वेंगुर्ला येथे वरील संस्थेतर्फे संशोधन केले जाते.

मिठारी, भू. चिं.

संदर्भ : 1. Aiyadurai, S. G. A Review of Research on Spices and Cashewnut, Ernakulam, 1966.

2. Hayes, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.

3. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

४. नागपाल, र. ला.; अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडींची तत्त्वे आणि पद्धती आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती, नवी दिल्ली, १९६३. ५. परांजपे, ह. पु. फळझाडांचा बाग , पुणे, १९५०.

चित्रपत्र :

काजू