शेंजी : (इं. इंडियन क्लोव्हर, स्वीट क्लोव्हर लॅ. मेलिलोटस पार्व्हिफ्लोरा, कुल-लेग्युमिनोजी). हे चाऱ्याचे पीक उत्तर भारतात लागवडीत आहे. कोरोमंडल किनाऱ्यावर ते हिवाळी तण म्हणून वाढते. द्वीपकल्पीय भारतात त्याची लागवड यशस्वी झाली नाही. सिंध-पंजाबात ते लोकप्रिय आहे. ते १·२ मी. उंच वाढते. खोड दंडाकृती व पोकळ असते. पाने त्रिदली असून पर्णके ⇨ बरसीमसारखी असतात. फुले पांढरी किंवा पिवळी. शेंग गोलसर असून तीत एक बी असते. बी लहान दीर्घवृत्ताकृती व तपकिरी पिवळ्या रंगाचे असते.

शेंजी मुख्यतः हिवाळी पीक असून उत्तर भारतात बागायती पीक म्हणून घेतात. याला दुमट किंवा गाळाची जमीन चांगली मानवते. त्याला पाण्याच्या २-३ पाळ्या पुरेशा होतात. पंजाबात शेंजी व ऊस अशी पिकाची फेरपालट करतात.

जमीन चार–सहा वेळा उभी-आडवी नांगरून तयार करतात. तीन हेक्टरी २०–२५ टन शेणखत मिसळून घेतात, तसेच ६७ किग्रॅ. फॉस्फरस व २२ किग्रॅ. नायट्रोजन मिळेल एवढे सुपर फॉस्फेट व अमोनियम सल्फेट देतात. हेक्टरी २५–३५ किग्रॅ. टरफल काढलेले किंवा ४५–५६ किग्रॅ. टरफल न काढलेले बी हाताने फेकून पेरतात. बी बारीक असल्यामुळे त्यात माती मिसळून पेरणी करतात. ती ऑक्टोबर महिन्यात केली जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात हेक्टरी ६७–८९ क्विंटल ओला चारा मिळतो.     फलधारणेला सुरुवात झाल्यावर याची कापणी करतात. लवकर कापणी करून जनावरांना खाऊ घातल्यास पोटफुगी होण्याची भीती असते. हा सकस चारा जनावरे आवडीने खातात. बरसीम व लसूणघासापेक्षा यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्याचे उत्पन्नही कमी येते व त्याची एकच कापणी होते. बियांसाठी पीक घेतल्यास हेक्टरी २५०–३०० किग्रॅ. बियांचे उत्पन्न येते.                                            

चव्हाण, ई. गो.