तुरीची फांदी : (१) संयुक्त पान, (२) फूल, (३) शिंबा, (४) बिया (तुरीचे दाणे).

तूर : (हिं. तूअर, अरहर दाल गु. तुवेरो, डांगरी क. तुवरी सं. तुवरिका, तुवरी, आढकी इं. पीजन पी, कज्जन पी लॅ. कजानस कजान, क. इंडिकस कुल–लेग्युमिनोजी, उपकुल–पॅपिलिऑनेटी). हे एक प्रसिद्ध कडधान्य आहे व ते भारतात बहुतेक सर्व राज्यांत पिकविले जाते. याचे मूलस्थान निश्चित नाही, तथापि ते आफ्रिकेतून इतरत्र पसरविले गेले असावे, असे मानतात. आढकी या नावाने तुरीचा उल्लेख चरकसंहिता (दुसरे शतक) व सुश्रुतसंहिता (तिसरे शतक) यांत आलेला आहे तुवरी (तुवर, तुवरिका) धान्याचा उल्लेख मदनविनोद निघंटूत केलेला आढळतो यावरून ते मूळचे भारतीय असावे, असे दिसते. याचे सु. १·२ ते ३ मी उंचीचे, वर्षायू (एक वर्ष जगणारे) अथवा बहुवर्षायू (पुष्कळ वर्ष जगणारे) शिंबावंत (शेंगा असलेले) झुडूप मूग, मटकी, उडीद व अगस्ता इत्यादींशी साधारणतः समलक्षणी आहे कारण ही सर्व एकाच कुलातील [→ लेग्यमुनोजी] व उपकुलातील (पॅपिलिऑनेटी) आहेत. याची संयुक्त पाने त्रिदली असून दले लांबट, टोकदार व गर्द हिरवी, खालून पांढरट व लवदार असतात. फुले पिवळी, पतंगरूप [→ अगस्ता] असून ऑक्टोबर–डिसेंबरपर्यंत त्यांना बहार असतो. शिंबा (शेंग) ३·८–५ X १·२ सेंमी., थोडी गोलसर चपटी व गाठाळ असते. कोवळेपणी तिच्या हिरव्या रंगावर पिंगट, जाड, वाकड्या रेषा असतात बिया ३–५, टणक, गुळगुळीत, गोलसर व पिवळसर लाल किंवा पांढऱ्या असतात.

तुरीची डाळ शाकाहारी जेवणतील महत्त्वाचा भाग आहे. बियांचे पोटीस लावल्यास सूज कमी होते. पाने व डाळ वाटून स्तनावर गरम लेप लावल्यास दूध कमी येते. पाने मुखरोगांवर उपयुक्त. तुरीची राख करंजेलातून खवड्यावर लावल्यास गुण येतो. तुरीची डाळ मधात उगाळून डोळ्यात घातल्यास रांजणवाडी जाते. पानांचा रस थोड्या सैंधवाबरोबर काविळीत देतात.

परांडेकर, शं. आ.

कडधान्याच्या पिकांपैकी तूर हे महत्त्वाचे व मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. मुळांवर नायट्रोजनयुक्त गाठी असणाऱ्या आणि जमिनीत खोल जाणाऱ्या मुळांचे हे पीक जमीन सुधारणारे पीक मानले जाते. या पिकाची लागवड आफ्रिका, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, हवाई, ईस्ट व वेस्ट इंडीज बेटे धरून उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत होते. भारतात ते हरभऱ्याच्या खालोखाल महत्त्वाचे कडधान्याचे पीक असून ते मुख्यतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत सर्वसाधारणपणे मिश्रपीक म्हणून घेतले जाते. भारतात १९७० मध्ये या पिकाखाली २६·६९ लाख हेक्टर क्षेत्र होते. त्यांपैकी सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात (६·८६ लाख) आणि त्याखालोखाल उत्तर प्रदेशात (५·७९ लाख) आणि मध्य प्रदेशात (५·०१ लाख) होते परंतु उत्पादनाच्या बाबतीत मात्र उत्तर प्रदेशाचा प्रथम क्रमांक असून सु. १८ लाख टन उत्पादनापैकी सु. ४०% उत्पादन त्या राज्यात होते. महाराष्ट्रात ते १८% व मध्य प्रदेशात सु. तेवढेच होते. महाराष्ट्रात या पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी नागपूर विभागात सु. ५०% आणि औरंगाबाद विभागात ३५% क्षेत्र असून राज्यातील एकूण उत्पादनापैकी सु. ६५% उत्पादन नागपूर विभागात आणि २०% औरंगाबाद विभागात होते. देशातील कडधान्यांच्या सर्व पिकांचा विचार केल्यास तुरीचे क्षेत्र सु. १०% असून त्यात सर्व कडधान्यांच्या उत्पादनापैकी सु. १३% उत्पादन होते.

हवामान : हे उष्ण प्रदेशातील पीक असून त्याला वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश फायदेशीर असतो. फुले व शेंगा धरण्याच्या काळात ढगाळ हवामान अपायकारक असते. हे मुख्यत्वेकरून खरीप हंगामातील पीक असून केव्हा केव्हा ते रबी हंगामातही (ऑक्टोबर ते मार्च–एप्रिल) घेतात. कोरड्या व दमट अशा दोन्ही प्रकारच्या हवामानांत हे पीक वाढते. कोरड्या हवामानात ते लवकर कापणीला येते व दमट हवामानात त्याची शाकीय (फांद्या, पाने वगैरे) वाढ भरपूर होत असल्यामुळे ते कापणीला उशिरा येते. हे रूक्षता विरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक आहे.

जमीन : सामान्यतः कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तुरीचे पीक येऊ शकते परंतु चांगल्या निचऱ्याच्या मध्यम ते भारी प्रकारच्या, चुन्याचे प्रमाण कमी नसणाऱ्या व मुळे खोलवर जाऊ शकतील अशा प्रकारच्या जमिनीत ते उत्तम येते. उ. भारतातील दुमट जमिनीपासून दक्षिणेतील भारी काळ्या जमिनीपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत तुरीचे पीक घेतात.


प्रकार : झाडाची उंची, वाढीचा प्रकार, पेरणीपासून कापणीपर्यंतचा काळ, तसेच शेगांचा आणि दाण्याचा रंग, आकार व आकारमान याबाबतीत भिन्नता असलेले तुरीचे असंख्य प्रकार आहेत. एकट्या मध्य प्रदेशातच असे ३६ प्रकार आढळून आले आहेत. या सर्व प्रकारांची दोन प्रमुख प्रकारांत (गटांत) विभागणी करण्यात आली आहे: (१) अरहर (कजानस कजान प्रकार बायकलर) आणि (२) तूर (क.कजान प्रकार फ्लाव्हस). बहुवर्षायू आणि उशिरा पिकणारे प्रकार अरहर या गटात मोडतात. यातील प्रकारांची झाडे मोठी व झुडपासारखी असतात व त्यांना जांभळ्या रेषा असलेली पिवळी फुले आणि प्रत्येकी ४ ते ५ दाणे असलेल्या काळसर शेंगा येतात. अरहरची लागवड मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल व आसाममध्ये होते. ‘तूर’ या नावाखालील प्रकार हळवे (लवकर पिकणारे) असून त्यांची झाडे अरहरपेक्षा लहान असतात. फुले पिवळी व शेंगा फिकट रंगाच्या असून त्यांत प्रत्येकी २ ते ३ दाणे असतात. या प्रकारांची लागवड सर्वसाधारपणे द. भारतात होते. मध्य प्रदेशात व महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील काही जिल्ह्यांत तूर व अरहर या दोन्ही प्रकारांची लागवड होते. बियांच्या रंगाप्रमाणे लाल आणि पांढरा असेही प्रकार लागवडीत आहेत. पांढऱ्या रंगाची तूर विशेषेकरून गुजरातमध्ये आणि लाल रंगाची द. भारतात पिकते. संशोधनाने निरनिराळ्या राज्यांसाठी तुरूचे सुधारित प्रकार निर्माण करण्यात आले आहेत व त्यांतील काही मर रोगप्रतिकारक आहेत. महाराष्ट्रात टी ८४, एन २९०–२१, टी १४८. पी टी ३०१ आणि सी ११ हे सुधारित प्रकार लागवडीत आहेत. सी ११ हा प्रकार अंशतः मर रोगप्रतिकारक आहे.

मशागत : तूर बहुतेक भुईमूग, मका, कापूस, खरीप ज्वारी, बाजरी इ. पिकांत मिश्रपीक म्हणून घेतात. त्यामुळे मुख्य पिकासाठी केलेल्या मशागतीचा फायदा तुरीला मिळतो. स्वतंत्र पीक घ्यावयाचे असल्यास जमीन एकदा नांगरून दोन–तीन वेळा कुळवतात.

पेरणी : स्वतंत्र पिकाचे बी पाभरीने पेरतात व मिश्रपिकात मुख्य पिकाच्या तीन, पाच किंवा सात ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरतात. स्वतंत्र पिकासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशात दोन ओळींत ४५ ते ९० सेंमी आणि मध्य प्रदेश व मध्य भारतात ३५ ते ४० सेंमी. अंतर ठेवतात. विरळणी केल्यावर ओळीतील दोन झाडांमधील अंतर ४०–४५ सेंमी. असते. मिश्रपिकात तुरीच्या दोन ओळींतील अंतर १·५ पासून ७·५ मी. पर्यंत असते. पेरणी जून–जुलैमध्ये (कर्नाटकाच्या काही भागांत मेमध्ये) करतात. स्वतंत्र पिकासाठी हेक्टरी १५–२० किग्रॅ. आणि मिश्रपिकासाठी हेक्टरी १ ते ५ किग्रॅ. बी लागते.

आंतर मशागत : स्वतंत्र पिकाला ते लहान असताना एक अथवा दोन खुरपण्या आणि दोन किंवा तीन कोळपण्या देतात. खुरपणीच्यावळी पिकाची विरळणी करतात. मिश्रपिकातील तुरीला मुख्य पिकाला दिलेल्या आंतर मशागतीचा फायदा मिळतो. या पिकाचा विशेष म्हणजे ते सुरुवातीला मंदगतीने वाढते व पुढे त्याची वाढ झपाट्याने होते. पिकाची वाढ जोरात होण्यापूर्वी मुख्य पिकाची कापणी झालेली असते.

फूल आणि फलधारणा : जून–जुलैमध्ये पेरलेल्या पिकाला सप्टेंबरच्या अखेरीस अगर ऑक्टोबरच्या सुरूवातीला फुले येण्यास सुरूवात होते आणि जवळजवळ पीक कापणीला येईपर्यंत फुले येतच राहतात. ‘अरहर’ प्रकारांपेक्षा ‘तूर’ प्रकारांना एक ते दोन महिने लवकर फुले येतात.

रोग : मर : हा तुरीचा सर्वांत महत्त्वाचा रोग असून तो सर्वत्र आढळतो. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात तो जास्त नुकसानकारक आहे. तो फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम प्रकार ऊडम या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. रोगामुळे प्रथम झाडाची पाने पिवळी पडून वाळतात व नंतर संबंध झाड वाळते. रोगकारक कवक जमिनीत बराच काळ जिवंत रहात असल्यामुळे रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हा एकच उपाय आहे. अंशतः रोगप्रतिकारक प्रकार उपलब्ध आहेत. रोगट जमिनीत ३–४ वर्षे तुरीचे पीक न घेण्यामुळे व जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होईल अशी चतजवीज केल्यामुळे रोगाचे प्रमाण कमी राहते.

पानावरील ठिपके : हा रोग सर्कोस्पोरा इंडिका या कवकामुळे होतो. फिकट तपकिरी रंगाचे ठिपके पानांच्या खालील बाजूवर आढळतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेंकात मिसळतात. रोगाचे प्रमाण फार असल्यास पाने वाळतात, वळतात व गळून पडतात. यावर बोर्डो मिश्रण १% अथवा इतर कोणतेही ताम्रयुक्त कवकनाशक फवारतात.

भुरी : हा रोग एरिसायफे पॉलिगोनाय कवकामुळे होतो. थंड आणि कोरड्या हवेत या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. हेक्टरी २४ ते २९ किग्रॅ. गंधक पिस्कारतात.

कीड :पापडी : (हरभऱ्यावरील सुरवंट हेलिओथिस ऑब्सोलेटा). ही कीड तुरीच्या शेंगा खाते. पूर्ण वाढलेला सुरवंट सु. ३५ मिमी. लांब असून हिरवट अथवा तपकिरी रंगाचा असतो. सुरवंट प्रथम पाने खातात व मागाहून शेंगांत शिरतात. १०% बीएचसी अथवा ५% डीडीटी पूड झाडावर पिस्कारतात.

पिसारी पतंग : (तुरीवरील सुरवंट एक्सेलास्टीम अटोमोसा). हा सुरवंट वर वर्णन केलेल्या सुरवंटापेक्षा लाबीला कमी (सु. १२ मिमी.) असतो. अंगावर लहान केस व काटे असतात. पतंगाला पिसासारखे पंख असतात म्हणून त्याला इंग्रजीत प्लम मॉथ असे म्हणतात. पाने, फुले व शेंगांवर याची अंडी आढळतात. सुरवंट शेंगांत प्रवेश करून कोवळे दाणे खातात. या किडीमुळे काही वेळा पिकाचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हरभऱ्यावरील सुरवंटासाठी वर्णन केलेली उपाययोजना या किडीलाही लागू पडते.

यांखेरीज ॲग्रोमायझा ऑब्‌च्युसा या माशीच्या अळ्या शेंगांतील दाणे खातात. ही सर्वत्र आढळून येणारी कीड आहे व काही भागांत विशेष नुकसानकारक आहे. ०·१% डीडीटी अथाव बीएचसी पाण्यात मिसळून फवारल्याने किडीचे प्रमाण कमी होते.


 कापणी व मळणी : हळव्या प्रकारांची कापणी डिसेंबर–जानेवारीत आणी गरव्या प्रकारांची मार्च–एप्रिलमध्ये करतात. झाडे जमिनीलगत कापून त्यांच्या पेंढ्या खळ्यावर वाळण्यासाठी ठेवतात. पाने आणि शेंगा वाळल्यावर झाडे हालवून अगर काठीने बडवून शेंगा खाली पाडतात. नतंर शेंगा बडवून (अथवा बैलाच्या पायाखाली मळणी करून) व उफणणी करून दाणे वेगळे काढतात. दाणे संपूर्णपणे उन्हात वाळवून मातीच्या अगर धातूच्या कोठ्यांत भरून त्यावर वाळूचा थर घालतात. अशा रीतीने ठेवलेले तुरीचे दाणे एक वर्ष अगर त्याहून जास्त टिकतात. मिश्रपिकाचे हेक्टरी २३० ते ९१० किग्रॅ. आणि स्वतंत्र पिकाचे २,००० किग्रॅ पर्यंत उत्पन्न मिळते.

रासायनिक संघटन : तुरीमध्ये जलांश ११·४%, प्रथिने २०·३%, वसा (स्निग्ध पदार्थ) १·४%, कार्बोहायड्रेटे ५६·४% आणि तंतू ७·१% तर डाळीमध्ये जलांश १०·५ ते १५.२%, प्रथिने २२·३%, वसा १·७ ते २·१%, कार्बोहायड्रेटे ५७·२ ते ६०·१% आणि तंतू १·२% असतात. तुरीच्या काही प्रकारांतील प्रथिने इतर प्रकारांतील प्रथिनांपेक्षा पचावयास हलकी असतात.

उपयोग : तुरीच्या उपयोग डाळीच्या स्वरूपात नेहमीच्या जेवणात करतात. डाळीतून शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. हिरव्या शेंगांतील दाण्यांची उसळ करतात. झाडांचा हिरवा पाला आणि शेंडे जनावरांसाठी खाद्य व हिरवळीच्या खतासाठी वापरतात. दाण्यांची टरफले आणि चुणी (फुटलेल्या दाण्यांचा चुरा) दुभत्या जनावरांना चारतात. मळणी करतेवेळी निघालेले पाल्याचे व शेंगांच्या टरफलांचे भुसकट वैरणीसाठी वापरतात. तूरकाट्यांचा (वाळलेल्या झाडांचा) उपयोग खेड्यांत घरे शाकारण्यासाठी, कुडासाठी, टोपल्या विणण्यासाठी, सरपणासाठी वा बंदुकीच्या दारूकरिता कोळसा तयार करण्यासाठी करतात. लाखेचे उत्पादन करण्यासाठी आणि रेशमाचे किडे पोसण्यासाठी तुरीच्या झाडांचा उपयोग थोड्या प्रमाणात करतात.

डाळ : तुरीची डाळ मुख्यतः कोरड्या आणि ओल्या अशा दोन पद्धतींनी तयार करतात.

कोरडी पद्धत : या पद्धतीत तूर (दाणे) ३–४ दिवस उन्हात वाळवितात आणि नंतर गिरणीत भरडून डाळ करतात. भरडण्यापूर्वी काही वेळा तिळाचे अगर एरंडीचे तेल तुरीला चोपडतात. यामुळे डाळीचे सालपट लवकर सुटून येते. डाळीतून अखंड तुरीचे दाणे वेगळे काढण्यात येतात व ते पुन्हा भरडण्यात येतात. अशा रीतीने सर्व तुरी भरडल्या जाईपर्यंत (३ ते ४ वेळा) भरडतात. या पद्धतीने सु. ६६% डाळ मिळते. बाकीची चुणी व टरफले असतात.

ओली पद्धत : या पद्धतीत तुरी ८–१० तास पाण्यात भिजवितात. मग त्यात चाळलेली लाल माती १०० किग्रॅ. मध्ये ५ किग्रॅ या प्रमाणात मिसळून रात्रभर ठेवतात. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून, चाळून व उफणून माती अलग काढतात. तुरी जात्यात भरडून डाळ करतात या पद्धतीत डाळीचा उतारा ८०% असतो.

डाळ करण्याची तिसरी पद्धत विशेषेकरून बिहारमध्ये प्रचलित आहे. या पद्धतीत तुरी अर्धवट भाजून मग भरडून डाळ करतात.

गुजरात व उ. भारतात डाळ करण्यासाठी कोरडी पद्धत प्रचलित आहे. द. भारतात आणि दख्खनच्या काही भागांत ओल्या पद्धतीने डाळ करण्यात येते. कोरड्या पद्धतीने तयार केलेली डाळ अर्धगोलाकार असून ती लवकर शिजते, शिवाय तिच्या वरणाला विशिष्ट स्वाद असतो. ओल्या पद्धतीने तयार केलेली डाळ चपटी असून मध्यभागी खोलगट असते. ती शिजावयास मंद असते.

डाळीची प्रत ती तयार करण्याच्या पद्धतीवर, तुरीच्या प्रकारावर आणि जमिनीवर अवलंबून असते. काळ्या जमीनीतील तूर चांगली शिजते असे मानण्यात येते. डाळ शिजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम यांची लवणे नसावित.

महल्ले, प्र. श्री. रुईकर, स. के. गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Field Crops of India, Bangalore, 1958.

   2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

   3. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.