कृष्णकमळ : (इं. पॅशन फ्लॉवर लॅ. पॅसिफ्लोरा कुल-पॅसिफ्लोरेसी). या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींच्या पॅसिफ्लोरा  वंशात एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत व आता इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत बागांतून लावलेल्या आढळतात. भारतात ५–७ जाती विशेषे करून दिसतात त्या सर्व प्रतानारोही (तणाव्यांच्या साहाय्याने आधारावर चढणाऱ्या) वेली असून बागेत मांडवावर, कमानीवर किंवा बंगल्याच्या काही भागांवर चढतात. पाने साधी, बहुधा हस्ताकृती, खंडित आणि एकांतरित (एकाआड एक) असतात प्रताने कक्षास्थ (पानांच्या बगलेत) असून त्यांच्या साहाय्याने वेल वर चढते. फुले आकर्षक, मोठी, द्विलिंगी, नियमित. काहींची सुगंधी, जांभळी, पांढरी, लाल, पिवळी किंवा हिरवी असतात. ती एकाकी किंवा फुलोऱ्यावर, कक्षास्थ व सच्छद असतात. प्रत्येकास खाली जुळलेली नलिकाकृती आणि सतत राहणारी पाच संदले असतात. प्रदले सुटी, पाच व त्यांच्या आतील बाजूस अनेक तंतूंचे मंडल (तोरण) असते. पाच केसरदलांच्या खाली जुळून झालेल्यानलिकेतून (केसरधरातून) किंजधर वर येतो आणि त्यावर किंजमंडल असते. परागकोश विलोलकिंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजले तीन व किंजल्क टोपीसारखे असते. बीजके अनेक व तटलग्न असतात[→ फूल]. मृदुफळात असंख्य, चपट्या, अंडाकृती, मांसल अध्यावरणमुक्त बिया असतात. काही जातींची फळे खाद्य आहेत (उदा., ग्रॅनाडिला, बार्बाडाइन, पॅशनॅरिया, मेराकुजा मेलावो, वॉटर लेमन, पोमेलिऑन इत्यादी).

नवीन लागवड बी, छाट कलमे व दाब कलमे यांनी करतात. या वेलीच्या वाढीस भरपूर पाणी, निचरा होणारी, विशेष न खतावलेली जमीन व भरपूर सूर्यप्रकाश ही आवश्यक आहेत. निळ्या कृष्णकमळाची (पॅसिफ्लोरा सेरूलिया) फुले सुवासिक असतात. पॅ. रॅसिमोजा  या जातीत लाल पाकळ्या व खाली निळे व वर पांढरे तोरण असते. पॅशन फ्रुट (पॅ. एड्यूलिस) या निळ्या सुगंधी फुलांची जाती भारतात आणून लावली असून तिची पिवळी फळे खाद्य आहेत. त्यांचा मगज (गर) उत्तेजक आणि पौष्टिक असतो. पॅ. फेटिडा  ही लहान पांढऱ्या फुलांची जाती असून तिच्या पानांचा काढा दमा व पित्तविकारावर उपयुक्त आहे फळ वांतिकारक डोकेदुखीवर व घेरीवर पाने डोक्यास बांधतात. (चित्रपत्र ५४).

पहा : पॅशन फ्रुट.

कुलकर्णी, उ. के.

पिवळी कोरांटीजांभळी कोरांटीपांढरे कृष्णकमळजांभळे कृष्णकमळगणेरीगारवेल