शेतकामाची अवजारे व यंत्रे : शेतीची कामे, तिचे संधारण आणि सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामग्री यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मानवी श्रम वाचविण्यासाठी प्राचीन काळात लावण्यात आलेल्या शोधांची संख्या थोडीच होती. नाईल व पो नदयांच्या खोऱ्यांसारख्या समृद्ध क्षेत्रांतच शेतीचा उत्कर्ष झालेला आढळतो. कारण तेथेच सधन शेती होत असे.

हाताने वापरावयाचे फावडे व कुदळ, माणसाने वा बैलामार्फत ओढावयाचा वाकड्या काठीचा नांगर वा ब्रशासारखे ओढावयाचे अवजार ही साधने माणसाने वस्ती करून शेती करायला सुरूवात केल्यानंतर पाच हजार वर्षे वापरात होती. अगदी धातूंचा शोध लागल्यावरही धातूचे कुदळ, फावडे, नांगर व इतर अवजारे यांचे थोडेच शोध पुढे आले. ईजिप्तमधील तसेच गीक व रोमन लोकांनी शेतीच्या अवजारांमध्ये अगदीच थोड्या सुधारणा केल्या. अमेरिकेतील मूळ संशोधकांनीही रोमन लोक वापरीत असलेल्या अवजारांसारखी लाकडी अवजारे बनविली (१७००).

शेतीमधील यांत्रिक युगाची उत्कांती ही उदयोगातील व वाहतुकीतील उत्कांतीच्या बरोबर झाली. मात्र विसाव्या शतकापर्यंत हाताने वापरावयाच्या अवजारांऐवजी यंत्रांचा वापर व्यापक प्रमाणात झाला नव्हता. अजूनही जगातील मोठया भागात हातात कुदळ घेतलेला माणूस हा शेतजमीन कसणाऱ्या माणसाचे प्रतीक म्हणून राहिला आहे.

नांगरामधील सुधारणा १६०० सालापर्यंत अगदी मंद गतीने होत होती. त्या काळात काही ब्रिटिश जमिनदारांनी नांगरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जेथ्रो टल (१६७४-१७४१) यांनी १७३३ च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीच्या मशागतीचा प्रचार केला. अठराव्या शतकात यानंतर टॉमस जेफर्सन यांनी अगदी चांगल्या नांगरटीचा पुरस्कार केला. १८१४ सालामध्ये जेथ्रो वुड (१७७४-१८३४) यांनी एका नांगराचे एकस्व (पेटंट) घेतले. या नांगरात लाकडी फाळावर अनेक लोखंडी खंड आच्छादले होते. असा लोखंडी खंड (तुकडा) जमीन नांगरताना दगड मधे आल्याने तुटला तर सहजपणे बदलता येत असे. तथापि विशेषकरून प्रेअरी प्रदेशातील [→ गवताळ प्रदेश] राज्यांमधील कठीण शेतजमिनीसाठी अधिक चांगल्या नांगराची आवश्यकता होती.

सुमारे १८३३ साली जॉन लेन (न्यूयॉर्क राज्य), जॉन डिअर (१८०४-८६ इलिनॉय) व जेम्स ऑलिव्हर (१८२३-१९०८ इंडियाना) यांनी ओतीव घडीव पत्र्यापासून कार्यक्षम पोलादी नांगर तयार केला. हा जमीन भुसभुशीत करणारा नांगर १८७० सालापर्यंत प्रमाणभूत झाला. दाट झाडीखाली फिरण्यासाठी लागणाऱ्या लोळण फणासारख्या जोडण्या कधीकधी नांगराला बसवीत.

अमेरिकेतील यादवी युद्धानंतर शेतजमिनीसाठी वापरावयाची इतर यंत्रसामगी वापरात आली. यामध्ये पोलादी कुळव (वखर), तव्यांचा नांगर, १८५६ साली एकस्व दिलेले कोळपे व दातेरी वखर यांचा अंतर्भाव होता. दातेरी वखर पोलादी होते व कचरा निघून जावा म्हणून दाते तिरपे करण्याची सोय (प्रयुक्ती) त्यात होती. कर्षक व लाट ही अवजारे आधीपासून सामान्य वापरात होती. इंग्लंडमधील टल यांनी ओळीत बी पेरण्यासाठी पहिली पाभर तयार केली. मात्र हे यंत्र तयार केले म्हणून त्यांच्याकडील कामगारांनी त्या शोधाच्या निषेधार्थ संप केला होता.

अमेरिका हा देश १८०० सालानंतर शेतकामाच्या यंत्रांचा विकास करणारा आघाडीवरील देश झाला. तेथे इंग्लंड व यूरोप खंडातील इतर देशांमधून आलेल्या कल्पनांमध्ये अमेरिकेतील संशोधकांनी सुधारणा करून हे साध्य केले होते. १६०० सालापासून काही प्रकारची कापणी यंत्रे वापरात होती. मात्र इंग्लंडमधील पॅट्रिक बेल, तसेच अमेरिकेतील ओबद हसी व सायरस हॉल मॅक्कॉर्मिक यांनी लावलेले शोध सु. १८५० सालापर्यंत मोठया प्रमाणावर वापरात आले नव्हते. मॅक्कॉर्मिक यांनी कापणी उदयोग स्थापन केला आणि तो जगभर पसरला. त्यांनी यातील सुधारणा स्वीकारल्यामुळे त्यांची यंत्रे शंभर वर्षे आघाडीवर राहिली.

अमेरिकेमध्ये १८७० ते १९१० या काळात शेतकामाच्या यंत्रांचा वापर करण्यात हळूहळू पण स्थिर अशी प्रगती होत गेल्याचे आढळते. १९१० सालानंतर ⇨ यांत्रिक शेतीमध्ये वेगाने बदल झाले. १९५० पासून अमेरिकेतील कृषी उत्पादन जवळजवळ संपूर्णपणे यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागले. शेतकामाकरिता मध्यम आकारापासून ते मोठी यंत्रे तयार करण्यात आली. मोठया आकाराची शेती आणि भांडवल असलेल्या ठिकाणी मोठी यंत्रे आणि ट्रॅक्टर यांचा कृषी उत्पादनाकरिता सर्रास वापर होऊ लागला.

विकसनशील देशांतील शेतीत काही तुरळक क्षेत्रात यांत्रिकीकरण झालेले आहे. भारत व मध्यपूर्वेतील देश, आफिका आणि लॅटिन अमेरिका या ठिकाणी शेतकामाकरिता लहान व मोठी यंत्रे आणि ट्रॅक्टर यांचा संमिश्र वापर करण्यात येतो. भारतात लहान आकाराची शेती, जलसिंचित जमिनीचे एकंदर लागवडीखाली असलेल्या क्षेत्राशी अल्प प्रमाण यांमुळे यंत्रसज्ज शेतीचे प्रमाण अल्पच आहे.

शेतकामाकरिता पुढील प्रकारची यंत्रे वापरण्यात येतात : ट्रॅक्टरचलित (कर्षित्रचलित)२४-फूट थाळी असलेला नांगर तण काढण्याकरिता आठ ओळींचा कल्टिव्हेटर भात व गहू यांकरिता संयुक्त कापणी व मळणी यंत्र (कम्बाइन) खत विस्कटणारे यंत्र वाफे तयार करणारे व खत घालणारे बहुउद्देशीय यंत्र ड्रिलच्या साहाय्याने शेतजमिनीत बी टोकून ते मातीने झाकणारे यंत्र वेल कापून त्यातील फळे गोळा करून चांगली फळे ट्रकमध्ये भरणारे टोमॅटो हार्वेस्टर यंत्र द्राक्ष फळांसारख्या वेलांवरील फळांचे घड गोळा करून वाहक पट्ट्याव्दारे ट्रकमध्ये भरणारे यंत्र शेतातील उसाची तळाशी व वरील बाजूला तोडणी करून आणि त्याची पाने काढून उसाच्या कांड्या गोळा करणारे यंत्र बटाट्याचे पीक खणून मातीतून बाहेर काढून स्वयंचलित रीत्या ट्रकमध्ये भरणारे पोटॅटो कम्बाइन यंत्र बीट पिकाची पाने काढून टाकल्यानंतर जमिनीतून मगजयुक्त मुळे गोळा करणारे यंत्र शेतामध्ये यांत्रिक रीत्या कापसाची बोंडे गोळा करणारे यंत्र कीटकनाशक औषधाची फवारणी करणारे यंत्र इत्यादी. यांपैकी काही यंत्रांची छायाचित्रे चित्रपत्रांमध्ये दिलेली आहेत.

भारत : भारतीय शेती पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जात आहे. हवामान, जमिनीचा प्रकार इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. ढोबळपणे नांगर, मैंद, कुळव, केणी, पाभर, कोळपी यांसारखी अवजारे आणि विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.

पुरातन काळापासून पारंपरिक पद्धतीने शेतकामासाठी वापरण्यात येणारी अवजारे आणि साधने काही जड तर काही हलकी असतात. माणसांकडून आणि जनावरांकडून या अवजाराद्वारे शेतीची वेगवेगळी कामे करून घेतली जातात. आजही त्यामध्ये विशेष असा बदल झालेला आढळत नाही. पूर्वीप्रमाणेच ती अवजारे बाभूळ, खैर, सागवान इ. स्थानिक उपलब्ध लाकडापासून बनविली जातात. खेड्यातील सुतार व लोहार यांसारखे कारागीर त्यांची जडणघडण व दुरुस्ती करतात. आजच्या आधुनिक युगात या पारंपरिक अवजारांमध्ये काही सुधारणा घडवून आणून ती शेतीला अधिकाधिक उपयुक्त कशी बनविता येतील याबाबत तंत्रज्ञांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

साधारणतः वापरल्या जाणाऱ्या अवजारांत अडचण उत्पन्न होईपर्यंत सुधारणा करण्याची प्रवृत्ती होत नाही. सद्य परिस्थितीत शेतमाल जास्त प्रमाणात प्रतिहेक्टर व प्रतिक्विंटल कमी खर्चात उत्पन्न करण्याची निकड अपरिहार्य बनल्यामुळे इतर कारागिरांप्रमाणे शेतकऱ्यालाही आपली कार्यक्षमता वाढविण्याकरिता सतत सुधारलेल्या अवजारांचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर शेतकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांच्या दर्जाच्या सुधारणेकडे लक्ष देणेही अत्यावश्यक बनले आहे. ह्याखेरीज उपलब्ध होणारी यांत्रिक अवजारेही वापरणे आवश्यक व किफायतशीर ठरत आहे.

भारतातील मशागतीची बहुतेक सर्व पारंपरिक अवजारे जनावरांकडूनच ओढली जातात. यासाठी प्रामुख्याने बैलांचा वापर केला जातो. जनावरांमध्येही शास्त्रोक्त पद्धतीने सुधारणा घडवून आणणे हीसुद्धा आवश्यक बाब ठरली आहे.

शेतकामाची अवजारे ओढण्यासाठी लागणाऱ्या ताकदीचे-ओढीचे-मापन केले असता असे आढळून आले की, ऋतुमान, जमिनीचा प्रकार इ. घटकांवर ही ताकद अवलंबून असते. पाश्चात्त्य देशांत घोड्यांवर प्रयोग केल्यानंतर असे लक्षात आले की, घोडा आपल्या वजनाच्या एकदशांश इतकी ताकद ओढण्याच्या कामी देऊ शकतो. निरनिराळ्या जातींच्या आणि वजनांच्या बैलांपासून अवजारे ओढण्यास उपलब्ध होऊ शकणाऱ्या ताकदीचे मापन केले असता असे आढळून आले आहे की, स्थूलमानाने बैलसुद्धा याच प्रमाणात ताकद देऊ शकतात.

भारतात शेती अवजारे ओढण्यासाठी मुख्यतः वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या जाती, त्यांची सरासरी वजने यांची माहिती तसेच निरनिराळी अवजारे ओढण्यास लागणारी सरासरी ओढ याबद्दलची माहिती पुढे दिलेली आहे.

शेती अवजारे ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या जाती
बैलांच्या जाती मुख्य स्थान वजन (किग्रॅ.) शेरा
खिलार सातपुडा ४००-५०० काटक, हलक्या ओढीच्या कामाला उपयुक्त.
डोंगरी / डांगी नासिक ४५०-५५० काटक, भारीकामाला चांगले.
गीर गुजरात ४५०-५५० काटक, मंद कामाला चांगले.
निमाडी मध्य प्रदेश ४७५-५५० सर्व प्रकारच्या कामाला चांगले.
अमृत महाल म्हैसूर ४००-५०० चपळ, काटक.
कृष्णाकाठी मिरज, सांगली ६००-९०० ओझ्याच्या व जड कामास चांगले.
काँकेज गुजरात ६००-७०० काटक, चपळ.
माळवी माळवा ४७५-५२५ सशक्त,काटक,मध्यम प्रकारच्या कामास चांगले.
ओंगळ चेन्नई (तमिळनाडू) ५००-८०० म ध्यम ओझ्याच्या कामाला चांगले.

अवजारांना लागणारी सरासरी ओढ : (१) हलका नांगर ६७-६८ किग्रॅ.; (२) मध्यम नांगर ९०-९९ किग्रॅ.; (३) भारी नांगर १५० पेक्षा जास्त किग्रॅ.; (४) कुळव ५४-९० किग्रॅ.; (५) पाभर ५४-८१ किग्रॅ.; (६) कोळपे ४५-५० किग्रॅ.

नांगर, कुळव, पाभर, कोळपे, मळणीची साधने इ. देशी अवजारांत विशिष्ट प्रदेशातील पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार, पीक पद्धती, उपलब्ध जनावरांची परिस्थिती इत्यादींप्रमाणे पुष्कळशी तफावत आढळते. विभागवार अवजारांची नावेसुद्धा वेगवेगळी आढळतात. या बाबी लक्षात घेऊन अवजारांसंबंधी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. यामध्ये अवजारांची वर्गवारी मशागतीच्या प्रकारानुसार करणे सोयीचे असल्याने तशी वर्गवारी करणे योग्य ठरते.

पेरणीपूर्व मशागतीची अवजारे : पेरणीपूर्व मशागतीमध्ये शेतीची नांगरणी करणे हे फार महत्त्वाचे काम आहे. याकरिता पूर्वापारपासून देशी किंवा लाकडी नांगरांचा वापर केला जातो. विभागानुसार वेगवेगळे नांगर वापरले जात असल्याने त्यांना नावेही तशीच आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार नांगरांच्या आकारात आणि वजनात खूपच तफावत आढळून येते. त्यातील काही महत्त्वाचे नांगर म्हणजे सोलापूर नांगर, पुणेरी नांगर, भातशेतीमधील नांगर, चरोचर नांगर, पंचमहाल नांगर, धारवाडी हलका नांगर हे होत. हे सर्व नांगर सर्वसाधारणपणे ‘ देशी नांगर ’ या सदराखाली येतात. या देशी नांगरांचा फार पूर्वीपासून बैलांच्या साहाय्याने वापर करण्याची पद्धत आहे परंतु या नांगरांच्या वापराने होणारी कामाची प्रत खूपच हलक्या दर्जाची असते आणि लागणारा वेळही खूपच जास्त असतो. शेतीतील बदलती आव्हाने लक्षात घेऊन आणि काळाची गरज विचारात घेऊन नांगरामध्ये खूप सुधारणा घडून आल्या आणि चांगल्या प्रतीची मशागत करणारे अनेक सुधारित नांगर अस्तित्वात आले. सुधारलेले नांगर हे मुख्यत्वे लोखंडी (वा पोलादी) नांगर आहेत. सुधारित नांगरांचे बैलांच्या साहाय्याने चालविले जाणारे आणि कर्षित्राने (ट्रॅक्टरने) चालविले जाणारे असे प्रमुख दोन प्रकार आहेत. यांशिवाय त्यांच्या घडणीनुसार फाळांचे नांगर आणि तव्यांचे नांगर असेही दोन मुख्य प्रकार आहेत. अलीकडच्या काळात कर्षित्राच्या साहाय्याने चालणारा फिरता नांगरसुद्धा मुख्यत्वे उसाच्या शेतीमध्ये मोठया प्रमाणात वापरला जातो. बागायत क्षेत्रांत नेहमीच्या मशागतीच्या खोलीच्या खाली तयार होणारा कठीण स्तर किंवा तळजमीन फोडण्यासाठी आणि पाण्याचा निचरा वाढविण्यासाठी तळजमीन फोडण्याचे नांगर वापरण्याचीही शिफारस करण्यात येते. तळजमीन फोडण्याचे नांगर साधारणपणे ५० ते ६० सेंमी. खोलीवरचा कठीण स्तर फोडण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. मराठी विश्वकोश : खंड ८ मध्ये ‘ नांगर ’ या स्वतंत्र नोंदीत काही प्रकारांचे सविस्तर विवेचन व आकृत्या दिलेल्या आहेत. येथे प्रमुख सुधारित नांगरांचे थोडक्यात विवेचन दिलेले आहे.

फाळाचा नांगर : फाळाच्या नांगरामध्ये एकतर्फी आणि दुतर्फी असे दोन प्रकार आहेत. बैलांच्या साहाय्याने चालणाऱ्या फाळाच्या नांगराला एकच फाळ असतो. एका दिवसाकाठी ४ ते ६ बैलांच्या साहाय्याने २५ ते ३० आर जमीन सरासरी १५ ते १८ सेंमी. खोलीपर्यंत नांगरली जाते. कर्षित्राचा वापर करून १ ते ५ फाळांचे एकतर्फी आणि दुतर्फी नांगर शेतांची नांगरणी करण्यासाठी आता वापरले जातात. या नांगरांच्या वापरामुळे नांगरणीच्या कामाचा वेग खूपच वाढलेला आहे. कर्षित्राच्या अश्वशक्तीनुसार कर्षित्राला कमी किंवा जास्त फाळाचा नांगर जोडला जातो. तास संपल्यानंतर, नांगर कर्षित्रासह वळविताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना, नांगर जमिनीच्या वर उचलून धरण्याची सोय कर्षित्रामध्ये केलेली असते. काही कर्षित्रचलित नांगराला मागील चाके नसतात. परंतु जमिनीच्या बाजूने चालणारे एक चाक असते. नांगराची जमिनीच्या बाजूकडील ओढ थांबविण्यासाठी आणि दाब कमी करण्यासाठी या चाकाचा उपयोग होतो. कर्षित्रचलित नांगराच्या वापराने जमीन २० ते २५ सेंमी. खोलीपर्यंत नांगरली जाते.

सरीचा नांगर : पेरणीपूर्व मशागत केल्यानंतर ऊस, बटाटा किंवा तत्सम पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीत सऱ्या तयार करण्याकरिता सरीच्या नांगराचा वापर केला जातो. या नांगराला असलेले दोन पंखे आत-बाहेर सरकवून सरीची रुंदी कमी-जास्त करता येते. बैलांचा वापर करून एका वेळेस एकच सरी तयार करता येते. कर्षित्राच्या साहाय्याने चालविल्या जाणाऱ्या सरीच्या नांगराने एकाच वेळी अश्वशक्तीनुसार ३ ते ५ सऱ्या तयार केल्या जातात. सरीची खोली कमी-जास्त करण्यासाठी कर्षित्रामध्येच सोय केलेली असते.

तव्यांचा नांगर : जमिनीच्या बाजूकडील ओढ व घर्षण कमी करण्यासाठी तव्यांच्या नांगराचा शोध व विकास करण्यात आला. हा नांगर ओढण्यासाठी फाळाच्या नांगरापेक्षा कमी शक्ती लागते. शिवाय कठीण व दगडगोट्यांचा जमिनी नांगरण्यासाठी तव्यांच्या नांगराचा उपयोग फायदेशीर ठरतो. नांगराच्या तव्याचा व्यास ६० ते ९० सेंमी. असून कडा धारदार असतात. नांगरणीची खोली कमी-जास्त करण्यासाठी तव्यांचा कोन कमी-जास्त करण्याची सोय यांत असते. नांगरावर वजन ठेवूनही खोली काही प्रमाणात वाढविता येते. कर्षित्राच्या अश्वशक्तीनुसार तव्यांची संख्या बदलते.

तळजमीन फोडण्याचा नांगर : सर्वसामान्यपणे जमिनीची मशागत एका ठराविक खोलीपर्यंतच होते. शिवाय वनस्पतींची मुळेसुद्धा ठराविक खोलीपर्यंतच जातात. ही खोली साधारणपणे ४० ते ६० सेंमी. एवढी असते. या खोलीच्या खाली जमिनीत कठीण तळजमीन तयार होते. या कठीण तळामुळे जमिनीतील जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी जमीन पाणथळ बनू लागते. जमिनीची उत्पादनक्षमता त्यामुळे कमी होते. ती तळजमीन बागायत क्षेत्रामध्ये काही वर्षांतच गंभीर समस्या बनल्याने ती फोडून पाण्याला निचृयासाठी वाट करून देण्याचे काम हा नांगर करतो. या नांगराने ६० सेंमी. खोलीवरची तळजमीन फोडता येते. यापेक्षा जास्त खोलीवर तळजमीन फोडण्यासाठी जास्ती अश्वशक्तीच्या कर्षित्राचा वापर करावा लागतो. जमीन नांगरणे हा या नांगराचा उद्देश नसून कठीण तळजमीन फोडणे हा प्रमुख उद्देश आहे.

फिरता नांगर : हा नांगर अलीकडच्या काळात प्रचलित झाला आहे. यामध्ये दर मिनिटाला ३०० फेरे घेणाऱ्या आसावर धारदार पाती बसविलेली असतात. पात्यांचा आकार कुदळीसारखा किंवा इंग्रजी ‘ एल् ’ अक्षरासारखा असतो. औत सुरू झाले म्हणजे आसावर बसविलेली पाती आसाच्या वेगाने फिरतात. पाती असलेला आस फिरविण्यासाठी कर्षित्राच्या पी. टी. ओ. मार्फत शक्ती पुरविली जाते. वेगाने फिरणाऱ्या पात्यामुळे जमीन एकसारख्या खोलीपर्यंत नांगरली जाते. औत चालू असताना दगड अगर झाडांची मुळे किंवा इतर अवशेष आड आले तरी पाती तुटू नयेत म्हणून या यंत्रामध्ये विशिष्ट योजना केलेली असते. एका घड्याळी तासामध्ये सरासरी १/४ हेक्टर क्षेत्र नांगरून होते. या नांगराच्या वापराने मातीच्या ढेकळांचा चुरा होत असल्याने जमीन चांगली तयार होते. भारतात ऊस शेतीमध्ये या नांगरांचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. ३५ ते ४० अश्वशक्तीचे कर्षित्र या यंत्राच्या वापराला पुरेसे ठरते.

कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभुशीत करणे यांसाठी कुळवाचा वापर केला जातो. पेरणीपूर्वी कुळवाची पाळी दिल्याने मातीत खत योग्य प्रकारे मिसळले जाते.

कुळवांचे मुख्य तीन प्रकार आहेत : (१) फासेचा कुळव, (२) तव्यांचा कुळव आणि (३) ड्रॅग प्रकारचा कुळव.

फासेचा कुळव : यामध्ये बाभळीच्या किंवा शिसवी लाकडाच्या १३x१० सेंमी. ते १८x१३ सेंमी. जाडीच्या आणि ५० ते १०० सेंमी. लांबीच्या दिंडावर दोन्ही टोकांवर दोन जानोळी बसवितात. विदर्भात जानोळ्यालाच ‘ जानकुड ’ या नावाने संबोधले जाते. जानोळ्याच्या खालच्या टोकांना लोखंडी (वा पोलादी) कडी (वसू) बसविलेली असतात. यांत एका बाजूला धार केलेली लोखंडी (वा पोलादी) फास बसते. दिंडावर बसविलेल्या रूमण्याच्या साहाय्याने कुळवाची खोली नियंत्रित केली जाते. खोली वाढविण्यासाठी दिंडावर वजन ठेवतात अथवा कुळव हाकणारा दिंडावर उभा राहूनसुद्धा ते साध्य करतो. कुळव सरासरी ५ ते १० सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवण्याचे काम करतो. कुळवाला जुंपलेले बैल मागे–पुढे करूनसुद्धा खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसाकाठी साधारणपणे एक हेक्टर जमिनीची कुळवणी करता येते. काही कुळवांच्या दिंडांना गोलसर बाक दिलेला असतो. काही ठिकाणी फासेला सरळ धार करण्याऐवजी दाते करण्याची सुद्धा पद्धत आहे.

भागांनुसार देशी कुळवांना वेगवेगळी नावे आहेत. ती अशी : (१) वखर, (२) पुणेरी कुळव, (३) कोंग्या कुळव, (४) भडोच कुळव, (५) अहमदनगर कुळव, (६) भाल कुळव, (७) बेळगाव कुळव, (८) मैंद, (९) डोणी, (१०) फळी, (११) दुहेरी फळी, (१२) मोगरी (हात कुळव).

आधुनिक शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच सुधारित कुळव वापरात आहेत. सुधारित कुळवांचा वापर केल्याने मिळणारी कामाची प्रतही चांगल्या प्रकारची असते. तव्यांच्या कुळवाचा वापर त्यातल्या त्यात मोठया प्रमाणात होतो.

तव्यांचा कुळव: तव्यांचा कुळव कर्षित्रचलित किंवा बैलचलित प्रकारचा असतो. बैलचलित तव्यांच्या कुळवाला तव्यांच्या एक किंवा दोन ओळी (गँग) असतात. एका ओळीत सरासरी चार तवे आसावर बसविलेले असतात. दोन तव्यांत १५ सेंमी. अंतर असते. तव्यांचा व्यास बैलचलित कुळवात ३०-३५ सेंमी. असतो. कर्षित्रचलित तव्यांच्या कुळवासाठी ४० ते ६० सेंमी. व्यासाच्या तव्यांचा वापर करतात. ते आसावर १५ ते २५ सेंमी. अंतरावर बसविलेले असतात. या प्रकारच्या कुळवाला तव्यांच्या दोन किंवा चार ओळी (गँग) असतात. दोन गँगच्या कुळवात प्रत्येक आसावर सहा ते आठ तवे बसवितात. चार गँगच्या कुळवामध्ये प्रत्येक आसावरील तव्यांची संख्या कमी असते. गँगच्या रचनेनुसार तव्यांच्या कुळवाचे सिंगल ॲक्टिंग, टँडम टाइप आणि ऑफसेट टाइप असे तीन प्रकार प्रचलित आहेत. तवे काम चालू असताना आसावर गोल फिरतात.

ड्रॅग प्रकारचा कुळव :  या प्रकारात मोडणारे कुळव म्हणजे (१) सुऱ्यांचा कुळव, (२) नॉर्वेजियन कुळव, (३) खुंटी कुळव, (४) स्प्रिं ग कुळव, (५) ॲक्मे कुळव हे होत. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवरून त्यांना ओढण्याच्या प्रकारचे कुळव असे म्हणता येईल. या कुळवांचा वापर ढेकळे फोडण्यासाठी, माती भुसभुशीत करण्यासाठी, लहान तणांचा नाश करण्यासाठी आणि काही प्रमाणात जमिनीचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी होतो.

कल्टिव्हेटर : पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरते. कल्टिव्हेटर बैलचलित तसेच कर्षित्रचलित प्रकारचे वापरात आहेत. कल्टिव्हेटरच्या वापरामुळे जमिनीतील ढेकळे फोडणे, तणांचे निर्मूलन करणे आणि जमीन भुसभुशीत करून ती पेरणीयोग्य केली जाते. बैलचलित कल्टिव्हेटरचा वापर पिकांच्या आंतरमशागतीसाठी सुद्धा करता  येतो. तण निर्मूलनाबरोबरच पिकाला भर लावण्याचे कामही यामुळे होते. बैलचलित कल्टिव्हेटरमध्ये ५ ते ७ फणांचा किंवा २-३ इंग्रजी ‘ व्ही ’ आकाराच्या पात्यांचा वापर केला जातो.

जमीन सपाट करण्याची अवजारे : पेरणीपूर्वी काही प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण ही आवश्यक बाब असते. उंचवट्याच्या भागाकडील माती अवजाराच्या साहाय्याने अथवा मजुराकडून सखल भागात पसरल्याने जमीन सपाट होते. पिकाला पाणी देण्याचे काम सपाट जमिनीत चांगल्या प्रकारे करता येते. या कामासाठी वेगवेगळी देशी अवजारे वापरता येतात.

लाकडी कुळव : लाकडी कुळवाच्या जानोळ्यांना दोरी गुंडाळून माती ओढण्याच्या कामासाठी वापरतात. हलक्या प्रमाणात सपाटीकरण करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. जानोळ्यांना गुंडाळलेल्या दोरीच्या आत एक फळी बांधल्यास सपाटीकरणाचे काम अधिक कार्यक्षमपणे होते.

गुटे फळी : साधारणपणे १०० ते १२० सेंमी. लांबीची आणि २५ ते ३० सेंमी. रूंदीची फळी घेऊन तिला एक रूमणे बसविलेले असते. गुटे फळीला दोन लोखंडी गोल कड्या बसवून त्यांच्या साहाय्याने बैल जोडून माती ओढण्याचे काम करतात. फळीची खालची बाजू थोडीशी धारदार केलेली असल्याने फळीत माती गोळा होणे सोपे जाते. गुटे फळीत भरलेली माती बैलाच्या साहाय्याने इच्छित ठिकाणी पसरून जमिनीचे सपाटीकरण करतात.

केणी पेटारी : लहान वरंबे घालण्यास किंवा शेतातील खोलगट भाग भरून जमीन सपाट करण्यास केणी किंवा लोखंडी पेटाऱ्याचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे ९०x३७.५ सेंमी. आकाराच्या पोलादी पत्र्याच्या दोन्ही बाजू बाहेरच्या अंगाला ७.५० सेंमी. वाकवून त्याला सुपासारखा आकार देतात. त्याच्या मागील बाजूस मध्यभागी ९० ते १२० सेंमी. लांबीचे दोन्ही बाजूंना दोन लाकडी दांडे बसविलेले असतात. पुढच्या बाजूला लोखंडी पट्टीची एक फ्रेम बसविलेली असते. फ्रेमचा उपयोग बैल जुंपण्यासाठी होतो. लाकडी दांडक्यांचा उपयोग पेटारी तोलून धरण्यासाठी होतो. बैल चालू लागले की पेटारीत माती भरली जाते आणि ती खोलगट भागात सोडून जमिनीचे सपाटीकरण करतात. मोठमोठे बांध किंवा ताली घालण्याचे कामसुद्धा पेटारीच्या साहाय्याने चांगले होते. लोखंडी पेटारी तीन ते पाच घनफूट आकाराच्या असतात. बैलांची ताकद लक्षात घेऊन पेटारीचे माप ठरविण्यात आलेले असल्याने त्यानुसार लहान किंवा मोठी पेटारी वापरावी.

स्वयंचलित बलिवर्दधरा यंत्र : मोठमोठे उंचवटे सपाट करणे, मुरमाच्या कठीण जमिनीचे सपाटीकरण करणे, पाझर तलाव किंवा धरणाचे मोठमोठे बांध घालणे इ. कामांसाठी स्वयंचलित बलिवर्दधरा यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राच्या साहाय्याने मातीची/मुरमाची मोठया प्रमाणात हलवाहलव करणे शक्य होते. यामुळे वेळेची आणि कष्टांची फार मोठया प्रमाणात बचत होऊन थोड्या वेळात काम पूर्ण करणे शक्य होते.

मजुरांच्या साहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करणे किंवा लहान बांध व ताली घालण्याच्या कामासाठी ज्या अवजारांचा उपयोग केला जातो त्यांत टिकाव, खोरे किंवा फावडे, घमेले, लाकडी किंवा लोखंडी दाताळ यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. टिकाव अथवा कुदळीच्या साहाय्याने माती खणून काढतात आणि घमेल्यांत भरून ती खोलगट भागात पसरून जमिनीचे सपाटीकरण करतात किंवा मातीचा बांध तयार करतात. लाकडी दाताळ्याचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपाचे सपाटीकरण करतात.

बंड फॉर्मर : वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून भुसभुशीत झालेल्या जमिनीत लहान लहान आकाराचे बांध तयार करण्यासाठी बंड फॉर्मर हे  बैलचलित अवजार वापरले जाते. सपाट जमिनीच्या मोठया भूभागावर पडणारे पाणी बांधांत अडवून ते जमिनीत मुरविणे यामुळे शक्य होते आणि त्याचबरोबर मृद्संधारणाचा उद्देशही साध्य होतो.

पेरणीची अवजारे व यंत्रे : जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार पेरणीसाठी निरनिराळ्या अवजारांचा उपयोग केला जातो. पूर्वीपासून कुळव, देशी नांगर अथवा अरगडा यांच्या जानोळ्याला मागे पोकळ बांबूचे ‘ सरते ’ बांधून त्यातून बी पेरले जाते. पोकळ बांबूचे एक टोक फोडून चाड्याच्या आकाराचे करतात जेणेकरून बी पेरणाऱ्याच्या हाताची मूठ त्यावर व्यवस्थित बसेल. सरत्याची उंची साधारण पेरणाऱ्याच्या खांद्यापेक्षा कमी ठेवली जाते. एकावेळी पिकाची एकच ओळ पेरावयाची असेल तेव्हा ‘ मोघण ’ हे अवजार वापरतात. यासाठी मनुष्य बळाचा वापरही केला जातो. महाराष्ट्रात पाभरीच्या पाठीमागे ‘ मोघण ’ जोडून दुसऱ्या पिकाची एक ओळ पेरण्याचा प्रघात आहे. सर्वसाधारणपणे पेरणी करण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी पाभरीचा वापर केला जातो. पेरणीच्या दोन ओळींतील अंतराच्या गरजेनुसार तीन फणी पाभर (तिफण) अथवा चार फणी पाभर (चौफण) वापरण्याचा प्रघात आहे.

काही भागांत जमिनीच्या प्रकारानुसार पाच ओळी पेरण्यासाठी ‘ पाचफणी ’ किंवा ‘ कुर्गी ’ आणि सहा किंवा बारा ओळी पेरण्यासाठी ‘ गोरू ’ ही अवजारे वापरतात. याचा वापर बेळगाव व तमिळनाडू भागात भाताचे बी पेरण्यासाठी करतात. बारा फणीचा वापर मुख्यत्वे नाचणी पेरण्यासाठी तमिळनाडू भागात करतात. ही अवजारे चालविण्यासाठी सामान्यतः दोन किंवा चार बैल आणि दोन ते तीन माणसांची आवश्यकता असते. साधारणतः दोन फणी (दुसे), तिफण किंवा चौफण किंवा पाचफणी अवजाराच्या साहाय्याने दिवसाकाठी १ ते २ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते. सहा फणी किंवा बारा फणी अवजाराच्या साहाय्याने २ ते ३ हेक्टर क्षेत्र दिवसाकाठी पेरून होते. लाकडी पेरणी अवजाराचे दिंड बाभळीच्या लाकडाचे चौकोनी किंवा षट्‌कोनी आकाराचे असते. फणसुद्धा बाभळीच्या लाकडाचा लहान परंतु जाड व मजबूत तुकड्यांपासून बनवितात. फण दिंडात भोके पाडून भक्कमपणे बसविलेले असतात. फणावर भोके पाडून त्यावर बांबूच्या नळ्या बसवून त्याच्यावर चाडे बसविलेले असते. जितके फण तितक्या नळ्या परंतु चाडे एकच असते. सुधारित पेरणी अवजारासाठी दिंड व फण लोखंडी (वा पोलादी) बनवितात. नळ्यासाठी लोखंडी २.५ सेंमी. व्यासाच्या पाइपचा वापर करतात. अलीकडच्या काळात लोखंडी चाड्यांचा वापरसुद्धा केला जातो. चाड्याची घडण घनाकृती माथा कातून गोल केलेला, खालचा भाग चौकोनी, वरच्या गोल माथ्याला कोरून वाटीसारखा आकार दिलेला, त्याच्या मधोमध खुंटीसारखा उंचवटा (ह्याला ‘ माशी ’ म्हणतात) आणि या माशीच्या सभोवती पेरावयाच्या बिया जाण्यासाठी फणांच्या संख्येइतकी भोके पाडलेली अशी असते.

पेरणीसाठी अवजार तयार करताना, त्याच्या फणाइतक्या नळ्या चाड्याला जोडून घेतात. चाडे मजबूत दोरीने अवजाराच्या दांडीला आणि दिंडाला धरून एक विशिष्ट गाठ देऊन घट्ट आवळून बांधतात. या गाठीला चाडेगाठ असे नाव आहे. अवजार पेरणीसाठी चालू असताना पेरणारा मनुष्य बी मुठीने चाड्यांतील माशीवर सोडतो. ते चाड्याच्या वाटीत सर्वत्र पसरून भोकावाटे त्यांना जोडलेल्या नळ्यांमधून फणाला असलेल्या भोकांमधून मातीत, फणामुळे तयार झालेल्या तासात पडते. एक दिवसाकाठी साधारण एक हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकते.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे कोणत्याही देशी पाभरीवर बसविता येण्यासारखे सुधारित पेरणी यंत्र १९६० साली तयार केले. या सुधारित पेरणी यंत्राच्या साहाय्याने योग्य त्या खोलीपर्यंत आपोआप ठराविक प्रमाणात बी योग्य प्रकारे पेरता येते आणि दिवसाकाठी देशी पाभरीच्या दुप्पट पेरणीचे काम होऊ शकते.

सुधारित पेरणीची अवजारे : बैलचलित देशी तिफण किंवा चौफण वापरताना पेरणीची खोली आणि दोन रोपांमधील अंतर नियंत्रित करण्याची कोणतीही सोय नसल्याने होणाऱ्या कामाची प्रत ही पूर्णपणे बैल हाकणाऱ्या व पेरणी करणाऱ्या मजुराच्या कौशल्यावर अवलंबून असते. सुधारित पेरणी यंत्रामध्ये या अडचणींवर मात करण्यात आलेली आहे.

पुणेरी पेरणी यंत्र : हे सुधारित पेरणी यंत्र आहे. या यंत्राच्या साहाय्याने बी पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रित खोलीवर आणि दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून पेरता येते. बियांसाठी बसविलेल्या पेटीच्या खालच्या बाजूला बी नियंत्रित करण्यासाठी फिरक्या बसविलेल्या असतात. त्यातून बी प्लॅस्टिकच्या नळीमधून उतरून योग्य त्या खोलीवर पडते.

यंत्राच्या मागे बसविलेले लाकडी चाक, सायकलचे दातेरी चाक व चेन यांच्या साहाय्याने फिरक्यामधून जाणाऱ्या आसाला गती दिलेली असते. मागचे चाक फिरू लागल्याबरोबर फिरक्यामधून दाणे सुटतात व नळ्यांवाटे जमिनीत जातात. दातेरी चाक अथवा लाकडी चाक बदलून ज्वारी, भात, गहू इ. पिकांची पेरणी करता येते.

सुधारित खत व बी पेरणी यंत्र : सुधारित पुणेरी पेरणी यंत्रामध्ये आणखी सुधारणा करून बिया बरोबरच रासायनिक खत पेरून देण्याची व्यवस्था केलेली आहे. रासायनिक खते ठेवण्यासाठी वेगळी पेटी पेरणी यंत्रावर बसवून त्याच्याखाली खत नळ्यांत सोडण्यासाठी भोके असलेल्या गोल चकत्या बसविलेल्या असतात. या यंत्राच्या फणाला दोन भोके पाडलेली असतात. वरच्या भोकांतून बी पडते आणि खालच्या भोकांतून खत जमिनीत पडते. बियांचे आणि खताचे नळे वेगळे असतात. बियांपासून योग्य अंतरावर आणि खोलीवर खत पेरून दिल्याने खतांची बचत तर होतेच, परंतु बियांची उगवण जोमदार होत असल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.

बैलचलित टोकण यंत्र : उत्पादन वाढीचे लक्ष्य गाठताना पिकाची पेरणी योग्य प्रकारे करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. पारंपरिक पेरणी अवजाराव्दारे पेरणी करताना दोन ओळींतील अंतर गरजेनुसार ठेवता येते. परंतु दोन रोपांमधील अंतरावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने पेरणी, कधी दाट तर कधी पातळ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. हा परिणाम टाळण्यासाठी बियांची मजुराकरवी टोकण केली जाते. यामध्ये मजुरीचा खर्च खूपच वाढत असल्याने संशोधकांनी पारंपरिक पेरणी यंत्रांतच सुधारणा करून टोकण यंत्र तयार केले. टोकण यंत्राच्या वापराने दोन ओळींतील तसेच दोन रोपांतील अंतर शिफारशीनुसार ठेवणे शक्य होते. टोकण यंत्रामध्ये असलेल्या बियांच्या पेटीखाली फिरणाऱ्या उभ्या अथवा आडव्या गोल चकत्या बसविलेल्या असतात. या चकत्यांना असलेल्या खाचेमध्ये अथवा लहान खड्डयमध्ये एक किंवा दोनच बिया मावतात आणि चकतीच्या दोन खाचांत अथवा खड्डयत ठेवलेले अंतर दोन रोपांमधील अंतर ठरविते. टोकण यंत्राच्या वापरामुळे बी ठराविक अंतरावर पडल्यामुळे उगवून येणाऱ्या रोपांना योग्य प्रमाणात हवा व सूर्यप्रकाश मिळत राहिल्याने पिकाची वाढ चांगली होते आणि पर्यायाने उत्पादनात वाढ होते. या यंत्राच्या वापरासाठी एका बैलजोडीची गरज असते. दिवसाकाठी साधारणपणे १ ते १.५ हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते. बाकीची सर्व रचना नेहमीच्या पाभरीसारखीच असते. 

अलीकडे कर्षित्रचलित टोकण यंत्राचा वापरही काही प्रमाणात होऊ लागला आहे. या यंत्रात सहा ते आठ फणांची योजना असते. कामाचा वेग आणि मोठा आकार यांमुळे टोकणसुद्धा मोठया क्षेत्रावर होते. खत पेरण्याची सुविधा यामध्ये असल्याने उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठणेसुद्धा सुलभ झाले आहे. वेगवेगळ्या पिकांची टोकण करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या वापराव्या लागतात.

सर्वसामान्य पेरणी यंत्रांचा वापर वेगवेगळी पिके पेरण्यासाठी केला जातो. तथापि काही विशेष प्रकारची पेरणी यंत्रेसुद्धा वापरात आलेली आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे बटाटा पेरणी यंत्र आणि ऊस पेरणी यंत्र ही होत. अर्थात याचा वापर अजून फार मोठया प्रमाणात होताना दिसत नाही.

काही पिकांचे बाबतीत बी पेरण्यापेक्षा रोपे तयार करून त्यांची लागण करणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यात भात हे प्रमुख पीक आहे. त्याशिवाय भाजीपाला पिकाची रोपे तयार करून त्यांची शेतात लावणी करणे, ही पारंपरिक पद्धत आहे. रोपाची लागण योग्य अंतरावर करण्याच्या कामात उपयोगी ठरलेले आखणी यंत्र मोठया प्रमाणात शेतकरी वापरतात. या यंत्राच्या साहाय्याने शेतात योग्य अंतरावर खुणा करून तेथे रोपांची लावणी केली जाते. संशोधकांनी ही गरज लक्षात घेऊन भात लावणी यंत्र आता विकसित केले आहे. भात लावणी यंत्राला असलेल्या ट्रेमध्ये भाताची रोपे ठेवली जातात. या ट्रेमधून लावणी यंत्राला जोडलेले चिमटे ४-५ रोपे उचलून जमिनीत त्यांची लागण करतात. हे यंत्र मनुष्यचलित असते. जपानमध्ये लहान कर्षित्राच्या साहाय्याने चालविता येणाऱ्या भात लावणी यंत्राचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची यंत्रे प्रायोगिक अवस्थेत आहेत परंतु शेतकामासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता आणि मजुरीवर होणारा खर्च लक्षात घेऊन भात लावणी यंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.

कोकणसारख्या भागात भात खाचरांतील भाताची कापणी झाल्यानंतर पुढच्या हंगामात जमीन तयार करून त्यात हरभरा किंवा वाल यासारखी पिके पेरण्यासाठी नारी नांगर या अवजाराचा वापर मोठया प्रमाणात होतो. हा नांगर बैलांच्या साहाय्याने चालवून तयार होणाऱ्या सरीत हरभऱ्याचे अथवा वालाचे बी हाताने टाकले जाते. यामुळे बी खोलवर ओल्या जमिनीत टाकता येत असल्याने उगवण चांगली होते.

आंतरमशागतीची अवजारे : उगवून आलेल्या पिकांत जी मशागत केली जाते तिलाच आंतरमशागत असे म्हणतात. पीक उगवून आल्यानंतर त्याची योग्य प्रकारे जोमदार व निरोगी वाढ होण्यासाठी आंतरमशागतीची आवश्यकता असते. आंतरमशागतीमुळे पिकांतील तणांचे नियंत्रण करून मुख्य पिकासाठी अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य प्रकारे केला जातो. तसेचत्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढविली जाते.

आंतरमशागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीत खुरपे किंवा विळा या हात अवजारांचा वापर सर्वमान्य आहे. पिकाच्या दोन ओळींत खुरपे किंवा विळ्याचा हाताने वापर करतात. अर्थात या पद्धतीत कामाचा उरक फारच कमी असतो. आंतरमशागतीचा वेग कोळप्यांचा वापर करून मोठया प्रमाणात वाढविता येतो. कोळपी वापरण्यासाठी सामान्यतः बैलांचा वापर केलेला जातो. आंतरमशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळप्यामध्ये डवरा, डवरी, धुंडिया यांसारखी अखंड फासेची कोळपी वापरण्यात येतात. एका बैलजोडीच्या साहाय्याने दोन ते तीन कोळपी एका वेळेस चालविता येतात. कोळप्याचे अनेक प्रकार गामीण भागांत प्रचलित आहेत. त्यांत (१) अखंड फासेचे कोळपे, (२) फटीचे कोळपे, (३) अकोला कोळपे, (४) बडोदा कोळपे इ. प्रकार वापरात आहेत. पिकाला भर देण्याचे महत्त्वाचे काम करणे कोळप्याच्या वापरामुळे शक्य होते.

अखंड फासेचे कोळपे : याची रचना बरीचशी कुळवाप्रमाणे असते परंतु आकार लहान व वजन कमी असते. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. पेक्षा जास्त असलेल्या पिकात या कोळप्यांचा वापर फायदेशीर ठरतो. कोळप्याची फास दोन ओळींच्या मधून जात असताना सर्व प्रकारचे तण निर्मूलन होऊन काही प्रमाणात पिकाला भर लावली जाते. एका बैलजोडीवर दोन ते तीन कोळपी सहजपणे चालतात. प्रत्येक कोळप्यामागे एका माणसाची गरज असते. याच कोळप्याच्या जानोळ्याभोवती दोरी गुंडाळून पिकाला भर लावणे सोपे जाते.

फटीचे कोळपे : फटीच्या कोळप्याची रचना वरीलप्रमाणेच असते, परंतु फास अखंड न वापरता दिंडाच्या दोन्ही टोकाला इंग्रजी ‘ एल् ’ आकाराची फास बसविलेली असते. जमिनीतून चालणाऱ्या भागाला धार केलेली असल्याने तण सहजपणे निघते. या ‘ एल् ’ आकाराच्या दोन फासांमध्ये साधारण ८ ते १० सेंमी. लांबीची फट असते. पिकाची ओळ या फटीमध्ये राहाते आणि ओळीच्या दोन्ही बाजूंना अर्धे अंतर कोळपले जाते. राहिलेले अर्धे अंतर कोळपी परत येताना कोळपले  जाते.पीक साधारणपणे ३० सेंमी. उंचीचे होईपर्यंत फटीची कोळपी वापरता येतात. पिकाला भर लावण्याच्या दृष्टिकोनांतून या कोळप्याचा उपयोग कमीच होतो परंतु रोपांच्या बरीच जवळची माती हलवून तण नियंत्रण मात्र चांगल्या प्रकारे होते.

अकोला कोळपे : लाकडी दिंडांत किंवा लोखंडी पट्ट्याच्या दिंडांत खालच्या टोकाला त्रिकोणी आकार दिलेले दोन फण या अवजारांत बसविलेले असतात. त्यांच्यामध्ये परंतु दिंडापासून पुढे थोड्या अंतरावर दांडीवर आणखी एक त्याच प्रकारचा फण बसविलेला असतो. अशा प्रकारे अकोला कोळप्याला तीन फण बसवून कोळपणीचे काम केले जाते. लोखंडी कोळप्यात फणातील अंतर कमी-जास्त करण्याची सोय असते. विदर्भात अकोला कोळप्याचा वापर मोठया प्रमाणात होतो. एका बैलजोडीवर दोन अगर तीन कोळपी जोडतात. दिवसाकाठी साधारण १ ते २ हेक्टर जमीन कोळपून होते. आंतरमशागतीच्या कामाची प्रत, त्याला लागणारा वेळ, होणारा मजुरीचा खर्च, बैलाची उपलब्धता इ. बाबी लक्षात घेऊन या अवजारांवर खूपच संशोधन झाल्यानंतर कोळप्यांचे अनेक सुधारित प्रकार विकसित केले गेले. काळानुरूप त्यातील काहींचा वापर कमी झाला तर काहींचा वाढला. तथापि या सुधारित आंतरमशागतीच्या अवजारात लक्षात घेण्यासारखी काही अवजारे अशी : (१) हात कोळपे, (२) उभ्याचे कोळपे (डच हो), (३) नारक्रॉस कोळपे, (४) कर्जत फिरते कोळपे, (५) जपानी कोळपे, (६) दातेरी कोळपे, (७) फण कोळपे, (८) अकोला कोळपे, (९) इंदूर कोळपे, (१०) बडोदा कोळपे, (११) लायलपूर कोळपे.

पीक संरक्षणाची यंत्रे : उभ्या पिकात करावयाच्या आंतर-मशागतीव्यतिरिक्त महत्त्वाची कामे म्हणजे पीक संरक्षणाची. तणाच्या, रोगांच्या आणि किडीच्या नियंत्रणासाठी पिकात तणनाशकाची, कीड-नाशकाची व रोगनाशकांची फवारणी अथवा धुरळणी करण्याची गरज असते. यासाठी वापरली जाणारी वेगवेगळी देशी आणि सुधारित फवारणी व धुरळणी यंत्रे वापरली जातात. औषधांची फवारणी करण्यासाठी हवेच्या दाबावर काम करणारी फवारणी यंत्रे वापरली जातात. यात हवादाबयंत्र, पाठीवरील फवारणी यंत्र अथवा बादली फवारा यंत्राचा वापर मनुष्यबळाच्या साहाय्याने केला जातो. एंजिनवर चालणारी फवारणी यंत्रे मोठया क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. द्राक्ष अथवा इतर फळबागासाठी अलीकडच्या काळात लहान कर्षित्रावर चालणारी फवारणी यंत्रे अस्तित्वात आलेली आहेत. पीक संरक्षणासाठी औषधी भुकटीची धुरळणी करण्यासाठी मानवचलित अथवा एंजिनचलित धुराळी यंत्रांचा वापर केला जातो. मानवचलित धुरळणी यंत्रात चकी धुराळी सर्रास वापरली जाते. घरगुती पद्धतीने धुरळणी करण्यासाठी कापडी धुराळीचा वापरही शेतकरी करतात. पातळ कापडात औषधी भुकटी घेऊन ती पिकावर अथवा फळझाडावर धरून हलवली असता भुकटी धुरळली जाते. फार मोठया क्षेत्रावर किडीचा अथवा रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अथवा टोळधाडीसारख्या आपत्तीच्या वेळी लहान विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा वापरही औषधे फवारण्यासाठी किंवा धुरळण्यासाठी केला जातो.

आधुनिक तंत्रात जैविक कीडनियंत्रणांचा वापर वाढू लागलेला आहे. उदा., जमिनीत राहून पिकांचा नाश करणाऱ्या काही बुरशींचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविकांचा वापर केला जातो.

पीक काढणी व कापणी यांसाठी यंत्रे व अवजारे : पीक तयार झाल्यानंतर ते काढण्यासाठी वापरली जाणारी अवजारे पीक काढण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळी असतात. फळे, फुले, भाजीपाला इ. पिके हाताने तोडून काढली जातात. जमिनीत वाढणारी पिके उदा., बटाटा, रताळी, हळद, आले, सुरण वगैरे जमिनीतून खणून काढावी लागतात. त्यासाठी कुदळ किंवा टिकाव यांचा वापर करतात. ज्वारी, बाजरी, गहू , भात इत्यादींसारखी जमिनीवर वाढणारी पिके कापून काढावी लागतात. पिकांची कापणी करण्यासाठी विळा हे हात अवजार मुख्यत्वे वापरले जाते. विळा पोलादी पट्टीपासून बनविला जातो. त्याचा आकार सर्वसामान्यतः अर्धवर्तुळाकार असून त्याची आतील कड धारदार बनविलेली असते. विळा धरण्यासाठी त्याला मागे लाकडी मूठ बसविलेली असते. विळ्याच्या आकारामध्ये देशमानाप्रमाणे थोडाफार बदल आढळून येतो. काही विळ्यांची आतील कड दातेरी बनवून त्याला धार लावलेली असते. दातेरी विळा वापरल्याने कापणीसाठी कमी शक्ती लावावी लागते. त्यामुळे कामाचा उरकही वाढतो. कापणी करीत असताना हाताची बोटे मातीवर घासत राहिल्यामुळे बोटांना पाठीमागच्या बाजूला होणारी इजा टाळण्यासाठी सुधारित विळ्यांना मुठीच्या पुढच्या बाजूला बाक दिलेला असतो. ज्वारी, बाजरी या पिकांची कापणी केल्यानंतर कणसे विळ्याच्या साहाय्याने धाटापासून कापून वेगळी केली जातात आणि नंतर त्यांची मळणी करून धान्य वेगळे काढले जाते.

झाडावरून फळांची काढणी करण्यासाठी लोक पारंपरिक झेल्याचा वापर मोठया प्रमाणात करतात. सुधारित झेल्याचा वापर करून फळांची काढणी वेगाने, कमी त्रासात आणि फळांना इजा न होता करता येते. सुधारित झेल्यांचा वापर आंबे आणि चिकू झाडावरून काढण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो.

भुईमुगाचे पीक काढण्यासाठी कोंग्या कुळवाचा वापर शेतकरी करतात. कुळवाच्या वापराने शेंगांसहित वेल जमिनीतून निघून येतात. नंतर शेंगा हातांनी तोडून वेगळ्या केल्या जातात. या पारंपरिक पद्धतीने संशोधन करून शास्त्रज्ञांनी भुईमूग काढणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र दोन बैलांच्या साहाय्याने चालते. यंत्र हाकणाऱ्यासाठी यंत्रावरच बसण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे अकारण येणारा थकवा सहजासहजी टाळता येतो. भुईमूग काढणीचा वेगही या यंत्राच्या साहाय्याने खूप वाढतो. भुईमुगाच्या शेंगा हातांनी तोडण्यासाठी खूपच वेळ लागतो याचा विचार करून भुईमुगाच्या शेंगा तोडण्यासाठी शेंगातोडणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राच्या वापरामुळे मजुरीच्या खर्चात आणि वेळेत खूपच बचत होते.

भुईमुगाप्रमाणेच बटाटे, रताळी, बीट इ. पिके ज्यांचे उपयुक्त भागजमिनीत वाढतात अशा पिकांच्या काढणीसाठी विशिष्ट प्रकारची काढणी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे बैलांच्या अगर कर्षित्राच्या साहाय्याने वापरता येतात.

गहू आणि भात या पिकांची कापणी करण्यासाठी स्वयंचलित कापणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. कापणी यंत्राच्या साहाय्याने वेळेची आणि मजुरीची फारच मोठया प्रमाणात बचत होते.

पाश्चात्त्य देशांत गव्हाचे पीक कापून लगेच मळणी करून धान्य पोत्यात भरून देणारी संयुक्त संयंत्रे वापरली जातात. भारतातही या संयुक्त संयंत्राचा वापर आता मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. गव्हाचे पीक मोठया क्षेत्रावर असेल तर संयुक्त संयंत्र अतिशय फायदेशीर ठरते. धान्य आणि भुसा काम चालू असतानाच वेगळे होत असल्याने स्वच्छ धान्य ताबडतोब तयार मिळते. संयुक्त संयंत्राचा वापर कर्षित्राच्या साहाय्याने केला जातो. एकूणच यंत्राचा आकार मोठा असल्याने लहान लहान तुकडे असलेल्या क्षेत्रात तसेच शेतात पोहोचण्यासाठी योग्य प्रकारचा रस्ता उपलब्ध नसेल तर या यंत्राच्या वापरावर मोठे बंधन येते. यंत्राची किंमतही खूपच असली तरी ते भाड्याने घेऊन या अडचणीवर मात करता येते.

गवत कापणीसाठी विशिष्ट यंत्राचा वापर करतात. त्याला मोअर असे नाव आहे. गवत कापल्यानंतर त्याचे गठ्ठे बांधण्यासाठी कापणी व बांधणी यंत्राचा वापर पाश्चात्त्य देशांत मोठया प्रमाणात केला जातो. त्याला ‘ गवत गासड्या बांधणी यंत्र ’ असे म्हणतात. ज्वारी अथवा बाजरीची कणसे धाटापासून वेगळी करण्यासाठी ‘ कणसे कापणी यंत्र ’ (हेडर) विकसित झालेले आहे. गवत कापणी किंवा कापणी व बांधणी यंत्राचा वापर क्षेत्र सलग व मोठे आणि सपाट असेल तरच फायदेशीर ठरतो.

पीक मळणीची अवजारे व यंत्रे : ज्वारी, बाजरीच्या कणसापासून दाणे वेगळे करणे, ओंब्यापासून गहू अथवा भाताचे दाणे वेगळे करणे या कामाला मळणी असे सामान्यतः संबोधले जाते. पूर्वापारपासून मळणी करण्यासाठी वेगवेगळ्या देशी तंत्रांचा वापर केला जातो. मळणी करावयाचे पीक थोडेच असेल तर काठीने अथवा मोगरीने बडवून मळणी केली जाते. मळणीचे काम मोठया प्रमाणात असेल तर शेतकरी खळ्याचा वापर करतात. खळ्यात ज्वारी अथवा बाजरीची कणसे जाडसर थरांत पसरवून ठेवतात. त्याच्यावरून बैल किंवा इतर उपलब्ध जनावरे फिरवितात. यामुळे कणसापासून दाणे अलग होतात. गव्हाची, हरभऱ्याची मळणीसुद्धा अशाच प्रकारे करतात. भाताची मळणी करण्यासाठी भाताच्या पेंढ्या बांधून त्या लोखंडी खाटेवर अथवा बाकड्यावर आपटून मळणी केली जाते. कणसापासून दाणे अलग होणाऱ्या मळणीमध्ये धान्य आणि भुसा एकत्रच असतो. अशाच प्रकारे मळणी करण्याच्या सुधारित तंत्रामध्ये दगडी रूळाचा वापर करून वेळेची बचत करता येते. मळणीसाठी वापरण्यात येणारा दगडी रूळ ९० सेंमी. लांबीचा असतो. रूळाचा एका टोकाचा व्यास ४५ सेंमी. तर दुसऱ्या टोकाचा व्यास ५० सेंमी. असतो. निमुळत्या आकारामुळे खळ्यांत रूळ गोल फिरविताना अडचण येत नाही. रूळाला मध्ये लोखंडी (वा पोलादी) आख बसविलेला असून त्यावरच रूळाच्या सभोवार लाकडी अथवा लोखंडी अँगलची फ्रेम करून या फ्रेमवर बसविलेल्या दांडीला बैल जोडून रूळ कणसावरून फिरविला जातो. बैलांच्या पायाखाली आणि रूळाखाली कणसे रगडली जाऊन दाणे अलग होतात. बैलांच्या अथवा दगडी रूळाच्या साहाय्याने मळणी झाल्यानंतर त्याची उफणणी करून धान्य व भुसा अलग केला जातो. पूर्वी शेतकरी नैसर्गिक वाऱ्याचा उपयोग करून उफणणी करीत परंतु आता उफणणीसाठी पंख्याचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. पंखा असलेले उपनेर यंत्र आता उपलब्ध आहे. मळणी केलेली अथवा मोगरीने बडवून काढलेली कणसे, सुपाचा उपयोग करून (पाकडून) दाणे व भुसा अलग करण्याची जुनी पद्धत आजही वापरली जाते. मळणीसाठी मुसळ किंवा जाडसर काठीसुद्धा वापरतात.

पिकांच्या मळणीसाठी आता अनेक सुधारलेली मळणी यंत्रे वापरात आली आहेत. गव्हाच्या मळणीसाठी ‘ ओलपाड गहू मळणी यंत्राचा ’ वापर केला जातो. ओलपाड यंत्रात एक लोखंडी सांगाडा असून त्यावर तीन आख बसविलेले असतात. प्रत्येक आखावर नरम पोलादाचे करवती-सारखे दाते असलेले धारदार सपाट तवे एकमेकांपासून २५ सेंमी. अंतरावर एकासमोर दुसरा येणार नाही असे बसविलेले असतात. एका बैलजोडीच्या साहाय्याने हे मळणी यंत्र चालविता येते. चालविणाऱ्या माणसाला बसण्यासाठी यंत्रावर बैठकीची व्यवस्था केलेली असते. दातेरी धारदार तव्यामुळे काडापासून धान्य व भुसा चांगल्या प्रकारे अलग केला जातो व उत्तम मळणी होते. एका दिवसाला एका बैलजोडीकडून १०ते १२ क्विंटल दाणे मिळतील एवढे पीक मळले जाते. मळणीला लागणारा वेळही कमी होतो.

भात मळणी यंत्राचा वापरसुद्धा आता वाढला आहे. या यंत्राला सामान्यतः जपानी भात मळणी यंत्र असे संबोधले जाते. भात मळणी यंत्राचा मुख्य भाग म्हणजे साधारण ४५ सेंमी. व्यासाचे व ६० सेंमी.लांबीचा दंडगोल (ड्रम). त्यावर लाकडी पट्ट्या बसवितात. लाकडी पट्ट्यावर जाड तारेचे लंबवर्तुळाकार हूक बसविलेले असते. दंडगोलाला पायट्याने (पायडलने) शिलाई यंत्राप्रमाणे गती दिली जाते. फिरणाऱ्या दंडगोलावर भाताची पेंडी धरली म्हणजे भाताचे दाणे वेगळे होऊन खाली पडतात. नंतर उफणणी करून भात स्वच्छ केले जाते. भात सडण्याच्या गिरणीवर भातातून तांदूळ काढले जातात. फक्त भात मळणीसाठी हे विशेष प्रकारचे यंत्र वापरले जाते. आधुनिक शेतीतील यंत्रांची वाढती गरज लक्षात घेऊन आता स्वयंचलित (डीझेल एंजिन अथवा विद्युत् चलित्र) मळणी यंत्रांचा वापरसुद्धा होऊ लागला आहे.

ज्वारी, बाजरी, गहू , हरभरा व इतर कडधान्ये वगैरेंच्या मळणीसाठी आता एकाच मळणी-उफणणी यंत्राचा वापर सर्रास होऊ लागला आहे. ही मळणी यंत्रे डीझेल एंजिनाच्या साहाय्याने चालविली जातात. योग्य तांत्रिक ज्ञानाची जोड असल्यास या मळणी यंत्रावर उत्तम प्रकारे मळणी होऊन काम कमी वेळात पूर्ण करता येते. या यंत्रामध्येच फुटके अथवा हलके कमी प्रतीचे धान्य बाजूला काढून काही प्रमाणात प्रतवारी करण्याचीही सोय केलेली आहे.

यंत्राच्या वापरामुळे मळणीच्या कामातील कष्टदायी भाग कमी होऊन प्रतिदिन होणाऱ्या दर माणशी कामात निश्चित वाढ होते. औदयोगिकीकरणामुळे शेतकामासाठी जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता यंत्राच्या वापरामुळे कमी झाली आहे. मजुरीसाठी द्याव्या लागणाऱ्या पैशांची बचत मोठया प्रमाणात करावयाची म्हणजे यंत्रांचा वापर अपरिहार्य आहे. अमेरिकेसारख्या देशाचे उदाहरण याबाबतीत बोलके आहे. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत एकूण श्रमजीवी कामगारांपैकी जवळपास ६६ टक्के व्यक्ती शेतकामगार होत्या. परंतु आता हे प्रमाण फक्त १३ टक्क्यांवर आले आहे व शेतीच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झालेली आहे. यांत्रिकीकरण हा ह्या सुधारणेतील एक मोठा घटक आहे.

मळणी यंत्रांचा विचार करताना काही पिकांसाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरणे आवश्यक ठरते. कापूस हे एक असे पीक आहे. कापसाची वेचणी आपल्याकडे मजुराकरवी हातानेच केली जाते. वेचलेल्या कापसापासून सरकी अलग करण्यासाठी सरकी जीन या यंत्राचा उपयोग केला जातो. सरकी वेगळी काढल्यानंतर मिळणाऱ्या रूईच्या गासड्या बांधण्यासाठी ‘ कापूस गासड्या बांधणी यंत्रा’चा उपयोग करतात. गासड्या बांधलेल्या कापसाची इतरत्र वाहतूक करणे सोयीचे असते. [→ कापूस ].

शेतमाल वाळविण्याची साधने : मळणी केल्यानंतर तयार झालेले धान्य साठवून ठेवण्यापूर्वी वाळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धान्यात ओलाव्याचे पमाण जास्त असतानाच त्याची साठवण केली, तर कीड लागून धान्य खराब होते. पिकाच्या कापणी-मळणीसाठी जेव्हासंयुक्त संयंत्राचा वापर करावयाचा असतो तेव्हा पिकात २० टक्क्यांपर्यंत ओलावा असणे फायद्याचे असते. कापणीसाठी इतर पर्याय वापरून मळणीसाठी मळणी यंत्रांचा वापर करतानासुद्धा जास्त वाळलेले पीक असेल तर दाणे फुटण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जवळपास २० टक्के ओलावा असतानाच मळणी करणे चांगले. या परिस्थितीत धान्य वाळवून त्यातील ओलावा साधारणपणे १० टक्क्यांपर्यंत कमी करणे ही धान्य साठवणुकीपूर्वी घ्यावी लागणारी महत्त्वाची काळजी आहे. भारतात सामान्यतः धान्य वाळविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करतात. यांत्रिक पद्धतीने धान्य वाळविण्याची पद्धत पाश्चात्त्य देशांत वापरली जाते. यांत्रिक पद्धतीने धान्य वाळविण्यासाठी धान्याच्या राशीतून गरम हवा खेळविली जाते. संकरित बीजोत्पादनाच्या कार्यकमात २० टक्क्यांपर्यंत ओलावा असलेली सर्व प्रकारची पिके एका विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या खोलीमध्ये साठवितात व त्यातून गरम हवा सोडतात. काही पद्धतीत मळून तयार झालेले धान्य एका मोठया लोखंडी पेटीत एकावर एक अशा थरात पसरून ठेवतात व ती लोखंडी पेटी बंद करून त्यातून गरम हवा सोडतात. ही गरम हवा धान्यामधून फिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडते. त्या वेळी हवेबरोबर ओलावाही निघून जातो. यासाठी योग्य इंधनावर चालणाऱ्या भट्ट्या हवा गरम करण्यासाठी वापरतात. भट्टीला जोडलेल्या यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या पंपाच्या साहाय्याने हवा दाबाने या विशिष्ट प्रकारच्या खोलीतून अथवा लोखंडी पेटीतून खेळविली जाते. धान्यांतील ओलावा मोजण्यासाठी ओलावामापकाचा वापर करतात. ओलावा ठराविक पातळीपर्यंत कमी झाला की वाळविणे बंद करून धान्य साठविण्यासाठी किंवा पोत्यात भरण्यासाठी तयार होते.

फळे अथवा भाजीपाला वाळविण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जातो. द्राक्षांपासून बेदाणे तयार करण्यासाठी द्राक्षांना गंधकाची धुरी देऊन मग द्राक्षे एका मोठया शेडमध्ये एकावर एक थर देऊन पसरून ठेवतात व सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून ती वाळविली जातात. वाळविलेल्या द्राक्षांनाच बेदाणे असे संबोधले जाते. काही देशांत द्राक्षांची वेलीवरून काढणी न करताच द्राक्षाचे घड उन्हाने वेलीवरच वाळविण्याची पद्धत आहे. या पद्धतीने बेदाणे तयार करण्यासाठी अर्थातच वेळ अधिक लागतो परंतु तयार होणाऱ्या बेदाण्याची प्रत चांगली असते. यांत्रिक पद्धतीचा वापर करून सुके अंजीर बनविण्याची पद्धतसुद्धा सर्वमान्य आहे.

शेतमाल प्रतवारी लावण्याची साधने : शेतमाल बाजारात पाठविल्यानंतर त्याला योग्य भाव मिळण्यासाठी तो स्वच्छ करून त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे आहे. फळे, भाजीपाला, अंडी इ. प्रकारच्या मालाची प्रतवारी भारतात बहुतांशी हातानेच केली जाते. यासाठी बांबूच्या पातळ पट्ट्यांपासून तयार केलेल्या सुपाचा वापरसुद्धा करतात. शेतमालाची प्रतवारी त्याचे आकारमान व वजनानुसार करण्याची पद्धत आहे. धान्याची प्रतवारी लावण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या जाळ्या असलेल्या चाळण्यांचा वापर केला जातो. पाश्चात्त्य देशांत यासाठी यांत्रिक साधनांचा वापर केला जातो. भारतातसुद्धा आता प्रतवारीसाठी यांत्रिक साधनांचा वापर होऊ लागला आहे. भाजीपाला अथवा फळे निर्यात करण्यासाठी प्रतवारी करणे ही मूलभूत गरज आहे. भारतात ॲगमार्क पद्धतीने फळांची प्रतवारी लावण्याची शिफारस केली जाते.

शेतमाल प्रकिया : शेतमालाची बाजारातील किंमत वाढविण्यासाठी तसेच तो बराच काळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्यावर प्रकिया करणे फायद्याचे ठरते. या प्रकिया शेतमालानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. धान्य वाळवून ठेवणे हीसुद्धा प्रकियाच आहे. या प्रकिया ढोबळपणे दोन प्रकारांत मोडतात. एका प्रकारात शेतमाल प्रकिया करून लगेचच त्याची विक्री केली जाते. यांना अल्पकालीन प्रकिया म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात प्रकिया केलेला शेतमाल दीर्घकाल टिकून राहतो. त्यामुळे त्याची विक्री जागतिक बाजारपेठेत मागणीनुसार करणे शक्य होते. याला दीर्घकालीन प्रकिया असे संबोधता येईल.

अल्पकालीन प्रकियेमध्ये फळांचा रस अथवा उसाचा रस काढून त्याची विक्री केली जाते. उसाचा रस काढण्यासाठी लाकडी उभ्या दोन लाटांचा बैलांवर चालणारा चरक अथवा लोखंडी आडव्या लाटा असलेला एंजिनावर चालणारा चरक या यंत्रांचा वापर केला जातो. फळांचा रस काढण्यासाठी हातांनी चालविता येणारे अथवा यांत्रिक पद्धतीचे रस काढण्याचे यंत्र वापरले जाते. धान्याचे पिठाच्या चक्कीवर अथवा घरगुती जाते वापरून पीठ करून त्याचा स्वयंपाकात वापर केला जातो. पिठाच्या पॅकबंद पिशव्या करून ते बाजारात विक्रीसाठी ठेवता येते. धान्याचे पीठ करून ते वापरणे हीसुद्धा प्रकियाच आहे. भात सडणे ही एक प्रकियाच आहे. घरगुती प्रमाणावर अशी प्रकिया करण्यासाठी उखळ आणि मुसळ यांचा वापर केला जातो. बैलांच्या साहाय्याने चालणारी तेलघाणी वापरून भुईमुगाच्या शेंगांपासून तेल काढणे ही देशी प्रकिया आहे. तेलघाण्या गरजेनुसार लहान मोठया आकाराच्या असतात. मोठया तेलघाण्या अथवा तेलाच्या गिरण्या यांत्रिक अथवा विद्युत् शक्तीवर चालतात. तेलघाणीमधून निघणारी पेंड अथवा ढेप जनावरांचे खाद्य म्हणून वापरली जाते. घरगुती प्रमाणावर प्रकिया करण्यासाठी उखळ व मुसळ, खलबत्ता, पाटा-वरवंटा इत्यादींसारखी साधने आपल्याकडे मोठया प्रमाणात वापरतात. याला पर्यायी मिक्सर अथवा फूड प्रोसेसर यासारखी साधने आता खूपच लोकप्रिय आहेत.

चरकाचा वापर करून उसाचा रस काढणे व त्यापासून गूळ तयार करणे या प्रकियेचा वापर भारतात मोठया प्रमाणात होतो. यासाठी रस उकळून आटविण्याच्या मोठया काहिली, वेगवेगळ्या आकाराचे साचे, रस गाळण्याची चाळणी इ. साधने वापरली जातात. योग्य प्रकियेव्दारे तयार केलेला गूळ बराच काळपर्यंत टिकून राहात असल्याने तो कितीही लांबच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देता येतो.

शेतमालाच्या प्रकियेमध्ये इतरही अनेक साधने आणि यंत्रे वापरली जातात. त्यात प्रकिया केलेला माल वाळविण्याचे यंत्र, यांत्रिक दळण यंत्र, यांत्रिक दणका यंत्र, बीज प्रकिया यंत्र, भातसडीचे यंत्र (हलर), सरकी काढण्याचे यंत्र, भुईमूग शेंगा सोलणी यंत्र, मका सोलणी यंत्र, कडबा कापणी यंत्र (बैल, मनुष्य व एंजिन शक्तीवर चालणारे), कुऱ्हाड व अडकित्त्यासारखे कैची यंत्र, हळद चोळण्याचे यंत्र, शेवया करण्याचे यंत्र इ. यंत्रांचा समावेश करता येईल.

फळे शीतगृहात साठविल्यास बाजारात ती जास्त दिवस मिळू शकतात. मात्र निरनिराळी फळे कोणत्या तापमानात चांगली टिकतात, याचा विचार करणे आवश्यक असते. आंबा व केळी अनुकमे ७.५° से. आणि १५° से.पेक्षा कमी तापमानाखाली ठेवल्यास त्यांवर विपरित परिणाम घडून येतो.

फळे व भाजीपाला दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्यावर प्रकिया करून ते हवाबंद डब्यात भरून ठेवता येतात. यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रकिया मोठया आहेत. हवाबंद डब्यांतून प्रकिया केलेली फळे व भाजीपाला कितीही अंतरावरच्या बाजारपेठेत उपलब्ध करून देता येतात.

पाणी उपसण्याची साधने : पाणी उपसून शेतातील पिकाला पुरविण्यासाठी अनेक प्रकारची देशी व सुधारित साधने वापरली जातात. देशी साधनांचा वापर दिवसेंदिवस कमी होत गेला आहे आणि सुधारित साधनांचा या कामी वापर वाढलेला आहे.

देशी साधने : (१) चंपारा, (२) डोण, (३) पिकोटा, (४) ढेकळी अथवा ढेकी, (५) ओकटी, (६) सोंडेची कातडी मोट, (७) बिनसोंडेची लोखंडी मोट, (८) बैलांची दुहेरी मोट, (९) लाकडी पोहऱ्याच्या माळेसह रहाटगाडगे, (१०) दोर व बादली.

सुधारित साधने : (१) लोखंडी पोहृयाच्या माळेसह लोखंडी रहाट-गाडगे, (२) पाणदट्ट्या, (३) पवनचक्की, (४) पुढे-मागे गतीचे पंप, (५) अपमध्य पंप.

शेतमालाची वाहतूक : शेतमालाची वाहतूक हा शेतकामातील महत्त्वाचा भाग आहे. यासाठी अनेक प्रकारची देशी आणि सुधारित साधने वापरली जातात.

देशी साधने : (१) बैलगाडी, (२) लाकडी अथवा लोखंडी बंडी, (३) छकडा, (४) दमणी, (५) दुचाकी सायकल.

सुधारित साधने : (१) रबरी चाकाची सुधारित बैलगाडी, (२) मालमोटार, (३) कर्षित्र आणि ट्रोली, (४) पिकअप व्हॅन.

दूधदुभत्याच्या धंद्यासाठी लागणारी साधने : देशी साधने : (१) दूध काढण्याची चरवी, (२) तांब्या भांडे, (३) गंज, (४) डेरा, (५) रवी, (६) दूध विरजविण्यासाठी मातीचे भांडे.

सुधारित साधने : (१) दूध काढण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे भांडे, (२) धार काढण्याचे यंत्र, (३) दुधातून मलई काढण्याचे यंत्र, (४) मलईमधून लोणी काढण्याचे यंत्र, (५) लोणी तयार करण्याचे यंत्र, (६) तूप आचवून ठेवण्याचे पात्र.

शेतकामासाठी वापरण्यात येणारी इतर साधने : (१) पहार, (२) बादली, (३) झारी, (४) कुदळ, (५) टिकाव, (६) फावडे (खोरे), (७) लोखंडी पाटी (घमेले), (८) बुरूडी पाटी (टोपली), (९) कोयता, (१०) विळा/खुरपी, (११) जोखड (जू), (१२) शिळवट (दुहेरी जू), (१३) खिळा-लाकडी, लोखंडी, (१४) जुपण्या, (१५) दावे, कासरा, दोर.

पाहा : कृषि; कृषि अभियांत्रिकी; कृषि संशोधन; ट्रॅक्टर; नांगर; बैलगाडी; शेतीची कामे.

संदर्भ : 1.  Culpin, C. Farm Machinery, 1992.

2. Hunt, D. Farm Power and Machinery Management, 1983.

3. I. C. A. R. Indigenous Agricultural Implements of India, New Delhi, 1962.

4. McColly, H. T. Martin, J. W. An Introduction to Agricultural Engineering, New York, 1955.

5. Michael, A. M. Oza, T. P. Principles of Agricultural Engineering, Vol. I, New Delhi, 1999.

6. Sahai, K. B. Elements of Agricul tural Engineering, New Delhi, 2005.

7. Stone, A. A. Gulvin, H. E. Machines for Power Farming, 1977.

८. आरकेरी, एच्. आर्. (अनु.) पाटील, ह. चिं. शेतीची साधी यंत्रसामुगी, मुंबई.

सोमण, ना. श्री.; घरत, ग. के.; गुजरकर, के. गो.; शिंगटे, मा. ब.

गव्हाचे पेरणी यंत्र (ड्रिल) भात पिकावर कवकनाशक भुकटीची धुरळणी करणारे विमान
गव्हाची कापणी व मळणी करणारे कम्बाइन हार्वेस्टर यंत्र भाताची कापणी व मळणी करणारे कम्बाइन यंत्रे

उसाची तोडणी करून स्वयंचलित रित्या ढकलगाडीत भरणारे यंत्र पाने तोडल्यानंतर बीटचे कंद जमिनीतून गोळा करून स्वयंचलित रित्या ट्रकमध्ये भरणारे यंत्र.
बटाटे खणून काढून व गोळा करून स्वयंचलित रित्या ट्रकमध्ये भरणारे पोटॅटो कम्बाइन यंत्र. तव्यांच्या तीन ओळी (गँग) असलेला कर्षित्रचलित्र कुळव
पिकावर पिडमाशक औषधाची फवारणी करणारे हेलिकॉप्टर द्राक्ष आणि तत्सम फळांच्या वेलांवरील घड गोळा करून वाहकपट्ट्याने ढकलगाडीत भरणारे यंत्र

हार्वेस्टर-कम्बाइन यंत्र : यामध्ये एका सेकंदाला ६ किग्रॅ. धान्य मिळते. शेतामध्ये खत विखरून टाकणारे यंत्र
मशागत, लागवड, वाफे करणे, खत घालणे अशी अनेक कामे करणारे बहु-उद्देशिय यंत्र. कर्षिचलित्र आठ ओळींची मशागत करणारे यंत्र (कल्टिव्हेटर)
यांत्रिक रीत्या कापसाची बोंडे गोळा करणारी यंत्रे कर्षित्रचलित बहुपीक टोकण यंत्र

पॉवर टिलरचलित बहुपीक टोकण यंत्र ज्योती बहुपीक टोकण यंत्र (बैलचलित)
सिंचाईकरिता वापरण्यात येणारी रेनगन कर्षिकाच्या साहाय्याने चालविता येणारे भुसकट-कर्तक यंत्र
ऊस लावणी यंत्र सूर्यफूल मळणी यंत्र
मका सोलणी यंत्र भेडी तोडणी कात्री