मिरे : (मिरी, काळे मिरे हिं. काली मिर्च, गोल मिर्च सं. मरीच इं. ब्लॅक पेपर लॅ. पायपर नायग्रम कुल-पायपरेसी). ही शाखायुक्त आरोही (वर चढणारी), बहवर्षायू (अनेक वर्ष जगणारी), खालील भागात काष्ठमय व केशहीन वेल मूळची बहुधा भारताच्या नैर्ऋत्येकडील टेकड्यांतील असून ती उत्तर कारवारपासून कन्याकुमारीपर्यंत जास्त पावसाच्या प्रदेशात रानटी अवस्थेत आढळून येते. मिरे हे जगातील सर्वांत जुने व फार महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. चरकसंहिता, बृहत्संहिता व तमिळ वाङ्‌मयात त्याचे पुष्कळ उल्लेख आढळतात. इ. स. पाचव्या शतकात भारतातून ग्रीसला त्याची निर्यात होत असावी.

वेलीची उंची १० मी. अगर त्याहून जास्त असते. फांद्या मजबूत असून तिच्या पेऱ्यांतून हवाई मुळे फुटतात. ⇨ पिंपळी, ⇨ नागवेल, ⇨ कबाबचिनी  इ. ⇨ पायपरेसी कुलातील (मिरी कुलातील) असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. पाने नागवेलीपेक्षा मोठी, साधी, सु. ७·५ सेंमी. लांब, अंडाकृती, एकाआड एक, चिवट ५–९ शिरांची, खालील बाजूस आनील (निळसर हिरवी) व वरील बाजूस गर्द हिरवी असतात. फुले लहान, बहुधा विभक्तलिंगी (पुं-पुष्पे आणि स्त्री-पुष्पे वेगवेगळ्या वेलींवर असतात), काही प्रमाणात द्विलिंगी, सु. १० ते १८ सेंमी. लांबीच्या नतकणिशावर [लोंबत्या फुलोऱ्यावर ⟶पुष्पबंध] येतात. प्रत्येकात सु. ५० फुले असतात. फळे अश्मगर्भी (आठळी फळे), लाल, लहान (५–६ मिमी. व्यासाची) व एकबीजी असतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास सु. सहा महिने लागतात. तयार परंतु पूर्ण पिकण्यापूर्वी काढून वाळवलेली फळे ‘काळी मिरी’ आणि पूर्ण पिकलेली व फलावरण काढलेली फळे ‘पांढरी मिरी’ या नावाने बाजारात ओळखली जातात.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.

लागवडीचे प्रदेश : जगात मिऱ्याची लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंडोनेशियात मिऱ्याचे सर्वांत जास्त उत्पादन होत असे परंतु युद्धामुळे तेथील मळे उद्‌ध्वस्त होऊन उत्पादन निम्म्याने घटले. जगातील एकूण सु. १,५०,००० टन उत्पादनापैकी २०–२५ % उत्पादन भारतात होते. भारतातील या पिकाखालील क्षेत्र इतर सर्व देशांपेक्षा जास्त असले, तरी हेक्टरी उत्पादन मात्र सर्वांत कमी आहे. १९८०–८१ मध्ये भारतातील सरासरी हेक्टरी उत्पादन २४८ किग्रॅ. होते.

इ.स. १९८०–८१ मध्ये मिऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र सु. १,१०,६४० हे. होते, त्यांपैकी १,०७,०९० हे. केरळ राज्यात व बाकीचे मुख्यतः कर्नाटक व तामिळनाडूत होते. देशातील मिऱ्याचे एकूण वार्षिक उत्पादन ३०,००० ते ३५,००० टन आहे. त्यांपैकी २५,००० टनापेक्षा जास्त उत्पादन केरळमध्ये होते. कर्नाटक व तमिळनाडू मिळून ४% उत्पादन होते. आसाम, प. बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार बेटे आणि महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत (सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांत) मिऱ्याची सुयोग्य भागात लागवड करण्याचे प्रयत्न चालू आहेत. केरळमध्ये बहुतेक सर्व जिल्ह्यांत मिऱ्याची लागवड होते परंतु सु. ४४% उत्पादन एकट्या कननोर जिल्ह्यात होते. कर्नाटकात उत्तर व दक्षिण कारवार आणि तामिळनाडूत निलगिरी आणि कन्याकुमारी हे जिल्हे मिऱ्याच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.

भारतातील मिऱ्याखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ८० टक्के क्षेत्र लहान शेतकऱ्यांकडे असून त्यांच्याकडे तीन हेक्टरांपेक्षा कमी क्षेत्र असते. एकट्या केरळ राज्यात मिऱ्याची लागवड २२ लक्ष लहानमोठ्या बागांतून होते व बहुतेक भागांत मिरवेलीचे पीक दुय्यम म्हणून घेण्यात येते. बहुसंख्य लहान बागांतून वेलींची संख्या १०० च्या आतच असते परंतु त्यांची योग्य निगा राखली जात नसल्यामुळे आणि रोग व किंडीमुळे उत्पन्नात घट दिसून येते. आणखी एक कारण म्हणजे भारतात मिरवेलीचे सर्वसाधारणपणे ६० वर्षे (काही अपवादात्मक वेलींचे १०० वर्षे) उत्पादन काढण्यात येते परंतु मिरवेलीचे फायदेशीर उत्पन्न २५ वर्षांपर्यंच मिळते. जगातील मिरवेलीच्या लागवडीच्या इतर प्रमुख देशांत वेलींचे उत्पादक आयुष्य १५–२० वर्षांपेक्षा जास्त ठेवत नाहीत (जुन्या वेली उपटून नव्यांची लागण करतात).


प्रकार : भारतात मिरवेलीचे ७५ पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत. केरळात कल्लुवल्ली, बालनकोट्टा, करिमुंडा आणि कोट्टानड हे जुन्या प्रकारांपैकी जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत. पण्णिआर – १ या नवीन संकरित प्रकाराचे उत्पन्न जुन्या स्थानिक प्रकारांपेक्षा ३ ते ४ पट अधिक मिळते. शिवाय त्यात रोग व किडींना प्रतिकार करण्याची शक्ती आहे लागणीनंतर तिसऱ्या वर्षात फुले व फळे धरतात आणि त्यांची प्रतही चांगली असते. (सर्वसाधारणपणे मिरवेलीला लागण केल्यानंतर ४ अगर ५ वर्षांत फुले व फळे येतात). मात्र जास्त सावली असल्यास हा संकरित प्रकार चांगला वाढत नाही. महाराष्ट्रातही सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत या प्रकाराची लागवड सुरू झाली आहे.

तेल्लिचेरी बोल्ड हा मिऱ्याचा प्रकार मलबार भागात लागवडीत असून त्याला फार मागणी असते व मिऱ्याच्या सर्व प्रकारांत हा जास्त महाग आहे. मल्लीगसरा, डोड्डीम्या व अरीसीना मोरट्टा हे कर्नाटकातील सुधारित प्रकार आहेत.

हवामान : या पिकाला उष्ण व दमट हवामान आणि काही प्रमाणात सावली लागते. समुद्रसपाटीपासून १,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात त्याची लागवड होऊ शकते परंतु सु. ५०० मी. उंचीवरील प्रदेशात हे पीक चांगले येते. वार्षिक पर्जन्यमान कमीत कमी १५० सेंमी. असावे लागते व २५० सेंमी. अथवा जास्त पर्जन्यमानात हे पीक जास्त चांगले वाढते. लागवडीच्या महत्त्वाच्या प्रदेशात उन्हाळ्यातील कमाल तापमान ३८° से. आणि हिवाळ्यातील किमान तापमान १०° से. पर्यंत असते.

जमीन : या पिकाला जांभा खडकापासून तयार झालेली तांबडी, निचऱ्याची अथवा सेंद्रीय पदार्थ भरपूर प्रकाणात असलेली गाळाची जमीन मानवते. पावसाळ्यात जमिनीत फार पाणी साठल्यास व कोरड्या महिन्यात जमीन वाळून भेगाळल्यास वेली मरतात.

लागवडीच्या प्रमुख पद्धती : (१) डोंगराच्या उतरणीवर स्वतंत्र पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड. (२) घरगुती बागेत नारळ, सुपारी, फणस, पांगारा व आंबा या वृक्षांच्या आधारावर वेली लावून मिश्र पीक म्हणून. (३) चहा व कॉफीच्या मळ्यांत दुय्यम पीक म्हणून. स्वतंत्र पीक म्हणून मिऱ्याची लागवड अलीकडे कमी होऊ लागली असून परसबागेतील मिश्र पिकची लागवड वाढत आहे.

पूर्व मशागत : स्वतंत्र पीक म्हणून लागवड करण्यासाठी लागवडीपूर्वी वेलींना सावली व आधारासाठी आधारवृक्षांची लागवड करणे आवश्यक असते. यासाठी निवड केलेल्या जमिनीत २·५ मी. ते ३ मी. अंतरावर खड्डे खणून ते खतमिश्रित मातीने भरून त्यांत एप्रिल-मे मध्ये पांगाऱ्यासारखी झाडे लावतात. दुय्यम पीक म्हणून लागवड करावयाची असल्यास उन्हाळ्यात ४५ सेंमी. खोल खड्डे झाडांच्या बुंध्यापाशी खणून खतमिश्रित मातीने भरून काढतात.

अभिवृद्धी : मिरवेलीची अभिवृद्धी बी लावून अथवा शाकीय पद्धतीने (कळ्या, कंद इत्यादींसारख्या एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या इंद्रियांपासून नवीन वनस्पती निर्माण करण्याच्या पद्धतीने) वेलीचे तुकडे लावून करता येते. बी लावून वाढविलेल्या वेली मंदगतीने वाढतात त्यांवर फळे उशिरा धरतात व त्यांच्या पैतृक शुद्धतेची खात्री नसते. मात्र अशा वेली दीर्घकाल जगतात आणि काही वर्षानंतर शाकीय अभिवृद्धीने वाढविलेल्या वेलींपेक्षा जास्त उत्पन्न देतात, असा समज आहे. शाकीय अभिवृद्धी सर्वसाधारणपणे जास्त पसंत केली जाते. यासाठी वेलीच्या बुंध्याजवळ फुटून आलेल्या फांद्या उपयोगात आणतात. काही ठिकाणी वेलीच्या शेंड्यांकडील भागांचा उपयोग अभिवृद्धीसाठी केला जातो. वेलींना फळे धरण्याच्या सुमारास (ऑक्टोबर महिन्यात) अभिवृद्धीसाठी उपयोगात आणावयाच्या वेलींची निवड करतात. जंगली अवस्थेत वाढणाऱ्या मिरवेलीची फुले विभक्तलिंगी असतात व त्यामुळे फलधारणा क्वचितच होते. लागवडीखालील बहुतेक प्रकारांत कमी जास्त प्रमाणात द्विलिंगी फुले असतात व त्यामुळे त्यांत फलधारणेचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारांच्या कणिशांत द्विलिंग फुलांचे प्रमाण वेगवेगळे असते. केरळमधील प्रकारांत हे प्रमाण १० ते ९८% असते व पुष्कळ उत्पन्न देणाऱ्या प्रकारांत ते ७० ते ९८% असते. जास्त सावलीत वाढणाऱ्या वेलीत द्विलिंगी फुलांचे प्रमाण कमी असते व स्त्री-पुष्पांचे प्रमाण जास्त असते.


जास्त उत्पन्न देणाऱ्या व ज्यांच्या कणिशात द्विलिंगी फुलांचे प्रमाण पुष्कळ असते, अशावेलींची अभिवृद्धीसाठी निवड करतात. निवड केलेल्या वेलींच्या बुंध्याकडील जोमदार फांद्यांची छाटकलमे (एक अगर अधिक पेरे असलेले वनस्पतीच्या खोडाचे तुकडे) रोपवाटिकेत ऑक्टोबरमध्ये लावून पुढील वर्षी जुलै महिन्यात त्यांचे कायम जागी स्थलांतर करतात. प्रत्येक छाटकलमावर ४ ते ५ पेरे असतात. छाटकलमे काही दिवस बांबूच्या टोपल्यांत सावलीमध्ये ठेवून त्यांना मुळे फुटून आल्यावर त्यांची कायम जागी लागवड करणे जास्त चांगले, असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. एक हेक्टरामध्ये लागण करण्यासाठी ७५० ते १,००० छाटकलमे लागतात.

उत्तर कारवार जिल्ह्यात वेलींचे शेंड्याकडील भाग लावून अभिवृद्धी करतात. बुंध्याकडील फांद्यांपासून वाढविलेल्या वेलींपेक्षा त्यांना लवकर फळे येतात. या पद्धतीतील प्रमुख दोष पुढीलप्रमाणे आहेत : वेलींचे आयुष्य फक्त १५ वर्षे असते. शिवाय वेलींचे शेंड्याकडील भाग अभिवृद्धीसाठी वापरल्यामुळे वेलींच्या उत्पन्नात घट येते. इंडोनेशिया, कंबोडिया, मलेशिया इ. देशांत ही पद्धती प्रचलित आहे. मलबार व दक्षिण कारवार भागात निवडक वेलींच्या बुंध्याकडील फांद्यांची बांबूंच्या टोपल्यांतून दाबकलमे [⟶ कलमे] करून मुळे फुटून आल्यावर ती वेलीपासून वेगळी करण्यात येतात व त्यानंतर कायम जागी लावण्यात येतात.

लागवड : मुळे फुटलेली अथवा ताजी छाटकमले जुलै महिन्यात आधारवृक्षाच्या उत्तर अगर ईशान्य बाजूला आधारवृक्षापासून ४५ ते ६० सेंमी. अंतरावर ३० X ३० X ३० सेंमी. आकारमानाचे खड्डे खणून प्रत्येक जागी दोन कलमे याप्रमाणे लावतात. मिरवलेली वाढ झपाट्याने होते व ती जसजशी वाढत जाते, तसतशी तिला दर सु. ३० सेंमी. अंतरावर सु. २५ ते ३० दिवसांच्या अंतराने ३–४ वर्षेपर्यंत बांधून ठेवणे आवश्यक असते. त्यानंतर बांधून ठेवण्याची आवश्यकता नसते. लावलेल्या वेलींची ९० सेंमी. वाढ होईपर्यंत त्यांना फांद्या फुटल्यास त्या छाटून टाकतात. वेलींची छाटणी न करता तशाच वाढ दिल्यास त्या बऱ्याच उंच वाढतात. औषध फवारणी, फळांची काढणी इ. कामांच्या सोईसाठी वेल ५ ते ६ मी. पेक्षा जास्त उंच वाढू न देणे इष्ट असते.

खते : चांगले उत्पन्न येण्यासाठी वेलींना भरपूर सेंद्रीय व वरखते द्यावी लागतात परंतु भारतात खत देण्यावर विशेष लक्ष दिले जात नाही. नारळ-सुपारीसारख्या आधारवृक्षांना जे खत दिले जाते त्यातून वेलीचे पोषण होते परंतु ते अपुरे पडते व त्यामुळे उत्पन्न कमी येते. (केरळमध्ये १९६०–६१ मध्ये हेक्टरी उत्पन्न २७१ किग्रॅ. होते ते १९८०–८१ मध्ये २४८ किग्रॅ. पर्यंत खाली आले). वेलींना ३ वर्षांनंतर वर्षातून दोन वेळा (मार्च व सप्टेंबर) शेणखत, कडू पेंड, यूरिया, सुपरफॉस्फेट व म्युरिएट ऑफ पोटॅश ही खते शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे देणे आवश्यक असते.

फळांची काढणी व प्रक्रिया : पश्चिम किनाऱ्यावर लागण केल्यापासून पण्णिआर-१ प्रकाराला तिसऱ्या वर्षात जून-जुलैमध्ये वेलीवर फुले येतात व डिसेंबरमध्ये फळे तयार होण्यास सुरुवात होते. काढणी डिसेंबरच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत चालू असते. सर्व फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. त्यामुळे ती जशी तयार होतील तशी तीन ते चार हप्त्यांत काढतात. फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग बदलत असताना परंतु संपूर्णपणे पिकण्यापूर्वी त्यांचे घोस कापून ते ६–७ दिवस उन्हात वाळवितात व काठीने बडवून अगर पायाखाली तुडवून घोसापासून फळे मोकळी करतात. वाळल्यावर फळाची साल सुरकुतते व काळी पडते. अशी फळे ‘काळी मिरी’ या नावाने ओळखतात. वाळविल्यामुळे फळांच्या वजनात दोन तृतीयांश घट येते. फळांना चकचकीत काळा रंग येण्यासाठी शिफारस केलेल्या पद्धतीत वेलीवरून काढलेले घोस दोन्ही हातांनी चोळून त्यातील दाणे मोकळे करतात व कपड्यात गुंडाळून ती पुरचुंडी उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवून काढतात आणि नंतर फळे ८–१० दिवस उन्हात वाळवितात. अशातऱ्हेने प्रक्रिया केलेल्या मिऱ्यांना चकचकीत काळा रंग येतो व त्यांचा स्वादही वाढतो. वाळविलेल्या फळांतील जलांश ८ ते १०% पेक्षा जास्त असल्यास साठवणीमध्ये त्यावर कवकांची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहीत वनस्पतींची) वाढ होते.

पांढरी मिरी तयार करण्यासाठी संपूर्ण पिकलेली गर्द नारंगी अथवा लाल रंगाची फळे काढून ती एक दिवस वाहत्या पाण्यात भिजत ठेवल्यावर पाण्यातून काढून त्यांचा ढीग झाकून ठेवतात. यामुळे फळांत एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाची) क्रिया होऊन त्यांवरील सालपटे मऊ होतात व ती हाताने चोळून काढल्यावर आतील दाणे स्वच्छ धुवून उन्हात वाळवितात. उन्हात वाळविल्याने त्यांचा रंग मलईसारखा पांढरा होता. अशा तऱ्हेने तयार केलेली पांढरी मिरी काळ्या मिऱ्यापेक्षा कमी तिखट परंतु अधिक स्वादयुक्त असते. पांढऱ्या मिऱ्याला जागतिक बाजारपेठेत पुष्कळच मागणी असते कारण प्रगत देशांत पांढरी मिरीच वापरली जाते.


पांढरी मिरी तयार करण्याची दुसरी पद्धत म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. या सुधारित पद्धतीत पिकलेल्या व लालसर फळांऐवजी तयार झालेल्या परंतु हिरव्या फळांचा वापर केला जातो. अशी फळे उकळत्या पाण्यात अथवा वाफेवर १०–१५ मिनिटे शिजवितात. नंतर ती गर वेगळा करण्याच्या यंत्रात घालून काढतात. अशा तऱ्हेने साल काढलेल्या दाण्यांवर सल्फर डाय-ऑक्साइड वायूची अथवा विरंजक चूर्णाची (रंग काढून टाकणाऱ्या चूर्णाची) प्रक्रिया करून ते वाळवितात. वाळल्यावर ते पांढरे होतात. या कृतीमध्ये हिरव्या फळांच्या २२% पांढरी मिरी मिळते.

काळ्या मिऱ्यापासून पांढरी मिरपूड तयार करण्याची एक निराळी पद्धती त्रिवेंद्रम येथील प्रादेशिक प्रयोगशाळेने शोधून काढली आहे. या पद्धतीत काळी मिरी शुष्क पद्धतीने दळतात. नंतर आंशिक अलगीकरण पद्धतीने पांढरा भाग वेगळा काढतात आणि मागे राहिलेल्या काळ्या सालीपासून तेल व ओलिओरेझीन काढता येते.

यूरोपीय बाजारात ताजी हिरवी मिरी विशेष पसंत करतात. यासाठी अशी मिरी हवाबंद डब्यात भरून अथवा बाटल्यांतून लोणच्याच्या स्वरूपात पाठविण्याची पूर्वापार पद्धत आहे. हिरवी मिरी हवाबंद डब्यात भरण्यासाठी सुधारित पद्धतीत थोड्याशा अपक्व स्थितीतील घोस वेलींवरून काढून मिरी मोकळी करतात व क्लोरीनच्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवतात. नंतर ती स्वच्छ धुवून डब्यात इच्छित पातळीपर्यंत भरतात. डबे २% मिठाच्या द्रावणाने भरतात. त्यानंतर ते उष्णतेच्या साह्याने निर्जंतुक करून हवा बंद करतात. मिठाच्या पाण्यात अनुज्ञात समावेश पदार्थ मिसळलेले असतात. बाटल्या हवाबंद करण्यासाठी २% मिठाच्या द्रावणाऐवजी १५ ते २०% मिठाचे द्रावण वापरतात.

त्रिवेंद्रम येथील प्रादेशिक प्रयोगशाळेने हिरवी मिरी ओलसर असताना पॉलिथिनाच्या पिशव्यातून बंद करण्याची कृती शोधून काढली आहे. या कृतीमुळे मिऱ्याचा ताजेपणा व हिरवा रंग कायम राहातात आणि डब्यांत अथवा बाटल्यांत भरण्याच्या व वाहतुकीतील खर्चात बचत होते.

रोग व किडी :रोग : या पिकाला मर हा महत्त्वाचा रोग दोन निरनिराळ्या कवकांमुळे होतो. फायटोफ्‌थोरा  पामीव्होरा कवकामुळे होणाऱ्या रोगाला जलद गतीचा मर असे नाव देता येईल. या रोगापासून पिकाचे सु. ३०% नुकसान होते. रोगाची सुरुवात खोडावर जमिनीच्यावर २५ ते ३० सेंमी. उंचीवर होते. रोगट भाग कुजतो. पाने कोमेजतात, फिकट दिसतात व गळतात. वेली दोन आठवड्यांत मरतात. मंद गतीचा मर रोग फ्युजेरियम प्रजातीतील कवकांमुळे होतो व तो मुख्यतः मुळांवर आढळून येतो. रोगट वेलीची खालची पाने हलके हलके फिकट पिवळी होऊन मागाहून गळतात. रोगाची लक्षणे दिसू लागल्यापासून वेलींचा मृत्यू होईपर्यंत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जातो. मंद गतीच्या मर रोगाला फ्युजेरियम प्रजातीतील कवकांबरोबरच ऱ्हायझोक्टोनिया प्रजातीतील कवके, सूत्रकृमी व पोषणातील न्यूनता हीही कारणे असावीत, असे आढळून आले आहे. या दोन्ही रोगांवर रोगप्रतिकारक प्रकार उपलब्ध नाहीत. रोगट झाडे जाळून नष्ट करणे, पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर जमिनीच्या पृष्ठभागाजवळील मुळांना पाण्यात विरघळलेला चुना लावणे व जमिनीतून पाण्याचा निचरा होईल अशी तजवीज करणे हे इतर कवकनाशकांच्या वापराबरोबर योजण्याचे उपाय आहेत.


किडी : (१) पोलू : या किडीमुळे फळे पोकळ होऊन त्यांचा संपूर्ण नाश होतो. काही शास्त्रज्ञांच्या मते केवळ पिसू-भुंगेरा (लाँगिटार्सस नायग्रिपेनिस) या किडीमुळे हे नुकसान होते व केरळात या किडीचे स्थानिक नाव पोलू भुंगेरा असे आहे. कीड फळात प्रवेश करून त्यातील अन्नरस शोषून घेते. काही इतर शास्त्रज्ञांच्या मते फळे पोकळ होणे हे वर उल्लेख केलेल्या किडीखेरीज कोलेटॉट्रिकम पायपेरी या कवकामुळेही संभवते. कवकाची सुरुवात पाने व खोड यांपासून होऊन रोग घोस व फळे यांच्यापर्यंत पसरतो. रोगामुळे घोस गळून पडतात आणि त्यांवरील फळे वाळल्यावर पोकळ व वजनाने हलकी असतात. फलधारणा झाल्याबरोबर वेलीवर बोर्डो मिश्रण फवारण्याने कवकाच्या वाढीला आळा बसतो. किडीच्या बंदोबस्तासाठी ०·२५% डीडीटी फवारण्याने चांगला परिणाम होतो. लिंडेन, डिल्ड्रीन व मॅलॅथिऑन ही कीटकनाशकेही परिणामकारक आहेत.

(२) शेंडा पोखरणारी अळी : (लास्पिरेसिया हेमीडॉक्सा) कोवळे शेंडे लहान वयाच्या अळ्या पोखरतात. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. उपाय म्हणून मॅलॅथिऑन ५०% फवारतात.

  (३) फुलकिडे : या किडीमुळे पानांच्या कडांवर गाठी तयार होतात पाने सुरकुतात व वेडीवाकडी होतात. वेलींची वाढ खुंटते, उपाय म्हणून मॅलॅथिऑन ५०% फवारतात.

कोकणातील काळ्या मिऱ्याची लागवड : ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मिऱ्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. कोकणातील परिस्थितीला योग्य अशा लागवडीसंबंधी विशेष शिफारशी खाली दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांत थोड्या प्रमाणावर काळ्या मिऱ्याच्या स्थानिक प्रकारांची लागवड केलेली आढळून येते. या प्रकारांतील फुलोऱ्यांत संयुक्त व मादी फुलांचे प्रमाण फार कमी असते. तसेच घोसही फार लहान असतात. या प्रकारांमध्ये मिऱ्याचे दाणे भरण्याचे प्रमाण फार कमी असल्यामुळे उत्पन्न फार कमी मिळते. केरळ राज्यात विकसित केलेल्या संकरित पण्णिआर–१ या प्रकाराचे घोस लांब असून ते फळांनी संपूर्णपणे भरलेले असतात. या प्रकाराला लवकर म्हणजे तिसऱ्या वर्षापासून फळे धरण्यास सुरुवात होते, उत्पन्न साधारणपणे स्थानिक प्रकारांपेक्षा ३ ते ४ पटींनी जास्त येते व फळांची प्रतही स्थानिक प्रकारांच्या फळापेक्षा चांगली असते. कोकणातील हवामानात हा प्रकार चांगला वाढतो, असे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात आढळून आले आहे. या विद्यापीठामार्फत या प्रकाराची मुळ्या फुटलेली रोपे प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पुरविण्यात येतात.

निरनिराळ्या आधारवृक्षांवर अवलंबून अशा चार पद्धतीनी मिऱ्यांची कोकणात लागवड करता येते.

(१) परसबागेतील लागवड : नारळ, सुपारी, फणस, साग, जांभूळ इ. परसबागेतील झाडांवर पण्णिआर-१ प्रकारचे प्रत्येकी दोन वेल लावल्यास दहा झाडांपासून पाचव्या-सहाव्या वर्षी साधारणपणे २० किग्रॅ. उत्पन्न मिळू शकते. वेलींना पाणी देण्यासाठी घरातील सांडपाण्याचा उपयोग करता येतो.

(२) सुपारीच्या बागेतील आंतरपीक : सुपारीची लागवड ३ X ३ मी. अंतरावर केलेली असेल, तरच सुपारीच्या सर्व झाडांजवळ मिरवेली लावता येतात परंतु कोकणातील बऱ्याच बागांतून सुपारीची झाडे दाटीने लावलेली आढळून येतात. अशा सर्वच झाडांजवळ मिरवेली लावून आंतरपीक घेता येत नाही कारण फार सावलीमुळे विशेषतः पण्णिआर–१ या संकरित प्रकाराच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. अशावेळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळणाऱ्या दृष्टीने बागेच्या चारी बाजूंच्या कडेच्या फक्त दोन रांगांतील सुपारीच्या झाडांजवळ मिरवेली लावण्याची शिफारस करण्यात येते.

(३) नारळाच्या बागेतील लागवड : ८ ते १० वर्षे वयाच्या प्रत्येक नारळाच्या झाडाजवळ दोन मिरवेली लावतात. शिवाय ८ X ८ अंतरावर नारळाची लागवड केल्यास चार नारळाची झाडे मिळून होणाऱ्या प्रत्येक चौकोनाच्या मध्यावर पांगाऱ्याची लागवड करून त्याच्याजवळ प्रत्येकी दोन वेली लावतात. अशा रीतीने नारळांच्या झाडामधील मोकळ्या जागेचा उपयोग करून घेता येतो.

(४) पांगाऱ्याच्या खुंटांवर स्वतंत्र पीक : ३ X ३ मी. अंतरावर खड्‌ड्यात १·२५ ते २ मी. लांबीच्या पांगाऱ्याच्या खुंटांची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करून पुढील जुन-जुलै महिन्यात वाढीला लागलेल्या प्रत्येक खुंटावर दोन मिरवेली पूर्व किंवा उत्तर बाजूस लावतात.


लागणीनंतरची काळजी : केरळमधील लागवडीप्रमाणे वेली आधाराच्या झाडावर चढेपर्यंत मधून मधून त्यांना सुतळीने सैल बांधणे आवश्यक असते. वेली ५ ते ६ मी. पेक्षा जास्त उंच वाढू देत नाहीत. वेलींना प्रमाणाबाहेर सावली झाल्यास पांगाऱ्यांच्या फांद्या छाटून योग्य प्रमाणात सावली राहील अशी खबरदारी घेतात. हिवाळ्यात व उन्हाळ्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे वेलींना ४–६ दिवसांनी पाणी देतात.

खत : पहिल्या दोनच वर्षांत वेलींना द्यावयाच्या खताचे प्रमाण कमी असते. तिसऱ्या वर्षांपासून दर वेलीला पुढे दिल्याप्रमाणे खत देण्याची शिफारस करण्यात येते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेणखत २० किग्रॅ. युरिया १२५ ग्रॅम, कडू पेंड (एरंडी अथवा कडूनिंब) २ किग्रॅ., सुपरफॉस्फेट किंवा हाडाची पूड १ किग्रॅ., म्युरिएट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम ही सर्व खते बांगडी पद्धतीने वेलीपासून ३० सेंमी. अंतरावर देतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्रत्येक वेलीला शेणखत १० किग्रॅ., यूरिया १२५ ग्रॅम, कडू पेंड १ किग्रॅ. व म्युरिएट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम देतात. वेली लावल्यानंतर पहिल्या वर्षी वरील खताचा निम्मा हिस्सा व दुसऱ्या वर्षी / हिस्सा देतात. रोग व किडी, फळांची काढणी व त्यांवरील प्रक्रिया केरळमधील मिऱ्याच्या लागवडीत वर्णन केल्याप्रमाणे आहेत.

उत्पन्न : भारतात दर मिरवेलीचे सरासरी वार्षिक उत्पन्न सु. ०·५ किग्रॅ. असते फळे येण्याच्या वेळेपासून वेलीचे आयुष्य वाढते त्याप्रमाणे वेल १० वर्षांची होईपर्यंत उत्पन्नही वाढते. १० ते २० वर्ष हा काल उत्पन्नाच्या दृष्टीने सर्वांत चांगला असतो. ३० वर्षांनंतर उत्पन्न कमी होत जाते.

वाळलेल्या मिऱ्याचे भारतातील सरासरी वार्षिक हेक्टरी उत्पन्न फार कमी (२३५ किग्रॅ.) असते. सर्वांत जास्त उत्पन्न क्विलॉन जिल्ह्यात (२८० ते ३३५ किग्रॅ.) असते. मिरे पिकविणाऱ्या जगातील इतर प्रमुख देशांत ते ६५० ते १,५५० किग्रॅ. असते.

रासायनिक संघटन : मिऱ्यामध्ये पायपरीन नावाचे अल्कलॉइड, बाष्पनशील (बाष्प रूपाने उडून जाणारे) तेल व जहाल (झोंबणारे) ओलिओरेझीन हे महत्त्वाचे घटक आहेत. यांशिवाय त्यात स्टार्च, डिंक व श्वेतक (अल्ब्यूमीन) असतात. मिऱ्याची तिखट चव त्यातील बाष्पनशील तेल व ओलिओरेझीन यांच्यामुळे असते. कुन्नूर येथील काळ्यात मिऱ्याच्या एका नमुन्यात पुढील घटक (  %) आढळून आले : जलांश १३·२, प्रथिने ११·५, वसा (स्निग्ध पदार्थ) ६·८, तंतू १४·९, कार्बोहायड्रेट ४९·२, खनिज द्रव्ये ४·४ यांखेरीज थायामीन, रिबोफ्लाव्हिन, निकोटिनिक अम्ल व अ ही जीवनसत्त्वेही आढळून आली.

उपयोग : मिरे मसाल्याचा राजा म्हणून ओळखले जाते. काळी मिरी अन्नपदार्थात गेली सु. ३,००० वर्षे उपयोगात आहे. प्रशीतनाचा वापर माहीत नव्हता अशा काळात काहीसे शिळे (शिजविलेले) मांस स्वादिष्ट बनविण्यासाठी मिरपुडीचा वापर करीत आणि त्यामुळे त्या काळात मिऱ्याला फार महत्त्व प्राप्त झाले होते. भाज्या, मांस, मासे, बेकरीतील उत्पादने व इतर पदार्थ यांमध्ये मिऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय वैद्यकशास्त्रात मिऱ्याचा उपयोग पटकी, भोवळ, दीर्घकाळ टिकणारी बेशुद्धी, तापानंतरची अशक्तता, पोटफुगी, हिवताप, अधरांगवात (कमरेखालील भागाचा लुळेपणा), सांध्याचे विकार, घसा दुखणे, मूळव्याध आणि त्वचारोग यांमध्ये केला जातो. मिऱ्यातील बाष्पनशील तेल सॉसेज, डबाबंद मांस, सार (सूप), काही पेये व मद्ये यांत स्वादकारक घटक म्हणून वापरण्यात येते. सुंगधी द्रव्ये, साबण व औषधे यांतही त्याचा उपयोग करण्यात येतो.


व्यापार व निर्यात : मिऱ्याच्या निर्यातीपासून भारताला मसाल्याच्या पदार्थांपैकी सर्वांत जास्त परकीय चलन मिळते. मसाल्याच्या पदार्थांपैकी निर्यातीपासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्ना पैकी सु. ५०% उत्पन्न मिऱ्याच्या निर्यातीपासून मिळते. भारतातून होणाऱ्या मिऱ्याच्या निर्यातीसंबंधी सल्ला देण्याचे व देखरेख करण्याचे कार्य कोचीन येथील स्पाइसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ही संस्था करते. भारतातील मिरी श्रेष्ठ दर्जाची समजली जाते व त्यामुळे निर्यात व्यापारात तिला जास्त भाव मिळतो. जगातील मिऱ्याच्या मान्यता पावलेल्या व्यापारी प्रतीमध्ये भारतातील तेल्लिचेरी व अलेप्पी या प्रतीच्या मिऱ्याला जास्त भाव मिळतो. वास, स्वाद व तिखटपणा यांत भारतीय मिरी इंडोनेशिया, सारावाक (मलेशिया) किंवा ब्राझील या देशांतील मिऱ्यापेक्षा किती तरी श्रेष्ठ दर्जाची आहे परंतु ठिकठिकाणची व वेगवेगळ्या प्रकारांची मिरी भारतात एकत्र केली जाते. त्यामुळे आकारमान, तेलाचे प्रमाण व तिखटपणा या बाबतींत त्यात एक समानता नसते.

भारतातील मिऱ्याच्या उत्पादनापैकी सु. ९०% उत्पादन निर्यात केले जाते. १९८१–८२ मध्ये २०,६०७ टन निर्यातीपासून देशाला २७–९८ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले. याशिवाय १९८० मध्ये मिठाच्या पाण्यातील ८३ टन, निर्जलीकृत ४·७ टन व लोणच्याच्या स्वरूपातील हिरवी मिरी १८७ टन निर्यात झाली, असा अंदाज आहे.

जगातील मिऱ्याच्या व्यापारातील भारताचा हिस्सा हळूहळू कमी होत आहे. १९४७ मध्ये जगातील ८०% मिऱ्याचा व्यापार भारताच्या हातात होता. सध्या तो फक्त सु. १८ टक्केच आहे.

भारतातून सु. ८० देशांत मिऱ्यांची निर्यात होते. मुख्यतः ती अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, रशिया व जपान या देशांत होते. रशियाला सर्वांत जास्त निर्यात होते. अलीकडील काळापर्यंत फक्त शाबूत मिऱ्याची निर्यात केली जात असे परंतु आता शाबूत मिऱ्याशिवाय विशेष प्रक्रिया करून निर्जंलीकरण केलेली हिरवी मिरी, मिरपूड व मिऱ्याचे बाष्पनशील तेल यांची वाढत्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. १९७७–७८ मध्ये ४४,५०० किग्रॅ. मिरपूड निर्यात करण्यात आली.

विकसित देशात अलीकडे संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेल्या) मिऱ्याच्या पदार्थाचे उत्पादन होऊ लागले आहे परंतु ते नैसर्गिक उत्पादनाशी स्पर्धा करू शकेल, असे वाटत नाही.

संशोधन : भारतात मिऱ्यासंबंधी संशोधन अनेक केंद्रांत होते. केरळ राज्यातील कासरगोड येथील सेंट्रल प्लँटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट, कननोर जिल्ह्यात पण्णिआर येथील मिरे संशोधन केंद्र आणि म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधनाची प्रमुख केंद्रे आहेत. पण्णिआर केंद्रात निर्माण झालेला पण्णिआर-१ हा मिरवेलीचा संकरित प्रकार फार लोकप्रिय झाला असून महाराष्ट्रातही लागवडीसाठी देण्यात आला आहे. याशिवाय कल्लुवल्ली, बालनकोट्टा व इतर संकरित प्रकार या केंद्रातून लागवडीसाठी देण्यात आले आहेत आणि मिरवेलीची अभिवृद्धी, खत, मशागत, रोग व किडी, फळांची गळ इ. बाबींवर संशोधन चालू आहे.  

पहा : मसाले

पाटील, ह. चि. रुईकर स.के. गोखले, वा. पु. 

संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y.  Field Crops of India, Banalore, 1958.

             2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.             ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

 

मेरीगोल्ड ( कँलेन्डयूला आँफिसिनँलिस ): फूल,कळी व पाने यांसह फांदीशुगर मँपल ( अँसर सँकँरम )काळी मुसळी मुळ्याचे काही प्रकार (१) पुसा देशी व्हाईट (२) रँपिड रेड लांग (३) स्कार्लेट ग्लोब (४) जँपनीज व्हाईट (५) रँपिड रेड राऊंड

माधवलता: फूल व पाने यांसह फांदी