कलमे : बागायती झाडांचे प्रवर्धन (वृद्धी) त्यांच्यापासून जे आर्थिक उत्पादन मिळते त्याच्यासाठी किंवा सौंदर्यमूल्यासाठी केले जाते. दोन्ही प्रकारांत त्यांची चालचर्या त्यांच्या मातृवृक्षाप्रमाणेच रहावी लागते. उदा., एखाद्याला जर एका विशिष्ट तांबड्या रंगाची फुले येणारे झाड पाहिजे असेल अगर हापूस आंब्याचे झाड पाहिजे असेल, तर तशीच वैशिष्ट‌्यपूर्ण फुले अगर आंबे येणारी झाडे असावी लागतात. पण बियांपासून तयार केलेल्या झाडांपासून हे उद्दिष्ट साध्य होत नाही कारण बियांची पैदास नरमादी संयोगापासून होत असते आणि मनुष्यप्राण्यात ज्याप्रमाणे एकाच मातापित्याच्या पोटी जन्मलेल्या दोन व्यक्ती गुणधर्माने सर्वस्वी एकाच प्रकारच्या असू शकत नाहीत तसेच वनस्पतींच्या बाबतीतही घडते.

आनुवंशिकीच्याद्वारे असे विशद करण्यात आले आहे की, आंतरिक प्रजनन पद्धत स्वीकारून त्या बियांच्या रोपांतील अन्य प्रकारची रोपे वरचेवर काढून टाकून आनुवंशिक सजातीयता घडवून आणून मातृपितृ वनस्पतीप्रमाणे उत्पादन देणारे बी पैदा करता येते. एकदा अशा प्रकारचे इच्छित झाड सापडले की, त्या प्रकाराप्रमाणेच हमखास बी देईल असे झाड पैदा करण्याकरिता वरील क्रिया त्या झाडाच्या १०–१५ पिढ्यांपर्यंत चालू ठेवतात. मातापिता संयोगाशिवाय प्रवर्धन करण्याची पद्धत जर उपलब्ध असेल, तर ही १०–१५ पिढ्या इतक्या कालावधीपर्यंत वाट पहात बसण्याची आवश्यकता टाळून कलम पद्धतीने त्या झाडाचे प्रवर्धन करण्यात येते. तथापि जर ते झाड बियांपासून उत्पन्न करण्यात आले, तर त्या बियांच्या मातृवृक्षाप्रमाणेच ते निपजणार नाही.

आनुवंशिक सजातीयता असलेले झाड उत्पन्न करण्याची पद्धत आंबा, मोसंबी वगैरेंसारख्या पुष्कळशा बागायती झाडांच्या बाबतीत शक्य होणार नाही कारण तशा प्रकारच्या गुणधर्मांचे झाड उत्पन्न करण्यात यश मिळविण्यासाठी शेकडो वर्षे खर्ची घालावी लागतील. अशा प्रसंगी लैंगिक संयोगाच्या क्रियेचा उपयोग करावा न लागल्यामुळे ज्यांच्या बीजपैदाशीमध्ये पितरांच्या विशिष्ट आनुवंशिक गुणधर्मांचा मिलाप होण्याची शक्यता नसते, अशा पद्धतीने जातीच्या अभिवृद्धीचे (लागवडीचे) प्रयत्‍न करावे लागतात.

याप्रमाणे इष्ट प्रकारच्या झाडांचे प्रवर्धन करण्यासाठी दोन पद्धतींचा उपयोग करतात. बियांशिवाय अन्य तर्‍हेने सहजपणे ज्यांचे प्रवर्धन करता येते अशा इच्छित झाडांच्या बाबतीत एकदा निवड केल्यानंतर अभिवृद्धीसाठी पुढील योजना करतात. उदा., मशागतीखालील पिकांपैकी ऊस,बटाटा, हळद, आले वगैरे फुलझाडांपैकी डेलिया, गुलाब इ. व फळझाडांपैकी आंबा, संत्री, मोसंबी, पेरू वगैरे यांच्या प्रवर्धन प्रकाराला शारीरिक किंवा अलैंगिक जनन म्हणतात आणि गहू, भात वगैरेंच्या प्रवर्धनाला लैंगिक जनन म्हणतात. गहू, भात वगैरे पिकांत बियांवाचून प्रवर्धन करता येत नाही. या पिकांच्या बाबतीत वारंवार स्वनिषेचन (स्वफलन) घडवून आणून आणि त्या बियांच्या रोपांमधील विभिन्न प्रकारची रोपे काढून टाकून निवडलेल्या प्रकारांमध्ये आनुवंशिक स्वजातीयता घडवून आणतात. या पद्धतीला लैंगिक जनन म्हणतात.

शारीरिक अथवा अलैंगिक जनन पद्धतीमध्ये झाडाच्या अवयवाचा नवीन झाड उत्पन्न करण्याकरिता उपयोग होत असल्यामुळे त्याच्या जननात आनुवंशिक गुणधर्मांची सरमिसळ होण्याचा संभव नसतो आणि ते नवे झाड, ज्या झाडापासून तो अवयव घेतलेला असतो त्या मातृवृक्षाप्रमाणे सर्वस्वी निपजते. सर्वांत सोपी आणि प्रख्यात शारीरिक अभिवृद्धीची पद्धती म्हणजे फाटे किंवा छाट कलमे लावणे. गुलाबाच्या अनेक प्रकारांच्या प्रवर्धनाबाबतीतल्याप्रमाणे पुष्कळशा वनस्पती नाजूक समजून लावल्या जातात. संत्री-मोसंबी यांसारखी काही झाडे त्यांना योग्य नसलेल्या प्रकारच्या जमिनीत लावावी लागतात अगर जमिनीत वास्तव्य करून असलेल्या रोगराईमुळे अपाय होऊन वाढ खुंटून अपाय होईल अशा प्रकारच्या जमिनीत लावावी लागतात, जसे संत्री-मोसंबी महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत लावल्यास मूळकूज रोगाने पछाडली जात असल्यामुळे त्यांची वाढ चांगली होत नाही. अशा वेळी कलमे लावून अभिवृद्धी करणे श्रेयस्कर ठरते. कारण या कलमांचा मुळवा जोमदारपणे वाढणार्‍या आणि जमिनीतील रोगजंतू आणि कीटक यांना दाद न देणार्‍या वनस्पतींचा असतो आणि जमिनीवरील खोडाचा भाग शारीरिक वाढ, फुले किंवा फळे यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने लावणार्‍याला इच्छित असलेले गुणधर्म असलेला असतो. कोकणात गावठी आंब्याची रोपे लावून तयार केलेली झाडे पाणी देण्याची विशेष काळजी न घेताही चांगली वाढतात हे सर्वश्रुत आहे. परंतु हापूस आंब्यासारख्या प्रकारांची रोपे लावल्यास त्यांना किमान सुरुवातीच्या तीन-चार वर्षांच्या अवधीत पाणी द्यावे लागते. तथापि, प्रचलित स्थानिक पद्धतीप्रमाणे चांगल्या पोसलेल्या गावठी रोपावर केलेले हापूसचे कलम पहिल्या तीन-चार वर्षांत पाणी दिल्याशिवाय चांगला आकार घेते.

कलम करण्यात बियांपासून तयार केलेल्या रोपावर दुसर्‍या झाडाच्या डोळ्याचा अगर फांदीचा जोड जमवून तो जोपासावयाचा असतो. त्यामुळे एका झाडाच्या मुळावर दुसर्‍या झाडाचा विस्तार वाढविला जातो. मुळांचा भाग बनलेल्या भागाला खुंट आणि वरील विस्तार पुरविणार्‍या भागाला कलम म्हणतात. अशी कलमे काही विशिष्ट वनस्पतींमध्येच करता येतात. नारळ, केळी यांसारख्या एकदल वनस्पतींमध्ये कलमे करता येत नाहीत. आंबा, मोसंबी, चिकू, पेरू यांसारख्या द्विदल वनस्पतींमध्ये ती करता येतात. निकट संबंध असलेल्या प्रकारातील झाडांचा जोड लवकर जमतो. दूरवरचा संबंध असलेल्या झाडांचा जोड जमत नाही. वनस्पतिविज्ञान दृष्ट्या वनस्पतींची विभागणी कुलांत, कुलांची विभागणी वंशांमध्ये आणि वंशांची विभागणी जातींमध्ये करण्यात येते. एका जातीतील दोन झाडांमधील कलमाचा जोड चटकन जमतो, दोन निरनिराळ्या जातींतील पण एकाच वंशामधील दोन झाडांचे कलम चांगले जमते परंतु ते एकाच जातीतील दोन झाडांमधील कलमाप्रमाणे लवकर जमत नाही. निरनिराळ्या वंशांमधील दोन वनस्पतींचे कलम घडवून आणणे फार कठीण असते. दोन विभिन्न कुलांतील दोन वनस्पतींचे कलम कधीच जमत नाही. आंबा आणि मोसंबी दोन विभिन्न कुलांतील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड कधीच जमत नाही. मोसंबी व कवठ निरनिराळ्या वंशांतील परंतु एकाच कुलातील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड जमतो, पण त्यापासून तयार झालेले झाड बरेच लहानखुरे रहाते म्हणून अशा प्रकारची कलमे रूढ नाहीत. जंबुरी आणि मोसंबी विभिन्न जातींची आहेत परंतु ती एकाच वंशातील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड जमतो आणि कलमे यशस्वीपणे तयार करता येतात, त्यामुळे जंबुरीवर मोसंबीची कलमे बांधणे हा सामान्य प्रघात आहे.

कलमांचे ढोबळमानाने सामान्यतः दोन गट मानण्यात येतात. कलम करण्यासाठी फक्त वनस्पतीचा डोळाच वापरतात, तेव्हा त्याला डोळ्यांचे कलम किंवा डोळा बांधणे अशी संज्ञा वापरतात. अनेक डोळ्यांच्या फांदीचा भाग वापरल्यास त्याला कलम करणे म्हणतात.

वनस्पतीच्या शरीराचे महत्त्वाचे भाग मूळ, खोड आणि पाने हे होत. मूळ जमिनीमधून खनिज पदार्थमिश्रित पाणी शोषून घेते. खोड ते पानांकडे पाेहोचविण्याचे कार्य करते. पाने सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्याचे जैव अन्नामध्ये रूपांतर घडवून आणतात आणि खोड ते अन्न आपल्या मुळांच्या उपयोगाकरिता त्यांच्याकडे पोहोचविते. वनस्पतीच्या सालीमध्ये परिकाष्ठ ऊतक (मुख्यत्वे अन्नपदार्थांची ने-आण करणारे पेशींचे समूह) आणि प्रकाष्ठ ऊतक (जलीय विद्राव वाहून नेणारे व आधार देणारे पेशींचे समूह) असतात. काष्ठमय भागाच्या जवळ असलेली ऊतके क्रियाशील आणि कार्यकारी असतात. सालीच्या बाहेरच्या बाजूला लागून असलेली ऊतके जुनी आणि अचेतन असतात. काष्ठमय भागात प्रकाष्ठ ऊतके असतात. ती मुळांनी शोषलेले पाणी आणि खनिज पोषकद्रव्ये मुळांकडून पानांकडे वाहून नेतात. त्यांच्यापैकी जी सालीच्या बाजूकडे असतात ती कार्यक्षम आणि कार्यकारी असतात व काष्ठमय भागाच्या मध्याकडे असलेली मृत आणि निष्क्रिय असतात. साल आणि काष्ठमय भाग यांच्यामध्ये जोरकस वाढणार्‍या ऊतकांना ऊतककर म्हणतात. त्यांच्यापासून नवीन कोशिका (पेशी) तयार होऊन पुढे त्यांचे रूपांतर परिकाष्ठ आणि प्रकाष्ठ ऊतकांमध्ये होते. कलमे करण्याच्या प्रक्रियेमध्ये कलमासाठी यावयाच्या दोन्ही वनस्पतींमधील ही ऊतके उघडी करून त्यांचा परस्परांशी मिलाप घडवून आणावा लागतो.

निवड व लागण : लागणीकरिता कलमांची निवड करताना लक्षात घ्यावयाचा मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पन्हेरी बागेची विश्वसनीयता आणि लौकिक. कलमापासून चांगल्याप्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी खुंट आणि कलम ही दोन्ही जातिवंत आणि चांगले उत्पन्न देणार्‍या झाडांपासूनच मिळविलेली असावीत. अर्थात त्याची परीक्षा कलमाचे झाड पाहून करता येणे शक्य नसते. त्यामुळे कलम खरेदी करणार्‍याला पन्हेरी बाग संस्थेच्या कीर्तीवरच अवलंबून रहावे लागते.

कलमांच्या बाह्य स्वरूपाबद्दल बोलावयाचे म्हणजे खुंट आणि कलम करण्याकरिता घेतलेली फांदी या दोहोंची जाडी एकसारखी असावी आणि त्यांचा जमलेला जोड अगदी एकजीव झालेला असावा. साधारणतः फळझाडे लावणारे बागायतदार मोठ्या आकाराची कलमे पसंत करतात. परंतु तसल्या कलमांमध्ये काही विशिष्ट फायदे नसतात. कलमे लावणारांच्या या विशिष्ट मनोवृत्तीचा फायदा घेण्याकरिता कलमे तयार करणारे पन्हेरी बागवाले लहान आकाराच्या खुंटावर त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या फांदीचे कलम करतात. ह्याचा परिणाम असा होतो की, त्या कलमाचा जोड नीट जमलेला नसतो आणि ते बागेत लावल्यावर त्याची वाढ योग्य प्रकारे न झाल्यामुळे किफायतशीर होत नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की, खुंट आणि कलम फांदी ही दोन्ही जोमदारपणे वाढणारी असावीत. खुंटाचे रोप अगदी सरळ वाढणारे, बिनगाठीचे असावे आणि फार जाड नसावे.

सामान्यत: कलमे मडक्यामध्ये वाढणार्‍या खुंटावर केलेली असतात. जर योग्य वेळी विक्री न झाल्यामुळे ती पुष्कळ दिवस त्या मडक्यातच वाढत राहिली, तर त्यांच्या मुळांची वाढ मडक्यातील जागेतच मर्यादित होऊन त्यांचे गुंडाळे बनते आणि पुढे ती जमिनीत लावल्यानंतर चिकटून जोम धरावयाला वेळ लागतो. असल्या कलमांत ती काढून जमिनीत लावल्यानंतर यशस्वीपणे रुजण्याची शक्यता तुलनात्मक दृष्ट्या कमी आढळते. कलम विकत घेताना ते झाडावरून उतरून घेतल्याला चार–सहा महिनेच झाले असतील असेच घ्यावे.

साधारणपणे कलमे मडक्यातच वाढविलेली असतात. ती तशीच गटागटाने एकत्र बांधून विक्रीकरिता पाठवितात. परंतु डोळा भरून केलेली कलमे जमिनीत वाढत असतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीकरिता पाठविण्याच्या बाबतीत विशिष्ट प्रकारच्या अडचणी उत्पन्न होतात. त्यांच्या मुळव्यामध्ये आणि शेंड्याच्या विस्तारामध्ये एक प्रकारचा समतोल असतो. ही कलमे जमिनीतून खणून काढून घेताना त्यांच्या मुळांपैकी बरीच दगावतात, त्यामुळे त्यांच्या संख्येत घट होते आणि मुळवा आणि शेंड्याकडील विस्तार यांच्यामधील समतोल बिघडतो. त्याच्या परिणामामुळे लावलेले कलम मरते. या बाबतीत असे निदर्शनास आले आहे की, जर जमिनीत लावण्यापूर्वी या कलमांच्या शेंड्याकडील विस्तारापैकी काही भाग कमी केला, तर त्यांच्या लागणीनंतरच्या होणार्‍या मृत्युसंख्येत विशेष प्रमाणात घट होते. खोडावर फुटलेल्या बाजूच्या सर्व फांद्या काढून टाकल्यास आणि वरच्या विस्तारावरील एकूण पर्णसंभारापैकी ५० टक्के संभार कमी केल्यास कलमे चांगली रुजतात.

कलमे लावण्याचे काम सामान्यतः पावसाळ्यात करतात. कलमे जर पन्हेरी बागेपासून जवळच्या जागी लावावयाची असतील म्हणजे कलमे जमिनीतून काढल्यापासून २४ ते ३६ तासांच्या अवधीत लावावयाची असल्यास लिंबू वंशातील कलमे त्यांच्या मुळांजवळ मातीचा गोळा न घेता काढली तरी चालते. अन्यथा ती मुळांवर मातीचा गोळा घेऊनच काढून घ्यावी लागतात. त्या मातीसह वेष्टनात चांगल्या प्रकारे गुंडाळून प्रवासात कलमाच्या कोणत्याही भागाला इजा होणार नाही अशी बंदिस्त पाठवावी लागतात प्रवासामध्ये कलमांच्या मुळांवरील माती सतत ओली राहील अशी काळजी घ्यावी लागते.

तयार करून ठेवलेल्या खड्ड्यात कलम लावण्याच्या वेळी ते मडक्यात वाढविलेले असेल, तर मडके फोडून गुंडाळा झालेली असतील अशी मुळे योग्य प्रकारे छाटून सुटी करून खड्ड्यात नीट पसरवून लावतात. पन्हेरी बागेमधून जमिनीतून खणून काढलेल्या कलमांच्या लागणीतही अशीच काळजी घेतात. कलमे खड्ड्यात लावताना पन्हेरी बागेत ती जितक्या खोलीपर्यंत जमिनीत असतात, तितक्याच खोलीपर्यंत खड्ड्यात लावतात. कलमाचा जोड जमिनीच्या सपाटीच्या वर राहील अशी काळजी घेतात, लावलेल्या कलमांच्या बुंध्याजवळची माती हाताने दाबून घट्ट बसवितात आणि पाणी देतात. शक्यतोवर लागण संध्याकाळी करतात. कोवळ्या कलमाच्या सालीचे प्रखर सूर्यकिरणांच्या सतत मार्‍याने होणारे नुकसान टाळण्यासाठी घराच्या भिंतींना फासतात तशी चुन्याची सफेती खोडाला फासतात. याप्रमाणे काळजी घेतल्यास १०–१५ दिवसांत कलम वाढीला लागून त्याला पालवी फुटते.

नागपाल, र. ला. (इं.); पाटील, ह. चिं. (म.)

कलमांचे प्रकार आणि त्यांची कृती : कलमांचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांपैकी भारतात विशेष प्रचारात असलेल्या प्रकारांचे वर्णन खाली दिले आहे.

आ. १. फाटे (छाट) कलम : द्राक्षवेलीचा फाटा.

(१) फाटे कलम : या प्रकारात झाडांचे एक-दोन वर्षे वयाच्या फांद्यांचे तीस ते चाळीस सेंमी. लांबीचे, फुगलेले व निरोगी डोळे असलेले तुकडे लावतात. कांडी तोकडी असलेल्या फांद्या फाटे कलमासाठी निवडतात. ही पद्धत द्राक्षे, अंजीर, डाळिंबे, वड, पांगारा, गुलाब, पारिजातक वगैरे अनेक झाडांच्या बाबतीत वापरतात.

(२) डोळ्याचे कलम (डोळे भरणे) : कलमे करण्यासाठी ज्याच्यावर कलम करावयाचे ते झाड म्हणजे खुंट व ज्याचे कलम करावयाचे ते झाड अशी दोन प्रकारची निरोगी व जोमदार झाडे लागतात.

या कलम प्रकाराचा उपयोग संत्री, मोसंबी, आंबा यांसारख्या फळझाडांच्या आणि गुलाबासारख्या फुलझाडांच्या अभिवृद्धीसाठी करतात. खुंटांसाठी रोपे बियांपासून बागेतच तयार करतात. खुंटाचे रोप खतपाणी घालून जोपासतात. ते योग्य प्रकारे वाढून साधारणपणे शिसपेन्सिलीइतके अगर त्याहून थोडे अधिक जाड झाल्यावर डोळे भरण्यालायक होते. डोळा भरण्याच्या वेळी ते रसावर असावे लागते. डोळा भरताना खुंटावर जमिनीपासून सु. २४ सेंमी. उंचीवर धारदार चाकूने तीन-चार सेंमी. उभी चीर पाडून तिच्या माथ्यावर किंवा पायाशी आडवी चीर पाडतात. उभ्या चिरीच्या दोन्ही कडांकडील साल हळुवारपणे सुटी करतात. निवडून घेतलेल्या वर्षाच्या पक्व कलम फांदीवरील खुंटावरील उभ्या चिरीच्या लांबी इतक्याच लांबीचा फुगलेला निरोगी डोळा आजूबाजूच्या सालीसह चाकूने अलगद काढून घेतात. तो खुंटावरील चिरीत झटपट सफाईदारपणे बसवून घेतात.

आ. २. डोळा भरणे : (१) चाकू, (२) कलम फांदी, (३) डोळा काढण्याची रीत, (४) काढून घेतलेला डोळा, (५) खुंटावर चीर पाडणे, (६) चिरीत डोळा बसविणे, (७) त्याच्यावरून सोपट बांधणे.

डोळा तेवढा उघडा ठेवून बाकीचा भाग केळीच्या सोपटाच्या पट्टीने घट्ट आवळून बांधतात. त्यामुळे त्याच्या सालीमधील ऊतके खुंटाच्या ऊतककराबरोबर एकजीव होऊन जातात. साधारणपणे ८–१० दिवस भरलेला डोळा हिरवा राहिल्यास तो चिकटला असे समजतात. तो चिकटला नाही तर काळा पडतो. अशा प्रसंगी त्या खुंटावर त्या जागेच्या खाली किंवा वर आणखी डोळा भरता येतो. डोळा चिकटल्यावर त्याच्यामधून अंकुर निघणारसे दिसताच डोळा भरलेल्या जागेच्या वर खुंटाचा शेंडा छाटून टाकतात व खतपाणी देवून निगा राखतात. खालच्या भागावर फांद्या वाढू देत नाहीत. डोळे भरण्याचे अनेक प्रकार आहेत. उदा., खुंटावरील चौकोनी आकाराची साल काढून त्या जागी कलम फांदीवरील डोळ्याचा तेवढ्याच आकाराचा तुकडा बसविणे, टोपण बसविणे वगैरे. त्यांतलाच एक प्रकार म्हणजे ‘फोरकर्ट’ पद्धतीने डोळे भरणे हा आहे. हा प्रकार आंब्याच्या बाबतीत बराच यशस्वी झालेला आहे. या पद्धतीने मडक्यात वाढविलेल्या अगर जमिनीत वाढविलेल्या आंब्याच्या खुंटावर डोळा भरतात. डोळा भरताना खुंटावरची जमिनीपासून सु. २४ सेंमी. उंचीवर योग्य गुळगुळीत जागा निवडून तेथे एकमेकांत एक सेंमी. अंतर ठेवून दोन-अडीच सेंमी. उंचीच्या उभ्या चिरा पाडतात. माथ्याकडील टोकांना जोडून आडवी चीर पाडतात. अशी तीन बाजूंनी साल धारदार चाकूने कापून घेऊन खुंटापासून सोडविली म्हणजे चौथ्या बाजूने लोंबकळत राहते. नंतर निवडून घेतलेल्या कलम फांदीवरील फुगलेला डोळा, सालीसह बरोबर इतक्याच आकाराचा डोळा, देठ ठेवून पान छाटलेला, चाकूने काढून घेऊन खुंटावरील साल काढलेल्या जागी व्यवस्थितपणे बसवितात. तो काढून घेताना डोळ्याखाली काष्ठमय भाग आलेला असल्यास नखाने तो काढून टाकतात. सालीचा डोळ्यासह तुकडा खुंटावर बसविल्यानंतर लोंबती ठेवलेली साल डोळ्यावर ओढून घेतात व वरून मेणवलेल्या कापडाची पट्टी घट्ट बांधतात. नंतर ३ ते ४ आठवड्यांनी ही पट्टी सोडून डोळा चिकटला किंवा नाही ते तपासतात. डोळा हिरवा आणि टवटवीत दिसल्यास डोळ्यावर घेतलेला खुंटाच्या सालीचा तुकडा कापून टाकतात. फक्त डोळा उघडा ठेवून तो सर्व भाग परत मेणवलेल्या कापडाच्या पट्टीने घट्ट बांधतात. तीन-चार आठवड्यांनतर त्या चिकटलेल्या डोळ्यातून अंकुर निघतो. मग कापडाची पट्टी सोडतात. खुंटाचा शेंडा चिकटलेल्या डोळ्याच्या वर छाटतात. अशी ऑगस्टमध्ये केलेली कलमे पुढील पावसाळ्यापर्यंत १ ते १⋅२५ मी. उंच वाढतात.

आ. ३. फोरकर्ट कलम : (१) कलम फांदी, (२) कलम फांदीवरून डोळ्यासह सालीचा चौकोनी तुकडा काढून घेणे, (३) काढलेला डोळा, (४) काढलेल्या डोळ्याच्या तुकड्याच्या मापाइतकीच खुंटावरील साल तीन बाजूंनी सोडविणे, (५) त्याजागी काढलेला डोळा बसविणे, (६) बसविलेल्या डोळ्यावर सोडविलेली साल ओढून घेणे व त्याच्यावरून मेणवलेल्या कापडाची पट्टी बांधणे, (७) डोळा चिकटल्यावर पट्टी व सुतळी सोडल्यानंतरचे दृश्य.

टोपण बसविणे : गावठी बोरीच्या फोकावर चांगल्या जातीच्या बोरीच्या फोकावरील डोळ्यासह सालीचे अंगठीसारखे टोपण बसवितात. चांगल्या जातीच्या बोरीच्या धुमार्‍याचा शेंडा छाटून त्याच्यावरील फुगलेला डोळा असलेली साल सबंध अंगठीसारखी चाकूने कापून अलगद काढतात आणि ती तितक्याच जाडीच्या देशी बोरीच्या धुमार्‍याचा शेंडा कापून टोकाकडची साल थोडी फाडून उघड्या केलेल्या खोडावर अलगर अंगठीसारखी सरकवून त्यावर घट्टपणे बसेपर्यंत खाली सरकवीत जातात. अंगठी घट्ट बसली म्हणजे खोडाच्या वरचा उघडा भाग छाटून टाकतात. टोपण बसविलेला भाग पट्टीने बांधतात.

(३) भेट कलम : सामान्यपणे भारतात आंब्याच्या अभिवृद्धीसाठी हे कलम वापरतात. त्यात खुंट म्हणून आंब्याचीच रोपे वापरतात. ती तयार करण्यासाठी पिकलेल्या आंब्यांतून कोयी काढून घेतल्यानंतर एक महिन्याच्या आत रुजत घालतात. जास्त काळ लोटल्यास त्यांची उगवण कमी होते. ३० सेंमी. खोल चर काढून त्याच्या तळाशी जाड वाळूचा थर पसरतात. त्यावर पाचोळ्याच्या खताचा १५ सेंमी. जाड थर करून त्याच्यावर एकेरी थरात कोयी पातळ पसरून चरात पाणी सोडतात. १५ ते ३० दिवसांत कोयींतून अंकुर निघतात. ती रोपे तेथेच महिनाभर वाढू देऊन ऑगस्ट महिन्यात तेथून काढून मडक्यात लावतात व सावलीत ठेवून खतपाणी घालून वर्षभर जोपासतात. वर्षभरात ती ४०–५० सेंमी. उंच आणि दोन-तीन सेंमी. जाड बनून खुंट म्हणून कलमासाठी वापरण्यायोग्य होतात. ती नंतर ज्याची कलमे करावयाची असतील त्या झाडाजवळ नेऊन त्याच्या खुंटाइतक्या जाडीच्या फांद्यांशी कलमे करतात.

आ. ४. भेट कलम : (१) कलम फांदीचा तासलेला भाग, (२) खुंटावरचा तासलेला भाग, (३) दोघांचा घडवून आणलेला जोड, (४) जोडावरून सुतळी बांधणे, (५) जोड जमल्यावर सुतळी सोडल्यानंतरचे दृश्य.

त्यांना भेट कलमे म्हणतात. खुंट आणि कलम फांदी यांची जाडी एकसारखी असणे अत्यावश्यक असते. नसल्यास त्यांच्यामधील ऊतककर, परिकाष्ठ आणि प्रकाष्ठ यांचा मिलाप योग्य प्रकारे न होऊन कलम त्याच्या आयुष्यभर कमकुवत राहते. कलम झाडाच्या फांद्यांच्या उंचीइतक्या वर खुंटांची मडकी ठेवता यावी म्हणून झाडाखाली तितकी उंच माचण करतात. खुंट रोप आणि कलम फांदी सहजपणे एकमेकांना भिडू शकतील अशा जागी खुंट आणि कलम फांदी या दोहोंवरची एकमेकांसमोरची त्यांच्या जाडीच्या निम्म्याइतकी खोल व तीन ते चार सेंमी. लांब ढलपी धारदार चाकूने सफाईदारपणे काढतात. नंतर ते तासलेले भाग एकमेकांशी जोडून सुतळीने आवळून बांधतात. दोन-तीन महिन्यांत त्यांचा जोड जमून येतो. नंतर कलम फांदी मातृवृक्षापासून अलग करण्याकरिता कलम केलेल्या जागेखाली चाकूने खाच पाडतात. ती आठवड्याच्या अंतराने आणखी खोल करतात. तिसर्‍या खेपेला ती पूर्णपणे कापून अलग करतात. नंतर ते कलमाचे मडके माचणीवरून काढून महिनाभर सावलीत ठेवतात व त्याची निगा राखतात. नंतर विकतात किंवा बागेत लावतात.

(४) जिभली कलम : या प्रकारात खुंट आणि कलम फांदी या दोहोंवर त्यांच्या जाडीच्या अर्ध्याइतकी चीर पाडतात. चिरीमुळे खोडापासून जरा दूर झालेल्या भागाला तासून पाचरीसारखा आकार देऊन ते भाग एकमेकांत घट्ट बसतील असे करतात. नंतर त्यावर सुतळी आवळून बांधणे वगैरे पुढील क्रिया भेट कलमाप्रमाणे करतात.

आ. ५. जिभली कलम : (१) जोडलेले कलम, (२) खुंट आणि कलम फांद्यांवर घेतलेले काप, (३) कापलेले भाग एकमेकांत बसविणे.

(५) खोगीर कलम : मडक्यातील खुंटाचा शेंडा २२ ते ४५ सेंमी. उंचीवर छाटून त्या टोकाला तासून पाचरीसारखा आकार आणतात. खुंटाचा पाचरीसारखा केलेला भाग घट्ट बसेल अशी खाच कलम फांदीला योग्य जागी पाडतात. अशी जोडवणूक केल्यानंतर पुढची सर्व क्रिया भेट कलमाप्रमाणे करतात.

(६) खुंटी कलम : सामान्य प्रकारच्या गावठी आंब्याचे चांगल्या प्रकारच्या आंब्यात रूपांतर करण्यासाठी या कलमप्रकाराचा उपयोग करतात. त्याच्यासाठी मोठे झाड जमिनीपासून काही सेंमी. उंचीवर करवतीने सपाट कापतात. नंतर त्या बुडख्याच्या सालीला वरून खाली आठ–दहा सेंमी. लांबीची उभी चीर चाकूने पाडतात. तेथील साल आतल्या काष्ठमय भागापासून थोडीशी सोडवितात. कलम फांदी एक वर्ष वयाची, फुगलेले डोळे असलेली व १५ ते २० सेंमी. लांबीची घेऊन तिच्यावरील पाने देठ राखून छाटतात.

आ. ६. खुंटी कलम : (१) खुंट्या, (२) कापलेल्या आंब्याचा बुडखा आणि त्याच्या सालीवर पाडलेली चीर, (३) चिरीत बसविलेल्या खुंट्या, (४) त्यावर ठेवलेले काचेचे भांडे, (५) खुंट्या चिकटून त्यावर आलेली फूट.

तिचा बुंध्याकडचा ६ ते ८ सेंमी. भाग धारदार चाकूने तासून चपटा करतात. तो चीर पाडलेल्या जागी साल आणि लाकूड यांच्यामध्ये खुपसून घट्ट बसवितात. नंतर सालीवरून मेणवलेल्या कापडाची पट्टी बांधून वरून दोरीने करकचून बांधून टाकतात. झाडाच्या घेराप्रमाणे एक अगर अधिक अशा खुंट्या (कलम फांद्या) बसवितात. नंतर त्या बुडख्यावर खुंट्यांना अपाय होणार नाही अशा रीतीने मातीची मोठी कुंडी बुडाला मोठे भोक पाडून उपडी ठेवतात. भोकावर काचेचे तावदान झाकण घालतात. त्यामुळे तेथील हवामान थंड  राहून प्रकाशही आत जातो. सु. एक ते तीन आठवड्यांमध्ये कलमाचा जोड जमतो. त्याला पाने फुटली म्हणजे कुंडी काढून घेतात. पुढे जरुरीप्रमाणे खतपाणी देणे वगैरे नेहमीची निगा राखतात.

(७) बगल कलम : सामान्य प्रकारच्या गावठी आंब्याचे चांगल्या प्रकारच्या आंब्यात रूपांतर करण्यासाठी हे कलम वापरतात. वाढत असलेल्या रायवळ आंब्याच्या बगलेला ६० ते ७५ सेंमी. उंचीवर खोडाच्या सालीचा त्रिकोणी तुकडा पटाशीने छेद घेऊन खोडापासून सोडवून घेतात. त्रिकोणाचा शिरोबिंदू झाडाच्या शेंड्याच्या दिशेला ठेवतात. त्रिकोणाच्या पायावर सालीला १० सेंमी. लांब उभी चीर पाडतात. तेथील साल थोडी खोडापासून सोडवितात. खुंटी कलमातल्याप्रमाणे तयार करून चिरीत किंवा चिरीपासून जरा दूर खुपसून बसवितात. काढून घेतलेला सालीचा तुकडा मूळ जागी बसवून नंतर खुंटी कलमाप्रमाणे कापडी पट्टीने आणि सुतळीने बांधतात. तीन–चार आठवड्यांत जोड जमून कलम वाढू लागते. ते साधारण ४५ सेंमी. इतके वाढले म्हणजे कलम केलेल्या जागेच्या वर खुंटाचा शेंडा करवतीने काळजीपूर्वक कापून टाकतात.

(८) झाडाच्या तोडलेल्या फांद्यांवरील फुटीवरचे कलम : वरील दोन प्रकारांप्रमाणे हाही प्रकार निकृष्ट प्रकारच्या झाडांचे उत्कृष्ट प्रकारच्या आंब्यामध्ये रूपांतर करण्यासाठी वापरतात. यात झाडाच्या विस्ताराच्या बहुतेक फांद्या मुख्य खोडापासून सु. एक मीटर लांब ठेवून करवतीने कापतात. पुढे त्यांच्यावर जी फूट येते तिच्यापैकी सरळ उभी वाढणारी जोमदार अशी निवडक फूट ठेवून बाकीची काढून टाकतात. या फुटीवर तिची योग्य वाढ झाल्यानंतर भेट कलम पद्धतीने अगर डोळे भरून कलमे करतात. मोठ्या झाडावर ती केलेली असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होऊन वाढ जलद होते व झाडाचा विस्तार लवकर वाढतो. कलम जमून येण्यासाठी व त्या जागी दमट हवामान राखण्यासाठी कलम केलेल्या जागेभोवती वरची बाजू उघडी असलेले पुठ्ठ्याचे खोके बसवून त्यांत लाकडाचा दमट भुस्सा किंवा शेवाळे भरतात. प्रकाश आत जावा म्हणून खोक्यावर काचेचे झाकण ठेवतात. दोन तीन महिन्यांत कलम वाढू लागले म्हणजे खोके काढून घेतात. कलमांची वाढ ३० सेंमी. पर्यंत झाली म्हणजे त्याचा शेंडा छाटतात, त्यामुळे विस्तार वाढतो.

(९) दाब कलम : ही पद्धती फाटे कलमासारखीच आहे. त्यात फरक इतकाच की फाटे कलमात ते मूळ झाडापासून आधीच अलग केलेले असते. त्याला मुळ्या फुटण्यासाठी नंतर ते जमिनीत लावतात. दाब अगर गुटी प्रकारात फांदीला झाडावर असतानाच मुळे आणण्याची योजना करतात व नंतर ते मूळच्या झाडापासून तोडून वेगळे करतात. दाब कलमात झाडाची फांदी जमिनीला भिडेल अशी खाली वाकवून घेतात आणि तिच्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला पाच-सहा सेंमी. लांबीचा तिरपा छेद घेऊन ती शेंड्याच्या दिशेने एक-दोन सेंमी. लांबीपर्यंत चिरतात.

आ. ७. दाब कलम : (१) फांदी वाकवून तिला जमिनीच्या बाजूकडे खाच घेणे व तो भाग जमिनीत पुरून वर वजन ठेवणे, (२) त्या भागाला फुटलेली मुळे, (३) मुळे फुटल्यावर घेतलेला पहिला काप, (४) दुसर्‍या वेळी आणखी खोल केलेला काप.

फांदीच्या जाडीच्या अर्ध्याइतकी चीर पाडतात. ती फांदीची चीर बरोबर परत चिकटून जोडली जाऊ नये म्हणून तिच्यामध्ये लहानशी ढलपी बसवून तो चिरलेला भाग जमिनीत आठ–दहा सेंमी. खोल पुरतात. तो जमिनीतून निघून वर येऊ नये म्हणून त्याच्यावर वजन ठेवतात. तेथील जमीन पाणी घालून ओली ठेवतात. चिरलेल्या भागाच्या टोकाकडे जास्त मुळे फुटतात. सु. एक-दोन महिन्यांत तेथील माती उकरून मुळे पुरेशी फुटली आहेत किंवा नाहीत ते तपासतात. पुरेशी मुळे फुटल्याचे आढळल्यावर त्या फांदीवर खोडाकडच्या बाजूने जमिनीजवळ फांदीच्या जाडीच्या एकतृतियांशाइतकी खोल खाच चाकूने पाडतात. पुढे भेट कलमातल्याप्रमाणे तोडून मूळ झाडापासून फांदी सुटी करतात. पण ते दाब कलम तेथेच आणखी आठ–दहा दिवस वाढू देतात. नंतर मातीच्या गोळ्यासह काढून घेऊन मडक्यात अगर शेतात लावतात. जमिनीत करण्याऐवजी कुंडीत माती भरून तिच्यामध्येही दाब कलम करता येते. याला जडवा असेही म्हणतात.

(१०) गुटी कलम : याचे दुसरे नाव चवडा. झाडाच्या उभ्या वाढणार्‍या वर्ष–दीडवर्ष वयाच्या करंगळीएवढ्या जाड फांद्यांवर हे कलम करतात. अशी निरोगी जोमदार फांदी घेऊन तिच्या कांड्यावरील डोळ्याच्या वरच्या योग्य जागेचा चार-पाच सेंमी. उंचीचा अंगठीसारखा सालीचा गोलाकार भाग चाकूने कापून सोडवून घेतात. झाड रसावर असले म्हणजे हे सोपे जाते. झाडावर वाढणारे शेवाळे गोळा करून वाळवून ठेवलेले असते ते पाण्यात भिजवून, जास्त झालेले पाणी पिळून काढून, तो ओला गोळा साल काढलेल्या जागी सर्व बाजूंनी लपेटून बसवितात व वरून सुतळी गुंडाळतात.

आ. ८. गुटी कलम : (१) फांदीवरील सर्व बाजूंकडील सु. सव्वा सेंमी. साल काढून (२) त्याच्यावर शेवाळे ओले करून बांधणे व त्यावरून प्लॅस्टिक कागदाची पट्टी लपेटून वरून सुतळीने बांधणे, (३) दीड-दोन महिन्यांनी मुळे फुटल्यावर शेवाळे बांधलेल्या जागेखाली कापून कुंडीत लावणे.

त्याच्यावर प्लॅस्टिक कागदाची रुंद पट्टी दोन–चार वेढे देऊन लपेटतात व सुतळीने आवळून बांधतात. शेवाळे पाणी धरून ठेवते. ही कलमे पावसाळ्यात करतात त्यामुळे अधूनमधून पडणार्‍या पावसाने शेवाळे सतत ओले राहते. पुष्कळ दिवस पावसाने उघडीप दिल्यास मात्र वरून पाणी ओतून शेवाळे ओले करावे लागते. साल काढलेल्या गोल पट्टीच्या वरच्या बाजूकडून दीड-दोन महिन्यांत मुळे फुटतात. या वेळी प्लॅस्टिकची पट्टी सोडून पाहिल्यास शेवाळ्यातून मुळे वाढत असलेली दिसून येतात. त्या वेळी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कलम मूळ झाडापासून वेगळे करून त्याची योग्य ती काळजी घेतात.

 

 

 

 

 

पाटील, ह. चिं.

संदर्भ : 1. Hayes, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.

2. Sham, Singh; Krishnamurthi, S.; Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.