मसूर : (हि. मसूर गु. मसुरी क. चनंगी, मास्सूर सं. मसुरिका, मसुरा इं. लेंटिल लॅ. लेस क्युलिनॅरिस लें. एस्क्युलेंटा कुल-लेग्युमिनोजी). हे एक कडधान्य आहे. याचे मूलस्थान आशिया मायनर, इराण किंवा हिंदुकुश असावे. मसुराचे खाद्यान्न म्हणून महत्त्व बायबल काळतही माहीत होते, असे दिसते. याचे उत्पादन वेदकाळत होत असे. कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या ग्रंथांतही याचे उल्लेख आहेत. भारताखेरीज जगातील अनेक देशांत मसूराची लागवड होते परंतु लागवड भारतात या पिकाखाली जगातील इतर देशांच्या तुलनेने जास्त क्षेत्र आहे.
वनस्पती वर्णन : मसुराचे झाड ही काहीशी वेलासारखी, लहान, सरळ वाढणारी, लवदार व प्रतानयुक्त (तणावे असलेली) ⇨ओषधी आहे. हिची उंची १५-७५ सेंमी. आणि पाने संयुक्त पिसासारखी व एकांतरिक (एका आड एक) असतात. उपपर्णे दोन व रेषाकृती आणि दलांच्या ५-७ जोड्या असतात. फुले लहान, निळसर, पांढरी, गुलाबी वा लाल, एकेकटी किंवा २-४, मंजऱ्यांवर [⟶ पुष्प बंध] पानांच्या बगलेत येतात आणि ती ⇨अगस्त्याप्रमाणे पतंगरूप असतात [⟶ फूल]. शिंबा (शेंग) चपटी, लांबट गोलसर, एक ते दीड सेंमी, लांब, गुळगुळीत असून तिच्यात दोन किंवा तीन वाटोळ्या, काहीशा चपट्या, बहिर्गोल भिंगासारख्या, लालसर, पिंगट किंवा तपकिरी रंगाच्या बिया असतात. हिची इतर शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णन केल्या प्रमाणे असतात.
लागवडीचे देश : भारत, पाकिस्तान, स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस, मोरोक्को, अल्जीरिया, ईजिप्त, इथिओपिया, जॉर्डन, सिरिया, तुर्कस्तान, अर्जेटिना, एक्वादोर, चिली इ. देशांत या पिकाची लागवड होते परंतु क्षेत्र व उत्पादन या बाबतींत भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे. १९७८ साली जगात या पिकाखाली १९ लक्ष ४७ हजार हेक्टर
मसुराचे सुधारित प्रकार
सुधारित प्रकार |
पेरणीपासून तयार होण्यास लागणारे दिवस |
हेक्टरी उत्पादन (किग्रॅ.) |
लागवडीसाठी अनुकूल प्रदेश |
झाडाच्या वाढीची वैशिष्ट्ये |
दाण्याचे गुणधर्म व इतर माहिती |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
टी ८ |
१२०-१३० |
१,४०० |
उत्तर प्रदेश |
ठेंगणा व मध्यम पसरणारा प्रकार. |
द्राणा मोठ्या आकारमानाचा |
टी ३६ |
१३०-१४० |
१,६०० ते १,८०० |
सर्व देशभर, विशेषत: उत्तर प्रदेश |
ठेंगणा व मध्यम पसरणारा प्रकार. |
दाणा गुलाबी करड्या रंगाचा, निरनिराळ्या रंगांचे ठिपके असलेला, मध्यम आकारमानाचा. |
क्षेत्र होते व १२ लक्ष १९ हजार टन उत्पादन झाले. भारतात त्या वर्षी ९ लक्ष २७ हजार हेक्टर क्षेत्र होते व ४ लक्ष ३४ हजार टन उत्पादन झाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि त्या खालोखाल पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र व गुजरातमध्ये या पिकाची लागवड होते. दक्षिण भारतात हे पीक महत्त्वाचे नाही.
हवामान, हंगाम व जमीन : हे पीक उत्तर भारतातील सखल प्रदेशापासून काश्मीरमधील लडाख भागापर्यंत (३,४५० मी. उंचीवर) लागवडीत आहे. तसेच हे उत्तर भारतीतील हलक्या, दुमट आणि गाळाच्या जमिनीत आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील चांगल्या निचऱ्याच्या, मध्यम काळ्या जमिनीत चांगले वाढते. पंजाबात खोलगट भागातील हलक्या जमिनीतही याची लागवड करतात. हे सर्वसाधारणपणे रबी हंगामातील जिरायती पीक आहे. भाताचे पीक काढल्यावर स्वतंत्र पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर हे घेतात. तसेच भाताचे पीक कापण्यापूर्वी उभ्या पिकात मसुराचे बी फोकून पेरण्याचीही पद्धत काही भागांत प्रचलित आहे. काही वेळा हे सातू किंवा मोहरीच्या पिकात मिश्रपीक म्हणूनही घेतात. पावसाळ्यानंतर लागण केलेल्या उसाच्या पिकात हे आंतरपीक म्हणूनही घेण्याचा प्रघात आहे. थोड्या प्रमाणात लवणता असलेली जमीन या पिकाला चालते. महाराष्ट्रात हे पीक खरीपाच्या हंगामात तृणधान्याबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात आणि रबी हंगामात याचे स्वतंत्र पीक घेतात.
प्रकार : फुलाचे रंग, शेंगा व बिया यांमध्ये या पिकात पुष्कळ भिन्नता आढळून येते. मोठा, मध्यम व लहान असे बियांच्या आकरमानाप्रमाणे प्रकार आढळूत येतात. बियांवर निराळ्या रंगछटा आढळून येतात. हवामान व जमीन यांनुसार या पिकात भिन्नता आढळून येते. जिच्यात कापूस पिकविला जातो, अशा काळ्या जमिनीत वाढणाऱ्या प्रकारांची मुळे उथळ व शाखायुक्त असून त्यांवर सूक्ष्मजंतू असलेल्या ग्रंथी (गाठी) मोठ्या संख्येने आढळून येतात. पंजाबसारख्या रुक्ष हवामानाच्या प्रदेशातील जमिनीत वाढणाऱ्या झाडांची मुळे वरील दोन भिन्न प्रकारांच्या मध्ये मोडणारी असतात. खोलवर जाणारी मुळे असलेल्या झाडांच्या फांद्या कमी प्रमाणात फुटतात बियांचे उत्पादनही कमी येते परंतु बियांचे आकारमान मोठे असते. विशेष खोल न जाणारी मुळे असलेल्या झाडांना पुष्कळ फांद्या फुटतात व उत्पादनही जास्त येते मात्र बियांचे आकारमान लहान असते. व्यापारात मसुराचे दोन प्रकार ओळखले जातात. मोठ्या आकारमानाच्या बिया असलेल्या प्रकाराला ‘मसूर’ व लहान आकारमानाच्या बियांच्या प्रकाराला ‘मसरी’ अशी नावे आहेत.
मसुराचे पुष्कळ सुधारित प्रकार लागवडीसाठी देण्यात आले आहेत. त्यांची तपशीलवार माहिती कोष्टकात दिली आहे.
वरील प्रकारांशिवाय डब्ल्यू. बी. ८१ व डब्ल्यू. बी. ९४ या प्रकारांची पश्चिम बंगालसाठी शिफारस करण्यात आली आहे.
मसूराचे सुधारित प्रकार (पुढे चालू)
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
पुसा-१ |
११५-१२० |
१,२०० |
उत्तर प्रदेश |
झाडे पसरणारी |
दाणा मध्यम आकारमानाचा. |
पुसा-६ |
१४० |
१,३०० |
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश. |
झाडे उंच वाटणारी व कमी पसरट. |
दाणा लहान व करड्या रंगाचा, ठिपके असलेल्या. |
एल ९- १२ |
१५०-१६० |
१,८०० ते २,००० |
सर्व देशभर, विशेष करून हरियाना व पंजाब. |
झाडे ठेंगणी व मध्यम पसरणारी. |
दाणा काहीसा मोठ्या आकार मानाचा, गुलाबी रंगाचा व निरनिराळ्या रंगाचे ठिपके असलेला. हा तांबोरा रोगाला काहीसा प्रतिकारक प्रकार आहे. |
पंत एल २०९ |
१५२ |
१,६०० ते १,७०० |
सर्व देशभर |
झाडे मध्यम उंच व मध्यम पसरणारी. |
दाणा गुलाबी- करडा, ठिपकेदार, आकारमानाचा. तांबोरा रोगास प्रतिकारक व मर रोगाला पुष्कळसा प्रतिकारक प्रकार आहे. |
एत एल २३४ |
१३०-१४० |
– |
उत्तर प्रदेश |
झाडे मध्यम पसरणारी. |
दाणा मोठा करड्या रंगाचा व ठिपकेदार तांबोरा आणि मर रोगांना हा प्रकार प्रतिकारक आहे. |
पंत एल ४०६ |
१५० |
२,५०० ते ३,०० |
सर्व देशभर, नेहमीच्या वेळी पेरणीसाठी आणि भात काढल्यावर उशीरा पेरणीसाठी योग्य |
उंच वाढणारा व मध्यम पसरणारा प्रकार. |
दाणा मध्यम आकारमानाचा तांबेरा व मररोगांस प्रतिकारक प्रकार. |
व्ही आर. २५ |
१३५ |
१,२०० ते १,३०० |
बिहार व पश्चिम बंगाल. |
झाडे मध्यम उंचीची व पसरणारी. |
दाणा मध्यम आकारमानाचा. |
पूर्व मशागत व पेरणी: या पिकासाठी फार मोठ्या प्रमाणावर जमिनीची मशागत करीत नाहीत. पंजाब व उत्तर प्रदेशात हे पीक भाताच्या पिकानंतर खोलगट शेतात घेण्यास येते. तेथे फक्त एक अगर दोन वेळा जमीन नांगरली जाते. भारी काळ्या जमिनी पावसाळ्यानंतर नांगरून कुळवाने ढेकळे बारीक करतात. या पिकाची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सेंमी. अंतरावर ओळीत पाभरीने पेरतात. मिश्रपिकासाठी हेक्टरी २०-२५ किग्रॅ. व स्वतंत्र पिकासाठी ५० किग्रॅ. बी लागते. बियांच्या आकारमानाप्रमाणे कमीजास्त प्रमाणात बी लागते. पाणी देण्याची सोय असल्यास जानेवारी महिन्या पर्यंत ही पेरणी करतात.
पेरणीनंतरची मशागत, खत व पाणी : सर्व साधारणपणे पेरणीनंतर या पिकाची कोणतीच मशागत केली जात नाही परंतु त्यामुळे उत्पादन फार कमी मिळते. पेरणीनंतर सु. ३५ दिवसांनी खुरपणी व अधून-मधून कोळपणी केल्यास उत्पादनात वाढ होते. रबी हंगामातील कडधान्यांच्या पिकांमध्ये मसुराचे पीक रुक्षताविरोधक आहे. तथापि पीक फुलावर असताना (पेरणीनंतर सु. ४५-६० दिवसांनी) पाणी दिल्यास उत्पादन वाढते. या पिकाला सर्वसाधारणपणे कोणतेही खत दिले जात नाही परंतु हेक्टरी १० किग्रॅ. नायट्रोजन व १४ किग्रॅ. फॉस्फरस पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून देण्यामुळे उत्पादन वाढते, असे दिसून आले आहे. तसेच पेरणीपूर्वी बियांना सूक्ष्म जंतुसंवर्धक ) लावण्याने ही उत्पादन भर पडते.
या पिकावर ⇨⇨मर व ⇨⇨तांबेरा हे महत्त्वाचे रोग आढळून येतात. या दोन्ही रोगांना प्रतिकारक असलेल्या प्रकारांचा उल्लेख ‘प्रकार’ या सदराखाली आला आहे.
कापणी, मळणी व उत्पादन : पेरणीनंतर साडेतीन महिन्यांनी पीक तयार होते. पूर्ण वाळण्यापूर्वीच पीक कापून खळ्यावर एक आठवडा वाळू दिल्यानंतर मळणी व उफगणी करून दाणे वेगळे काढतात. वाळू दिल्यानंतर मळणी व उफगणी करून दाणे वेगळे काढतात. पाणी न देता घेतलेल्या पिकाचे हेक्टरी उत्पादन ४ ते ५ क्विंटल मिळते. पाणी दिल्यास ८ ते ९ क्विंटल मिळते. वर उल्लेख केलेल्या शिफारशींप्रमाणे (सुधारलेल्या प्रकारांच्या बियांचा वापर, खत, पाणी वगैरे) लागवड केल्यास २ ते २.५ टन उत्पादन मिळू शकते.
रासायनिक संघटन व उपयोग : दाण्याचे आकारमान व शिजण्याची क्षमता यांबाबतींत या पिकात लागवडीच्या प्रदेशानुसार बरीच भिन्नता आढळून येते. बियांचे सर्वसाधारण रासायनिक संघटन पुढीलप्रमाणे आहे : जलांश १२.५%, प्राथिने २.५.१% स्निग्ध पदार्थ ०.७%, कार्बोहायड्रेटे ५९.७%, लवणे २.१%. मसुराचे आहारातील महत्त्व त्यातील प्रथिनांमुळे (सर्वसाधारण २५% व काही प्रकारांच्या बियांमध्ये ३०% पर्यंत) आहे. पोषणाच्या दृष्टीने भारतात पिकणाऱ्या कडधान्यांत हरभरा व उडीद यानंतर मसुराचा क्रमांक लागतो. बियांच्या उगवणीमध्ये त्यांतील प्रथिनांचे जैवमूल्य वाढते. मसुराच्या बियांत ब गटातील जीवनसत्त्वे व काही प्रमाणात क जीवनसत्त्व आढळून येतात. बियांच्या उगवणीच्या अवस्थेत जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते. भारतात मसुराचा उपयोग उसळ व डाळीची आमटी यांसाठी आणि उत्तर प्रदेशात दाल मोठ नावाचा खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो. अपक्व बियांची उसळ करतात. सातू (बार्ली) किंवा इतर तृणधान्यांच्या पिठात मसुराचे पीठ मिसळून ते आजारी व्यक्तींचे अन्न म्हणून काही देशांत विकले जाते. मसुराला पाला व भुसा जनावरांना खाऊ घालतात. काश्मीर खोऱ्यात भात पिकाच्या लागवडीमध्ये मसुराच्या ओल्या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात.
शौचास साफ न होण्याच्या व आतड्याच्या इतर विकारांवर हे धान्य फायदेशीर असते. टरफले स्तंभक (आकुंचन करणारी) आणि रक्तरोधक (स्त्राव थांबविणारी) असतात.
पहा : कडधान्ये.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol, VI, New Delhi, 1962.
2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.
परांडेकर, शं. आ. पाटील, ह. चि. गोखले, वा. पु.
“