मेथी : (हिं. मेथी, मुथी क. मेंते, मेंथेपल्ले सं. मेथिका, चंद्रिका इं. फेनुग्रीक लॅ. ट्रायगोनेला फीनम-ग्रीकम कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). देशी मेथी या नावाने ओळखली जाणारी ही उग्र वासाची वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) ⇨ ओषधी सु. ३०–६० सेंमी. उंच वाढते. ती मूळची द. यूरोपातील असून भारत, पाकिस्तान, इराण, ईजिप्त, इथिओपिया, भूमध्य सामुद्रिक, प्रदेश, फ्रान्स इ. देशांत तिचा प्रसार आहे. अमेरिकेतही ती थोड्या प्रमाणात लागवडीत आहे. भारतात ती काश्मीर, पंजाब व गंगेच्या उत्तरेकडील सपाट प्रदेशांत रानटी अवस्थेत आढळते. हे थंड हवमानातील पीक असल्यामुळे भारतात त्याची लागवड उत्तरेकडील भागात विशेष प्रमाणावर करतात. पाने एकाआड एक व संयुक्त दले तीन, भाल्यासारखी किंवा व्यस्त अंडाकृती, २ ते २·५ सेंमी. लांब, थोडी दातेरी उपपर्ण लांबट आणि अखंड फुले लहान, पांढरी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत) १–२, बिनदेठाची असतात शिंबा (शेंगा) ५–७·५ सेंमी. लांब, सरळ, चपट्या व टोकदार असतात बिया १०–२०, हिरवट तपकिरी, २·५–५·० X २·०–३·५ मिमी. व आयत. बियांच्या टोकाला दोन्ही बाजूंना तिरप्या खाचा असतात व त्यामुळे बियांचा आकार आकडीसारखा दिसतो.

या पिकात झाडाच्या उंचीवरून मेथी व मेथा असे दोन प्रमुख भेद आहेत. मेथी हा प्रकार बुटका असून त्याचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून करण्यात येतो. मेथा हा उंच वाढणारा प्रकार असून त्याची लागवड पंजाबात वैरणीसाठी करतात. 

जमदाडे, ज. वि. 

(अ) मेथी (आ) मेथा : (१) शेंगांसहित झाड, (२) बिया.भारतात मेथीची लागवड पालेभाजी, वैरण आणि दाणे यांसाठी केली जाते. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांत या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. महाराष्ट्रात या पिकाखालील सु. ५०० हे. क्षेत्र आहे आणि ते अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांत आहे. हे मुख्यतः रबी हंगामातील पीक असले, तरी पालेभाजीसाठी ओलिताची सोय असलेल्या भागात ते वर्षाच्या कोणत्याही ऋतूत घेता येते. मध्यम अथवा कमी पावसाचे प्रदेश या पिकाच्या लागवडीला अनुकूल असतात. या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते परंतु भारी अथवा मध्यम प्रकारची दमट जमीन चांगली. भारी काळ्या जमिनीतही कापसानंतर हे पीक समाधानकारक वाढते.

पालेभाजीचे पीक: पालेभाजीच्या बागायती पिकासाठी जमीन दोनदा नांगरून हेक्टरमध्ये २०–२५ टन शेणखत मिसळून व कुवळून तयार केलेल्या जमिनीत ३·५ X २ मी. मापाचे वाफे करून त्यांमध्ये प्रत्येकी सु. ८० ग्रॅम बी मुठीने फोकून ते मातीत मिसळून पाणी देतात. पुढे दर ७–८ दिवसांनी पाण्याची पाळी देतात. पाल्याचे उत्पन्न जास्तीत जास्त मिळण्यासाठी पेरणीनंतर १ महिन्याने हे. ४५ किग्रॅ. अमेनियम सल्फेट देतात व त्यानंतर भाजीच्या दर दोन तोड्यानंतर तितकेच अमोनियम सल्फेट वरखत म्हणून देतात. भाजीसाठी पीक काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पेरणीनंतर ४–५ आठवड्यांत फुले येण्यापूर्वी झाडे मुळासकट  उपटून  त्यांच्या  पेंड्या  बांधून  त्या  बाजारात  विक्रीसाठी पाठवितात. दुसऱ्या पद्धतीत पेरणीपासून २० दिवसांनंतर झाडांचा जमिनीपासून २ ते ३ सेंमी. वरील भाग खुडतात. त्या वेळी झाडाला ३ ते ४ पाने फुटलेली असतात. खुडलेला पाला विक्रीसाठी पाठवितात. पुढे दर १२–१५ दिवसांनी खालचा भाग ठेवून कापणी करतात. २ ते ३ कापण्यानंतर झाडे बी धरण्यासाठी ठेवतात अथवा ४–५ कापण्यानंतर झाडे उपटून टाकतात. हे. ८,००० ते ९,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते.

दाण्यांसाठी पीक: वरीलप्रमाणे जमिनीची मशागत करून पाभरीने सु. २५ सेंमी. अंतरावर ओळीत बी पेरतात व कुळवाने अगर फळीने झाकून घेतात. हे. ३०–३५ किग्रॅ. बी लागते. भारी काळ्या जमिनीत दोन ओळीत ४५ सेंमी. अंतर ठेवतात व हे. २० ते २२ किग्रॅ. बी पेरतात. बागायती पिकास दर ८–१० दिवसांनी पाणी देतात. हे पीक कोरडवाहूही घेता येते. पेरणीपासून सु. १५५ दिवसांनी शेंगा तयार होतात. पीक उपटून भारे बांधून खळ्यावर नेऊन वाळू देतात व मळणी करून दाणे साफ करतात.

कोरडवाहू पिकाचे हेक्टरी ५०० किग्रॅ. व बागायती पिकाचे ९०० ते १,००० किग्रॅ. दाणे मिळतात. उत्तर भारतात १,५०० ते १,९०० किग्रॅ. पर्यंत उत्पादन मिळते.

प्रकार : महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे क्र. ४७ व क्र. १४ हे सुधारित प्रकार लागवडीसाठी देण्यात आले आहेत. क्र. ४७ चे उत्पादन स्थानिक प्रकारंपेक्षा २१% व क्र, १४ चे १८% जास्त मिळते. दोन्ही प्रकारांत स्थानिक प्रकारांपेक्षा क जीवनसत्त्व जास्त असते. नवी दिल्ली येथील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने पुसा अर्ली बंचिंग व ई. सी. ४९११ हे प्रकार लागवडीसाठी दिले आहेत. पेरणीपासून हे प्रकार अनुक्रमे १२५ आणि १६५ दिवसांत तयार होतात.


उपयोग : बिया उग्र वासाच्या असून त्यांची चव चिकट, पिठासारखी व कडवट असते. त्यांचा उपयोग स्वयंपाकात मसाल्यासारखा आणि पदार्थांना स्वाद आणण्यासाठी करतात. ताज्या व वाळलेल्या पानांचा उपयोग भाजीसाठी आणि जनावरांना खाऊ घालण्यासाठी करतात. बिया पाचक, शक्तीवर्धक, दुग्धोत्पत्तिप्रवर्तक (दूध वाढविणाऱ्या) आणि शीतकरी असतात. गळवे, व्रण व फोड यांसाठी बियांचे पोटीस लावतात. आणि आतड्यातील सुजेवर, तसेच प्लीहा (पानथरी) व यकृताच्या वाढीवर बिया शिजवून अथवा भाजून देतात. बियांचा फांट (काढा) आतड्याची सूज, घसादुखी व संधिवात यांवर उपयोगी आहे. भाजलेल्या जागेवर पानांचा लेप लावतात. बियांत अ आणि पानात अ व ब जीवनसत्त्वे असतात. बियांचा उपयोग पशुवैद्यकातही करतात.

साठविलेल्या धान्याचे किडीपासून रक्षण करण्यासाठी पंजाबात मेथीची वाळलेली झाडे धान्यात मिसळतात.

दक्षिण भारतात डोसा हा पदार्थ बनविताना मेथीच्या बियांचा काही प्रमाणात वापर करतात.

बियांतील श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थाचा वापर पाण्यातील सूक्ष्म गाळ खाली बसण्यासाठी तुरटीप्रमाणे करता येतो व तुरटीबरोबर त्याचा वापर केल्यास तुरटीचा वापर कमी प्रमाणात करणे शक्य होते.

बियांत डायोसजेनीन नावाचे स्टेरॉइड [⟶ स्टेरॉल व स्टेरॉइडे] असते. या स्टेरॉइडाचा उपयोग

संततिनियमनासाठी वापरावयाच्या गोळ्यांच्या उत्पादनात व इतर अनेक औषधांत करतात. डायोसजेनिनाचा तुटवडा भरून काढण्यासाठी मेथीचा उपयोग काही प्रमाणात करता येईल, असे आढळून आले आहे.

कसूरी मेथी : (हिं. कस्तुरी मेथी, मारवाडी मेथी, चम्पा मेथी लॅ. ट्रायगोनेला कॉर्निक्युलॅटा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). तीस सेंमी. अथवा जास्त उंच वाढणारी ही वर्षायू ओषधी पसरट, काहीशी  सरळ  वाढीची.  तीव्र-गंधी असून  ती  पश्चिम हिमालयात १,५०० ते ३,६०० मी. उंचीवर आणि पूर्वेकडे बिहार व पश्चिम बंगालमध्ये तणासारखी वाढते. पाने संयुक्त, पिसासारखी, दले १·२५ ते २ सेंमी. लांब, व्यस्त अंडाकृती व तळाकडे टोकदार असून किनार काहीशी खंडित दातेरी असते. फुले नारिंगी पिवळट असून ती गर्द  मंजिरीत येतात. शिंबा १·२ ते २·० सेंमी. लांब, कोयत्यासारख्या. बिया ४–८, कडवट अथवा तुरट व स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) असतात. दाण्यांसाठी व पालेभाजीसाठी या पिकाची लागवड उत्तर भारतात विशेषेकरून पंजाब व राजस्थानात होते. देशी मेथीची तुलना करता या पिकाची वाढ सुरुवातीला संथगतीने होते व जवळजवळ शेवटपर्यंत झाड गुच्छासारखे दिसते. देशी मेथीची फुले पांढरी व शेंगा सरळ व ६–७ सेंमी. लांब असतात, तर कसूरी मेथीची फुले नारिंगी पिवळट असून शेंगा आखूड व कोयत्याच्या आकाराच्या असतात. या पिकाची लागवड देशी मेथीप्रमाणेच करतात परंतु पालेभाजीच्या पहिल्या तोडणीसाठी हे पीक देशी मेथीपेक्षा ५ ते १० दिवसांनी उशिरा येते. दाण्यांचे उत्पादन देशी मेथीपेक्षा बरेच कमी म्हणजे सु. ७५० किग्रॅ मिळते. दाण्यांचा उपयोग खाद्य पदार्थांना स्वाद आणण्यासाठी करण्यात येतो. या प्रकारच्या मेथीची वाळलेली पाने वर्षभर मिळतात.

पाटील, ह. चिं. गोखले, वा. पु.

संदर्भ :  1. Choudhary, B. Vegetables, New Delhi, 1967.

              2. C. S. I. R. The Wealth of India, Raw materials, Vol. X, New Delhi, 1976.