आ. १. नारळ (अ) संपूर्ण वृक्ष (माड) (आ) फुलोरा: (१) पुं-पुष्पे,(२) स्त्री-पुष्पे (इ) पुं-पुष्प (ई) स्त्री-पुष्पाचा उभा छेद (उ) फळ (ऊ) फऴाचा उभा छेद: (१) बाह्यकवच, (२) मध्यकवच, (३) अंतःकवच (करवंटी), (४) खोबरे (पुष्क),(५) गर्भ (ए) नारळ (आठऴी) : (१) अंकुरद्वार.

नारळ : (हिं., गु. नारियल क. टेंगू सं. नारिकेल इं. कोकोनट लॅ. कोकॉस न्यूसिफेरा कुल-पामी). या नावाचे सुपरिचित फळ ज्यापासून मिळते त्या वृक्षाला सामान्यतः ‘माड’किंवा ‘नारळाचे झाड’ म्हणतात. याचा प्रसार उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशांत विशेष आहे. हिंदी व पॅसिफिक या महासागरांतील बेटांत नैसर्गिक अवस्थेत व गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचे खालचे प्रदेश, द. भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका इ. भागांत हे मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. याचे मूलस्थान आग्नेय आशिया (इंडोमलायातील प्रदेश) असावे हे सर्वमान्य झाले आहे. नारळाच्या वंशातील इतर जाती, त्यांचा प्रसार, जीवाश्म (शिळारूप अवशेष) इत्यादींचा अभ्यास करून पुणे विद्यापीठातील त्र्यं. शं. महाबळे यांनी नारळाच्या मूलस्थानासंबंधी काढलेला निष्कर्ष वरील विधानाला पुष्टी देणाराच आहे. तसेच त्याच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या जाती लहान फळांच्या होत्या आणि अशा काही जाती हल्ली द. अमेरिकेत आढळतात कदाचित नारळाचा पूर्वज लहान फळांचा असावा. न्यूझीलंडात माडाचे जीवाश्म आढळले असून इंडोमलायात माडाचे काही नैसर्गिक प्रकारही आढळले आहेत. भारतात रामायण, महाभारत व पुराणांत नारळाचा उल्लेख आढळतो परंतु वेदांमध्ये त्याच्या संबंधी उल्लेख नाही. हा वृक्ष सु. २५ मी. पर्यंत उंच वाढतो खोड नितळ, राखी रंगाचे, पर्णकिण (पानांच्या तळाचे वण) असलेले व शाखाहीन असून त्याच्या टोकास मोठ्या, संयुक्त व पिसासारख्या २ – ६ मी. लांबीच्या सु. १० – १२ पानांचा झुबका असतो मोठ्या वाऱ्याने तो डुलत राहतो. दले अनेक, मोठी, ६० – ९० सेंमी. लांब, हिरवी, चकचकीत आणि तलवारीच्या पात्यासारखी पण चिवट असतात. दरवर्षी सु. १० – १२ पाने आणि तितकेच फुलोरे (स्थूलकणिशे) येतात. प्रत्येक स्थूलकणिश [→पुष्पबंध] १–२ मी. लांब असून त्यावर लहान, असंख्य एकलिंगी फुले येतात. पुं-पुष्पे संख्येने खूप असून त्यामानाने स्त्री पुष्पे बरीच कमी फुलांची संरचना व सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पामी कुलात (ताल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात, फुलोऱ्यावर पुं-पुष्पे वरील टोकाकडे व स्त्री-पुष्पे खाली असतात. प्रत्येक स्त्री-पुष्पाजवळ दोन पुं-पुष्पे असतात. पुं-पुष्पात परिदले लहान व केसरदले सहा असून वंध्य किंज बहुधा नसतो. स्त्री-पुष्पे मोठी, सच्छदक, परिदले मोठी व किंजदले तीन असतात [→ फूल]. दोन्ही प्रकारची फुले भिन्न वेळी पक्व होत असल्यामुळे परपरागण [→ परागण] घडून येते. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ २० – ३० सेंमी. लांब, काहीसे त्रिकोनी, प्रथम हिरवट पिवळे पण नंतर पिंगट होते. ते टणक असून मध्यकवच तंतूयुक्त (सूत्रल) व अंतःकवच (करवंटी) कठीण असते. बी एकच व सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेली) असते. अंतःकवचासह बी हाच बाजारात मिळणारा नारळ होय. खोबरे व तेथे असलेले पाणी हा पुष्क व सर्व नारळ ही अष्ठी (आठळी) होय. नारळावर असलेल्या तीन काळ्या ठिपक्यांमुळे तीन किंजदलांचा बोध होतो. यांपैकी एका नरम ठिपक्यातून (अंकुरद्वार) बी रुजतेवेळी अंकूर बाहेर पडतो.

हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर बाजूंनी आंब्याची पाने लावून मधोमध नारळ उभा ठेवतात. शुभकार्यात पाहुणे मंडळींना नारळ देण्याची पद्धत आहे. तसेच इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी आणि देवदेवतांसमोर नारळ फोडतात व खोबरे प्रसाद म्हणून वाटतात.

जगातील तेलोत्पादक पिकांमध्ये नारळाचा क्रमांक पहिला आहे. त्यानंतर अनुक्रमे भुईमूग, कापूस (सरकी), तीळ आणि तेल माड यांचे क्रमांक आहेत. भारतात भुईमूगाचा प्रथम क्रमांक आहे.

माडाला ‘सत्य सृष्टीतील कल्पतरू’ म्हणतात, कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मनुष्याला उपयोग होतो. ‘वर्षाचे जेवढे दिवस आहेत तेवढे नारळाच्या झाडाचे व फळांचे उपयोग आहेत’ असे इंडोनेशियातील लोक म्हणतात. खोबरे व पाणी पौष्टिक असून कोवळ्या नारळातील (शहाळ्यातील) पाण्याचा उपयोग कृत्रिम गर्भसंवर्धन किंवा सूक्ष्मजंतु संवर्धन याकरिता फार होतो. नीलेतून अंतःक्षेपण (इंजेक्शन) देण्यासाठीही नारळाच्या पाण्याचा उपयोग करतात. खोबऱ्याचा उपयोग स्वयंपाकात व मिठाईत घालण्यास करतात. तेल (खोबरेल) खाद्य असून साबण, मेणबत्त्या, सुगंधी तेले, मार्गारीन वगैरेंकरिता मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पेंड जनावरांना खाऊ घालतात. फुलोऱ्यास (पोईला) खाचा पाडून काढलेला गोड रस [→ नीरा] पेय असून पुढे त्यापासून माडी (मादक पेय), सिरका किंवा गूळ बनवितात. चोड्यांपासून काथ्या तयार करून त्यापासून दोरखंडे, चटया (मॅटिंग), पायपोस, ब्रश इ. वस्तू बनवितात. काथ्याचा उपयोग गाद्या व उशा भरण्यासाठीही करतात. करवंटीपासून बटणे, वाट्या, चमचे इ. बनवितात. पानांच्या शिरांपासून झाडण्या व पातीपासून चटया करतात. खोड किरकोळ बांधकामात अगर नाल्यावर तात्पुरता पूल बांधण्यासाठी वापरतात. खोडाच्या बाहेरील भागातील लाकूड पार्क्युपाइन वूड या नावाने ओळखले जाते व त्याचा उपयोग शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी करतात.


खोबरे वाजीकर (कामोत्तेजक) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते मुळे मूत्रल व स्तंभक (आकुंचन करणारे) असून अतिसार आणि आतड्याच्या व गर्भाशयाच्या विकारांवर देतात नारळातील पाणी शीतल, मूत्रल, रक्तशोधक (रक्त शुद्ध करणारे) व कृमिनाशक असते. फुले स्तंभक ताजी व आंबलेली माडी सारक व उत्तेजक असते खोबऱ्यात अ, ब आणि क जीवनसत्वे असतात. खोडाची साल दंतधावनाकरिता आणि राख खरजेवर लावण्यास वापरतात. खोबरेल केशवर्धन व अंगमर्दन यांकरिता उपयुक्त असते.

पाटील, शा. दा.

जागतिक आणि भारतातील उत्पादन : जगातील ५७ देशांत नारळाचे उत्पादन होते. त्यांत फिलिपीन्स बेटे, भारत, इंडोनेशिया आणि श्रीलंका हे चार प्रमुख देश असून त्यांत जगातील सु. ७३% नारळाचे उत्पादन होते. १९६८ मध्ये जगात २,८८४ कोटी नारळांचे उत्पादन झाले. ५० कोटींपेक्षा जास्त उत्पादन असलेले नऊ देश व त्यांचे उत्पादन पुढीलप्रमाणे आहे (उत्पन्नाचे आकडे कोटी नारळांचे आहेत) : फिलिपीन्स बेटे ७८४·९, भारत ५४३·८, इंडोनेशिया ५१२·१, श्रीलंका २६०·१, थायलंड १००·००, प. मलेशिया ८१·५, मेक्सिको ८०·९, ब्राझील ६९·१, न्यू गिनी ६३·४. यांखेरीज इतर पाच देशांत २० ते ५० कोटी  आणि १० देशांत १० ते २० कोटी नारळांचे उत्पन्न झाले. ३३ देशांत ते १० कोटींपेक्षाही कमी होते. नारळ पिकवणाऱ्या देशांत भारताचा दुसरा क्रमांक आहे हे वरील आकड्यांवरून दिसून येईल.

 भारतात १९४९-५० मध्ये नारळाखालील क्षेत्र ५·९६ लक्ष हेक्टर, एकूण उत्पादन ३४४·८ कोटी (नारळ) आणि दर हेक्टरी उत्पादन ५,७८५ नारळ होते. १९७४-७५ मध्ये क्षेत्र जवळजवळ दुप्पट (११·१६ लक्ष हेक्टर) होते परंतु उत्पादन मात्र दुपटीने न वाढता ते फक्त ५९७·१३ कोटी नारळ एवढेच होते. याचे कारण दर हेक्टरी उत्पादन ५,७८५ वरून ५,३५३ पर्यंत घटले. नारळाच्या ९०% पेक्षा जास्त बागांचे क्षेत्र एक हेक्टरपेक्षा कमी आहे व दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या बागांचे क्षेत्र २% पेक्षा जास्त नाही. याशिवाय खोबरेल तेलाच्या किंमतीतील अस्थिरता, देशातील काथ्याच्या धंद्यातील अनेक समस्या यांमुळे नारळ बागाईतदार उत्पादनवाढीकडे आकर्षिला जात नाही. १९७४-७५ मध्ये भारतातील नारळाचे राज्यवार क्षेत्र, एकूण उत्पादन आणि हेक्टरी उत्पादन पुढील कोष्टकामध्ये दिले आहे. देशातील एकूण उत्पन्नापैकी सु. ६७% उत्पादन केरळ राज्यात होते.

महाराष्ट्रात नारळाची लागवड मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यात असून कुलाबा, ठाणे या जिल्ह्यांत तसेच मुंबई उपनगरांत थोडे फार क्षेत्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६,४०० हेक्टर, कुलाबा जिल्ह्यात ८०० हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात ४०० हेक्टर क्षेत्रात नारळाची लागवड आहे.

हवामान : नारळांचे उत्पादन उष्ण कटिबंधात उत्तरेस व दक्षिणेस २० अक्षांशाच्या पट्ट्यांत समुद्रकिनाऱ्याच्या भागात चांगले होते. त्यापलीकडे २३° उत्तर व दक्षिण अक्षांशांपर्यंत नारळाची किफायतशीर लागवड होऊ शकते. पाऊस आणि तापमान यांना नारळाच्या लागवडीत फार महत्त्व असते. वर्षभरात विभागून पडणाऱ्या १०० – १२५ सेंमी. पावसात नारळाची लागवड किफायतशीर होते. जमीन चांगल्या निचऱ्याची असल्यास जास्त पाऊस चालतो. जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यास अथवा पाण्याची पातळी फार वर आल्यास झाडांची योग्य वाढ होत नाही. फार उष्ण अगर थंड नसलेले असे उबदार हवामान व भरपूर सूर्यप्रकाश यांची नारळाला फार जरूरी असते. दैनिक कमाल व किमान तापमानांत फक्त ६° ते ७° से. पर्यंत फरक असलेल्या व वार्षिक सरासरी २७° ते ३०° से. तापमानाच्या हवामानात माडाची वाढ उत्तम होऊन फळांचे उत्पादनही चांगले येते. नारळाची लागवड विशेषेकरून समुद्रकिनाऱ्यावर होते कारण तेथे दैनिक कमाल व किमान तापमानांत फार फरक नसतो आणि हवाही दमट असते.

भारतातील राज्यवार नारळाचे क्षेत्र आणि उत्पादन (१९७४-७५)
राज्य क्षेत्र (हेक्टर) उत्पादन (कोटी नारळ) दर हेक्टरी उत्पादन(नारळ संख्या)
अंदमान आणि निकोबार बेटे १९,४००  ·३६  ,३३० 
आंध्र प्रदेश ४०,४०० १६·७२ ,१३९
आसाम ,४०० ·०६ ,४०९
ओरिसा ११,४०० ·३३ ,६७५
कर्नाटक ,४०,५०० ७५·९८ ,४०८
केरळ ,४८,२०० ३७१·८७ ,९७०
गोवा,दीव व दमण १८,७०० ·७५ ,२१४
तमिळनाडू ,१२,३०० ९८·६६ ,७८६
त्रिपुरा ४०० ·०५ ,२५०
प. बंगाल ,७०० ·२० ,२८४
पाँडिचेरी ,६०० ·९९ १२,४३८
महाराष्ट्र ,७०० ·०६ ,८१६
लक्षद्वीप ,८०० ·१० ,५००
एकूण भारत ११,१५,५०० ५९७·१३ ,३५३

सतत टिकणाऱ्या फार दमट हवेमुळे माडाचा कोंब सडतो व इतरही रोग पडतात. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने अगर चक्री वादळांमुळे झाडांची मोडतोड होऊन फार नुकसान होते.


आ. २. केरळमधील नारळाची लागवड

नारळाची लागवड विशेषेकरून समुद्रकिनाऱ्यावर होत असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून दूरच्या प्रदेशांत त्याची लागवड होऊ शकत नाही, असा गैरसमज आढळून येतो परंतु तो खरा नाही. कर्नाटकात समुद्रकिनाऱ्यापासून २४० ते ३२० किमी. अंतरावर नारळाच्या चांगल्या बागा आढळून येतात. तसेच समुद्रसपाटीपासून ७०० मी. उंचीपर्यंत नारळाची झाडे वाढतात परंतु उत्पन्न कमी येते.

जमीन : वर्षभर ओल आणि खेळती हवा असलेल्या अनेक प्रकारच्या जमिनी नारळाला चालतात. मात्र जमिनीची खोली कमीत कमी १ मी. असावी व पाण्याचा निचरा चांगला असावा. लवणांचे प्रमाण थोडे जास्त असले, तरी चालते. त्यामुळे लवणांनी बिघडलेल्या ज्या जमिनींत दुसरी फळझाडे वाढू शकत नाहीत त्यात नारळाची झाडे लावता येतात.

जलधारणाशक्ती कमी असलेल्या आणि अतिशय कोरड्या अथवा पुरेसा पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनी नारळाच्या लागवडीस योग्य नसतात. भात खाचरांच्या बांधांवर लावलेल्या झाडांचे उत्पन्न चांगले येते कारण त्यांच्या मुळांना पुरेशी हवा व पाणी आणि पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळण्याची खात्री असते.

लागवड : जगातील एकूण नारळाच्या उत्पादनापैकी निम्मे उत्पादन आपोआप वाढणाऱ्या व खास मशागत न केलेल्या झाडांपासून मिळते. ही वस्तुस्थिती असली, तरी काळजीपूर्वक लागवड आणि खत मशागत केलेल्या बागांत आपोआप वाढणाऱ्या झाडांपेक्षा जास्त उत्पन्न येते, हे सिद्ध झाले आहे.

प्रथमच लागवडीखाली आणावयाच्या जमिनीतील झाडेझुडपे तोडून जमीन साफ केल्यावर नांगरून आणि कुळवून घेतात. अवश्य तेथे उताराला आडव्या ताली घालतात.

अभिवृद्धी : नारळाची अभिवृद्धी (नवीन झाडांची निर्मिती) न सोललेल्या फळांपासून तयार केलेल्या रोपांपासून करतात. शाकीय पद्धतीने (कंद, कळ्या इत्यादींसारख्या एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या इंद्रियांपासून वनस्पतीची अभिवृद्धी करण्याच्या पद्धतीने) या झाडाची अभिवृद्धी करता येत नाही.

रोपासाठी फळांची निवड : नारळाची फलधारणा बहुतांशी परपरागणामुळे होते त्यामुळे खात्रीने चांगले उत्पन्न देतील अशा उत्तम दर्जाच्या झाडांची रोपे पुरविणे सरकारी संस्थानाही शक्य होत नाही. यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या झाडांच्या फळांपासून रोपे करून त्यांची लागवड करणे एवढेच शक्य असते. रोपासाठी फळांची निवड करण्यासाठी खात्रीशीर पद्धत शोधून काढण्यात आली आहे. यासाठी बागेतील व बागेच्या परिसरातील झाडांची परिस्थिती लक्षात घेऊन बहुसंख्येने जोमाने वाढणाऱ्या बागांतील २५ – ३० वर्षे वयाच्या आणि दरवर्षी १०० पेक्षा जास्त फळे देणाऱ्या निवडक झाडांची फळे रोपासाठी निवडतात. मध्यम आकारमानाची व गोल फळे असणाऱ्या झाडांचे उत्पन्न जास्त येते व नारळात खोबरेही भरपूर असते, असा नेहमीचा अनुभव आहे म्हणून अशी फळे येणारी झाडे निवडतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीत फेब्रुवारी ते मे महिन्यांत तयार होणारी फळे बेण्याकरिता वापरतात. तयार झालेली फळे दोरीच्या साहाय्याने झाडावरून उतरवितात व पेंडीच्या मध्यभागातील फळे पसंत करतात. काढलेली फळे लागणीपर्यंत (पावसाळा सुरू होईपर्यंत) वाळू नयेत यासाठी ती सावलीत जमिनीवर ८ सेंमी. जाडीचा बारीक रेतीचा थर करून त्यावर देठ वर करून रचतात आणि कोरड्या वाळूने झाकून ठेवतात.

आ.३. नारळ रुजत घालण्याची योग्य पद्धत

रोपे तयार करणे : भारताच्या पश्चिम किनारपट्टीत पावसाळा सुरू झाल्यावर (मे – जूनमध्ये) फळे रुजण्यासाठी ती रेताड जमिनीत सर्वांत अरुंद बाजू खाली करून २० सेंमी. खोलीवर पुरलेल्या फळाची थोडी साल जमिनीवर दिसेल अशा बेताने आडवी पुरतात. रेताड जमीन नसल्यास वाफ्यातील माती काढून ३० सेंमी. खोलीपर्यंत रेती भरतात. वाफ्यात वरचेवर पाणी देणे आणि रोग व किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. साधारणपणे ११-१२ आठवड्यांनंतर उगवण सुरू होऊन १७-१८ व्या आठवड्यात उगवणीचे प्रमाण सर्वांत जास्त असते.

आ. ४. रुजणाऱ्या नारळाचा उभा छेद.

आ. ५. एक वर्ष वयाचे नारळाचे रोप.

रोपे कायम जागी लावणे : भारताच्या पश्चिम किनारपट्टीत आणि श्रीलंकेत रोपे लावणीचे दोन हंगाम आहेत. पहिला जून- जुलै व दुसरा ऑक्टोबर-नोव्हेंबर. यासाठी भारी जमिनीत १ मी. X १ मी. X १ मी. व वाळूच्या जमिनीत ३० सेंमी. X ३० सेंमी. X ३० सेंमी. आकारमानाचे खड्डे खणून ते अर्ध्यापर्यंत  पालापाचोळा, नारळाची चोडे वगैरे टाकून भरतात. दोन रोपांमध्ये दोन्ही बाजूंना सु. ७·५ मी. अंतर ठेवतात. चांगली वाढणारी, उंच व पानांची संख्या जास्त असलेली, ९ ते १२ महिन्यांची रोपे लावण्यासाठी पसंत करतात. वाफ्यात जेवढ्या खोलीवर रोप असते तेवढ्याच खोलीवर ते खड्ड्यात लावतात. रोपवाटिकेतून रोप काढल्यावर ते १० दिवसांत कायम जागी लावणे आवश्यक असते.

आवश्यकतेप्रमाणे पाणी देणे आणि कोरड्या हवामानात जमिनीतील ओल टिकून राहण्यासाठी झाडांच्या बुंध्याजवळची जमीन पालापाचोळ्याने झाकणे ही महत्त्वाची कामे आहेत.

समुद्राच्या खाऱ्या पाण्याने नारळाच्या झाडांना अपाय झाल्याचे कोठे दिसून आलेले नाही.


खत : नारळाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये पोटॅश महत्त्वाचे असून नायट्रोजनाचा क्रमांक त्याखाली लागतो. सामान्यतः फॉस्फरसची गरज फार कमी असते. एका वर्षाच्या झाडाला १/४ किग्रॅ. अमोनियम सल्फेट, १/३ किग्रॅ. सुपरफॉस्फेट आणि १/५ किग्रॅ. सल्फेट ऑफ पोटॅश देतात. दरवर्षी हे प्रमाण साधारणपणे दीडपट करीत सातव्या वर्षी (म्हणजे झाडाची वाढ पूर्ण झाल्यावेळी) प्रत्येक झाडाला २ किग्रॅ. अमोनियम सल्फेट, १·५ किग्रॅ. सुपरफॉस्फेट आणि १ किग्रॅ. सल्फेट ऑफ पोटॅश याप्रमाणे खत देतात. खत नेहमी झाडाच्या बुंध्यापासून दूर गोलाकार चर खणून त्यात घालतात. झाडे ६-७ वर्षांची झाल्यानंतर वरखताखेरीज ताग, शेवरी, ग्लिरिसिडिया ही हिरवळीची पिके लावून ती त्या जागीच जमिनीत गाडतात.

आंतरपिके : केरळ राज्यात नारळाच्या बागांतून टॅपिओकाची फार मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. इतर कंदमुळे व मसाल्याच्या पिकांचीही लागवड काही बागांतून करण्यात येते.

फलधारणा : लागण केल्यापासून प्रकाराप्रमाणे पाचव्या अथवा सातव्या-आठव्या वर्षी माडाला फुले येऊ लागतात. निरोगी जोमदार माडाला एका वर्षात बारा पाने व जून पानांच्या बगलेतून प्रत्येकी एक याप्रमाणे बारा फुलोरे येतात. फुलोऱ्याला पोय असे म्हणतात. पूर्ण तयार झालेली पोय उघडल्यावर फुले दिसतात. पोय उघडल्यापासून फळ पक्क होण्यासाठी १२-१३ महिने लागतात. जर १२ महिन्यांचे तयार झालेले नारळ काढले, तर त्यांचे खोबरे उत्कृष्ट दर्जाचे असते परंतु काथ्या हलक्या दर्जाचा असतो. ते जर १० महिन्यांचे काढले, तर त्याचा काथ्या उत्कृष्ट प्रकारचा असतो परंतु खोबऱ्याची प्रत हलकी असते. या परिस्थितीत तडजोड म्हणून ११ महिन्यांचे नारळ काढल्यास खोबऱ्याच्या प्रतीमधील आणि उत्पन्नातील थोडीशी घट काथ्याच्या चांगल्या प्रतीमुळे येणाऱ्या जादा उत्पन्नामुळे भरून निघते.

फळे काढणे : दर महिन्याला एक पोय निघते. त्यामुळे झाडावर वर्षभर फळे असतात परंतु ती दर महिन्याला झाडावरून काढून घेणे त्रासदायक व खर्चिक असते म्हणून ती ठराविक कालावधीने काढतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीत व पूर्वेला गोदावरी नदीच्या पट्ट्यात वर्षातून सहा वेळा, ओरिसात चार वेळा आणि आसाममध्ये दोन वेळा फळे काढतात, याला पाडप म्हणतात. यासाठी वाकबगार मजूर झाडावर चढून तयार झालेल्या फळांची पेड विळ्याने तोडून ती जमिनीवर पडू देतो. झाड उंच वाढलेले नसल्यास शिडी लावून किंवा उंच बांबूला धारदार कोयता बांधून त्याने पेड कापतात. ज्या नारळापासून गोटा खोबरे तयार करावयाचे असते ते नारळ माडावरच पूर्ण पक्व होऊन वाळले म्हणजे काढतात. मलेशिया आणि थायलंड येथे माकडांना शिकवून या कामी तयार करून त्यांच्याकडून नारळाचे पाडप करवितात.

उत्पन्न : पहिली फळे लागल्यापासून सु. पाच वर्षांनी नारळाच्या झाडांना सर्वसाधारण पीक येऊ लागते. नारळाचे उत्पन्न जमिनीचा प्रकार, पाऊसमान, हंगाम, नारळाचा प्रकार, झाडाचे वय व मशागत यांवर अवलंबून कमीजास्त येते. फक्त पावसाच्या पाण्यावर वाढणाऱ्या झाडांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ६० नारळ असते. सर्वसाधारणपणे चांगली निगा राखलेल्या आणि उन्हाळ्यात पाणी देण्याची सोय असलेल्या बागेत प्रत्येक झाडाला दरवर्षी ८० – १०० नारळ येतात. लवकर फुले येणाऱ्या झाडांना उशीरा फुले येणाऱ्या झाडांपेक्षा जास्त नारळ धरतात. निरनिराळ्या देशांत आणि एकाच देशाच्या निरनिराळ्या भागांत नारळाच्या उत्पन्नात फरक पडतो. नारळ उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांत दरवर्षी दर हेक्टरी मिळणाऱ्या नारळाची संख्या पुढीलप्रमाणे आहे : फिलिपीन्स बेटे ७,१२५ भारत ५,००० श्रीलंका ४,५०० मलेशिया ३,५०० ब्रिटिश सालोमन बेटे ३,००० (आकडे १९६० पूर्वीचे आहेत). भारतातील निरनिराळ्या राज्यांतील १९७४–७५ मधील दर हेक्टरी उत्पादन मागील कोष्टकामध्ये दिले आहे.

उन्हाळी हंगामात पाडलेले नारळ मोठ्या आकारमानाचे असतात आणि त्यांच्यामध्ये खोबरे व तेल इतर हंगामात पाडलेल्या नारळांपेक्षा जास्त प्रमाणात असते.

सर्वसाधारणपणे १२ महिने झाडावर पोसलेल्या एक हजार नारळांपासून १६२ किग्रॅ. अथवा सरासरीने दर नारळात १६२ ग्रॅ. खोबरे मिळते. वजनाच्या हिशेबाने वाळलेल्या आणि सोललेल्या नारळात ३३·३% खोबरे व खोबऱ्यापासून सर्वसाधारणपणे ६२% तेल मिळते. काही प्रकारांत ते ७५% पर्यंत असते. सोललेल्या नारळातील पाणी काढून टाकल्यावर खोबऱ्याचे प्रमाण ४०·६४ % असते.

नारळाच्या भारतातील एकूण उत्पन्नापैकी सु. ५७% उत्पन्न घरगुती वापरासाठी व धार्मिक कार्यासाठी वापरले जाते. ३५% नारळ शहाळ्यांच्या स्वरूपात विकले जातात व फक्त ८% उत्पन्न खोबरे आणि खोबऱ्याचे तेल यांसाठी वापरले जाते.

प्रकार : इतर फळझाडांमध्ये आढळून येणाऱ्या शुद्ध पैदासीच्या व स्पष्ट वर्णन करता येण्याजोग्या प्रकारांप्रमाणे नारळामध्ये शुद्ध पैदासीचे प्रकार आढळून येत नाहीत. याचे एक कारण म्हणजे नारळामध्ये आढळून येणारे परपरागण आणि दुसरे कारण म्हणजे कलम वगैरेंसारख्या शाकीय अभिवृद्धीचा नारळामध्ये अभाव असे असले, तरी नारळामध्ये काही सुस्पष्ट प्रकार आहेत आणि गुणधर्मांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये सुस्पष्ट फरक आढळून येतात. झाडाची उंची व लागणीपासून फळे धरण्यास लागणारा काळ यांवर आधारित उंच व ठेंगणा असे दोन प्रमुख प्रकार आढळून येतात.


आ. ६. नारळाचा उंच प्रकार (डावीकडील) व ठेंगणा प्रकार

उंच प्रकार : हा नारळ पिकणाऱ्या जगाच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा प्रकार आहे. या प्रकारातील झाडांचे आयुष्य सर्वसाधारण ८० ते ९० वर्षे आणि काही झाडांचे त्याहूनही जास्त असते. यांपैकी सु. ४० ते ५० वर्षांपर्यंत किफायतशीर उत्पन्न मिळते. पुढेपुढे ते कमी होत जाते. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत निरनिराळ्या हवामानांत आणि कमीजास्त पावसाच्या प्रदेशांत वाढणारा हा प्रकार आहे. तो समुद्रसपाटीपासून १,००० मी. उंचीवरील प्रदेशातही वाढू शकतो. उंची सर्वसाधारणपणे १५ ते १८ मी. अथवा त्याहूनही जास्त असते. कायम जागी लावल्यावर ८ ते १० वर्षांत फळे येण्यास सुरुवात होते. या प्रकारातील झाडे रोग व किडींना थोड्या प्रमाणात प्रतिकारक असतात. फळे तयार होण्यास १२ महिने लागतात. नारळ मध्यमपासून मोठ्या आकारमानाचे व गोलपासून लांबटगोल आकारचे आणि हिरवा, पिवळा, नारिंगी अथवा तपकिरी छटा असलेले विविध रंगांचे असतात. नारळात खोबऱ्याचे प्रमाण व खोबऱ्याची प्रत समाधानकारक असते. या प्रकारात पुष्कळ उपप्रकार जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळून येतात. भारतात कप्पाडम, अंदमान जायंट, लखदीव सामान्य, लखदीव मध्यम, लखदीव लहान, गंगाभवानी, वेरी कोब्बारी व रंगून कोब्बारी हे उपप्रकार आढळून येतात. कप्पाडम हा उपप्रकार दक्षिण मलबारात आढळून येतो. नेहमीच्या उंच प्रकारापेक्षा या झाडांचे गुणधर्म सर्वच बाबतींत चांगल्या प्रतीचे असतात. फळे आकारमानाने सर्व प्रकार-उपप्रकारांत मोठी असतात परंतु एका वर्षात फक्त ६० फळे मिळतात. खोबऱ्याची प्रत फार चांगली असून खोबरे घट्ट व जाड असते. अंदमान जायंट हा उपप्रकार अंदमानीतील असून झाडे उंच, जाडजूड आणि दिसावयास भव्य असतात. फळांचे आकारमान कप्पाडामाप्रमाणे मोठे असते, खोबऱ्याचे प्रमाण जास्त असते परंतु खोबरे पातळ व हलक्या प्रतीचे असते. झाडे रोगांचा प्रतिकार करतात. लखदीव सामान्य हा उपप्रकार नेहमीच्या उंच प्रकाराप्रमाणे असून वार्षिक फळांचे उत्पन्न १२७ असते खोबरे चांगल्या दर्जाचे असून त्यात तेलाचे प्रमाण ७५% असते. लखदीव मध्यम व लखदीव लहान या उपप्रकारांत फळांचे आकारमान लखदीव सामान्यापेक्षा अनुक्रमे लहान व फार लहान असते. बाकी गुणधर्म लखदीव सामान्याप्रमाणे असतात. पश्चिम किनाऱ्यावर ‘थैरू थैंगाई’ नावाचा उपप्रकार आढळून येतो. याचा अर्थ दह्याचा नारळ असा आहे. याच्या फळांतील खोबरे घट्ट दह्याप्रमाणे असते. खाण्यासाठी हा उपप्रकार चांगला असतो. गंगाभवानी हा उपप्रकार आंध्र प्रदेशात लागवडीत असून त्याच्या शहाळ्यातील पाणी गोड असते. वेरी कोब्बारी हा उपप्रकार लखदीव लहानप्रमाणे व रंगून कोब्बारी हा उपप्रकार अंदमान जायंटाप्रमाणे आहे. हे दोन्ही उपप्रकार आंध्र प्रदेशात आढळून येतात. उंच प्रकारातील भारताबाहेरील उपप्रकारांत न्यू गिनी, कोचीन चायना, जावा आणि सयाम हे त्या त्या देशात लागवडीत असलेले उपप्रकार प्रसिद्ध आहेत. यांपैकी पहिल्या तीन उपप्रकारांतील नारळात २०० ते २४० ग्रॅ. खोबरे असते व त्यांत ६६% तेल असते. सयाम उपप्रकाराच्या नारळातील पाणी गोड असते व खोबऱ्यात ७४% तेल असते परंतु त्याचे उत्पन्न कमी येते.

ठेंगणा प्रकार: फळाच्या रंगाप्रमाणे या प्रकारात हिरवा, नारिंगी व पिवळा असे उपप्रकार आहेत. माडांना लवकर म्हणजे लागवड केल्यापासून ३ ते साडेतीन वर्षानी फळे येऊ लागतात आणि पेंडीत पुष्कळ फळे असतात. नारळ मोहक रंगाचे असल्यामुळे त्यांचा उपयोग सजावटीच्या कामासाठी करतात. नारळ अगदी लहान आकारमानाचे, गोल किंवा अंडाकृती असतात. शहाळ्यातील पाणी गोड असते. प्रत्येक नारळात ९० ग्रॅ. वजनाचे चामड्यासारखे चिवट खोबरे असते. व्यापारी दृष्ट्या खोबरे महत्त्वाचे नसते. शिवाय झाडाला अनेक रोग आणि कीटकउपद्रवामुळे अपाय होण्याचा जास्त संभव असतो. या प्रकारच्या झाडाचे आयुष्य ३० ते ४० वर्षेच असते. या सर्व कारणांमुळे हा माडाचा प्रकार कधीच किफायतशीर ठरलेला नाही.

रोग : महाराष्ट्रात नारळाच्या पिकाच्या बाबतीत रोगांपेक्षा कीटकउपद्रवाला फार महत्त्व आहे. रोगांमुळे व्यापारी दृष्ट्या फारसे नुकसान होत नाही परंतु दक्षिण भारतात व विशेषतः केरळ राज्यात तेथील हवामानामुळे रोगांचे फार प्राबल्य असते. महत्त्वाच्या रोगांचे व किडींचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

कोंब कुजणे व फळे गळणे : फायटोप्थोरा पामीव्होरा या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा हा गंभीर रोग असून तो भारतात सर्वत्र आढळून येतो. झाडाच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग उद्‌भवतो परंतु विशेषतः १५ ते ४५ वर्षे वयाच्या झाडांमध्ये तो प्रामुख्याने आढळून येतो. प्रथम शेंड्याजवळील कोवळी पाने वाळतात आणि कालांतराने मोडून पडतात. पुढे झाडाचा कोंब कुजतो व झाड मरते. पावसाळ्यातील सोसाट्याच्या वाऱ्यामार्फत हा रोग पसरतो. उपाय म्हणून रोगाच्या प्रथमावस्थेत रोगट झाडावर व आसपासच्या ४० मी. परिसरातील सर्व झाडांवर १% बोर्डो मिश्रण फवारतात. रोगाने कोंब कुजलेला आढळल्यास रोगट झाड तोडून नष्ट करतात. पावसाळ्यापूर्वी मोरचूद, चुना आणि मीठ यांचे समप्रमाणातील मिश्रण रोगट झाडाच्या आसपासच्या ४० मी. परिसरातील झाडांच्या कोंबांवर पसरल्याने आंध्र प्रदेशात या रोगाला आळा बसल्याचे आढळून आले आहे.

कोळे रोग : (महाली किंवा फळे कुजणे). सुपारीच्या झाडावर पडणारा हा रोग जेव्हा सुपारी आणि नारळ यांची एकत्र लागवड केलेली असते तेव्हा नारळाच्या झाडावरही आढळतो. फायटोप्थोरा रेकी  या कवकामुळे हा रोग पावसाळी हंगामात जास्त प्रमाणात आढळतो. कोवळी व पक्व फळे सुरकुतल्याप्रमाणे होऊन कुजतात व गळतात. रोगाच्या पुढील अवस्थेत झाडाचा कोंब कुजतो आणि झाड मरते. फार रोगट झाडे व जमिनीवर पडलेली फळे जाळून नष्ट करतात. रोगाचे प्रमाण कमी असल्यास १% बोर्डो मिश्रण जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि पुन्हा जुलैच्या मध्यावर फवारतात.

खोडातून स्राव बाहेर येणे : सिरॅटोस्टोमेला पॅराडॉक्सा या कवकामुळे होणारा हा रोग आंध्र प्रदेश, आसाम, केरळ आणि तमिळनाडूत नारळाखेरीज ताड, सुपारी, ऊस व अननस यांवर आढळून येतो. खोडाला भेगा पडतात व त्यांतून गडद लालसर तपकिरी रंगाचा स्राव वाहतो. पाण्याचा चांगला निचरा नसलेल्या जमिनीतील झाडांना हा रोग विशेषकरून होतो. उपाय म्हणून खोडाचा रोगट भाग काळजीपूर्वक तासून त्यावर गरम डांबर लावतात वा बोर्डो खळ लावतात.


पाने कुजणे :केरळात हा महत्त्वाचा रोग आहे. तीन प्रकारच्या कवकांमुळे हा रोग होतो. कोवळ्या पानांच्या पर्णिकांची टोके काळी पडतात व वाळल्यावर त्याचे तुकडे पडून ते वाऱ्याबरोबर उडतात. रोगग्रस्त पाने पंख्याच्या आकाराची दिसतात. रोगाची वाढ मंद गतीने होते झाड मरत नाही परंतु पानांचा विस्तार कमी झाल्यामुळे उत्पन्न घटते. उपायाकरिता माडाच्या पर्णविस्तारावर बोर्डो मिश्रण वर्षातून तीन वेळा फवारतात. तसेच पोटॅशयुक्त खत घालतात.

मर : हा बहुधा व्हायरसमुळे होणारा रोग केरळात ४०,००० हे. क्षेत्रात आढळून येतो व त्या भागात तो सर्वांत महत्त्वाचा रोग आहे. हा सार्वदेहिक व सांसर्गिक रोग असून त्यामुळे पाने वाळतात शेंड्याकडील भाग लहान होत जातो व फळांची संख्या कमी होऊन ती चांगल्या प्रतीची नसतात. मुळांची वाढ खुरटते व ती टोकाकडून वाळत जातात. या रोगावर खात्रीशीर इलाज नाही.

कीड : गेंडा भुंगेरा :  (ओरिक्टिस ऱ्हिनोसेरॉस). माडाला या किडीपासून सर्वांत जास्त उपद्रव पोहोचतो. ही कीड भारतात सर्वत्र आणि विशेषतः अंदमान बेटे, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ, लक्षद्वीप, महाराष्ट्र, कर्नाटक, निकोबार आणि पश्चिम बंगाल येथे जास्त उपद्रवी आहे. लहान वयाच्या झाडांना या किडीचा विशेष उपद्रव होतो. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल, तर काही वेळा झाडे वठून मरतात. या किडीमुळे दरवर्षी १०% नुकसान होते असा अंदाज आहे. भुंगेरे माडाच्या कोवळ्या शेंड्यात भोक पाडून आत शिरतात. भोकातून बाहेर पडणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे या किडीचे अस्तित्व व नुकसान कळून येते. भुंगेऱ्याची प्रथमावस्था (डिंभक) खताच्या खड्ड्यात किंवा वाळलेल्या झाडाच्या खोडात वाढते. याकरिता वाळलेली व कुजणारी माडाची खोडे जाळून नष्ट करतात. बागेत कुजणारा पालापाचोळा जमिनीत खोल पुरतात. खताच्या खड्ड्यावर बीएचसी भुकटी पिस्कारतात. झाडाच्या शेंड्यातील भुंगेरे तारेच्या आकड्याने काढून नष्ट करतात आणि त्यांची भोके वाळू व ५०% बीएचसी पूड यांच्या समसमान मिश्रणाने भरून काढतात. [→ गेंडा भुंगेरा].

सोंड्या : (ऱ्हिंकोफोरस फेरुजिनियस). भारतात सर्वत्र सात वर्षांपर्यंतच्या माडांना या किडीपासून विशेष उपद्रव होतो. या किडीच्या फक्त अळ्यांमुळेच नुकसान होते. मादी खोडाला भोक पाडून अगर खोडाला दुखापत झाली असेल अशा जागी अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडल्यावर अळ्या खोडाच्या गाभ्यातील नरम भागावर उपजीविका करतात. झाडांचे पुष्कळसे नुकसान झाल्यावरच किडीचे अस्तित्व कळून येते. झाडाची पाने वाळतात व त्यांचे देठ तडकतात. उपाय म्हणून माडावरील भोके, भेगा व इतर दुखापत झालेल्या भागांना डांबर लावतात अथवा ते भाग बीएचसी व वाळू यांच्या मिश्रणाने भरून घेतात. १% पायरोकोन-ई हे कवकनाशक पाण्यात मिसळून कीड लागलेल्या जागी पिचकारीने भरतात.

आ. ७. माडावरील उंदरांचा उपद्रव थांबविण्याचा उपाय.

काळ्या डोक्याचे सुरवंट   (नेफँटिस सेरिनोपा). हे सुरवंट पर्णकाच्या खालच्या बाजूवर रेशमासारखे तंतू आणि विष्ठा यांच्या आत बोगद्याप्रमाणे घर करून राहतात व पानाची खालची बाजू खातात. यामुळे पानावर वाळलेले पट्टे दिसून येतात. किडीचा उपद्रव जास्त असल्यास फलधारणेवर प्रतिकूल परिणाम होतो व काही वेळा झाड वठते. याकरिता ०·२% डी डी टी अगर बी एच सी पाण्यातून पानांवर फवारतात.

वाळवी वाळवी मुळे विशेषतः कोवळ्या झाडांचे फार नुकसान होते. कीड लागलेल्या झाडावर ०·२% डीडीटी फवारतात [→ वाळवी].

यांशिवाय पॅराडॅसिनस, अँब्लिपेल्टा कोकोफॅगा, अँब्लिपेल्टा ट्युटिसेन्स, स्यूडोथेरॅप्टस वायी  या किडींचा भारतात व इतर देशांत उपद्रव होतो, असे आढळून आले आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी ५०% बीएचसी, कार्बारिल यांची फवारणी करतात.

उंदीर : हे लहानमोठी फळे खातात. दाटीवाटीने झाडे असलेल्या बागेत उंदीर एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडी मारू शकतात. झिंक फॉस्फॉइड विषाचे आमिष ठेवून, बिळांत विषारी वायू सोडून आणि खोडाभोवती सरळ उभे अथवा तिरके पत्रे ठोकून उंदरांचा बंदोबस्त करतात (आ. ७). पत्र्यांमुळे उंदीर झाडावर चढू शकत नाहीत. याशिवाय फ्लाईंग फॉक्स (वटवाघळासारखे उडणारे आणि कोल्ह्यासारखे तोंड असणारे प्राणी; कुल – टेरोपोडिडी) हे कोवळ्या नारळाची शेंडी आणि करवंटी यांना भोक पाडून नारळातील पाणी पितात आणि खोबरे खातात. यावर खात्रीशीर इलाज नाही.

रोग व किडी यांखेरीज तडिताघातामुळे (वातावरणीय विद्युत् आघातामुळे) व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

रुईकर, स. के.

पहा : काथ्या खोबरे.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

           2. Menon, K. P. V. Mandalai, K. M. The Coconut Palm, Ernakulam, 1958.

3. Piggot, C.J. Coconut Growing, London, 1964.

४. नागपाल, रघबीरलाल म. भा., पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्वे आणि पद्धती, मुंबई, १९६३.