लसूण : (हिं. लसन गु. लसण क. बेळुवळ्ळी सं. लशून, उग्रगंधा इं. गार्लिक लॅ. ॲलियम सटायव्हम कुल-लिलिएसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही ओषधीय [लहान व नरम ⟶ ओषधि] वनस्पती ⇨कांदा व ⇨ खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व ⇨लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात इ. स. पू. ५००० ते ३४०० या काळात ईजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रूमानिया व ईजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्तिर होणे) झाले आहे. भारतादि अनेक पौर्वात्य देशांत ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे ती मूळची भारतीय नाही वैदिक वाङ्मयात लसणाचा उल्लेख नाही, तथापि महाभारतात (आरण्यक पर्वात) कांदा व लसूण यांचा उल्लेख आलेला आहे तसेच कौटिलीय अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, भावनीतक, मनुस्मृती इ. अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांत निरनिराळ्या संदर्भात त्यांचे उल्लेख आढळतात. लसणाच्या निश्चित मूलस्थानाबद्दल मतभेद आहेत. मात्र अनेक धर्मग्रंथांत लसूण अपवित्र, निषिद्ध व त्याज्य मानलेला आढळतो तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांची माहितीही भरपूर मिळते काश्यपसंहितेइतकी माहिती इतरत्र आढळत नाही.

लसूण : (१) पानाफुलांसह वनस्पती, (२) कंदाचा(गड्ड्यांचा) उभा छेद, (३)फूल, (४) कुडी (पाकळी).ही वनस्पती बहुवर्षायू (अनेक हंगाम जगणारी) असूनही ती वर्षायू (एक हंगाम जगणारी) प्रमाणे पिकवितात. हिचे भूमिगत खोड (कंद, गड्डा) कांद्यापेक्षा लहान असून त्यातील मांसल भाग पानांच्या बगलेतील कळ्यांचा असतो व त्यांना सामान्यपणे कुड्या किंवा पाकळ्या म्हणतात. कंदावर पातळ, पांढरे किंवा जांभळट आवरण असते. जमिनीवर येणारी हिरवी पाने साधी, रेषाकृती, सपाट, गवतासारखी व टोकदार असतात जणू मूळापासून आली असावीत म्हणून त्यांना मूलज म्हणतात. सर्वसाधारणपणे अधिक पांढरट व लालसर असे दोन कंद प्रकार [क्षेत्रज व गिरिज] असे दोन प्रकार फार पूर्वीपासून ओळखले गेले आहेत. डिसेंबर ते जानेवारीत लांब देठ असलेल्या व गोलसर चवरीसारख्या फुलोऱ्यावर (चामरकल्प ⟶ पुष्पबंध) टोकदार व लांब महाछदात दांड्यावर पांढरी फुले व लहान कंदिकाही येतात. ही फुले नियमित, द्विलिंगी, त्रिभागी असून त्यात परिदलांची व केसरदलांची दोन दोन मंडले असतात तीन जुळलेल्या व ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात [⟶ फूल] तीन कप्पे असून फळात (बोंडात) अनेक सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ललिएसी कुलाच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. 

लसणाच्या कुड्यांना उग्रवास येतो, त्यामुळे तो अनेकांना नकोसा वाटतो तथापि त्यातील खमंगपणामुळे लसणाचा स्वयंपाकातील वापर पूर्वीपासून प्रचलित आहे. औषधी गुणांमुळेही तो सर्व देशांत महत्त्वाचा ठरला आहे. अनेक प्रकारे त्याचा उपयोग केला जात असून त्याला कृषीत व व्यापारी जगात महत्त्वाचे स्थान लाभले आहे. लसूण (कुड्या) वायुसारक, वाजीकर (कामोत्तेजक), कफोत्सारक (कफ पाडून टाकणारा), उत्तेजक, पाचक, ज्वरहारी (ताप कमी करणारा) व दीपक (भूक वाढविणारा) आहे. लसणाचा रस पोटदुखीवर व कानदुखीवर (कानांत घालण्यास) देतात. फुप्फुसाचे व श्वासनलिकेचे विकार, डांग्या खोकला, कुष्ठरोग, जंत, मूत्रपिंड व ग्रहणीतील (लहान आतड्याच्या प्रारंभीच्या भागातील) व्रण यांवरही तो रस उपयुक्त असून कातडीचे विकार, जखमा व जुनाट व्रण धुण्यास बाहेरून वापरण्यास त्याचा पातळ केलेला रस उपयुक्त असतो. लसणाची बनबिलेली तयार भुकटी व औषधे भारतात आयात केली जातात. म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने वेळ व श्रम वाचवणारी तसेच रंग व स्वाद, सूक्ष्मजंतुरोधी गुण व औषधी मूल्य या बाबतींत अधिक चांगले असलेले लसूण चूर्ण तयार करणारी प्रक्रिया विकसित केली आहे. ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग थंड करून अलग करण्याच्या क्रियेने) काढलेल्या लसणातून बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलात (०.०६-०.१%) गंधकयुक्त संयुगे असतात यामुळे ते दीपक, उत्तेजक व कृमिनाशक असते तथापि तेलाचा प्रत्यक्ष वापर औषध म्हणून करीत नाहीत. लसूण रक्तवाहिन्यांमधील रक्त शुद्ध करते. तसेच रक्तप्रवाह खेळता ठेवण्यासाठी ते साहाय्यक ठरले आहे. आहारात लसणाचा वापर केल्यामुळे रक्तात कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमाण कमी राहते असे एका हृदयरोग तज्ञाने प्रयोगांनी सिद्ध केले आहे. डोकेदुखीवर लसणाचा रस कपाळाला चोळतात तसेच अर्धशिशी असल्यास रस नाकात घालतात. आमांशावर लसणाच्या बियातील मोड गुळाबरोबर देतात.


लागवड, मशागत इत्यादी : हवामान : समशीतोष्ण हवामानात लसणाची चांगली वाढ होते पीक थंडी सहन करू शकते. ९००-१,२०० मी. उंचीच्या प्रदेशात सुद्धा हे पीक चांगले येते ते मुख्यतः हिवाळी हंगामाचे पीक असून लागवडीनंतर पहिले दोन माहिने थंड व ओलसर हवा व त्यानंतर पीक तयार होत असताना मोठा दिवस व कोरजे आणि उष्ण हवामान यांमुळे ⇨ कांद्याप्रमाणे त्याचे कंद बनण्याच्या कार्यास चालना मिळते म्हणून लसणाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरात करतात उत्तरेत सपाट प्रदेशात सप्टेंबर ते ऑक्टोबरात आणि डोंगराळ भागात फेब्रुवारी ते मार्चमध्ये लागवड करतात. लसणाबरोबर फेरपालट म्हणून खरीप हंगामात बाजरी, मूग, बटाटे यांसारखी पिके घेतात द. भारतात घेवडे, मिरची, मका व नाचणीबरोबर फेरपालट करतात. १९७९ साली जगात सु. ३,८७,००० हे. क्षेत्र (भारतात ४२,००० हे.) लसणाच्या लागवडीखाली होते. भारत, चीन, द. कोरिया, थायलंड व स्पेन या देशांत लसणाची प्रामुख्याने लागवड होते.

प्रकार : जामनगर, नाशिक, महाबळेश्वरी, मदुराई, हिसार इ. लसणाचे लागवडीतील स्थानिक प्रकार आहेत. जामनगर या प्रकाराचे कंद पांढऱ्या रंगाचे सर्वोत्तम व मोठे असून त्यांपासून चांगल्या तिखट व सूक्ष्मजंतुरोधी क्रियाशीलता असलेल्या निर्जलीकरण केलेल्या कुड्या व चूर्ण यांचे सर्वाधिक उत्पन्न मिळते. उ. भारतात बहुतेक पांढऱ्या रंगाचे प्रकार पसंत करतात. पांढऱ्या प्रकारांचे कंद मोठे असतात, साठवणीत चांगले राहतात व त्यांचे उत्पादन अधिक मिळते. जाभळट रंगाचे प्रकार अधिक तिखट व औषधी मूल्याच्या दृष्टीने अधिक चांगले असतात, पण त्यांचे उत्पादन कमी मिळते.

जमीन : लसणाच्या पिकासाठी मध्यम ते भारी काळी , पोयट्याची व चांगला निचरा होणारी जमीन मानवते. लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून मऊ करतात. दर हेक्टरी २५ टन शेणखत जमिनीत मिसळतात लागवडीसाठी ३ ×१.८ किंवा ३.६ ×१.८ मी. आकारमानाचे वाफे तयार करतात. लागवडीकरिता कुड्या वापरतात दर हेक्टरी ३००-३५० किग्रॅ. लसणाच्या कुड्या लागतात १५-२० × ७-१० सेंमी. अंतरावर ओळीत कोरड्या जमिनीत प्रथम पेरणी करून नंतर पाणी देतात दुसरे पाणी ३-४ दिवसांनी व नंतर १०-१२ दिवसांनी पाणी देत राहतात पिकाच्या जीवनात एकूण १२-१५ पाण्याच्या पाळ्या होतात. पहिल्याने दिलेल्या शेणखताशिवाय १०० ते १२५ किग्रॅ. नायट्रोजन (अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट बरोबर) दोन हप्त्यांत व लागवडीच्या वेळी ५० किग्रॅ. फॉस्फेरिक अम्ल व ५० किग्रॅ. पोटॅश देतात.

काढणी व उत्पादन : चार ते साडेचार महिन्यांत (फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये) पीक काढणीसाठी तयार होते. त्या वेळी पाने पिवळी होतात आणि खालची पाने वाळून कंद जमिनीवर दिसू लागतात, कंद हातांनी उपटून काढतात १-३ आठवडे वाळवतात पाने व मुळे काढून टाकून, कंदांची साठवण करतात त्यासाठी तापमान १०° से. च्या आसपास व आर्द्रतेचे प्रमाण कमी असावे लागते. भारतात दर हेक्टरी सु. ३,५०० किग्रॅ. इतके उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील काही भागांत जास्त बियाणे (६०० किग्रॅ. प्रती हे.) वापरून ६,०००-७,५०० किग्रॅ. उत्पादन काढतात. साधारणणे बियाणांसाठी वापरलेल्या कंदाच्या दसपट उत्पादन मिळते. १९७९ साली लसणाचे जागतिक उत्पादन २४,४६,००० टन झाले व त्यांपैकी सर्वाधिक चीनमध्ये ५,१०,००० टन तर भारतात १,१०,००० टन झाले. कंदांतील कुड्यांचे प्रमाण ८६-९६% असते.

रोग व कीड : लसणाच्या पिकावर करपा (ब्लास्ट) रोग पडतो पानांवर तांबडे व मध्यभागी राखी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर ५:५:५० तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारतात. फुलकिड्यांचा उपद्रवही होतो. मॅलॅथिऑनासारखे कीटकनाशक त्यावर वापरतात. तंबाखूचा काढा किंवा पूड वापरूनही कीड निवारण होते.

रासायनिक संघटन : लसणात ६२.८% पाणी, ६.३% प्रथिने, २९.०% कार्बोहायड्रेटे, ०.१% मेद, ०.०३% कॅल्शियम व ०.३१% फॉस्फरस असतो शिवाय १.३ मिग्रॅ./१०० ग्रॅ. लोह व १३ मिग्रॅ./१०० ग्रॅ. क जीवनसत्त्व असते लसणाला येणारा विशिष्ट वास त्यातील ॲलिल २-प्रोपीन थायोसल्फिनेट (ॲलिसीन) या संयुगामुळे येतो. लसणाचा कंद कापला व चुरडला म्हणजे हे संयुग तयार होते व त्यामुळे तीव्र वास येतो.

संदर्भ : 1. Bose, T. K. Som, M. G.,Ed., Vegetable Crops in India, Calcutta, 1986.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.I, New Delhi, 1948.

जगताप, अहिल्या पां. कुलकर्णी, चं. ज. परांडेकर, शं. आ.