फुलकोबी : (फुलवर गु. फुलकोबी हिं. फूल गोभी इं. कॉलिफ्लॉवर लॅ. ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार बॉट्रिटीस कुल-क्रुसिफेरी). या द्विवर्षायू (जीवनक्रम पूर्ण होण्यास दोन हंगामांची आवश्यकता असणाऱ्या) ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतीचे मूलस्थान भूमध्य समुद्राच्या आसपासचा प्रदेश असून हल्ली तिचा प्रसार जगभर सर्वत्र झाला आहे. सर्वच ब्रॅ. ओलेरॅसियातील प्रकारांचा उगम यूरोपीय आहे, फुलकोबी : पानांसह फुलोराअसे हल्ली मानतात. तिचे खोड लहान असून जमिनीत राहते. फुलोरा मोठा व अग्रस्थ (टोकावरचा) असून तो प्रथमतः जाडसर पानांनी वेढलेला असतो. मागाहून तो खूपच वाढतो व त्याच्या शाखा, देठ व असंख्य वंध्य (रूपांतरित) कळ्या मांसल बनतात. चवदार भाजीकरिता ह्या गड्ड्यासारख्या भागाचा दिवसेंदिवस उपयोग वाढत असल्याने त्याची लागवड वाढत आहे. त्याचे लोणचेही करतात. ही वनस्पती नवलकोल, सलगम, कोबी यांच्या वंशातील व ⇨ क्रुसिफेरी कुलातील (मोहरी कुलातील) असल्याने अनेक शारीरिक लक्षणांत त्याच्याशी तिचे साम्य आहे [⟶ कोबी नवलकोल].

क्षीरसागर, ब. ग.

हवामान व जमीन : सर्वसाधारणपणे थंड व दमट हवेत फुलकोबीचे गड्डे सर्वांत चांगले पोसतात परंतु काही प्रकार पुरेशा उष्ण हवामानात वाढू शकतात. या पिकाला मासिक सरासरी तापमान १५°- २२° से. मानवते (सरासरी कमाल तापमान २५° से. आणि सरासरी किमान तापमान ८° से.). हळव्या प्रकारांना यापेक्षा जास्त तापमान व दीर्घ सूर्यप्रकाश असलेले हवामान लागते. कोबीपेक्षा हे पीक कमी काटक आहे. भारताच्या सर्व भागांत या पिकांची लागवड होते परंतु देशाच्या वायव्य भागात ती विशेष प्रमाणावर होते. हळव्या प्रकारांचा गड्डा भरण्यास २५° से. तापमान लागते. जमीन चांगल्या निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असलेली व सुपीक असावी. फार अम्लीय जमीन या पिकाला मानवत नाही. जमिनीचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ५·५ ते ६·६ च्या दरम्यान असावे.

प्रकार : फुलकोबीचे हळवे, निमगरवे व गरवे प्रकार लागवडीत आहेत. हवामानाप्रमाणे योग्य अशा प्रकारांची लागवड करणे आवश्यक असते. तसे न केल्यास गड्डा योग्य रीतीने पोसत नाही. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (नवी दिल्ली) लागवडीसाठी शिफारस केलेले प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

हळवे प्रकार : अर्ली कुंवारी व पुसा कातकी हे यांतील प्रमुख प्रकार आहेत. हाजीपूर अर्ली, पुसा दीपाली, अर्ली पाटणा आणि अर्ली मार्केट हे इतर सुधारित प्रकार आहेत. या प्रकारांचे गड्डे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत तयार होतात.

निमगरवे प्रकार : जायंट स्नोबॉल आणि पाटणा स्नोबॉल हे या गटातील प्रमुख प्रकार आहेत. त्यांचे गड्डे हिमासारखे पांढरे व मोठे असतात. हिस्सार-१, ९६-डी, अगहानी, पाटणा मेन क्रॉप, स्नोबॉल आणि इम्प्रूव्हड जपानीज हे या गटातील इतर महत्त्वाचे प्रकार आहेत. गड्डे सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत तयार होतात.

गरवे प्रकार : स्नोबॉल-१६, दांता कालिंपाँग, स्नोबॉल टाइप (ई.सी. २९०८१, ई.सी. २९०१९, स्नोड्रिफ्ट व ई.सी. २८७५२), कालिंपाँग स्नोबॉल, ई.सी. १२०१२ व १२०१३, पुसा स्नोबॉल-१ आणि पुसा स्नोबॉल-२ हे प्रमुख प्रकार आणि सिल्व्हर किंग व चायना पर्ल हे इतर प्रकार आहेत. गड्डे जानेवारीच्या मध्यापासून एप्रिलपर्यंत तयार होतात.

हळव्या प्रकारांचे गड्डे लहान असून त्यांच्यावर पिवळसर रंगाची छटा असते. निमगरव्या प्रकारांचे गड्डे सर्वांत मोठे, परंतु ते निस्तेज पांढरे असतात. गरव्या प्रकाराचे गड्डे भरलेले व दुधाळ रंगाचे असतात.

रोपे तयार करणे : गादी वाफ्यात बी पेरून रोपे तयार करतात. हळव्या प्रकारांची पेरणी मेच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत, निमगरव्या प्रकारांची जुलै-ऑगस्टमध्ये आणि गरव्या प्रकारांची सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत करतात. हळव्या प्रकारांसाठी हेक्टरी ६०० ते ७५० ग्रॅ. आणि गरव्या प्रकारांसाठी ३७५ ते ४०० ग्रॅ. बी. लागते.

रोपांची लागण : हंगामावर अवलंबून, ४ ते ६ आठवडे वाढलेल्या रोपांची लागण करतात. दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर हे जमिनीची सुपीकता, हंगाम,  फुलकोबीचा प्रकार आणि बाजारात कोणत्या आकारमानाच्या गड्ड्यांना मागणी जास्त असते या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. लहान अगर मध्यम आकारमानाच्या गड्ड्यांना मागणी असल्यास झाडे कमी अंतरावर लावतात. सर्वसाधारणपणे हळवे प्रकार ४५ सेंमी. X ४५ सेंमी. अंतरावर व गरवे प्रकार ६० सेंमी. X ४५ सेंमी. अंतरावर लावतात. हे पीक स्वतंत्रपणे अगर कोबी व नवलकोल यांबरोबर मिश्र पीक म्हणून घेतात.

खत : लागणीपूर्वी ३ आठवडे हेक्टरी १२ ते २० टन शेणखत अगर कंपोस्ट, लागणीच्या वेळी हेक्टरी ६० किग्रॅ. नायट्रोजन, सु. ८० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ४० किग्रॅ. पोटॅश आणि लागणीनंतर सहा आठवड्यांनी ५०-६० किग्रॅ. नायट्रोजन देतात.

आंतरमशागत व पाणीपुरवठा : या पिकाची मुळे जमिनीच्या वरच्या थरात ४५-६० सेंमी.पर्यंत खोल असतात. त्यामुळे खोल आंतरमशागत करीत नाहीत. कारण तसे केल्यास मुळांना इजा पोहोचते व गड्डे लवकर धरतात. वरच्या थरातील माती हालवून भुसभुशीत ठेवतात. लागणीपासून ४ ते ५ आठवड्यांनी झाडांना भर देतात. या पिकाला सतत पाण्याचा पुरवठा करणे फार आवश्यक आहे. हळव्या पिकाला आठवड्यातून दोन वेळा आणि गरव्या पिकाला १० ते १५ दिवसांनी एकदा पाणी देतात. हळव्या पिकाच्या अखेरीस आणि निमगरव्या पिकाच्या सुरूवातीला जर पावसाने ताण दिला, तरच पाणी देण्याची आवश्यकता असते. पाणी कमी पडल्यास गड्डे योग्य वेळेपूर्वीच धरतात.

       ड्डे झाकणे : सूर्यप्रकाशात गड्ड्यांचा रंग स्वच्छ पांढरा राहत नाही. यासाठी विशेषकरून हळव्या व  निमगरव्या प्रकारांचे गड्डे गरम हवेत २ ते ३ दिवस आणि थंड हवेत ६-१२ दिवसांपर्यंत बाहेरील पानांनी झाकून घेतात. गरव्या प्रकारात बाहेरील पाने आत वळल्यामुळे             गड्डा आपोआपच झाकला जातो.

     काढणी, साठवणी व उत्पन्न: फुलांचे गड्डे चांगले पोसल्यावर परंतु त्यांची प्रत बिघडण्यापूर्वी, ते काढणे आवश्यक असते. रोपे लावल्यापासून गड्डे तयार होण्यास २ ते ४ महिने लागतात. चांगल्या प्रतीचा गड्डा घट्ट आणि एकसारखा असतो. उष्ण हवामानात गड्ड्यातील          फुलांचे भाग वाढून वर येतात अथवा गड्ड्यामध्ये पानांची वाढ होते. अशा प्रकारच्या गड्ड्यांना योग्य भाव मिळत नाही. सर्वसाधारणपणे मध्यम आकारमानाच्या गड्ड्यांना बाजारात जास्त मागणी असते. पानासहित गड्डे ०° से. तापमान व ८५ ते ९०% सापेक्ष आर्द्रता              असल्यास ३० दिवसांपर्यंत शीतगृहात ठेवता येतात.

     हेक्टरी २०,००० ते ३०,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते. हळव्या प्रकारांचे उत्पन्न कमी मिळते परंतु निमगरव्या प्रकारांचे उत्पन्न सर्वांत जास्त मिळते.

     फुलकोबीत ९१·७% जलांश, २·४% प्रथिन, ०·२% वसा (स्‍निग्धांश), ४·९% कार्बोहायड्रेट आणि ०·९% लवणे असतात. १०० ग्रॅम खाद्य भागापासून ३० कॅलरी ऊर्जा मिळते. त्यात अ आणि ब जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आणि ब आणि क जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात                  असतात. 

     रोग व कीड : या विषयीच्या माहितीकरिता ‘कोबी’ ही नोंद पहावी.

पाटील, ह. चि. गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.

            2. Thompson, H. C. Kelly, W. C. Vegetable Crops, New York, 1957.