साबुदाणा : हा पिष्ठमय खाद्यपदार्थ काही विशिष्ट वनस्पतींच्या ⇨खोडांपासून किंवा मुळांपासून काढतात. ⇨पामी कुलातील मेट्रोझायलॉन प्रजातीतील मुख्यतः दोन जाती (मेट्रोझायलॉन रंफायमे. सॅगो ) यांकरिता प्रथम वापरीत. त्यावरुन ‘सॅगो’ हे इंग्रजी नाव साबुदाण्यास दिले गेले आहे. सायकॅड वृक्षाच्या सायकस रेव्होल्यूटा खोडापासूनही साबुदाणा मिळतो, म्हणून त्याला ‘सॅगोपाम’ असेही म्हणतात. पाम (ताल) वृक्षापासून साबुदाणा काढण्यापेक्षा बटाटे व ⇨टॅपिओका ( कसावा लॅ. मॅनिहॉट एस्क्युलेटा कुल-यूफोर्बिएसी ) यांपासून तो मोठ्या प्रमाणावर काढणे अधिक फायदेशीर ठरले आहे. जर्मनी व जपान येथे रताळी व बटाटे यांपासून साबुदाणा काढतात तर मलेशिया, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, भारत इ. देशांत त्याकरिता टॅपिओका लागवडीत आहे व त्याची ग्रं थिल ( गाठाळ ) मुळे साबुदाण्याच्या निर्मितीसाठी उपयोगात आणतात.

मेट्रोझायलॉनच्या जाती मूळच्या इंडोनेशिया, मलेशिया, न्यू गिनी व फिजी बेटे येथील असून मे. सॅगो मलेशिया, इंडोनेशिया व फिलिपीन्स येथे लागवडीत आहे. हा वृक्ष ९–१२ मी. उंच वाढतो, त्याचा घेर १·२५–१·५० मी. असतो. पाने संयुक्त, मोठी, पिच्छाकृती (पिसासारखी), अग्रस्थ (शेंड्या वर) आणि खोड शाखाहीन (बि नफांद्यांचे) असते. सुमारे १२–१५ वर्षांनी वृक्षाची पूर्ण वाढ होऊन एकदाच मोठा स्थूलकणिश प्रकारचा फुलोरा [⟶ पुष्पबंध] येतो व त्यानंतर तो गळतो. फुले एकलिंगी, द्विलिंगी व एकाच झाडावर असून फळात एकच बी असते. हा वृक्ष पाणथळ जमिनीत वाढतो. त्याची नवीन लागवड अधश्चरापासून (मुनव्यापासून) करतात. वृक्षाची पूर्ण वाढ झाल्यावर फुलोरा निर्माण होण्यात खोडातील अन्नाचा व्यय होत असल्याने फुले येण्याअगोदर तो तोडतात. सुमारे १ मी. लांबीचे तुकडे करुन ते उभे चिरतात व कठीण सालीपासून भेंड अलग काढतात. नंतर त्या भेंडाचे भरड पीठ करुन ते पाणी घालून चाळणीवर फेसतात त्यामुळे बारीक पिष्ठमय भाग चाळणीखालच्या पाण्यात पडतो व चोथा वर राहतो. पाण्यातील स्टार्चयुक्त भाग तळाशी बसल्यावर, पाणी बदलून तो धुतला जातो व नंतर सुकविला जातो. याचा पुन्हा लगदा करुन चाळणीतून कणी पाडतात व उथळ तव्याला तेल लावून त्यावर भाजतात या कठीण आणि चकाकणाऱ्या कणांना ‘पर्ल सॅगो’ किंवा ‘बुलेट सॅगो’ म्हणतात. या प्रकियेत यंत्रांचाही उपयोग करतात. एका वृक्षापासून सु. १२५–३३० किगॅ. साबुदाणा मिळतो.

मलेशियातील कॉरिफा एलॅटा पाम, गमूती पाम (ॲरेंगा पिनाटा), ⇨भेर्ली माड आणि मादागास्करमधील रॅफिया पिडंक्युलॅटा यांपासून कमी प्रतीचा साबुदाणा मिळतो. सायकसच्या खोडातील भेंडापासून, द. अमेरिकेतील दोन जातींपासून (मॉरिटिया फ्लेक्सुओजा व गिलिएमा गॅसिपीज ) व पोर्टलँड बेटावर वाढणाऱ्या ॲरम मॅक्युलेटम ( कुल-ॲरॉइडी) इत्यादींपासूनही साबुदाणा काढतात. तांदूळ, गहू, ज्वारी व मका यांतील पिठाचा उपयोग करुनही साबुदाणा बनवितात तथापि शिजविल्यावर हा भातासारखा भरीव दिसतो. याउलट टॅपिओका, बटाटा, रताळी व वर वर्णिलेले पाम वृक्ष यांपासून बनविलेला साबुदाणा शिजविल्यावर काहीसा पारदर्शक दिसतो व तो अधिक लवकर शिजतो. जावामध्ये रताळ्यांपासून इतर काही पिठे मिसळून विशेष प्रकारचा साबुदाणा बनवितात. भारतात पूर्वी मलेशिया व इंडोनेशिया येथून साबुदाणा आयात होत असे परंतु दुसऱ्या महायुद्घानंतर हळूहळू टॅपिओकापासून तो व्यापारी पद्घतीने बनविला जात आहे. मराठी विश्वकोशातील ‘टॅपिओका’ या नोंदीत टॅपिओकाच्या मुळांपासून तयार करण्यात येणाऱ्या साबुदाण्याची प्रक्रिया दिलेली आहे.

नैऋर्त्य पॅसिफिक महासागराच्या भागात राहणाऱ्या लोकांचा साबुदाणा हा महत्त्वाचा अन्नपदार्थ आहे. फिलिपीन्समध्ये साबुदाण्याच्या वृक्षातील भेंड भाजून खातात. भेंडाचे पीठ डुकरे, घोडे व कोंबड्या यांना चारा म्हणून महत्त्वाचे खाद्य ठरले आहे. साबुदाण्याचे पीठ अनेक खाद्यपदार्थांत [उदा., पुडिंग (सांजा, शिरा) आणि बेकरी पदार्थ यांमध्ये] मिसळतात. बोर्निओतून यूरोपकडे साबुदाण्याची निर्यात होते. यूरोप व अमेरिकेमध्ये सूप (रस्सा) आणि सॉस यांना दाटपणा आणण्याकरिता साबुदाणा वापरतात. साबुदाणा थंड पाण्यामध्ये विरघळत नाही परंतु बराच काळ पाणी उकळल्यानंतर तो एकजीव होऊन जिलेटिनी विद्राव तयार होतो. भारतात उपवासाच्या दिवशी साबुदाणा वापरुन खीर, खिचडी, वडे, थालीपिठे इ. पदार्थ बनवितात. लहान मुले व रुग्ण यांना पचण्यास हलका व पथ्यकर म्हणून याची खीर देतात. ताक किंवा दही आणि मीठ व मिरची घालून साबुदाणा खातात. साबुदाण्याचे पापड लोकप्रिय आहेत. कापडास कडकपणा आणण्याकरिता कापडगिरण्यांत साबुदाण्यातील स्टार्च खळीप्रमाणे वापरतात.

पहा : टॅपिओका पाम सायकस

परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.