विहीर : पाणी, कच्चे खनिज तेल, नैसर्गिक वायू, खारे पाणी, (मिठवणी) किंवा अन्य द्रव पदार्थ जमिनीतून काढण्यासाठी केलेल्या खोदकामास वा पाडलेल्या भोकास विहीर म्हणतात. आड, बाव, बावडी बारव (पायऱ्यांची विहीर), कूप इ. नावांनीही विहीर परिचित आहे. पिण्यासाठी व बागबगीच्यासाठी नदीनाल्यांतील पाण्याचा वापर होऊ लागाला व त्या भागांत मानवी संस्कृती विकसित झाल्या. काही कारणांमुळे या जलाशयापासून लोकांना लांब राहावे लागल्याने पाण्याची गरज भागविण्याकरिता विहीर खणून गरजेप्रमाणे ⇨ भूमिजल म्हणजे जमिनीतील पाणी मिळविण्याची प्रथा जगभर अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. विहिरीचे पाणी गोडे असल्यास पिण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी वापरतात.

मोठमोठ्या धरणांमुळे कालव्याच्या पाण्यावरील पिकांमुळे तेथील शेतकरी सधन झाल्याचे पाहून कालव्याची  सोय नसलेल्या किंवा जरूरीपेक्षा कमी पाणी मिळणाऱ्या ठिकाणचे शेतकरीशुद्धा विहिरी खणून बागायती पिकांसाठी पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा तऱ्हेने विहीर हे जीवन समृद्धीचे साधन बनते.

इतिहास: ऋग्वेदात तसेच रामायण, महाभारत या विख्यात ग्रंथात व निरनिराळ्या पुराणामध्येही जागोजागी विहीरीबद्दल उल्लेख केलेला आढळतो. बायबलमध्ये विहिरीतील पाणी व विहिरींची बांधणी यांसंबधी उल्लेख आढळतात. मोहें-जो-दडो येथे शहरी वस्तीसाठी पक्क्या विटांनी उत्तम तऱ्हेने बांधलेल्या विहिरी तेथील उत्खननात आढळून आल्या आहेत. भूजलाचा उपयोग करण्यासाठी यूरोपमध्ये ११०० च्या सुमारास आघात छिद्रण पद्धतीने विहिरी खणण्यास सुरूवात झाली [⟶ भूमिजल]. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रान्समधील आर् त्वा प्रांतात चुनखडकात खणलेल्या विहिरीतून पाणी कारंज्यासारखे बाहेर येऊ लागले. यावरूनच पुढे अशा प्रकारच्या विहीरीला ⇨ आटेंशियन विहीर असे म्हटले जाऊ लागले.

विहिरींचे प्रकार : पावसाचे पाणी  जमिनीच्या सच्छिद्र स्तरांतून झिरपल्यावर अभेद्य खडकातून किंवा चिकण मातीतून पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने साचून राहते. अशा जलसंचयातील पाणी काढण्याकरिता खोदलेल्या खड् ड्यास किंवा भोकास पाण्याची विहीर म्हणतात.

पाण्याच्या विहिरी हा सर्वाधिक परिचित प्रकार आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या विहिरी याही सर्वसाधारण परिचित आहेत. शिवाय मीठ व गंधक मिळविण्यासाठी खोल जमिनीत विहिरी खणतात. वाफ वा गरम पाणी पंपाच्या साहाय्याने दाबाने अशा विहिरीत सोडून ही द्रव्ये सुटी केली जातात व मग ती वर खेचून मिळविण्यात येतात. अजूनही बराच मोठा लोकसमुदाय पाणीपुरवठ्यासाठी विहिरींवर अवलंबून आहे व ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. सामान्यपणे भूमिजल हे शुद्ध असते.कारण मृदेतून झिरपून खाली जाताना पाणी चांगले गाळले जाते.सामान्यत : याच्यामध्ये विद्रुत (विरघळलेली) लवणे (खनिजे) असतात. ज्या विहिरीच्या झऱ्यात (प्रवाहात) या लवणांचे प्रमाण जास्त असते, तिला खनिज जल विहीर म्हणतात. जेथे विषारी वा दूषित पदार्थ व रोगवाहक जंतूंचा प्रादुर्भाव नसेल, अशा ठिकाणी पाण्याच्या विहीरी असतात. वाहितमल यांच्यात मिसळू नये म्हणून विहिरी  मलवापीपासून साधारणतः ३० मी अंतरावर खोदतात. तेल व नैसर्गिक वायू हे पाण्यापेक्षा हलके असतात. त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. नैसर्गिक वायू व खनिज तेल यांच्या विहिरीचे वेधन करणे हे एक प्रगत शास्त्र आहे. यासाठी अनेक वर्ष प्रशिक्षण व अनुभव देऊन कार्यकर्ते तयार केले जातात. खोल खनिज तेल विहीर खणणे ही खर्चाची बाब आहे (⟶खनिज तेल, वेधन व छिद्रण).

विहिरींना त्यांच्या व्यासाच्या व खोलीच्या मापाप्रमाणे पाणी पुरवण्याच्या प्रकारावरून निरनिराळी नावे दिली आहेत. विहिरींचे मुख्यतः खोदीव म्हणजे खोदलेली उघडी, छिद्रित (भोक घेऊन बनविलेली), अर्टेशियन, रंध्रित (वेधन करून बनविलेली), अनुर्खनित व अरीय असे प्रकार आहेत. महाराष्ट्रात जुन्या पायविहिरी खूप आहेत. खोदलेल्या उघड्या विहिरीसाधारणतः २ ते ८ मी. व्यासाच्या असतात. त्यांची खोली भूस्तरातील पाण्याच्या (भूमिजलाच्या) पातळीप्रमाणे ५ ते ३० मी. पर्यंत असते.

छिद्रित विहिरी १० सेंमी. ते १ मी. व्यासापर्यंतच्या असतात व त्यांची खोली १,००० मी. असू शकते. कारण बरेचसे भूमिजल ह्या खोलीपर्यंतच असते. काही विशिष्ट भूगर्भातील अशा विहिरींना ‘नलिका कूप’ असे संबोधण्यात येते. भोक पाडल्यावर किंवा खोदकाम केल्यावर ज्यांचे पाणी जास्त दाबामुळे उफाळून वर येते अशा विहिरींना आर्टेशियन  (उत्पीड अथवा कारंज्याच्या) विहिरी म्हणतात. [⟶ आर्टेशियन विहीर]. नलिका कूपाच्या प्रकारातील पण पाणीपुरवठा वाढावा म्हणून शेवटी मोठा खळगा तयार केलेल्या किंवा तेथून चाकाच्या आऱ्याप्रमाणे आडवे बोगदेवजा खोदकाम केलेल्या विहिरींना रंध्रित व अरीय विहिरी  अशा संज्ञा आहेत. मऊ स्तरात कूपकाच्या रूपात खाली खोदत गेलेल्या वा उतरविलेल्या विहिरींना अनुर्खनित विहिरी म्हणतात. नदी वा ओढ्याच्या काठाशी खणलेल्या विहिरीला भुडकी म्हणतात. साधारणपणे ही बांधलेली नसते.

पाण्याच्या विहिरींचे प्रकार : ( १ ) खोदीव, ( २ ) उत्पीड ( कारंजी ), ( ३ ) विंधन, ( ४ ) छिद्रित.

मनुष्यबळाने  हत्यारांच्या साहाय्याने खणलेल्या विहिरींची खोली  भारतात सु . १५० मी. पर्यंत व चीनमध्ये ४५० मी. पर्यंत असल्याचे आढळते. यंत्राच्या साह्याने ५०० मी. पर्यंत खोलीच्या नलिका कूप(भोकाच्या विहिरी) पुष्कळच वापरात आहेत.


खणलेल्या विहिरींचे पाणी वाढावे म्हणून नद्यानाल्यांमध्ये खोल कूप खणतात. पावसाळ्यात पुराचे पाणी जमिनीत मुरते व त्यामुळे कूपाच्या आजूबाजूंच्या विहिरींचे पाणी कायम वरच्या पातळीत राहू शकते.

जमिनीतील पाणी मुरावे म्हणून उलट्या किंवा मुक्या विहिरी खणतात. कारखान्यातील रसायने मिसळलेले सांडपाणी गटारात सोडल्याने ती गटारे ज्या नदीस मिळतात तिचे पाणी दूषित होते. म्हणून हे पाणी खूप खोल खणलेल्या कूपात सोडतात. पाणी खूप खोल व लांब पर्यंत जिरत, मुरत गेल्याने त्यांच्यामधील ही रसायने निघून जाऊन नदीचे पाणी प्रदूषित होत नाही.[ ⟶ प्रदूषण ].

विहिरींचे आकार : विहिरींचे आकारही वेगवेगळे असतात.वर्तुळाकार विहिरी सर्वत्र आढळतात. चौकोनी विहिरींचे बांधकाम त्याच्या मागील मातीच्या, पाऊस व ऊन यांच्यामुळे फुगण्या –आकसण्याच्या दाबामुळे खिळखिळे होऊन पडते. वर्तुळाकार बांधकामात सर्व बाजूंनी कमानीचा फायदा मिळाल्याने असा दाब सहन होऊन बांधकाम टिकते. म्हणूनच वर्तुळकार विहिरी फार रूढ आहेत.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाय रहाट बसविण्याच्या सोयीसाठी अगदी अरूंद व लांब अशा चिंचोळ्या आयताकार विहिरी ओल खणतात. आंध्र प्रदेशात गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी काँक्रीटच्या षट् कोणी, अष्टकोनी विहिरी बांधलेल्या आहेत व त्यांच्यावर प्रत्येकी सहा ते आठ रहाट बसविलेले आहेत. पुष्कळ ऐतिहासिक महत्त्वाच्या विहिरी मोठ्या दगडांनी किंवा शिळांनी कलाकृतीच्या आकारात बांधलेल्या आहेत. अशा काही विहिरींत गारव्यासाठी, जपजाप्य करण्यासाठी किंवा संपत्ती ठेवण्यासाठी, पाण्याच्या वर खोल्या किंवा पाण्याखाली कमानी काढलेल्या असतात. नाना फडणीसांनी पुण्यात सदाशिव पेठेच्या हौदास ज्या विहिरीतून पाणी आणले त्या विहिरीवर घुमट बांधून ती आच्छादून टाकली होती. मध्य प्रदेशात रतलाममध्ये तुरूंगासमोर सु.१६ ते १७ मी. खोलीची विहीर व वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराजवळील ‘तीर्थ’ विहीर या सर्व सुंदर कलाकृतीत बांधलेल्या आहेत. गुजरातमध्ये अनेक मजली विहिरी बांधलेल्या आहेत. पाणी वाढविण्यासाठी वर्तुळाकार विहिरीत चर खणून शाळुंकीच्या आकाराच्या पुष्कळ विहिरी बांधलेल्या आढळतात. बीडची खजाना  विहीर व लिंब (जि. सातारा) येथील बारा थारोळ्यांची विहीर प्रसिद्ध आहेत.

विहिरीची जागा ठरविणे : विहिरीसाठी जागा शोधणे, कोठे पाणी लागेल हे पहाणे हेही प्रशिक्षणामुळे समजते. नैसर्गिक साधन संपत्तीला धक्का न लावता पाण्याचा वा तेलाचा भरपूर साठा कोठे सापडेल अशी विहिरीसाठी जागा निश्चित करणे हे अभियंत्यांपुढील व भूवैज्ञानिकांपुढील एक महत्त्वाचे काम ठरते. अलीकडे शास्त्रज्ञ व अभियंते मात्र भूमिस्थित निक्षेप पाहण्यासाठी भूकंपनोंदयंत्रासारखी आधुनिक शास्त्रीय उपकरणे वापरतात. पारंपारिक अनुभवाने पाणी कोठे लागेल हे सांगणाऱ्या पाणाड्यांचीही काही ठिकाणी पाणी शोधण्यासाठी मदत घेतात.

बांधकाम व विहीर उतरविणे : पिण्याच्या पाण्यासाठी खणलेल्या विहिरी बांधलेल्याच असतात व त्यांना जमिनीवर कठडा करून, सांडपाणी जवळच न मुरता वाहून दूर जावे म्हणून विहिरीभोवती फरशी करून तिच्याभोवती गटार बांधलेले असते. जुन्या सार्वजनिक विहिरी उत्तम प्रकारे बांधलेल्या असून त्यात पाण्यापर्यंत जाण्यास पायऱ्या असतात.त्यामुळे पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता येते, परंतु गैरवापरामुळे अशा विहिरीचे पाणी घाण होते आणि ते पाणी पिऊन पूर्वी नारू या रोगाचा प्रादुर्भाव होत असे. अशा प्रकारे खेडीच्या खेडी नारूमुळे हैराण होत. हे लक्षात आल्यावर आता शासनाने पायऱ्यांच्या विहिरी बांधण्यास मनाई केली आहे. बिनपायऱ्यांच्या विहिरींमुळे नारू रोग आटोक्यात आला आहे. [ ⟶ अरोग्यविज्ञान, नारू ].

शेतातील सर्व विहिरी बांधतातच असे नाही. विहिरी कठीण खडकात असल्यास नुसते मोटवण किंवा एंजिन घरचं बांधतात.जेथे मऊ खडक, वाळू असेल, तेथे विहीर तळापासून बांधतात. अशा बांधकामास खडकाचा पाया नसल्यास तळात विहिरीच्या परिघावर एक प्रचिलित काँक्रीटचे किंवा लाकडी कडे टाकून त्यावर बांधकाम करतात. विहिरीचे बांधकाम विटांचे, बहुतेक ठिकाणी दगडांचे (तोडीचे) व काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे असते.

ज्या ठिकाणी वाळू अगर मऊ माती असते, तेथे विहीर खणतानाच ढासळते. अशा वेळी सुरूवातीस विहिरीचा गाळा खूप मोठा धरून थोडे खणतात व गाळा कमी करीत जातात. असे करीत करीत टप्प्याटप्प्याने विहीर खोल खणतात. मग तळात काँक्रीटचे कडे टाकून त्यावर जरूर तेवढ्या गाळ्याची विहीर बांधतात व बांधकामाच्या मागील मोठ्या गाळ्याचे खणलेले टप्पे बुजवतात, परंतु विहीर फार खोल खणावयाची असेल, तर ही पद्धत उपयुक्त नाही. अशा ठिकाणी बांधीव विहीर आत उतरविण्याचे तंत्र  अवलंबितात. पंजाबात हे तंत्र अधिक रूढ आहे. प्रथम विहिरीच्या आकाराचा थोडासा खड्डा घेऊन त्याचे तळास कडे टाकून त्याच्यावर बांधकाम जमिनीच्यावर २.५ ते ३ मी. पर्यंत करतात. मग त्या खड्डयात कामगार उतरून भुसभुशीत खडकात खोदकाम करतात. बांधकामाच्या कड्याखाली एकसारखे कोरून खोदकाम झाले म्हणजे बांधकाम आपल्याच वजनाने खाली उतरते वा बसते. पुन्हा त्यावर बांधकाम करून पुन्हा ते खाली उतरवतात. अशा तऱ्हेने कितीही खोल विहीर तयार होऊ शकते. विहीर तिरकी होऊ नये म्हणून व बांधकाम अटकू नये म्हणून त्याचे वजन हिशेबात घ्यावे लागते.

विहीर बांधून काढण्याची आणखी एक पद्धत आहे. त्या पद्धतीत भुसभुशीत खडकात प्रथम खणता येईल तितका खोल विहिरीचा खड्डा खणतात व तो सर्व आतून वर्तुळाकार बांधून काढतात. मग त्या बांधकामाच्या वर्तुळाचे सारखे चार भाग करून समोरासमोरचे दोन भाग बांधकामाच्या खाली खोल खणतात व ते खालपासून बांधीत आणून वरील बांधकामाशी जुळवतात. नंतर समोरासमोरचे दुसरे दोन भाग त्याचप्रमाणे बांधून वर आणतात. अशा तऱ्हेने वरचे बांधकाम आधी व खालचे शेवटी होते. सर्वात शेवटी कडे टाकून ते वरच्या बांधकामाशी जुळवून घेतात.


जमिनीखालील परिस्थितीप्रमाणे विहिरीतील पाणीपुरवठा व भारतातील विहिरी : विहिरींना होणारा पाणीपुरवठा हा जमिनीखालील खडकांच्या प्रकारावर व त्यांच्या रचनेवर अवलंबून असतो. सच्छिद्र व पुष्कळ संधी किंवा भेगा असलेल्या खडकांतून पुष्कळ पाणीपुरवठा होणे शक्य असते. अग्निज व रूपांतरित खडक सामन्यतः छिद्रहीन असतात. त्यांच्यात संधी  किंवा भेगा थोड्याच असतात. म्हणून त्यांच्यामधून पाणीपुरवठा कमी होतो. जाड वाळू व कंकर असलेल्या जमिनीमधील विहिरींना भरपूर पाणीपुरवठा होऊ शकतो. चिकण मातीतील विहिरींना फारच अल्प प्रमाणात पाणी उपल्बध होते.

भारतामध्ये सिंधू व गंगा या नद्यांच्या दुआबातील तसेच गुजरातमधील गाळवट प्रदेश आणि समुद्रकिनारपट्टीतील पाँडेचेरी वगैरें सारखे काही गाळवटीचे टापू यांमध्ये उथळ आणि खोल अशा भरपूर पाणी देणाऱ्या विहिरी आहेत. या भागांत नेहमीसारख्या अगर उतरवलेल्या विहिरी आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या विहिरी अगदी लहान, वर्तुळकार, खोल व विटांनी बांधलेल्या असतात. महाराष्ट्रात तापी नदी व सातपुड्याची पहिली रांग यांच्यामधील भागातही लहान आकारमानाच्या ३० -४० मी. खोलीपर्यंतच्या विहिरी आहेत. या सर्व गाळवटीच्या प्रदेशांतून नलिका-कूप हाच मुबलक पाणी मिळविण्याचा सोपा मार्ग आहे. अशा कूपांची खोली सामान्यपणे ६० ते १५० मी. असते. या भागातून खोदलेल्या विहिरींपासून ६ ते ८ हेक्टर बागाईतीला पुरेसे पाणी मिळते. राजस्थानाच्या काही  भागात नलिका-कूपांचे प्रयत्न होत आहेत. तेथील खडकाळ भागातून काही ठिकाणी शेल प्रकारच्या मातकट खडकात ५० ते ६० मी. पर्यंत खोल विहिरी छिन्नी-हातोडीने फोडून खणतात. घरातील एखाद्या खोलीतच, अशी विहीर खणतात. पिण्याच्या पाण्यासाठीच तिचा मुख्यत्वे उपयोग होतो. उदयपूरकडे व अरवली संधाच्या खडकात महाराष्ट्रातील विहिरीप्रमाणेच विहिरी असतात. त्यावर एक ते दीड हेक्टरपर्यंत बागायत शेती होते.

कर्नाटकात धारवाडी खडकातील विहिरी फार खोल असतात. खुद्द धारवाड व हुबळी शहरात ५० मी. खोलीच्या साध्या विहिरी व छिद्रित विहिरी आहेत. त्यातील काहींना मुबलक पाणी असून त्यांवर पुष्कळ बागायत शेती होते. धारवाडी खडकातून सावनूर या गावी सबंध गावास पुरेल एवढे पाणी अशा छिद्रित विहिरीतून मिळते. कर्नाटकात कलादगी खडकातही काही ठिकाणी पाणी फार खोल लागते. बेळगाव- बागलकोट रस्त्यावरील यारगट्टी या चौरस्त्यावरील गावी ४-५ मी. गाळ्याची सु.५५ मी. खोलीची विहीर आहे. तिला दोन तीन गावांना पुरेल इतके पाणी आहे. दक्षिण भारतात पट्टिताश्म खडकांतील विहिरी महाराष्ट्रातील विहिरींप्रमाणेच खोल आहेत व सामान्यपणे १५ ते१६ मी. खोल विहिरीवर दीड ते दोन हेक्टर बागायत शेती होते.

महाराष्ट्रातील बेसाल्ट या काळ्या खडकातील विहिरी सर्वसाधारणपणे १० ते १२ मी. खोल खोदलेल्या असतात. महाराष्ट्रातील विहिरींना पाणी मात्र बेताचेच असते. सर्वसाधारणपणे नेहमीच्या चांगल्या विहिरीवर एक ते दोन हेक्टर उसाची बागायत शेती होऊ शकते. काही थोड्या विहिरीतून प्रत्येकी साडेचार ते सात हजार हेक्टो-लिटर पाणी मिळते. व त्यापासून चार ते आठ हेक्टर उस पिकविता येतो.

खाऱ्या पाण्याच्या विहिरी : विहिरींचे पाणी हे नळ किंवा कालव्याच्या पाण्यापेक्षा अधिक लवणयुक्त असू शकते. त्यामुळे त्यांच्यात पाचक गुणही असतो, असा समज आहे, परंतु लवणांचे प्रमाण वाढले की, पाणी पिण्यास व शेतीस निरूपयोगी होते. विहिरींच्या पाण्याचा जडपणा सुद्धा तपासावा लागतो. घरगुती वापरास जड पाणी योग्य नसते. खाऱ्या पाण्याच्या विहिरी पुष्कळ ठिकाणी असतात. पाण्याच्या एक लक्ष भागात २५० भाग लवणे असलेले पाणी पिण्यास निरूपयोगी व हानिकारक असते. काही ठिकाणी मीठ व सोडा तयार करण्यासाठी अशा खाऱ्या पाण्याच्या विहिरी मुद्दाम खणतात.विकसित देशांत पिकांना खूप नत्र खते घालतात. ह्या खतातील नायट्रेट जमिनीत झिरपून विहिरीच्या पाण्यात मिसळते, असे पाणी आरोग्याला हितावह नसते.

विंधन विहीर किंवा नलिका-कूप (बोअर वेल) : सामान्यतः ५-९० सेंमी. व्यासाच्या व बहुधा इच्छित खोलीपर्यंत पोलादी नळ्या किंवा अवरणाच्या (केसिंग) विंधन-विहिरी असतात. पाणी लागलेला थर पक्का असेल, तर पक्क्या खडकाच्या वर आवरण घालतात. तळाला वाळू किंवा रेव असेल व गाभारा मोठा होण्याची भिती असेल, तर पाणी लागलेल्या थराच्या खालपर्यंत आवरण घालतात व त्या थराच्या तळापर्यंत सच्छिद्र नळ्या किंवा पडदा घालतात. अगदी बारीक वाळूमध्ये पडद्याभोवती जाड (भरड) वाळू किंवा बारीक रेव घालतात. भरड कणीदार. जलप्रस्तर (जलघर) असताना पडदा जलप्रस्तराच्या थेट संपर्कात असतो. दोन्हींच्या बाबतीत बांधकाम करताना बराच काळ पंपाने पाणी उपसणे, उल्लोल (खालीवर होणे) किंवा अन्य प्रकारे (याला विहिरीचा विकास म्हणतात) काम करतात. असे करताना तळातील अगदी बारीक कण विहिरीमध्ये येतात. ते बाहेर काढून टाकतात. या प्रक्रियेने विहिरीची प्राथमिक क्षमता बरीच वाढते व कित्येकदा ती अनेक पटीने वाढते. पाण्यातील खनिजांमुळे पडद्यातील भोके बंद होण्याची शक्यता असते. उल्लोलन, अम्ल प्रक्रिया किंवा छोटा स्फोट करणे इ. उपाय करून विहिरीची पाणी देण्याची क्षमता पुन्हा वाढवितात.

विहिरीतील पाणी पंपाने उपसल्यावर विहिरीवरील दाबशीर्ष कमी करतात व विहिरीकडील द्रवीय ढाळ प्रस्थापित करून घेतात, त्यामुळे पाणी विहिरीकडे वाहू लागते. या पाण्याची पातळी खाली नेण्याला विहिरीतील पाण्याच्या पातळीचे प्रमाण म्हणतात. विहिरीची अंतिम क्षमता मोजण्याची एक सर्वसाधारण वापरात असलेली पद्धत म्हणजे पाण्याच्या पातळीची प्रतिएककाला क्षमता मोजणे ही होय, ही विहिरीची विशिष्ट धारिता (क्षमता) होय व ती पाण्याच्या पातळीच्या प्रमाणात देतात. आणि ती विहीर पुरी झाल्यावर पंप परीक्षा झाल्यावर ठरवितात.

पाण्याचा उपसा : पूर्वी पाणी उपसण्यासाठी मोट, राहाटगाडगे, रहाट, हापशी इ. साधनांचा वापर करीत. आता मोठ्या क्षमतेच्या बहुतेक विहिरींतील पाणी उपसण्यासाठी टरबाइन प्रकारचे पंप बसवितात. तथापि विहिरीतील पाण्याची पातळी जमिनीच्या खाली ६ मी. पेक्षा जास्त असल्यास शोषण प्रकारचे पंप वापरतात. शेतातील कमी क्षमतेच्या पुष्कळ विहिरींवर पवनचक्कीने चालणारे पंप बसवितात. घरगुती वापराच्या विहिरींवर पाण्यात बुडालेले केंद्रोत्सारी किंवा प्रोथ (झोत) पंप बसवितात [⟶ पंप].

विहिरीचे पुनर्भरण : शेतातील परंपरागत विहिरींतून अधिकाधिक पाणी मिळविण्यासाठी वापरण्यात येणारे अत्यंत सोपे व स्वस्त तंत्र आहे. यामध्ये परंपरागत विहिरीचा एक टाकीसारखा उपयोग करून घेतात. कोरडवाहू प्रदेशात पाऊस अत्यंत कमी पडतो. पावसाचे पाणी वाहून जाते आणि पुन्हा काही दिवसांतच जमीन कोरडी पडते. हेच वाहून जाणारे पाणी विहिरीत साठवून ठेवता येते. ४० – ५० वर्षापूर्वी येथे ५ – ७ मी. खोलीवर पाणी लागत होते तेथे आता १७ – ३५ मी. खोलीपर्यंत जावे लागते. गेल्या काही वर्षात जमिनीवरील पाण्याच्या वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पण प्रचंड जंगलतोडीमुळे जमिनीत पाणी झिरपण्याच्या किंवा टिकून राहण्याच्या प्रमाणात मात्र सातत्याने घट होत गेली  आहे आणि म्हणूनच विहिरी  कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत गेले आहे. त्यासाठी विहिरीचे पुनर्भरण (रिचार्जिंग) ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरली आहे. त्यासाठी जमीन, शेती, रस्ते, नाले यांतून वाहून जाणारे पाणीही उपयोगात येऊ शकते. यामध्ये प्राण्यांचे मलमूत्र इ. शेतीसाठी आवश्यक घटकद्रव्येही  मिळू शकतात.

या तंत्रात विहिरीजवळ एक खड्डा घेऊन त्यामध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी बांध घालून साठविले जाते. व ते एका नळाद्वारे विहिरीत सोडले जाते. येथे विहिरीचा पाणी साठवण्याच्या टाकी सारखा उपयोग केला जातो. व साठवलेले पाणी हे पुढे अनेक दिवसापर्यंत वापरता येऊ शकते. या पद्धतीने खाऱ्या पाण्याची विहीर देखील गोड्या पाण्याच्या स्वरूपात बदलता येते. कारण खारे पाणी जड असल्याने तळाशी राहते व गोडे पाणी हलके असल्याने वर राहते. ऑपरेट चॅरिटेबल ट्रस्टने सौराष्ट्रात ४७,००० विहिरींचे पुनर्भरण केले आहे.

पहा : आर्टेशियन विहीर, जलविज्ञान, पंप, पाणी पुरवठा, भूमिजल , मोट, रहाटगाडगे, वेधंन व छिद्रण, सिंचन.

संदर्भ : 1. Todd, D. K. Groundwater Hydrology, 1980.

        2. Walton, W.C. Groundwater Resource Evaluation, 1970.

लिमये, दा. ग., जमदाडे, ज. वि., कुलकर्णी, सतीश वि.