कारळा : (खुरासनी, कोरटे हिं. रामतील, कालातील, सुर्गुजा गु.रामतल क.गुरेळ्ळू, हुच्चेळ्ळू इं.नायगर लॅ. रिवझोशिया ॲविसिनिका कुल-कंपॉझिटी). हे वर्षायू (एक वर्ष जगणारे) क्षुप (झुडूप) मुळचे आफ्रिकेच्या उष्ण भागातील आहे. खोड सरळ व बळकट. पाने लांबट, बिनदेठाची, दंतुर, ७·५–१२ सेंमी. स्तबके [→पुष्पबंध] पिवळी असून त्यांत दोन प्रकारची पुष्पके असतात. कडेची जिव्हिकाकृती (जिभेसारखी) आणि बिंबावरील नलिकाकृती [→कंपॉझिटी]. कृत्स्नफळे (शुष्क, आपोआप न फुटणारी व एकच बी असलेली फळे) बारीक, काळी, चकचकीत व कोनीय. बियांपासून देशी घाण्यातून ३० ते ३२ टक्के तेल मिळते ते फिकट पिवळे, नितळ व गोड असल्याने स्वयंपाकात वापरतात. हे तेल गरीब लोक तुपाऐवजी खातात एरंडेलात व तिळेलात याची भेसळ करतात. कारळ्याची चटणीही आवडीने खातात. तेल दिव्यात व साबणाकरिता वापरतात. ते संधिवातावर गुणकारी असते. बी पाळीव पक्ष्यांना खाऊ घालतात. पेंड दुभत्या जनावरांना खुराक म्हणून चारतात. महाराष्ट्रात नवरात्रात देवीच्या पुजेसाठी फुले वापरतात. निकृष्ट दर्जाचे तेल वंगणासाठी वापरतात.

भारत व इथिओपिया या देशांत विस्तृत प्रमाणावर आणि वेस्ट इंडीज व पूर्व आफ्रिकेत मर्यादित प्रमाणावर कारळ्याची लागवड करतात. भारतात या पिकाखाली ३·२ लक्ष हेक्टर क्षेत्र असून तेलबियांचे उत्पादन ९३,००० टन आहे. भारतातील लागवड मुख्यत्वे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व ओरिसा ह्या राज्यांत होते.

उष्णकटिबंधीय प्रदेशातील हवामान व ६० ते १०० सेंमी. वार्षिक पावसाच्या प्रदेशात हे पीक चांगले येते. समुद्रसपाटीपासून ३०० ते १,२०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात याची लागवड यशस्वी होते. लागवड कोरडवाहू पीक म्हणून करतात. या पिकाला वरकस, हलकी, तांबडी अगर मध्यम प्रकारची निचरा होणारी जमीन चालते.

नाचणी, वरी, कोद्रा व बाजरी या पिकांबरोबर कारळ्याची फेरपालट करतात. त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी, कडधान्ये, कपाशी, भुईमूग इ. पिकांबरोबर कारळ्याचे पीक मिश्रपीक म्हणूनही घेतले जाते.

स्वतंत्र, सलग पिकाकरिता दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करतात. मिश्रपिकात मुख्य पिकाला दिलेल्या मशागतीचा फायदा याला मिळतो. या पिकाला खत देण्याची प्रथा नाही.

फणांमध्ये ३० सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने हेक्टरमध्ये पाच-सात किग्रॅ. बी पेरतात. बी उगवून रोपे जमल्यावर गरजेप्रमाणे दोन-तीन कोळपण्या देतात त्यामुळे तण निघून जाऊन जमीन भुसभुशीत बनते. सप्टेंबर महिन्यात पीक फुलावर येते, तेथून पुढे ३०–४५ दिवसांनी पीक काढणीस तयार होते. ऑक्टोबर महिन्यात पिकाची काढणी करतात. पीक तयार होण्याच्या वेळी त्याची बरीचशी पाने गळून पडलेली असतात, ती पुढे जमिनीत कुजून तिला जैव (सेंद्रिय) पदार्थाचा भरपूर पुरवठा होतो. तयार झालेले पीक जमिनीसपाट विळ्याने कापतात. त्याचे भारे बांधून खळ्यावर नेऊन तेथे काही दिवस उन्हात वाळू देतात. वाळल्यानंतर खळ्यातच काठीने बडवून त्याची मळणी करतात. मळणी केलेला माल उफणून दाणे साफ करून पोत्यात भरून ठेवतात.

दाण्यांचे (तेलबियांचे) सरासरी हेक्टरी उत्पन्न १२० किग्रॅ. मिश्रपिकामधून आणि स्वतंत्र पिकामधून २४० किग्रॅ. पर्यंत मिळते.

भारतामधील लागवडीखालचे पीक बहुतेक एकच प्रकारचे आहे, परंतु कधीकधी झाडांच्या आणि बियांच्या रंगात किंचित फरक असलेले प्रकार आढळतात. कृषी खात्याने कारळ्याच्या खालील काही सुधारलेल्या जाती शोधून काढल्या आहेत.

 कारळ्याच्या सुधारलेल्या जाती

सुधारलेली जात 

पीक तयार होण्यासाठी लागणारे दिवस 

हेक्टरी उत्पन्न किग्रॅ. 

तेलाचे प्रमाण 

%

एन – १२ – ३  

११० 

२१५ 

४०·५ 

एन – ५  

९० 

२४० 

३७·० 

उटकमंड 

११५ 

२६० 

३७·० 

कुलकर्णी, य.स. आफळे, पुष्पलता द.