खरबूज : (चिबूड हिं. काचरा गु. चिबडू, शक्कर टेटी क. कळंगिड सं. मधुपाक, कर्कटी इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन लॅ. कुकुमिस मेलो कुल-कुकर्बिटेसी). या वेलीची विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात व दख्खन येथे पण भारतात सर्वत्र, नद्यांच्या वाळवंटात लागवड करतात. तिचे मूलस्थान बलुचिस्तान, उष्ण आफ्रिका व भारत आहे. ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) जमिनीवर पसरणारी व खरबरीत वेल असून हिची सामान्य लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी कुलाप्रमाणे आहेत.

या पिकाला गाळवट, कसदार जमीन लागते. ३ मी. अंतरावर ३० सेंमी. व्यासाचे आणि तितकेच खोल खड्डे करून त्यांत प्रत्येकी ८–१० किग्रॅ. शेणखत घालून पाच-सहा बिया लावतात. २-३ आठवड्यांनी प्रत्येक खड्ड्यात दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची काढून टाकतात. पाणी जरूरीप्रमाणे चालू ठेवतात. लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांत फळे पिकतील तशी काढतात. विविध आकार व रंगाप्रमाणे प्रकार ओळखले जातात. साल नरम अगर कठीण, रेषांचे नक्षीकाम असलेली अगर गुळगुळीत मृदुफळ गोलसर (१०–१२ सेंमी.) फळातील गर नारिंगी किंवा हिरवा, स्वादिष्ट, पिठूळ आणि मधुर वासाचा असतो. हेक्टरात आठ ते नऊ हजार किग्रॅ. फळे मिळतात. लखनौकडील ‘सफेद व चित्ता’ मद्रासकडील ‘अनार, बत्तासा, शेरबत’ पंजाबकडील ‘चुमिआरी’ वगैरे संकरज प्रकार उपलब्ध आहेत. फळे जेवणानंतर मुखशुद्धीसाठी खातात. ती मुरंब्यासाठी, सरबताकरिता उपयुक्त असून हवाबंद डब्यात भरुन सुरक्षित ठेवतात. बिया मोठ्या असून त्याही खाद्य आहेत. त्यांचे तेल पिवळट, सुगंधी, पौष्टिक व चवदार असते तेल दिव्यातही वापरतात. फळ व बिया औषधी, शीतक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या), पौष्टिक, स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), अग्निमांद्य व जुनाट हट्टी इसबावर गुणकारी असतात. फूट व ⇨ टरकाकडी  हे खरबुजाचेच प्रकार आहेत.

क्षीरसागर, ब. ग. पाटील, ह. चिं.

रोग : खरबुजावर मुख्यत्वेकरुन मर रोग आढळतो. तो एर्विनिया ट्रकीफिला या सूक्ष्मजंतूमुळे होतो. वेलाचा शेंडा मलूल होतो, पाने पिवळी पडतात व शेवटी वेल सुकून जातो. सूक्ष्मजंतू वेलाच्या वाहक वृंदातून (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणाऱ्या जुडग्यातून) निघणाऱ्या चिकट स्रावात जास्त प्रमाणात आढळतात. भुंगेऱ्यामुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार होतो. कीटकनाशकांच्या साहाय्याने भुंगेऱ्यांचा नाश करतात.

हा रोग काही ठिकाणी फ्युजेरियम  कवकामुळेही (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळेही) होतो. रोगाने वेल सुकतो. रोगप्रसार बियांद्वारे होतो. याकरिता रोगप्रतिकारक जाती लावतात.                                                  

कुलकर्णी, य. स.