नाचणी : (१) पर्णतलाने वेढलेले खोड, (२) पाने, (३) फुलोरा (कणिशांचा झुबका), (४) फळ.

नाचणी : (नागली हिं. मंडुआ, माक्रा, रोतका गु. बावटो क. रागी सं. राजिका, नर्त्तका इं. फिंगर मिलेट, आफ्रिकन मिलेट लॅ. इल्युसाइन कोरॅकोना कुल–ग्रॅमिनी). ही वनस्पती (गवत) मूळची आफ्रिका खंडातील असून नंतर उष्ण कटिबंधातील इतर देशांत पिकविली गेली आहे. इंडोनेशिया ते आफ्रिका या प्रदेशात आता ती पिकविली जाते. चौथ्या व पाचव्या शतकांत लिहिलेल्या द्रविड वाङ्‌मयात‘रागी’चा उल्लेख आला आहे. सुश्रुतसंहितेत (तिसऱ्या शतकात) ‘राजिका’चा अंतर्भाव शाकवर्गात केलेला आढळतो. याचा अर्थ तत्पूर्वी तिचा प्रवेश भारतात झाला असावा किंवा ती भारतीय असावी. हल्ली भारतात सर्वत्र तथापि विशेषतः घाटमाथ्यावर हलक्या जमिनीत जास्त पावसाच्या भागात व कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात येथे लागवडीत आहे. ही वर्षायू (एक वर्षभर जगणारी) ओषधी [→ओषधि] ०·६–१·२मी. उंच असून तळाशी अनेक खोडांचा झुबका असतो. प्रत्येक खोड साधारण अंगठ्याइतके जाड व काहीसे चपटे असते. पाने अरुंद व लांब असून त्यांचा आवरक तळभाग खोडाला वेढून राहतो खोडाच्या शेंड्यावर ४–६जाड, सरळ किंवा वाकड्या कणिशांचा झुबका [फुलोरा →पुष्पबंध] असतो. प्रत्येक कणिश १२–१५ X१·२सेंमी. असून कणिशके सु. ७०व प्रत्येक कणिशकात ३–१२द्विलिंगी फुले (पुष्पके) असतात. फुलात लघुतुषे दोन, केसरदले तीन कणिशकात ४–७बिया, बी गोलसर, पिंगट, १–२मिमी. व्यासाचे व फार लहान असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी कुलात (तृण कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नाचणीचे बी हे खाद्य धान्य असून त्याची भाकरी व आंबील करतात. ते पौष्टिक, किंचित कडसर, थंड व पित्तशामक, पचनास जड पण श्रमजीवी वर्गास फार चांगले असते. ते स्तंभक (आकुंचन करणारे) असते. मधुमेह असणाऱ्या रोग्यांस ते चांगले असते. चारा गुरे खातात. हे धान्य किडीपासून सुसंरक्षित असल्याने बराच काळ टिकून राहते. नाचणीचे पोषणमूल्य तांदळापेक्षा अधिक व सर्वसाधारणपणे गव्हाइतके असते. तीमध्ये जलांश १३·१%, प्रथिन ७·१%, मेद १·३%, खनिजे २·२%, कार्बोहायड्रेटे ७६·३%असतात शिवाय अ, बआणि निकोटिनिक अम्ल ही जीवनसत्त्वे असतात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह, आयोडीन व गंधक ही सर्व भरपूर असतात [→गॅमिनेलीझ गवते].

ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ. 

वर वर्णन केलेली लागवडीखालची नाचणी ही इल्युसाइन इंडिका ह्या नाचणीच्या रानटी जातीपासून उगम पावली असावी  असे समजतात. भारत, आफ्रिका, मॅलॅगॅसी, श्रीलंका, चीन व जपान हे नाचणी पिकविणारे देश आहेत. भारतामध्ये १९६९—७०साली नाचणीखाली २७,८३,४००हे. क्षेत्र होते. त्यापैकी ४३·१%म्हैसूर (कर्नाटक) राज्यात, १३·१% तमिळनाडूत, १२% आंध्र प्रदेशात ८·८% उत्तर प्रदेशात, ७·५% महाराष्ट्रात व बाकीचे १५·५% बिहार, ओरिसा, गुजरात वगैरे राज्यांत होते.

हवामान, जमीन, खते इत्यादी : नाचणीस उष्ण हवामान मानवते. तांबडवट, फिक्कट व राखी रंगाच्या जमिनीत नाचणी चांगली येते. बी मुठीने जमिनीत फोकून, पेरून किंवा रोपे लावून लागण करतात. हेक्टरी २५–५०किग्रॅ. बी लागते. महाराष्ट्रात रोपे तयार करून लावतात. लागणीत २५सेंमी. अंतरावरील नांगराच्या सऱ्यांत २०सेंमी. अंतरावर रोपे टाकीत जातात. प्रतिकूल परिस्थितीतही रोप ताबडतोब मूळ धरू शकते. या पिकाला खत देण्याची प्रथा नाही पण हेक्टरी ८००–१,०००किग्रॅ. मासळीचे खत किंवा ५०किग्रॅ. नायट्रोजन अमोनियम सल्फेटामधून आणि १०किग्रॅ. फास्फोरिक अम्ल दिल्यास उत्पन्न वाढते. हे पीक पावसाच्या पाण्यावर घेतात.

सुधारलेले प्रकार : बी–११ (हळवा), इ–३१ (निमगरवा) आणि ए–१६ (गरवा). नाचणीच्या तांबूस व पांढऱ्या दाण्यांच्या प्रकारांपैकी पांढऱ्या प्रकारांचे दाणे जास्त पौष्टिक असतात.

तत्त्ववादी, गो. रा.

रोग : करपा, काणी, पानावरील ठिपके व केवडा हे रोग नाचणीवर पडतात.

करपा : हा रोग पायरीक्यूलेरिया एल्युसिनी या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. त्यात राखाडी रंगाचे डाग कणसाच्या खालील भागावर आढळतात. त्यामुळे कणसात दाणे चांगले भरत नाहीत. लहान रोपे रोगाला लवकर बळी पडतात. ५ : ५ : ५०बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात.

काणी : हा रोग मेलॅनोप्सिकियम एल्युसिनीस या कवकामुळे होतो. त्यात कणसातील काही दाण्यांचे काणीयुक्त बीजाणुफळांत रूपांतर होते. रोग तुरळक आढळतो. उपाय म्हणून रोगट कणसे काढून नष्ट करतात.

पानावरील ठिपके : हा रोग हेल्मिंथोस्पोरियम नोड्यूलोजम या कवकामुळे होतो. यामुळे पानावर तपकिरी ठिपके पडतात. याकरिता बी पेरण्यापूर्वी बियांवर ॲग्रोसानची क्रिया (१ : ४००) करून घेतात.

केवडा : हा रोग स्क्लेरोस्पोरा मॅक्रोस्पोरा या कवकामुळे उद्‌भवतो [→ज्वारी बाजरी].

कीड : नाचणीवरील महत्त्वाची कीड म्हणजे सुरवंट होय. याच्या पतंगांचा नाश करणे हाच उपाय आहे.

रुईकर, स. के.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.