कीटक नियंत्रण : पिकांचे नुकसान करणे, साठविलेल्या धान्यादी वस्तूंचा नाश करणे, रोगांचा प्रसार करणे, पाळीव जनावरांना त्रास देणे इ. निरनिराळ्या प्रकारांनी कीटकांचा उपद्रव होतो. अशा उपद्रवी कीटकांचे नियत्रंण करण्यासाठी त्यांना जगणे कठीण करणे, त्यांचा नाश करणे, त्यांची उत्पती थांबविणे, प्रसार थांबविणे इ. मार्ग अवलंबिले जातात. कीटक नियत्रंणासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचे नैसर्गिक आणि अनुप्रयुक्त (व्यावहारिक) असे दोन भाग स्थूलमानाने पडतात.

नैसर्गिक नियंत्रण पद्धती : यांमधील पद्धती काही प्रमाणात जैव पद्धतीच आहेत. जैव पद्धती व ह्या पद्धती यांमधील फरक म्हणजे जैव पद्धतींना श्रम व पैसा लागतो, तर ह्या पद्धतींना त्यांची तितकीशी गरज भासत नाही. ह्या पद्धतींनी होणारे नियंत्रण निसर्गनियमांनुसार होत असते. ह्यांमध्ये पुढील पद्धतींचा समावेश होतो : (१) कीटकांवर हवामानातील चढउतारामुळे अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतात. हवामानातील बदलांचे परिणाम कीटकांवर जलद व मोठ्या प्रमाणावर होतात. हवेतील आर्द्रता, तसेच जमिनीतील ओलावा व तिची सुपीकता, पाऊस, सूर्य़प्रकाश, तापमान बदल, वाऱ्यांची हालचाल इत्यादींचे कीटकांच्या जीवनांवर परिणाम होतात. यांपैकी एकात जरी बदल झाला, तरी त्याचे कीटकांवर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतात. (२) जलशय, पर्वतांच्या रांगा इ. भौगोलिक रचना हे कीटकांच्या प्रसारातील मुख्य अडथळे होत. काही कीटक उडू शकत नसल्याने पर्वत, नद्या, तळी इत्यादींमुळे त्यांचा प्रसार शेजारच्या प्रदेशात होऊ शकत नाही. (३) कीटकांवर उपजीविका करणारे पक्षी, उंदीर, घुशी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), मासे उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे) प्राणी, कीटकभक्षक प्राणी इत्यादींकडून कीटकांचा बऱ्याच प्रमाणात नाश होतो. वरीलपैकी काहींचे कीटक हेच अन्न असते. बेडूक, भेक यांसारखे प्राणी, त्यांच्या पोटाच्या चौपट कीटक चोवीस तासांत खातात. सूक्ष्मजंतू, कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) व व्हायरस यांमुळे कीटकांना अनेक प्रकारचे रोग होतात. हवामानात बदल होऊन अशा रोगांचा झपाट्याने फैलाव होतो व त्यामुळे कीटकांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. काही वेळा कीटकांची वाढ बेसुमार होते. अशा वेळी त्यांचा अन्नपुरवठा कमी होऊन ते एकमेकांस खातात.

नैसर्गिक नियंत्रण पद्धतींनी कीटकांची संख्या बऱ्याच अंशी मर्यादित ठेवली जाते व नैसर्गिक समतोल राखला जातो. मात्र अनेकदा अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच कीटकांची भरमसाट वाढ होते. अशा वेळी कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी व त्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी अनुप्रयुक्त पद्धतींचा उपयोग अपरिहार्य ठरतो.

अनुप्रयुक्त नियंत्रण पद्धती : यांमध्ये कीटकनाशकांसारखी रसायने, यांत्रिक व भौतिकीय पद्धती, शेतीच्या मशागतीतील क्रिया, जैव पद्धती, व कायदा यांचा समावेश केला जातो.

(१) कीटकनाशके : नैसर्गिक व संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेली ) कार्बनी (सेंद्रिय) व अकार्बनी रसायने वापरून कीटकांचा नाश करतात. ही रसायने कीटकांवर स्पर्शाने, पोटात भिनून, श्वसनमार्ग इ. मार्गांनी, तसेच दैहिक (सर्व अंगात भिनणाऱ्या) विषांप्रमाणे कार्य करतात [→ कीटकनाशके].

(२) यांत्रिक व भौतिकीय पद्धती : प्राथमिक अवस्थेतील कीड लागलेली झाडे उपटून किडीसह त्यांचा नाश करणे पानांवरील कीटकांची अंडी, अळ्या व कोष गोळा करून त्यांचा नाश करणे वनस्पतींचा ग्रस्त भाग काढून टाकणे पिंजरे, सापळे इ. साधनांच्या साहाय्याने कीटकांना पकडून त्यांचा नाश करणे मोगरीसारख्या झोडपण्याच्या साधनांनी बडवून, वनस्पती किंवा प्राणी यांना विशिष्ट ठिकाणी ग्रीज, डांबरयुक्त पट्ट्या बांधून कीटकांना प्रतिबंध करणे  विद्युत् कुपंणे, विद्युत् कर्षुकीय (चुंबकीय) साधने, तापमान संतुलित ठेवून, कृत्रिम पूर आणून, प्रकाशाच्या साहाय्याने कीटकांना आकर्षित करून,  क्ष-किरण व गॅमा किरण (क्ष- किरणांपेक्षा कमी तरंगलांबी असलेले भेदक किरण) यांच्या साहाय्याने कीटकांचे निर्बीजीकरण करणे इ. भौतिकीय व यांत्रिक पद्धती कीटक नियंत्रणासाठी वापरतात. ह्या पद्धती कीटकांचे अस्तित्व समजल्यानंतरच वापरतात. ह्या पद्धतींनी कीटकनाश जलद होत असल्याने त्या लोकप्रिय आहेत. तथापि ह्या खर्चिक व वेळखाऊ असल्यामुळे टोळधाडीसारख्या मोठ्या प्रमाणावरील कीटकांबाबत त्या वापरणे परवडत नाहीत. प्रवर्तन तापन आणि ध्वनी यांचा उपयोग करून कीटकनाश करण्याचे प्रयत्न प्रयोगावस्थेत आहेत.

(३) शेतीच्या मशागतीतील क्रिया : जमिनीच्या मशागतीमधील कार्यपद्धतींचा उपयोग कीटकनाशासाठी करतात. ह्या पद्धती प्राथमिक स्वरूपाच्या असून त्यांमध्ये सामान्य मशागतीच्या कार्य- पद्धतींचा आणि शेतीच्या अवजारांचा प्रामुख्याने वापर करतात. ह्यांना खर्च कमी येतो. तथापि त्या योग्य वेळी केल्यासच फायदेशीर ठरतात. जमिनीत असणारे कीटक, त्यांची अंडी, कोष किंवा अळ्या यांचा नाश करण्यासाठी ती जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे किंवा बांध खरडणे इ. क्रिया केल्यास कीटक किंवा त्यांची अंडी, अळ्या वर येतात आणि उष्णता, सूर्य़प्रकाश, त्यांच्यावर उपजीविका करणारे प्राणी इ. विनाशकांशी त्यांचा संपर्क येऊन त्यांचा नाश होतो. पेरणीच्या वेळेत बदल करणे, पिकांची योग्य फेरपालट, कीटकरोधी नवीन वाणांची लागवड करणे, जमिनीतील भेगांमध्ये असणाऱ्या कीटकांचा नाश करण्यासाठी पाणी देणे, तण काढून टाकणे, कापणीनंतर राहिलेली धसकटे काढून त्यांतील कीटकांचा सुप्तावस्थेत नाश करणे इत्यादींमुळे कीटकांचा थोड्याफार प्रमाणात नाश होतो.

(४) जैव पद्धती : कीटकांचा नाश करणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूंचा प्रवेश करून, त्यांना प्रोत्साहन देऊन किंवा त्यांची वाढ करून इ. प्रकारांनी कीटकांचा नाश करतात. कीटकांवरील परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे) कीटकभक्षके आणि कीटकांमध्ये विकृती आणणारे सूक्ष्मजंतू व सूक्ष्मजीव यांचा यामध्ये समावेश केला जातो. पिकांच्या अंतर्गत भागातील बोंड अळी, खोडकिडा इ. कीटकांवर कीटकनाशकांचा फारसा उपयोग होत नाही . अशा कीटकांसाठी वरील पद्धतीचा उपयोग फायदेशीर व प्रभावी ठरतो.

या पद्धतींचा उपयोग सर्वसाधारण नैसर्गिक परिस्थितीतच करतात. तसेच उपद्रवी कीटकांचा त्रास जेथे ते कीटक कधीच दिसत नव्हते अशा ठिकाणी होत असल्यास व ते कीटक तेथील भक्षके व परजीव यांच्याकडूनही नष्ट होत नसतील, तर त्या ठिकाणी उपद्रवी कीटकांचा नाश करणाऱ्या नवीन कीटकांचा प्रवेश करवून त्यांचा नाश करता येतो. पण उपद्रवी कीटकांचा नाश झाल्यावर नाश करणाऱ्या कीटकांची वाढ होतच राहते व त्यांची ही वाढ रोखणे आवश्यक ठरते, नाहीतर ती वाढ घातक ठरते. कर्नाटकामधील सागवानावरील कीड नष्ट करण्यासाठी भक्षक-माश्या आणण्यात आल्या. त्या माश्यांनी ती कीड पूर्णपणे नष्ट केली. कीड नाहीशी झाल्यावर त्याच सागवान खाऊ लागल्या. तेव्हा त्यांच्या नाशाची समस्या निर्माण झाली. कॅलिफोर्नियामधील लिंबू गटातील झाडांवरील ढेकणाचे (आयसिरिया परचेसाय) ऑस्ट्रेलियातून ठिपके भुंगेरे (रोडोलिया कार्डिनॅलिस ) आणून यशस्वीपणे उच्चाटन करण्यात आले. उसावरील खोडकिडीचा उपद्रव कमी करण्यासाठी ट्रायकोग्रामा मायन्युटम याचा उपयोग करण्यात आला आहे. चित्रांग भुंगेरा मावा खातो, तर बगळे शेताला पाणी दिल्यावर वर येणारे किडे खातात.

कीटकांमध्ये रोग उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्मजंतूंपासून काही द्रव्ये मिळतात. त्यांचा उपयोग कीटकनाशके म्हणून करतात. बॅसिलस युरिंजेन्सीस या सूक्ष्मजंतूंपासून युरिसाईड हे कीटकनाशक मिळते. तसेच बऱ्याच व्हायरसांमुळे कीटकांना, त्यांच्या अळ्यांना आणि अंड्यांना रोग होतात. त्यांचा उपयोग कीटक, अंडी आणि अळ्या यांच्या नाशासाठी करतात.


(५) कायदे: कीटकांच्या नियंत्रणासाठी वनस्पतींवरील कीड व रोगप्रसार प्रतिबंधक कायदे, कीडनियंत्रक  कायदे इ. करण्यात आलेले आहेत. हे कायदे आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय स्वरूपाचे आहेत. या कायद्यान्वये वनस्पतींच्या किंवा शेतमालाच्या ने-आणीवर बंधने घातली आहेत. यामुळे एका प्रदेशातील रोग व कीटक यांचा दुसरीकडे प्रसार होण्यास प्रतिबंध होतो. एखाद्या ठिकाणी रोग पडल्यास त्याच्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पीक संरक्षक उपाय योजण्याची कायद्याने सक्ती केली जाते. तसेच आयात केलेली धान्ये, नवीन वाणाचे बी इ. मार्गांनी उपद्रवी कीटकांचा एका देशातून दुसऱ्या देशात प्रसार होतो. अशा गोष्टी पाठविण्यापूर्वी त्यांच्यावर कीटकनाशकांचा उपचार करावा, धान्य साठविण्याच्या किंवा विक्रीच्या पूर्वी अशा प्रक्रिया त्यांवर कराव्यात असे कायदे प्रत्येक देशात केलेले आहेत. त्यामुळे कीटकनाशास व रोगांना आळा घालण्यास मदत होते. काही वेळा मानव व प्राणी यांच्याप्रमाणेच रोपे, धान्ये ही सुद्धा विलग्नवासात (क्कारंटाइनामध्ये) ठेवतात.

संदर्भ: 1. Metcalf, R.L. Ed. Advances in Pest Control Research, 6 Vols., New York, 1957–65.

    2. Mukundan, T. K. Plant Protection- Principles and Practice, Bombay, 1964.

दोरगे, सं. कृ.